दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 13

Drushti, Drushtikon, ani, sight, vision, perspective, Rujuta, Viraj, Marathi, katha, kathamalika, story, love, office, prem, blind

मागील भागात ....

सगळे ऐकल्यावर ऋजुताला आश्चर्यही वाटले आणि आनंदही झाला .

"आय डोन्ट बिलिव विराज , आपण आता फ्रेंड्स आहोत. मला तर आधी भीतीच वाटायची तुझी . म्हणजे तुझ्या रागावण्याची. मी कधी त्यापलीकडे विचारच केला नव्हता. कदाचित तू केबिनमध्ये वेगळा बसलेला असतोस आणि आम्ही सगळे इकडे एकत्र असतो . फक्त कामापूरताच तेवढा काय तो संबंध यायचा ना तुझ्याशी. त्यामुळेही असावं" , ऋजुता.

"हं, खरं आहे", विराज.

"पण त्याच्यामागे एवढा जिंदादिल , नौटंकीबाज आणि हसरा , दुसऱ्याला आधार देणारा विराज आहे हे आता कळले", ऋजुता.

"चला मॅडम, वेळेच्या पाच मिनिटे आधीच पोचलो आपण", विराज गाडी थांबवत घड्याळात बघत म्हणाला.

आणि दोघेही उतरून रोहितच्या ऑफिसमध्ये गेले.

******
आता पुढे ...


रोहितच्या ऑफिसमध्ये पोचल्यानंतर विराज आणि ऋजुता आत गेले . रिसेप्शनिस्टने रोहितला कॉल करून विराज आल्याचे सांगितले . मिनिटभरातच प्रीती बाहेर आली .

"हा ss य प्रीती, कशी आहेस?", ऋजुता उत्साहाने हात हलवून स्मित हास्य करत  म्हणाली.

"झालं, हिला तर जशी काही मैत्रीणच भेटली खूप दिवसांनी. जिथे जाईल तिथे मैत्री जोडते", विराज ऋजुताकडे बघत हसतच मनात म्हणाला.

"हा ss य , मी एकदम मस्त ! तू कशी आहेस ?", प्रीती.

"मी पण छान", ऋजुता.
"हॅलो विराज सर ,कसे आहात?", प्रीती.

"हॅलो प्रीती, मी मजेत", विराज.

बोलत बोलत प्रीती त्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये घेऊन गेली.

"रोहित सर मिटींग संपवून येतीलच इतक्यात. आपण तोपर्यंत लॅपटॉप, प्रोजेक्टर वगैरे सेट अप करून घेऊ", प्रीती.

सेट अप करून होईपर्यंत रोहित आला.

"हॅलो गाईज, हाऊ आर यू ?", रोहितने अभिवादन करत विचारले.

"रोहितच्या डोळ्यातली चमक ऋजुताला बघून तर आलेली नाहीये ना ? सोबर फॉर्मल ड्रेस मध्येही किती इम्प्रेसिव दिसते तिची पर्सनालिटी ", विराजला मनात उगाच वाटून गेले.

"हॅलो रोहित. वी आर परफेक्टली फाईन !", विराज.

"ओके. सो शुड वि स्टार्ट?", रोहित.

"येस, शुअर", विराज.

कॉन्फरन्स रूममधले लाइट्स कमी करण्यात आले आणि प्रोजेक्टर सुरू करून ऋजुताने प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. प्रत्येक मुद्दा अगदी व्यवस्थितपणे मांडत शेवटपर्यंत अगदी आत्मविश्वासाने संपूर्ण प्रेझेंटेशन दिले . आज विराजचे अर्धे लक्ष रोहितकडेच होते. एकतर लाइट्स कमी असल्यामुळे त्याला रोहितच्या चेहऱ्यावरचे भाव नीट कळत नव्हते. प्रेझेंटेशन संपले , लाइट्स सुरू झाले आणि विराज भानावर आला.

"एनी क्वेश्चन्स ?", ऋजुताने विचारलं.

रोहित ने काही प्रश्न विचारले . प्रीतीनेही एक प्रश्न विचारला. विराज आणि ऋजुताने त्यांची उत्तरे दिली. काही प्रश्न विराजनेही रोहितला विचारले. सगळे झाल्यावर ऋजुता जागेवर येऊन बसली.

तेवढ्यात प्रीतीचा मोबाइल वाजला.
"सर, ते आपली क्लाएंट कंपनी Softech मधून फोन आहे करमरकर सरांचा, घेऊ का आता? ", प्रीती रोहितला म्हणाली.

"हं बोलून घे तू", रोहित.
प्रीतीने कॉल घेतला.

तेवढ्यात ऑफिसबॉय ने कॉफी आणली आणि सर्वांना दिली . कॉफी पिऊन झाल्यानंतर आता डील बद्दल बोलणी सुरू झाली. ऋजुता व्यवस्थितपणे आणि आत्मविश्वासाने सगळ्या प्रोसेस करत होती.

"हा प्रोजेक्ट कधीपर्यंत पूर्ण होईल ?" रोहितने विचारले.

प्रोजेक्ट मोठा असल्यामुळे ऋजुताने घाईमध्ये काही चुकीचे टाईम लाईन्स देऊ नये असे विराजला मनोमन वाटत होते.

"प्रोजेक्ट बर्‍यापैकी मोठा आहे . टाईम लाईन्स आम्ही वर्क आउट करून उद्या संध्याकाळी सांगतो. आय होप इट्स ओके विथ यू", ऋजुता म्हणाली.

ऋजुताने असे म्हणताच विराज काहीसा निश्चिंत झाला. विराजला माहिती होते की ऋजुताला इतक्या लगेच हे ठरवणे कठीण जाईल. त्यापेक्षा थोडी चर्चा करून व्यवस्थित अंदाज घेऊन हे नंतर कळवता येईल. म्हणजे आपल्यालाही प्रोजेक्ट करताना वेळेची अडचण जाणार नाही.

"येस, अबसोल्यूटली ओके.  नाइस ऋजुता अँड विराज. प्रोजेक्ट PACE डील इज फायनल. आय विल वेट फॉर युवर इमेल देन", रोहित दोघांशीही हात मिळवत म्हणाला .

"अरे, मी काही स्नॅक्स मागवले होते. ते आले नाहीत अजून !", रोहित दरवाज्यातून बाहेर बघत म्हणाला.

" रोहित, थँक्स फॉर देम, बट नेक्स्ट टाइम . मीटिंग आटपली आहे , तर आम्ही निघतो आता. आय होप यू डोन्ट माइंड. खरं म्हणजे ऋजुताच्या आईची तब्येत बरी नसल्याने तिला घरी जरा लवकर पोचायचं  आहे . त्यामुळे ट्रॅफिक वाढण्याच्या आत निघून जावं म्हणतोय", विराज.

"ओह ओके. हॅव अ नाईस इव्हनिंग ", रोहित.
"यू टू", विराज.

विराज आणि ऋजुता तेथून निघाले. पार्किंगमध्ये गाडी जवळ पोहोचताच विराज ने ब्लेझर आणि टाय काढून हँगरला लावून मागे गाडीमध्ये अडकवले .

"हुश्श" करत त्याने पांढऱ्या शुभ्र शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केल्या आणि मग पाणी पिऊन तो ड्रायव्हिंग सीटवर बसला.

" किती कूल दिसतोय आताही ", ऋजुताच्या मनात नकळत विचार चमकलाच .

गाडी रस्त्याला लागताच विराज बोलायला लागला.

"माईंड ब्लोईंग ऋजुता ! काय मस्त हँडल केलस तू सगळं ! आय ऍम प्राऊड ऑफ यू ", विराज आनंदाने म्हणाला.

"थँक्स विराज . तू मला ही जबाबदारी दिली नसती तर मलाही कळलं नसतं की मी हे करू शकते", ऋजुता स्वतःही खुश होती.

"चलो, इसी बात पे एक सेलिब्रेशन हो जाए ", विराज न राहवून आनंदाने म्हणाला.

"अं ... आता? ", ऋजुता.

"अगं हो , मला माहित आहे. अर्धे अंतर तर आलोच आहोत. जास्त वेळ नाही घेणार तुझा .उशीर नाही होऊ देणार तुला. चल मग क्विक एक काहीतरी खाऊया, जाता जाता एखाद्या ठिकाणी. भूक लागली आहे यार खूप!", विराज म्हणाला.

"हं भूक तर मलाही लागली आहे... इतकं बोलून बोलून..", ऋजुता हसत म्हणाली.

"पण काय रे , मग रोहित सरांना नाही का म्हणालास स्नॅक्स साठी ? मला तर जाम भूक लागली होती यार", ऋजुता म्हणाली.

"जाऊ दे ना.  काम झाल्यावर उगाच खाण्याची वाट बघत मला नाही थांबावसं वाटलं तिथे . तिथून लवकर निघता आलं तर ट्रॅफिक जास्त लागणारे चौक आपण इतर ऑफिसेस सुटण्याआधी पार करून आलोय ना पुढे. नाहीतर अर्धा पाऊण तास ट्रॅफिकमधेच गेला असता. तेवढंच तुलाही लवकर पोहचता येईल घरी", विराज.

"हं , तेही खरं आहे", ऋजुता.


"आपण आता इकडे खाऊ या ना. इथे पंधरा मिनिटे थांबलो तरीही घरी लवकरच पोचवतो तुला. काळजी नको करू.
आज तुझा दिवस . तू सांग काय आणि कुठे खायचं ते. पण मॅडम जरा जलदी करो, भूख के मारे जान निकल रही है", शेवटचं वाक्य विराज जरा नाटकीपणे चेहरा अगदी बिचारा करत म्हणाला.

"ए नौटंकी, काही जान बिन नको घालवू. चल ते समोरच एक चांगलं ठिकाण दिसतंय न , तिथे जाऊ", ऋजुता हसून म्हणाली.

विराजनेही मान डोलवत गाडी बाजूला घेतली. दोघेही उतरून आत जाऊन टेबल वर बसले. वेटर विचारायला येताच विराज म्हणाला, "लवकर काय मिळेल ?".

"मसाला डोसा , पावभाजी, वडा सांबर", वेटर.

"ऋजूता , तू काय घेणार? मी काय म्हणतो, तुला खूप धावपळ होतेय ना, काकूंसाठीही काहीतरी घेऊन जा ना आज. म्हणजे मग गेल्या गेल्या लगेच कामाला लागावं लागणार नाही तुला ", विराज.

"हं गुड आयडिया, मला मसाला डोसा आणि एक वडा सांबर पार्सल आईसाठी घेऊन जाते", ऋजुता.

"एक मसाला डोसा आणि एक पावभाजी द्या आणि एक वडा सांबर पार्सल", विराज.

काही वेळातच वेटर दोन्हीही घेऊन आला. बोलत बोलत दोघेही खायला लागले.

"विराज , तू तर एकदम हाडाचा मॅनेजर आहेस रे ! म्हणजे समोरच्या क्लाएंटचा रोष उद्भवून  न घेता, मलाही अगदी आयत्या वेळी सुट्टीची गरज पडलेली असताना , मला सुट्टी देऊनही तू काम मात्र परफेक्ट मॅनेज केलंस. निकीताकडून प्रेझेंटेशन बनवून घेतलंस, त्यायोगे तिलाही ते शिकायला मिळालं.  मलाही आज नवीन ध्येय समोर ठेवून प्रेरित केलंस. मीही नवीन गोष्टी करायला शिकले  आणि रोहित सर मीटिंग थोडी पुढे ढकलूनही अजिबात काही नाराज असल्यासारखे वाटले नाहीत. सगळंच कसं काय नीट मॅनेज करतोस तू? मानलं हं बॉस तुला ! ", ऋजुता डाव्या हाताने सॅल्युट करत म्हणाली.

"कळतात तर मॅडम तुम्हाला बऱ्याच गोष्टी", विराज हसून म्हणाला.

"ए, म्हणजे काय? कळणार नाही का मला?", ऋजुता डोळे मोठे करून म्हणाली.

"नाही, म्हणजे आम्हा पामरांकडे तुमचं लक्ष असलं तरच कळतील ना, नाहीतर कसं कळणार ?", विराज हसून म्हणाला.

"ओहो!  हे कधीपासून झालं? ", ऋजुता हसून म्हणाली.

"काय ते?", विराज न समजून म्हणाला.

"म्हणजे , तुमच्यासारखे दिग्गज कधीपासून स्वतःला 'आम्हा पामरांच्या' पंक्तीत बसवायला लागले?", ऋजुता हसून म्हणाली.

आता विराजही हसण्यात सामील झाला.

"पण जोक्स अपार्ट विराज, आय एम सो हॅपी ! काहीतरी नवीन करायला मिळालं आज!  विराज, या वेळी मला सगळं हँडल करायला कसं काय सांगितलंस रे? म्हणजे नेहमी असे काम तू करतोस ना?", ऋजुता आनंदात होती.

"हं हो ना. दोन गोष्टी आहेत . एकतर आता तुला ते बघून , कशाप्रकारे करायचं ते माहिती झालं आहे . नवीन गोष्टी शिकून करण्याची तुझी क्षमता खूप छान आहे , त्यामुळे तुला एक चान्स द्यावा असं वाटलं. गरज पडलीच तर सावरायला आज मी होतोच ", विराज.


"आणि दुसरी ?", ऋजुताने उत्सुकतेने विचारलं.

"सध्या नाही सांगता येणार . काही दिवसांनी नक्की काय ते कळेल , तेव्हा सांगेन " , विराज.

"ओके, म्हणजे मला माहीत नसलेल्या आणखी काही गोष्टी आहेत तर....", ऋजुता हसून पण विचार करत म्हणाली.

"हं, तेच तर म्हणतो न तुला. बऱ्याच गोष्टी सुरू असतात ग ऑफिसमध्ये", विराज.

"हं", ऋजुता.

दोघांनीही खाऊन संपवले आणि बिल देऊन ते निघाले. जाताना वेटरसाठी एक नोट ठेवायला विराज विसरला नाही.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद . सर्व वाचकांची साथ अशीच मिळत राहो . स्वस्थ रहा , आनंदी रहा, वाचत रहा आणि असेच कळवत रहा. लिहिण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा  त्यातूनच मिळते. 

🎭 Series Post

View all