दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 17

Drushti, ani, Drushtikon, sight, vision, perspective, Viraj, Rujuta, Rohit, love, blindness, office


विराज आणि ऋजुता केबिनमध्ये कामातून  छोटासा कॉफी ब्रेक घेऊन कॉफी घेत होते. कॉफी घेऊन झाली आणि ऋजुता विराजला म्हणाली,

"मी जरा टीमला भेटून येते दहा मिनिटात".

"हो, हो . तुझ्या दोस्त लोकांना भेटल्याशिवाय थोडंच होणार आहे तुला?", विराज हसून म्हणाला.

"तसं नाही रे. काय चाललय, काही अडचण तर नाही ना? स्टेटस वगैरे, एवढं बघून यावं एकदा . म्हणजे मग आपल्याला पुन्हा काम करताना व्यत्ययही येणार नाही, म्हणून . आलेच मी ", असे म्हणून ऋजुता केबिन बाहेर टीम कडे गेली.

विराजही पुन्हा आपल्या कामाला लागला.


तेवढ्यात विराजला एक फोन आला.

"विराज , आज रोजच्यापेक्षा जरा लवकर येशील का जमलं तर?

"का, काय झालं?", विराज.

"माझ्या ओळखीतल्या दोन-तीन जणांनी होकारार्थी कळवले आहे तर म्हटलं जाऊन येऊया आज त्यांच्याकडे.  काही व्यवस्था झाली तर बरे पडेल"

"ठीक आहे. प्रयत्न करतो मी. झालं तसं सांगतो तुला निघताना. शनिवार रविवारी सुद्धा खूप गोष्टी करायच्या आहेत हं आपल्याला. चांगला रिस्पॉन्स येतो आहे. माझ्या ओळखीचे काही जण तयार आहेत. त्यांच्याशी बोलायचंय आणि काही वस्तूही लागणार आहेत ना त्याही घ्यायच्या आहेत विकत ", विराज.

"हं, ओके . बाय".


फोन ठेवून विराज पुन्हा आपल्या कामात लागतो न लागतो तर त्याला रोहितचा फोन आला .

"हॅलो, हं बोला रोहित. आम्ही काम करतोय अजून PACE वरती. कळवतो मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत".

"अरे ठीक आहे. PACE मोठा प्रोजेक्ट आहे. ते द्या तुम्ही आरामात . मी त्यासाठी फोन नाही केला", रोहित.

"ओके मग?", विराजने न कळून विचारले.

"एक विचारायचं होतं. ही ऋजुता ओव्हरऑल कशी आहे?", रोहित.

"कामात ना? चांगलीच आहे ", विराज .

"कामात नाही ,म्हणजे स्वभावाने वगैरे कशी आहे?", रोहित.

"स्वभाव ? चांगला आहे", विराज जरा गोंधळला होता.

"ती कुठे ऑलरेडी एंगेज्ड आहे का ? म्हणजे लग्न वगैरे काही ठरलेलं आहे का? तुम्ही सोबत काम करता ना तर तुला माहीत असेल म्हणून विचारले.

विराजलाही पटकन कळेना, काय सांगावे? हो ही म्हणता येईना आणि नाही म्हणावं तरी पंचाईत ! 

तो म्हणाला ,"नक्की नाही माहिती. पण बहुतेक तसे असावे असे वाटते. का काय झालं?"

"नाही. काही नाही झालं रे. सहज विचारतोय ", रोहित म्हणाला.

"आता ऋजुताशीच बोलावं लागेल का", रोहित विचार करत होता.

"ओके. बाकी कसं चाललंय PACE चं?", रोहित.

"व्यवस्थित आहे एकदम", विराज.

"ठीक आहे. बोलू मग नंतर. बाय ", रोहितने फोन ठेवला.

विराज फोन ठेवून  खुर्चीवर मागे रेलून डोळे मिटून बसला होता . त्याच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा उमटल्या होत्या.

आता त्याला वाटून गेलं, "खरंच मी तर हा विचारच केला नव्हता. तिच्या आयुष्यात कोणीतरी आधीच असेल तर? पण मला काय दुधखुळे समजतो का हा रोहित? का विचारतोय हे मला कळत नाही का? निश्चित 'हो' च सांगायला हवं होतं मी ", एक मन म्हणालं.

लगेच दुसर मन म्हणालं , "असं कसं 'हो' सांगू शकशील तू, तिच्या मनातलं काहीही जाणून न घेता? तुला कुठे खरंच काही माहिती आहे?"

परत पहिलं मन म्हणालं, "असं डोळ्यासमोर कसं होऊ देऊ मी? तिच्या मनातल्या भावना जोपर्यंत मला कळत नाहीत तोपर्यंत तर नक्कीच असं मध्ये कोणाला येऊ देणार नाही मी माझ्यादेखत. विराज पहिल्या ध्येयपूर्तीसाठी जरा जोरात हालचाल करावी लागेल तुला . एकदा ते नीट सेट झाले की त्यानंतरच ऋजूशी बोलता येईल. कारण ध्येयावरचे तुझे लक्ष विचलित व्हायला नको आहे. आता तुझ्या ध्येयाला जरा आकार यायला लागला आहे. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे त्यात. तोपर्यंत या रोहितकडे  दुरूनच लक्ष ठेवावे लागेल. ".


ऋजुता टीमशी बोलून झाल्यावर केबिनमध्ये आली तर तिला विराजच्या चेहरा उतरलेला दिसला. डोळे मिटलेल्या चेहऱ्यावर थोडीशी चिंतेची लकेर दिसली.

"विराज, काय झालं? आता थोड्यावेळापूर्वी तर फ्रेश मूडमध्ये होतास. काही प्रॉब्लेम आहे का? उशीर लावला का मी यायला? अरे होऊन जाईल आपलं हे काम वेळेत. काळजी नको करू. चल घेऊ या करायला"  , ऋजुता तिच्या टेबल कडे जाऊन लॅपटॉप घेत म्हणाली.

"ए प्रश्नमंजुषा, किती प्रश्न विचारशील? चल सुरवात करू", काही न झाल्यासारखे दाखवत विराज पुन्हा आपला मूड ठीक करत म्हणाला. बाटलीतून पाणी प्यायला आणि ड्रॉवरमधून नोटपॅड पेन वगैरे घेऊन त्याने उघडून टेबलवर बाजूलाच ठेवले. अन आपल्या लॅपटॉप कडे वळला. ऋजुताही त्याच्या टेबलसमोरील खुर्चीवर लॅपटॉप अन नोटपॅड पेन घेऊन बसली .

"हं, ऋजुता, तू काही विचार केला आहेस का? की या प्रोजेक्टचे प्लॅंनिंग कसे करायचे? प्रोजेक्ट डिलिव्हर कसे करायचे?"

"हो, विराज , या प्रोजेक्ट मध्ये बत्तीस मॉड्युल आहेत. तर आपण एकाचवेळी सगळे डिलिव्हर करायचे म्हटले तर एकतर पूर्ण प्रोजेक्ट होईपर्यंत बराच वेळ लागेल . आणि सगळे एकदम करायला आपल्यालाही कठीण जाईल."

"हं, कॉम्प्लेक्स आहे खूप. टीमला हँडल करता यायला हवे एका वेळी एवढे".

"त्यापेक्षा आपण असे केले तर? की आपण फेझेस मध्ये डिलिव्हर केलं तर? म्हणजे पहिल्या फेज मध्ये दहा , दुसऱ्यात दहा आणि तिसऱ्या फेज मध्ये बारा मॉड्यूल्स असं करू या का?"

"हो तशी आयडिया चांगली आहे. तसं करता येईल. तुलाही हे असं मॅनेज करायला जास्त बरं पडेल ना?", विराज.

"हं, असं वाटतंय", ऋजुता.

"चल बघू कोणते मॉड्यूल्स आधी अन कोणते नंतर, कसे घेता येतील ते"

बराच वेळ त्यांची आखणी, चर्चा, कॅलक्युलेशन वगैरे सुरूच सुरू होतं.


इकडे बाहेर टीम मध्ये आता चुळबुळ सुरू झाली होती. सर्वांच्याच पोटात कावळे ओरडायला लागले होते. नेहमी एकमेकांना सोबत घेऊन जेवणारे ते ऋजुतासाठी थांबले होते.

प्रसाद म्हणाला, "निकिता विचार ना ऋजुताला".

"नको रे बाबा, ती वाघाच्या गुहेत बसली आहे. स्वतः हून वाघाच्या गुहेत कोण जाणार? ", निकिता.

त्यावर प्रसाद खळखळून हसत म्हणाला, "अग, हा वाघही vegitarian च आहे. अन त्यालाही भूक तर लागलीच असेल. घाबरतेस कशाला? नाहीतर बेस्ट वे सांगू का? तिथे जाऊन बोलण्याची हिंमत नसेल तर विराज सरांच्या एक्सटेंशन ला फोन कर आणि मग ऋजुताशी बोल."

कसेबसे निकिताने फोन केला. विराजने फोन घेतला.

फोनवर विराजला बघून पुन्हा निकिताला घाम फुटला.

"सर ते ऋजू ...", निकिता.

"हो, देतो", विराज.

"ऋजू, अग तुम्ही जेवणार आहात की नाही ? सगळे थांबलोय आम्ही वाट बघत", निकिता.

"त्यांना सांग, आज तुम्ही पुढे व्हा आणि जेवून घ्या. आपल्याला वेळ लागेल अजून", विराज.

"हं, निकी, तुम्ही व्हा पुढे, जेवून घ्या. मला वेळ लागेल आज", ऋजुता फोनवर निकिताला म्हणाली.

टीम जेवायला जाता जाता बोलणे सुरू होते .

"बघ ना किती बिझी आहेत ते. पण अजिबात ओरडले नाही हं जमदग्नी ", निकिता.

"हो ना, आजकाल ज्वालामुखी शांत दिसतोय", प्रसाद.

इकडे विराज ऋजुता दोघेही पुन्हा कामात गुंतले होते.

काही वेळाने...

"अं, बाप रे अडीच वाजून गेलेत! ", ऋजुताचे आता कुठे वेळेकडे लक्ष गेले होते. फोन हातातच ठेवून ती विराजला म्हणाली, "विराज जेवू या का आता पंधरा मिनिटांत? जेवण झालं की पुन्हा बसू करायला".

"हो चल, भूक लागलीय जाम", विराज.

आपापला डबा घेऊन दोघेही कॅन्टीन मध्ये जाऊन जेवायला बसले. डबे उघडून सुरवात करण्याआधीच विराज म्हणाला, "ऋजू, आज तुझा डबा मी खाऊ आणि माझा डबा तू खाशील? काळजी करू नकोस. तुझ्यासारखाच मी सुद्धा शाकाहारीच आहे. त्यामुळे डबाही शाकाहारीच असतो माझा".

"हो, घे ना, काही हरकत नाही . पण का रे , आज काय झालं अचानक?", ऋजू.

"काही नाही ग. मी सांगितलं होतं ना तुला, मी फॅन झालो आहे तुझ्या हातच्या पदार्थांचा. आज अनायासे आपण आलोय सोबत जेवायला तर घ्यावं म्हटलं ", विराज किंचित हसून म्हणाला आणि त्याने डब्यांची अदलाबदल केली.

पहिला घास घेतला आणि विराजने डोळे मिटले.

खरं म्हणजे दोघे कामातून बाहेर पडले आणि इकडे येताना विराजला पुन्हा रोहितचे बोलणे आठवले होते. त्याला वाटून गेले  ... आयुष्यभर तुझ्या हातचे प्रेमाने बनवलेले पदार्थ माझ्या नशिबात असतील का ग? निदान आज तरी मला ही संधी मिळाली आहे तर घेऊ दे. पुन्हा अशी मिळेल की नाही कोणास ठाऊक. थोडा भावुक झाला होता विराज मनामध्ये. पण चेहऱ्यावर काही दिसू नये असा प्रयत्न करत होता.


"ए काय झालं? आवडलं नाही का ?", त्याने डोळे मिटलेले बघून ऋजुता म्हणाली.

"अग एकदम सुपर आहे, टेस्ट एन्जॉय करत होतो ग" , विराज.

"बाय द वे, काकू कशा आहेत आता? ", विराज.

"आता एकदम ठीक. परवा सुटेल वाटतं हात. न्यायचं आहे डॉक्टरकडे".

"चला, बरं झालं", विराज.

थोडयाफार गप्पा करत जेवण आटपून दोघेही परत येऊन आधीसारखेच एकत्र कामाला लागले.

काही वेळाने ऋजुताच्या फोनवर रोहितचा फोन आला. प्रोजेक्ट संबंधीच असेल असे वाटून ऋजुताने विराजलाही ऐकता येईल या दृष्टीने तो स्पीकर वर टाकला .

"हॅलो, सर मी संध्याकाळी कळवेन PACE चं तुम्हाला. काम चाललंय त्यावर", ऋजुता.

"अग हो, हो. तुम्ही कामाव्यतिरिक्त काही बोलतच नाही का? मला दुसरं काहीतरी विचारायचं आहे? ", रोहित.

हे ऐकून विराज अस्वस्थ झाला.  अन ऋजुतालाही कळेनासे झाले की हा काय विचारणार आहे?

काय बोलेल रोहित ऋजुताशी?

क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

कथेला देत असलेल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.

मध्यंतरी काही अडचणी असतानाही मी पार्ट पोस्ट केले पण थोडा विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व. आठवड्यातून दोन तीन पार्टस मी नेहमी पोस्ट करतेच , मनासारखा  लिहून झाला तर जमेल तेव्हा तेव्हा करण्याचा प्रयत्न असतो . एक चांगली कथा लिहून वाचकांना त्याचा आनंद देण्याचा माझा प्रयत्न नक्कीच राहील. सर्व वाचकांची साथ अशीच मिळत राहो . स्वस्थ रहा , आनंदी रहा, वाचत रहा आणि असेच कळवत रहा. लिहिण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा  त्यातूनच मिळते. सर्वांना उत्तम आरोग्यासाठी माझ्या शुभेच्छा.

🎭 Series Post

View all