दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 18

Drushti, Drushtikon, ani, sight, vision, and, perspective, Viraj, Rujuta, Rajat, Rohit, love, blindness, katha, marathi, kathamalika

मागील भागात आपण पाहिले ...

थोडयाफार गप्पा करत जेवण आटपून विराज अन ऋजुता दोघेही परत येऊन आधीसारखेच एकत्र PACE च्या कामाला लागले.

काही वेळाने ऋजुताच्या फोनवर रोहितचा फोन आला. प्रोजेक्ट संबंधीच असेल असे वाटून ऋजुताने विराजलाही ऐकता येईल या दृष्टीने तो स्पीकर वर टाकला .

"हॅलो, सर मी संध्याकाळी कळवेन PACE चं तुम्हाला. काम चाललंय त्यावर", ऋजुता.

"अग हो, हो. तुम्ही कामाव्यतिरिक्त काही बोलतच नाही का? मला दुसरं काहीतरी विचारायचं आहे? ", रोहित.

हे ऐकून विराज अस्वस्थ झाला.  अन ऋजुतालाही कळेनासे झाले की हा काय विचारणार आहे?

***
आता पुढे ...

"अग हो, हो. तुम्ही कामाव्यतिरिक्त काही बोलतच नाही का? मला दुसरं काहीतरी विचारायचं आहे? ", रोहित.

"ओके", ऋजुता.

"माझी तुमच्या ऑफिसच्या जवळच तीन किलोमीटरवर हॉटेल गिरीधरमध्ये मीटिंग आहे आता. तर संध्याकाळी ऑफिस झाल्यानंतर इथे कॉफी घ्यायला येशील का?", रोहितने ऋजुताला विचारले.

ऋजुताने विराजकडे बघितले. विराजने काही न बोलता 'मी नाही येणार' अशी हाताने खूण केली.

"अं , ऍकच्युअली विराज सर बिझी आहेत , त्यांना नाही जमणार", ऋजुता .

"अग मी तुला विचारतो आहे. तू येत असशील तर मग थांबेन मी इथे मीटिंगनंतर आणखी थोडा वेळ. ", रोहित.

"सर, ऑफिसचे काही काम असेल तर प्लिज इथे ऑफिसमध्ये येता येईल का तुम्हाला?"

"नाही ग, ऑफिसचे काम नाहीये", रोहित.

किंचित विचार करायला लागली ऋजुता. विराजही कानात प्राण आणून ऋजुता काय उत्तर देते याकडे लक्ष देत होता. त्याच्या डोळ्यात अगतिकता, आतुरता एकवटलेली दिसत होती. ऋजुताने नकार द्यावा असे मनोमन वाटत होते त्याला. पण स्पष्टपणे सांगूही शकत नव्हता तसं. शेवटी तिचा स्वतःचा निर्णय असणार होता ना. तो कोणत्या हक्काने सांगणार होता? खूप अगतिक वाटत होते त्याला, चेहरा अगदी हिरमुसल्यासारखा झाला होता. ऋजुताचे लक्ष त्याच्याकडे गेले. तिला त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव जाणवले. पण ते का आले हे मात्र तिला कळले नव्हते. त्याच्याही नकळत त्याने नकारार्थी मान हलवली. तिने चेहरा कसनुसा करत हाताने 'मला नाही जायचे. काय सांगू?' अशी विराजला खूण केली . त्याने पटकन समोरच्या कागदावर 'आई डॉक्टर' असं लिहून तिला दाखवलं. ऋजुताने किंचित हसून त्याला थम्बस अप दाखवले.

"थँक्स फॉर द इनविटेशन सर, पण सॉरी , नाही जमणार मला", ऋजुता.

"आर यू शुअर?", रोहित.

"हं, नाही जमणार सर मला. ऍक्च्युअली आईला डॉक्टरकडे न्यायचं आहे . पण थँक यू सो मच . नंतर कधीतरी बघू या.", ऋजुता.

"ओके, नो प्रॉब्लेम, बाय", रोहित. त्याने फोन ठेवला.


"चला जाऊ दे, त्या निमित्ताने घरीच लवकर जावं मीटिंग आटपली की. आईतरी खूष होईल तेवढीच. बऱ्याच दिवसांमध्ये तिच्याशी गप्पा मारल्या नाहीयेत. किंवा तिला काही शॉपिंग करायला न्यावे", रोहित स्वतः शी विचार करत खांदे उडवत म्हणाला.

ऋजुताने फोन ठेवल्यावर विराज कडे बघितले . विराजच्या हृदयावरचा भार एकदम हलका होऊन चेहऱ्यावरची काळजी मिटल्यासारखी दिसत होती.  त्याच्या डोळ्यातला आनंद लपत नव्हता. तो आपले भाव लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.

विराजने तिला विचारले," नाही का म्हणालीस ग?"

"अरे काही काम नव्हतं ना. घरी जायचं आहे आता. आई वाट बघेल. ऑफिसच्या कामासाठी असतं तर एखादे वेळी विचार केला असता आणि तूही बरोबर येणार नव्हतास मग नाही जावंसं वाटलं मला", ऋजुता.

"हं, पण ऋजुता, प्रत्येक वेळी मी सोबत असेनच असं नाही न.  आता प्रत्येक क्लाएंटचा संबंध आधी माझ्याशी येतो. पण पुढे चालून करिअरमध्ये पुढे जाताना असे प्रसंग आले तर ते असेच काळजीपूर्वक हँडल करावे लागतील तुला. ", विराज सांगत होता.

"ओह मी तर इतका विचारच केला नव्हता . म्हणजे कधीतरी करिअरमध्ये अशी वेळही येईल जेव्हा तू सोबत नसशील कदाचित", ऋजुता म्हणाली. का माहिती नाही , पण या नुसत्या विचारानेच ऋजुताला कसेतरी झाले होते .

"हो मॅडम, मग काय? इतका चांगला बॉस आहे का मी, की नेहमी माझ्यासोबत काम करायला आवडेल तुला? ", विराज काहीसे हसून म्हणाला.

"खरं म्हणजे तुझी काम करण्याची पद्धत खूप आवडते मला. कामाच्या वेळी फक्त काम. प्रत्येक काम मनापासून करणे, स्वतः आणि इतरांनाही त्यासाठी मोटिव्हेट करत राहणे, समोरच्यावर विश्वासाने नवीन जबाबदारी सोपवून त्याच्याकडून ते चांगले कसे होईल ते बघणे असे कितीतरी. नकळत आपण घडत जातो , शिकत जातो . बरेच काही शिकायला मिळाले आहे मला तुझ्यासोबत काम करता करता", ऋजुता.

"ओहो, थँक्स!  बरं आता कामाला लागू या.  आता आपलं PACE चं एस्टीमेशन करून झालंय न, हे घे यात टीमच्या प्लॅन असलेल्या सुट्ट्यांचे डिटेल्स आहेत. आता प्रोजेक्ट डिलिव्हरी डेट कॅल्क्युलेट कर" , विराज.

काही वेळाने ...
"हं, हे फेजप्रमाणे डेट्स झाले", ऋजुता.

"गुड, बघू , काय आलेत ते? ", विराज.

ऋजुताने दाखवले.

"ओके आहेत. मी पाठवतो मग रोहितला थोडया वेळात", विराज.

"हुश्श, झालं बाबा एकदाचं ", ऋजुता क्षणभर डोळे मिटत विसावली.

"दमलीस का ग ? खरं आहे. ही सगळी प्रक्रिया मनाला दमवणारी आहे. पण यावेळी या प्रोजेक्टचे बहुतांश निर्णय तू घ्यायचे आहेत. अर्थात मी गाईड करेन आणि शहानिशा करून अप्रुवलही देईन ", विराज.

"Wow ! हा आनंद काही वेगळाच असतो, नाही का?", ऋजुता.

"बरं आता चहा मागवू की कॉफी?"

"मसाला चहा".

थोडया वेळात चहा आला. चहा घेता घेता पुन्हा चर्चा सुरू होती.

"ऋजुता, तू तुझ्या काही रिस्पॉन्सीबिलिटीज आता निकिताला दे. तीही शिकेल ते हळूहळू. मी तुला आणखी काही नवीन कामे देणार आहे".

"नवीन कामे? कोणती?" ऋजुता.

"उद्या सांगेन . सगळं आताच हवं का? तुझं माहीत नाही पण मी तर दमलोय आता. घरी जायची वेळ झालीय मॅडम, चला आवरा आता", विराज हसून म्हणाला.

ऋजुताही हसली.

"तुला कधी शांततेत काम करायचे असेल तर आजसारखे इथे त्या समोरच्या टेबलवर करू शकते. मी डिस्टर्ब नाही करणार तुला", विराज हसून म्हणाला.

विराजची कोपरखळी कळताच ऋजुता हसायला लागली.
"अरे खरंच ना, दर पाच मिनिटांनी काही न काही व्यत्यय येत असेल तर फरक नाही का पडणार? म्हणून म्हणाली होती मी तसं. आज खरच पटापट बरीच कामं झाली", ऋजुता.

"अग हो, मी पण खरंच म्हणतोय. कधीही वाटले तर इथे बसून काम करू शकते तू. मी तुला केबिनची एक चावी देऊन ठेवतो , हे घे", विराजने एक चावी तिला दिली.

"काय? 'द विराज दीक्षित' माझ्याशी केबिन शेअर करणार?इट्स अनबिलिव्हेबल! ", ऋजुता आश्चर्याने डोळे मोठे करत त्याला चिडवत म्हणाली .

"मी तर आयुष्यातला प्रत्येक क्षण शेअर करायला तयार आहे तुझ्याशी, ये केबिन क्या चीज है ", विराज मनाशीच म्हणाला.

"नकोय का तुला? राहू दे मग, दे चावी परत इकडे", विराज नाराज झाल्याचं नाटक करत म्हणाला.

"अरे, नाही नाही, गमतीने म्हटलं रे मी. थँक्स त्यासाठी. बरं चल मी आता निघू का? थोडं टीमकडेही जायचंय, ते झालं की निघेन घरी" , एक स्माईल देत ऋजुता म्हणाली.

"हं, ओके", विराज.

ऋजुता तिचे लॅपटॉप वगैरे सगळे घेऊन केबिनमधून बाहेर क्यूबिकलमध्ये टीमकडे गेली. ती जाताना विराज क्षणभर बघत राहिला.

"किती छान होता आजचा पूर्ण दिवस ! असे रोजच सोबत काम करायला मिळाले तर किती छान होईल ना! ", विराजला वाटून गेले आणि त्याने हसतच स्वतःच स्वतःला एक टपली मारली.

टीमला भेटून ऋजुता घरी जायला निघाली. लिफ्टमधून बाहेर निघते तोच तिला रजतचा फोन आला.

"हं, बोल दादा, अरे मी अजून घरी पोचले नाही. आता निघतेय. घरी पोचल्यावर बोलू का?"

"नाही ग, आताच बोल ना, मग नंतर मी बिझी होईन. तुझ्याशी बोलणंच होत नाहीये. रात्री तू झोपून जातेस, मग माझी परी खूप दमतेय , तिला झोपू दे , असं म्हणते आई मला", रजत हसत म्हणाला.

"हं, बोल ", ऋजुता हसून म्हणाली. ती आता पार्किंगमध्ये तिच्या गाडीजवळ पोचली होती. तिथे थांबून ती रजतशी बोलू लागली. थोडावेळ असंच बोलल्यानंतर रजतने तिला विचारले, "त्यादिवशी आईची मैत्रीण आली होती म्हणे , वीणाताई ", रजत सावकाशपणे मुद्द्यावर येत होता.

"हो, आल्या होत्या, वीणाकाकू. छान आहेत त्या. आईला पण जरा बरं वाटलं. गप्पा मारल्या. तेवढंच दुखणं विसरली होती ती. एवढी खूष झाली होती न तेव्हा त्या आल्या तर! ", ऋजुता आता सांगायला लागली.

"आणखी .... कोणी .... आलं .... होतं का त्यांच्याबरोबर? ", रजत जरा अडखळत शेवटी विचारता झाला.

"अं, हो. विधी आली होती . ", ऋजुता.

"येस, येस्स ", मनातच म्हणत रजत हातानेच येस ची ऍक्शन करत जागेवरच उड्या मारायला लागला.

बिचारा रजत! त्या दिवशी आईने वीणाताईचं नाव सांगितल्यानंतर त्याने शोधण्याचा प्रयत्न केला होता. पण काय, "आईची मैत्रीण आईसारखीच ! प्रत्यक्षच संबंध जपणारी. मोहमयी आभासी मायाजालात न फसणारी ! " , शेवटी त्याला ऋजुतालाच विचारावे लागले होते. निदान नाव तरी कळले. आता पुढे बघू या काय होतं ते.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

संपूर्ण कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद . सर्व वाचकांची साथ अशीच मिळत राहो . स्वस्थ रहा , आनंदी रहा, वाचत रहा आणि असेच कळवत रहा.

यासोबतच एक आणखी करूया.

संपूर्ण विश्व हळूहळू पूर्वपदावर येत आहे,
जनजीवन सुरळीत होऊ लागलं आहे,
सर्वजण आरोग्यसंपन्न होत आहेत, बरे होत आहेत,
सर्व कामं हळूहळू मार्गी लागत आहेत,
सगळीकडे सुख, समृध्दी आणि शांतता निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे,
मी आणि माझं कुटुंब दररोज सुरक्षित आणि आरोग्यसंपन्न होत आहे,
परमेश्वराची आणि निसर्गाची कृपा विश्वावर बरसत आहे, जगाचे कल्याण होत आहे .

अशी एक प्रार्थना रोज करत असे visualize करू या . 

🎭 Series Post

View all