दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 16

Drushti, ani, Drushtikon, sight, vision, and, perspective, Rujuta, Viraj, love, marathi, katha, kathamalika, blindness

मागील भागात आपण पाहिले ...

"विधी, सगळं नीट होईल ना ग? खूप भीती वाटतेय मला. माझा स्वभाव तिला माहिती आहे. किती चिडायचो मी. तिला मी आवडेल का ? ती हो म्हणेल का? दोघांच्याही घरचे हो म्हणतील का ? खूप प्रश्न आहेत ग. प्रेम हे जितकं सुखद आणि आनंददायक असतं न, तितकीच जबाबदारी आणि काळजीही देत असतं", विराज थोडा भावुक होत म्हणाला.

"अरे, तुझ्यात झालेला बदल सर्वानाच जाणवतो आहे दादा. किती बदलला आहेस तू! आधीसारखा चिडखोर राहिला नाहीसच मुळी. तिलाही जाणवले असेलच ते. तू काळजी करू नकोस . सगळं नीट होईल.  हम तुम्हारे साथ हैं. और जब हम हैं तो फिर क्या गम हैं?", विधी त्याला हसवत म्हणाली.

"हं, थँक्स. जा झोप आता", विराजच्या चेहऱ्यावर स्माईल आले होते.

विधी गेल्यावर विराजही बिछान्यावर पडून निद्रादेवीची आराधना करू लागला.

***

आता पुढे ...

दुसऱ्या दिवशी  सकाळी ऑफिसमध्ये ...

विराज केबिनमध्ये काम करत होता. टीमही आपल्या जागेवर बसून आपापले काम करायला सुरुवात करत होती. ऋजुता ऑफिसमध्ये आपल्या जागेवर येऊन बॅग ठेवत लॅपटॉप लावायला लागली तोच तिचा डेस्कवरचा फोन खणखणला.

"ओ हो , जरा दम तर घेऊ द्या . येऊन मिनीटभरही होत नाही तर लगेच फोन सुरू" , ऋजुता पुटपुटली. फोन उचलून बोलायला लागली.

"हॅलो, ऋजुता बोलतेय", ऋजुता.

"अग हो मला माहिती आहे", विराज हसून म्हणाला. "एवढी काय पुटपुटत होतीस, शिव्या दिल्यास का मला?"

"काय विराज, आज ठरवलेच आहे वाटतं माझी खिचाई करण्याचं? अरे ऑफिसमध्ये पाय ठेवला , लॅपटॉपही लावला नाही तर लगेच फोन वाजला, म्हणून म्हटलं दमही घेऊ देत नाहीत हे लोक ...मला वाटलं क्लाएंट चा फोन असेल", ऋजुता.

"अग तेच तर म्हणतोय, म्हणूनच तर लगेच फोन केला , की तिथे लॅपटॉप लावूच नकोस . इकडेच ये केबिनमध्ये आणि इथेच लाव. आणि तुला दम वगैरे काय घ्यायचा आहे ते पण इकडेच घे ", विराज हसत हसत म्हणाला.

"का, काय झालं?", ऋजुतालाही हसू फुटलं.

"ते प्रोजेक्ट PACE चे टाईमलाईन्स काढायचे आहेत ना . मग डिस्कस करायला बरं पडेल ना इथल्याइथे." , विराज.

"हं, मॉर्निंग रुटीन कामे आटपून येऊ का? "

" का ? ती केबिनमधून होत नसतात का?" , विराज अवखळ, मिस्कील हसत होता.

"ओके येते", ऋजुताने फोन ठेवला. हसू आले तिलाही.

"काय मॅडम , जमदग्नी बोलावताहेत वाटतं आल्या आल्या", निकिता हसून म्हणाली.

"हो ना. नवीन प्रोजेक्टचे टाइमलाईन्स आज कळवायचे आहेत ना रोहित सरांना. ते कॅलक्युलेट करायचे आहेत", ऋजुता.

"बरं मी आहे तिकडे. काही लागलं तर सांग किंवा तू ये तिकडे", ऋजुता.

ऋजुता आपले सामान घेऊन केबिनमध्ये गेली.

"गुड मॉर्निंग", ऋजुता.

विराजचा प्रसन्न चेहरा पाहून ती मनात म्हणाली ," चिडकूमहाराज आज एकदम फ्रेश अँड चार्मिंग दिसत आहेत. चिडकूपणाचा तर लवलेशही दिसत नाहीये. चला हे एक छान झालं".

"मॉर्निंग", विराज उत्तर देत म्हणाला.

"तशी माझी मॉर्निंग तर छान झालीच आहे. सकाळी सकाळी आज काही वेळ का होईना तू इथे बसणार ना", विराज मनात विचार करत होता.

"तुला हवं तर तू त्या समोरच्या वेगळ्या टेबलावर ठेवू शकते लॅपटॉप. मग तुझे मॉर्निंग रुटीन्स झाले की सांग . मी पण माझं आटपतो . मग आपण PACE चे करायला घेऊ ", विराज.

ऋजुताने तिथे आपले सेट अप केले आणि कामाला लागली. विराजही आपल्या कामात गुंतला. वेगवेगळ्या टीम्स च्या, वेगवेगळ्या क्लाएंटस च्या आलेल्या मेल्स ला भराभर उत्तरं देत ती काम हातावेगळे करायला लागली. विराजला मेल्स कॉपी असल्याने त्याच्याही मेलबॉक्स मध्ये त्या मेल्स चा पाऊस पडू लागला. पाऊण - एक तासाने विराजचे हातातले काम आटपले. तशी त्याची नजर समोर ऋजुताकडे गेली.

"किती साधेपणा आहे ! आजकाल मुली काय काय करतात ... काळे, निळे, हिरवे, भडक लाल नखे कर, तर भडक रंगाचे लिपस्टिक लाव ...  अरे ऑफिस आहे की लग्नाला चालल्या आहेत ? ऑफिसमध्ये असं अजिबात चांगलं वाटत नाही . अनप्रोफेशनल वाटतं असं . पण कोण सांगणार? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? शेवटी ज्याची त्याची मर्जी .... ऋजुताचे मात्र तसे नाही. तिला पक्के कळते कुठे कसे राहावे. खरच वेगळी आहे ऋजू. सगळं काही आपल्या कामातून, कृतीतून दाखवून देणारी .... सुंदर मन हेच खरे सौंदर्य आहे हे कळते तिला.  फक्त जातिवंत सौंदर्य.... खरंच जातिवंत सौंदर्याला रंगोटीची गरज नसते. कुठल्याही भडक रंगोटीशिवाय ते फक्त एका स्मितहास्यानेदेखील किती खुलते ! स्मितहास्य, आनंद, उत्साह , समाधान आणि आत्मविश्वास हेच खरे जीवनाचे अलंकार आहेत", विराज विचार करत होता.

"किती एकाग्रतेने काम करते ही! आल्यापासून जराही इकडेतिकडे नजर न टाकता, भराभर सपाट्याने काम उरकते आहे", विराज तिच्याकडे बघत मनात विचार करत होता. "हिला जर अशी वेगळी जागा मिळाली तर तिच्या कामात पुन्हा पुन्हा कामात व्यत्यय न येता ती अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल".


विराजने फोन करून दोन कप कॉफी मागवली. पाच दहा मिनिटात कॉफी आली. तोपर्यंत ऋजुताच्या बऱ्याचशा कामांचा पसारा आटपला होता.

विराज म्हणाला, "कॉफी इज वेटिंग फॉर यू ऋजुता".

"ओह, थँक्स" , ऋजुता.

"हो , मग नाहीतर काय? मघापासून एवढा पाऊस येतोय, थंडी वाजते आहे न मला, म्हणून म्हटलं कॉफी घ्यावी कोणी कंपनी देत असेल तर", विराज हसून म्हणाला.

"पाऊस ? इथे एअर कंडिशन्ड केबिनमध्ये ? " , ऋजुता अजूनही त्या कामांच्या मूडमधून बाहेर आली नव्हती. त्यामुळे कळलेच नाही तिला पटकन.

"हो ना, माझ्या ऑफिसच्या मेलबॉक्समधला तुझ्या ऑफिशिअल मेल्सचा पाऊस", विराज हसत हसत म्हणाला.

आता ऋजुताला कळले तसे ती हसून म्हणाली," अरे हो ना, आधी सुरू असलेल्या आपल्या तिन्ही प्रोजेक्टच्या क्लाएंटस कडून काही रिस्पॉन्सेसची वाट बघत होती मी. त्याचेच कम्युनिकेशन आहेत ते  आणि काही टीमला दिलेल्या कामांचे आहेत".

"हो ग, I know. मस्करी करत होतो मी. By the way, कसे वाटले केबिनमध्ये काम करताना? "

"एकदम शांततेत आणि लवकर उरकले. नाहीतर बाहेर आवाज असतो, कोणी न कोणी येऊन काहीतरी विचारत असतं. एवढेच काम व्हायला आणखी वेळ लागला असता. थँक्स", ऋजुता कॉफीचा पेपरकप हातात घेत म्हणाली.

"गुड. म्हणूनच इथे यायला म्हटलं तुला. घरी सगळं करून, गाडीवरून इतक्या दुरून धावत पळत येतेस. दमली असशील म्हणून तू आल्याआल्याच कॉफी मागवणार होतो . पण म्हटलं पुन्हा त्यावरून काही लेक्चर मिळेल बाबा, काम करू दे वगैरे, राहू द्या, जरा नंतरच बघू", विराज हसतच म्हणाला.

"हा, हा, हा, व्हेरी फनी. काम तर महत्त्वाचे आहेच पण मी काय तुला लेक्चर देते का ?"

"हो ना. मी भयंकर चिडलेला असतानादेखील मला काहीतरी सुनावण्याची हिम्मत फक्त तुम्हीच करू शकता मॅडम", विराज मिस्कीलपणे हसत म्हणाला.

"हं? मी कधी केले असे? काहीही हं विराज", ऋजुता हसून म्हणाली.

"मग काय? आठव ना, रोहितच्या ऑफिसमध्ये पहिल्या प्रोजेक्टच्या वेळी जाताना कोण म्हणालं होतं? काय काय म्हणालं होतं ....थांब मीच सांगतो....

कधीकधी कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी रोजच्या जगण्यातले फक्त पाच दहा मिनिटं ही पुरेसे असतात सर..... जास्त काहीच करावं लागत नाही... . आपल्याला दृष्टी असूनही जर या गोष्टी दिसल्या नाहीत ....आणि आपण दृष्टीहीन असलेल्यांना मदत केली नाही तर काय फायदा? ....

असं म्हणाली होती. काय आठवलं की नाही तुला?"

"हं, ते.... अजूनही आठवतं तुला?", ऋजुता जीभ चावत,  काहीशी लाजत,  हसून म्हणाली.

"हो , मग काय?", विराज.

"माझ्या आयुष्यात होऊ घातलेल्या एका बदलाची सुरवात होती ती. मी कसा विसरेन ते?" , विराज मनात म्हणाला.

काय असेल हा बदल ? बघू या पुढील भागांमध्ये.

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

काय असेल हा बदल ? Guesses कळवा.
कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनभरून  धन्यवाद.  काळजी घ्या. स्वस्थ रहा. वाचत रहा आणि असेच कळवत रहा. 

🎭 Series Post

View all