दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 15

Drushti, Drushtikon, ani, marathi, katha, katha malika, love, prem, Viraj, Rujuta, blindness, office

"दादा, ये दिमाग तुम्हारा नही है... बताओ , साथ में कौन था?", विधी त्याला चिडवत हसून म्हणाली.

"काय ग विधी, आल्या आल्या चिडवतेस त्याला? दमून आलाय ना तो? तू जा बरं विराज" , आई.

"हं , जा हं तू दादा. बाद मे तुम्हारी पूरी खबर लूंगी", विधी. शेवटचे वाक्य तिने आईला ऐकू जाणार नाही अशा आवाजात म्हटले. मात्र विराजला ऐकू गेलेच. तसे त्याने हसून तिच्याकडे बघितले आणि खोलीत गेला.


ऋजुताकडे रात्री...

सगळं आवरून झाल्यावर बिछान्यावर पडल्या पडल्या ऋजुताच्या डोळ्यासमोरून दिवसातल्या घडामोडी सरकल्या.

"खरंच छान होता ना आजचा दिवस... सकाळी घाईने आवरून गेले, घाईत बनवलेली भाजी सर्वांनी मिळून आवडीने फस्त केली. विराजनेसुद्धा घेतली आज तर.... त्यानंतर विराजने नवीन आव्हान समोर ठेवले.... प्रेझेंटेशन आणि डील दोन्ही छान झाले... समाधान वाटतंय ... किती आनंदात होता आज विराजसुद्धा ... 'आजचा दिवस तुझा' म्हणाला ... तो का माझ्यासाठी एवढा खूष झाला? ... मी पण इतकी आनंदित नक्की कशामुळे ? .... नवीन काम नीटपणे केल्यामुळे?.... की डील नीट झाल्यामुळे? .... की विराज खूष असल्यामुळे?", दमल्यामुळे विचार करता करता तिचा डोळा लागला आणि ती निद्राधीन झाली.


*****
आता पुढे ....



विराजकडे ...

जेवण वगैरे सगळे आटपून सर्वांशी थोडा वेळ गप्पा मारून विराज आपल्या खोलीत आला. सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले होते. विराजला आता कुठे शांतता मिळाली होती. विराजने कपाटातून त्याची डायरी काढली आणि टेबलसमोर खुर्चीवर बसला. डोळे मिटून आजच्या एक एक गोष्टी तो आठवून लिहू लागला . त्यात आजच्या स्पेशल अनुभवाबद्दल लिहिताना आज सुचलेली कविताही त्याने त्यात लिहिली. पुन्हा खुर्चीला मागे टेकत डोळे मिटून तो ऋजुताच्या विचारात हरवला. हिरव्यागार शेताजवळ सांजेच्या सोनेरी रंगात न्हाऊन निघालेले तिचे सोज्वळ, लोभस, हर्षोल्हसित रूप त्याच्या डोळ्यासमोरून हलत नव्हते. ते आठवून विराजच्या ओठांच्या कडा रुंदावल्या होत्या. त्यात त्या आजीबाईंचे शब्द आठवून तो पुन्हा सुखावला. एक आनंदाची लहर सळसळून गेली त्याच्या अंगातून.

"खरंच , ऋजू, आयुष्यातली पहिली कविता सुचली मला आज, फक्त तुला बघून .... तुझे असणे, तुझे दिसणे, तुझा लाघवी स्वभाव, तुझे वागणे या सगळ्यांच्याच प्रेमात पडलोय मी. कधी येईल तो दिवस , ज्या दिवशी मी तुला सांगू शकेन माझ्या मनातल्या भावना? खूप वाट पाहतोय मी त्या दिवसाची. होशील का ग तू माझी ? आवडेल का तुला माझी साथ द्यायला? " विराज डोळे मिटून विचारातच गढला होता.

"तुझं अवतीभवती असणं
निष्पाप निरागस हसणं....
विसरावे भान, अन जगावं
तुला एकटक बघत राहणं....

तुझं अवतीभवती असणं....
ते स्वच्छंद निर्मळ हसणं....
मोत्यांच्या दाण्यांनी जणू
गुलाबी गुलाबातून ओघळणं ...

विधी पाठमोरे बसलेल्या विराजच्यामागून हळूच येऊन ती कविता वाचत होती.

"ए , तू झोपायला गेली होतीस ना ", आपल्याच कवितेचे शब्द ऐकून विराज चमकून डोळे उघडत, मागे वळून म्हणाला.

"Wow माझा दादा, इतकी सुंदर कविता करतोय! हे ss कधी झालं ss ? ", विधी आश्चर्याने म्हणाली.

"ए दाखव , दाखव ना , पूर्ण कविता वाचू दे ना", विधी गळ घालत म्हणाली.

"इथे कधी आलीस? आणि असं वाचायचं असतं का?", विराज गडबडून डायरी बंद करत लपवत म्हणाला.

"मी तर सांगितलं होतं तुला, मी तुझी खबर घ्यायला येणार आहे ते . तू जेव्हा तिच्या स्वप्नात होतास ना तेव्हाच आले मी.  मला काय माहिती, तू इतकं पर्सनल काही लिहीत होतास ते", विधी.

"कोण आहे ही स्वप्नसुंदरी ? ए दादा , खरं सांग. आता तर तुला सांगावच लागेल दादा. अभी तुम रंगेहाथ पकडे गये हो ", विधी मिस्कीलपणे म्हणाली.

"एक मिनिट, .... ही तिच्याच साठी आहे न? ", विधी भुवया उडवत त्याला विचारू लागली.

"हं , हो", विराज आता केसातून हात फिरवत किंचित हसत ब्लश करत होता.

"ऋजुता?", विधी.

"हो, ऋजूच !", विराज अजूनही ब्लश करत होता.

"खरंच ? दादा, I am soooo happy ",  विधी त्याला खुर्चीवरून उठवून उभे करत त्याच्याभोवती नाचत, हसत त्यालाही नाचवत म्हणाली. खरच खूप आनंद झाला होता तिला.

"अग हो हो, किती खूष माझी वेडू !", विराज तिला प्रेमाने खांद्यावरून हात टाकत म्हणाला.

"मग काय तर, खूष होणारच ना मी, हीच वहिनी हवी आहे मला. ", विधीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

" मग सांगितलंस का तू तिला?", विधी म्हणाली.

"नाही ग विधी. इतकं सोपं असतं का ते? बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो.  आधी तर ती फक्त घाबरून असायची मला. त्यापलीकडे काही विचारच नव्हता तिच्या मनात. घाई करून नाही चालत अशी. सध्या तिच्या मनात काय आहे तेही माहीत नाही मला. दिल्ली अभी बहुत दूर हैं"

"मग कधी सांगणार आहेस? काही विचार केलास?", विधी.

"सध्या माझे दोन तीन गोष्टींवर काम सुरू आहे. एक आता बऱ्यापैकी सेट होते आहे. आणखी दुसरी होण्याची वाट बघतोय . त्यानंतर बघेन.  ", विराज.

"आणि हं, तुलाही सांगून ठेवतो. हे तुझे अभ्यासाचे , चांगले करिअर घडवण्याचे दिवस आहेत...  या सगळया इतर गोष्टींमध्ये स्वतःला गुंतू देऊ नकोस. आधी अभ्यासावरच लक्ष केंद्रित करायचं. इकडे तिकडे भटकू द्यायचं नाही. स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे असं समज . काय ? समजलं की नाही?", विराज .


"हो रे, नक्की" , विधी.

"बरं, चल आता झोप मग. सकाळी लवकर उठायचं असतं ना तुला अभ्यासाला?", विराज.

"ए , हे रे काय दादा? आधी मला सगळं ऐकायचं आहे तुझं. काय झालं , कधी , कसं झालं, सगळं", विधी.

"अग, मी काय पळून चाललोय का? सांगेन ना नंतर. आता झोप तू , जा."

"हं, आता तुला स्वप्न बघायचे असतील ना? ठीक आहे , ठीक आहे, जाते मी" , विधी तोंड वाकडं करून दाराकडे जात म्हणाली.

"वेडी मुलगी", विराज हसून म्हणाला.

विधी परत येऊन त्याच्या खांद्यावरून हात टाकत त्याला म्हणाली, "लव्ह यू दादा, मी खरच खूप खूष आहे तुझ्यासाठी. फायनली तुझी विकेट घेणारी कोणीतरी मिळाली तर!" , विधी मिश्किलपणे म्हणाली.

विराजनेही तिला एका हाताने जवळ घेत विचारले, "विधी, सगळं नीट होईल ना ग? खूप भीती वाटतेय मला. माझा स्वभाव तिला माहिती आहे. किती चिडायचो मी. तिला मी आवडेल का ? ती हो म्हणेल का? दोघांच्याही घरचे हो म्हणतील का ? खूप प्रश्न आहेत ग. प्रेम हे जितकं सुखद आणि आनंददायक असतं न, तितकीच जबाबदारी आणि काळजीही देत असतं", विराज थोडा भावुक होत म्हणाला.


"अरे, तुझ्यात झालेला बदल सर्वानाच जाणवतो आहे दादा. किती बदलला आहेस तू! आधीसारखा चिडखोर राहिला नाहीसच मुळी. तिलाही जाणवले असेलच ते. तू काळजी करू नकोस . सगळं नीट होईल.  हम तुम्हारे साथ हैं. और जब हम हैं तो फिर क्या गम हैं?", विधी त्याला हसवत म्हणाली.

"हं, थँक्स. जा झोप आता", विराजच्या चेहऱ्यावर स्माईल आले होते.

विधी गेल्यावर विराजही बिछान्यावर पडून निद्रादेवीची आराधना करू लागला.


***

लंडनला संध्याकाळचे सहा वाजत आले होते . रजत आज घरूनच ऑफिसचे काम करत होता. टेबल वर लॅपटॉप समोर बसून बराच वेळचे त्याचे काम चालले होते. काम संपले आणि तो खुर्चीला मागे रेलून डोळे मिटून शांतपणे बसला . डोळे मिटून दहा पंधरा सेकंद होत नाहीत तर पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर तोच चेहरा झळकला. गेल्या काही दिवसांपासून रजतच्या डोळ्यांपुढे तिचाच चेहरा येत होता. जरा शांत बसला , की ती डोळ्यासमोर हजर ! ...

"गौरवर्ण, नाकी डोळी सुंदर, बोलके डोळे , काळेभोर खांद्याला टेकणारे अर्धे केस क्लचमध्ये लावून बाकी मोकळे सोडलेले... नाजूक, निरागस वाटत होती. जरा अल्लडपणा दिसत होता डोळ्यात...  आनंद आणि आश्चर्य चकित झाल्यासारखे , काहीशी आतुरता असणारे असे भाव दिसत होते डोळ्यात. पण खूपच गोड होती ती... कोणालाही आवडावी अशी. कोण असेल बरं ती ? त्या दिवशी आईच्या फोनवर तिचा चेहरा काही सेकंदांसाठी झळकला होता .  तेव्हापासून कितीदा तरी माझ्या डोळ्यांपुढे तिचाच चेहरा येतोय ... या आधी तर असे कधी झालं नव्हतं .... . विचारू का आईला , त्यादिवशी कोण आले होते म्हणून?",  रजत विचार करत होता. शेवटी न राहवून त्याने आईला फोन केला .

"अरे रजत, बोल, ऑफिस नव्हतं का आज?", रेखाताई.

"आहे ग . झालं काम माझं . आता खायला बनवतो काहीतरी. त्याआधी तुझ्याशी बोलावं म्हणून सहज फोन केला. कशी आहेस? बरी आहेस ना आता? दुखणं कमी झालं की नाही?",  रजत म्हणाला.

"हो. आता एकदम बरी आहे. हात सुटला की झालं . तोपर्यंत मात्र ऋजूलाच बघावं लागतंय सगळं. आता बाबाही आलेत गावाहून. करतात दोघे मिळून सगळं काही", रेखाताई.

"हं, ठीक आहे. ऑफिसमध्ये जातेय का आता ऋजू?", रजत.

"हो , दोन तीन दिवस होती घरी . आता मला बरं वाटतय तर जाते आहे". आई.

"कोण कोण आलं होतं तुला भेटायला?", रजत.

"मला भेटायला होय? शेजारच्या काकू आल्या होत्या.  निकिता , प्राची वगैरे ऋजुच्या ऑफिसमधल्या एक दोन जणी जाता जाता येऊन गेल्या ", आई.

"हं या सर्वांना मी ओळखतो", रजत.

"त्या दिवशी कोण आलं होतं ग? मी ओळखत नव्हतो त्यांना ", रजत हळूच विचारता झाला.

"तू ओळखत नसणारं ... कोण बरं आलं होतं?...", रेखाताई अंमळ विचार करून म्हणाल्या,

"हं, वीणाताई आल्या होत्या त्या दिवशी".

"कोण ग वीणाताई?", रजत .

"वीणाताई दीक्षित. ऋजूमुळे आमची ओळख झाली. पण आता तर छान गप्पाही मारतो आम्ही दोघी . छान आहेत स्वभावाने . बऱ्याच गप्पा मारल्या आम्ही त्या दिवशी", आई.


"हं... आई आणि वीणाताई गप्पा मारण्यात रमतात ....  म्हणजे तर त्या आईच्या वयाच्या असतील साधारणपणे.... रजत विचार करत होता.

"त्या नाही ग आई... ती कोण होती ते सांग ना. आता कसं विचारू?", रजत डोक्याला हात लावत मनात म्हणाला.

"आणखी कोण आलं होतं?", रजत.

"आणखी तर कोणी नाही.." आई.
"तुला काय झालंय रे आज या नसत्या चौकशा करायला?", आई हसून म्हणाली.

"कुठे काय ग? काही नाही", रजत चपापून म्हणाला.

" ही आई पण ना ! सांगतच नाहीये. जाऊ दे . काहीतरी दुसऱ्या पद्धतीने बघावं लागेल", रजत खट्टू होऊन विचार करत होता.

"ऋजूला फोन दे न आई", रजत.

"अरे ती झोपलीसुद्धा . अकरा वाजून गेलेत  ना इथे", आई.

"हं , तसंही ऋजुला नकोच विचारायला. तिला कळलं तर मी का विचारतोय ते, नको सध्या", रजत विचार करत होता.

"खूप दमतेय रे माझी परी सध्या. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत धावपळच सुरू असते तिची . हे, मी पडल्यापासून तर फारच" , आई.

"हो ना , ती तर परीच आहे तुझी लाडकी. मी मात्र बिचारा...", रजत आता नाटकीपणे म्हणाला.

"गाढवा, गप्प बस. ती परी आहे तर तूसुद्धा राजकुमारच आहेस ना माझा?", आई हसून म्हणाली.

"बघ, बघ, कशी मला गाढव म्हणते आहे", रजत.

" ते तुला ऐकू आलं, आणि राजकुमार ऐकू नाही आलं का ?", आईने हसून विचारलं.

"आलं ग. आहेच मी तुझा राजा बेटा", रजत.

आईशी आणखी इतर बोलून , बाबांशी बोलून त्याने फोन ठेवला.

"ओह नो, मी कसा गडबडलो होतो त्या दिवशी अचानक तिला बघून... सुचतच नव्हते काय बोलावे. ब्लॅंक झालो होतो एकदम . काय होतं ते? रजत आता तुलाच शोधावं लागणार .. . ती कोण आहे ते. शोधल्याशिवाय तर काही चैन नाही पडणार आता", रजत विचार करत होता.

***

क्रमशः


© स्वाती अमोल मुधोळकर

संपूर्ण कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद . सर्व वाचकांची साथ अशीच मिळत राहो . स्वस्थ रहा , आनंदी रहा, वाचत रहा आणि असेच कळवत रहा. लिहिण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा  त्यातूनच मिळते. 

🎭 Series Post

View all