दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 12

Drushti, Drushtikon, sight, vision, perspective, Rujuta, Viraj, Rohit, Marathi, kathamalika, love, story


दुपारी विराज आणि ऋजुता रोहितच्या ऑफिसमध्ये जायला निघाले. पांढरा शुभ्र शर्ट, त्यावर नेव्ही ब्लू रंगाचा ब्लेझर, आणि साजेसा टाय , हातात घड्याळ , नीट सेट केलेले केस. दिसायला आधीच देखणा असलेला विराज एकदम राजबिंडा दिसत होता. ऋजुतालासुद्धा आज विराजकडे बघण्याचा मोह आवरला नाही. क्षणभर तिची नजर त्याच्याकडे बघण्यात गुंतली.

"निघायचं ?", विराज तिच्यापुढे चुटकी वाजवत म्हणाला.

"हं, हो . निघू या", तिने आपले लॅपटॉप वगैरे सगळे घेत होकार दिला.

दोघेही कारने जायला निघाले. विराज ड्राईव्ह करत होता. त्याने गाणी लावली.

"आज कोणीतरी हॅन्डसम दिसतंय", ऋजुता.

विराज उगाच मागे इकडे तिकडे बघू लागला.

"कोणाला म्हणते आहेस ? इथे तर कोणी नाहीये. म्हणजे तू मला म्हणते आहे का?  त्या 'कोणीतरी'ला नाव नाहीये का?"

ऋजुता गालात हसायला लागली.

"काय यार , कॉम्प्लिमेंट सुद्धा देत नाहीत लोक बरोबर ! ", विराज मिस्कीलपणे हसत म्हणाला.

"विराज, खूप हॅन्डसम दिसतो आहेस", ऋजुता म्हणाली.

"थँक्यू थँक्यू ! आता कसं.... जरा बरं ss वाटलं! ",  विराज हसत म्हणाला आणि ऋजुता च्या चेहऱ्यावर सुद्धा हसू फुलले.ते साधारण अर्धे अंतर पोचले असतील तेवढ्यात विराजने गाडी एका बाजूला घेऊन थांबवली अन तो उतरला.

"थांब , मी आलोच पाच मिनिटांत", ऋजुताला सांगून तो मागे वळून काही अंतर चालत गेला.

"आजोबा, कुठे निघालात? चला , मी पोचवतो तुम्हाला ", विराज म्हणाला.

अगदी बरोबर ओळखलंत. काळा चष्मा लावलेले, काठीने पुढची जागा चाचपणी करत चालणारे ते आजोबा तिथे रस्त्याच्या एका कडेला उभे होते . हे तेच आजोबा, ज्यांना दिसत नाही आणि मागच्या वेळी ऋजुताने ज्यांना मदत केली होती.  ते इथेच कुठेतरी राहतात. आज ते काही आवश्यक कामासाठी निघालेले होते.

"बाळा, माझे औषध गोळ्या संपले , ते घ्यायला त्या समोरच्या मेडिकल मध्ये जायचं आहे रे. तो मेडिकलवाला बरोबर औषधे देतो . खूप दिवसांपासून तिथूनच घेतो मी. पण कोणी सोडूनच देईना. तू  सोडशील का मला? ", आजोबा.

"हो, चला", विराज त्यांचा हात धरून त्यांना रस्ता क्रॉस करून देऊ लागला.

त्याने रस्ता क्रॉस करून दिला आणि मेडिकल मध्ये आजोबांना पोचवले.

"आजोबा , तुम्हाला परत त्या तिकडच्या रस्त्याला जायचे आहे का लगेच?", विराजने विचारले.

"हो . तिकडेच राहतो मी. त्यामुळे परत तिकडेच जायचे आहे", आजोबा.

"बरं , तर तुम्ही औषधे घेतली की मी परत पोचवून देईन तुम्हाला", विराज.

तेवढ्यात विराजला एक फोन आला . तो आजोबांना म्हणाला, "आजोबा मी आहे इथेच बाजूला. तुम्ही घ्या तोवर औषधे. मी फोनवर बोलतोय".

आजोबांनी मेडिकलवाल्याला प्रिस्क्रिप्शन दाखवून औषधे घेतली . त्याने सांगितले तेवढे पैसे दिले आणि औषध घेऊन बाजूला उभे राहिले. विराज त्याचं फोनवरचं बोलणं आटपून त्यांच्याजवळ आला.

"झालं का आजोबा?", विराज.

"हो घेतले", आजोबा.

"बघू द्या मला, मी चेक करून घेतो एकदा", विराज.

त्यांनी पाकीट विराजकडे दिले. विराजने गोळ्या तपासून बघितल्या तर त्यातल्या दोन प्रकारच्या गोळ्यांची एक्सपायरी डेट उलटून गेलेली होती. बिल बघितले तर बिलात जास्तीचे पैसे लावलेले होते.

"आजोबा, यातल्या दोन प्रकारच्या गोळ्या जुन्या झालेल्या आहेत. बदलून घेतो मी त्याच्याकडून. चला माझ्याबरोबर त्याच्याकडे", विराज.

"अहो, यातल्या या गोळ्या एक्सपायरी डेट उलटलेल्या आहेत , अशा कशा दिल्यात ? बदलून द्या त्या गोळ्या" , विराज.

दुकानदाराने गोळ्या बदलून व्यवस्थित गोळ्या दिल्या. 

"आणि या गोळ्यांच्या किमतीपेक्षा जास्त पैसे लावले आहेत तुम्ही बिलात.... तेसुद्धा परत करा त्यांना. त्यांना दिसत नाही म्हणून काय झाले? ही आपली जबाबदारी आहे ना , नीट वागणूक देण्याची, प्रामाणिक राहण्याची? ते विश्वासाने तुमच्याकडे नेहमी येतात आणि तुम्ही फसवता त्यांना... बरोबर आहे का हे? ", विराजचा आवाज आता वाढला होता.

दुकानदार खालमानेने सॉरी म्हणाला. विराजने पैसे आणि औषधे आजोबांना दिली आणि त्यांना परत रस्ता क्रॉस करून पोचवून दिले.

"आजोबा, जमले तर दुसरीकडून घेत जा औषधे", विराज.

"हो. धन्यवाद बाळा. मी जाऊ शकतो आता इथून कडेकडेने", आजोबा.


इकडे ऋजुता गाडीत एकटीच  होती , तोपर्यंत आईला कॉल करून बोलून घ्यावे असे वाटून तिने आईला फोन केला.

" आई, जेवलीस का ग ? मी तुझ्या जवळच टेबलावर सगळं ठेवलं आहे , औषध, पाणी, फळे सुद्धा धुवून ठेवलेली आहेत. खाऊन घेशील थोड्या वेळाने.

"हो ग ऋजू, किती काळजी करशील? मी जेवले. मस्त झाली होती भाजी", आई.

" आम्ही निघालोय मीटिंग ला जायला रोहित सरांच्या कंपनीत", ऋजुता.

"हो ठीक आहे. जाऊन ये", आई.

"बेस्ट ऑफ लक दे ना आई, मी आज एक नवीन काम पण करणार आहे तिकडे. डीलबद्दल बोलणी पण मलाच करायची आहेत आज. म्हणजे विराज आहे बरोबर, पण मलाच करायचं आहे सगळं. मी पहिल्यांदाच करणार आहे ते", ऋजुता.

"अगबाई, हो, का? बेस्ट ऑफ लक हं बेटा, छान होऊ दे तुझं काम आणि नीट शांतपणे कर हं", आई.

"थँक यू ग , माझी प्यारी मम्मा", ऋजुता लाडाने म्हणाली.

"बरं , ठेवू मग आता फोन? बाय", आई हसून म्हणाली.

विराज परत गाडीत परतला , तो अजूनही रागातच होता. चेहऱ्यावर दिसतच होते की तो अपसेट झालाय.

ऋजुताला कळले की याचे काहीतरी बिनसले आहे. पण "विचारले तर सांगेल की आणखी चिडेल हा? काही वेळ शांतच राहिलेले बरे", ती विचार करत होती. तिने त्याला पाण्याची बाटली दिली. विराज ती घेऊन घटाघट पाणी प्यायला. किंचित शांत वाटले त्याला.

"चल जाऊ या? " , ऋजुता म्हणाली.

" हं", विराज.

तिने गाणी लावली . एक दोन गाणी ऐकल्यावर विराज शांत झाला. आणि मग स्वतःहूनच तो सांगू लागला. त्याच्या आवाजात दुकानदाराबद्दल एक प्रकारची चीड, उद्विग्नता जाणवत होती .

"त्याने फसवताना हेही बघितले नाही ग, की समोरचा माणूस परिस्थिती पुढे आधीच हतबल आहे. साध्या साध्या गोष्टी करण्यासाठी त्याला आपल्या परीने संघर्ष करावा लागतोय",

"हो . ना. पण मुळात फसवावेच का? मलाही हे असे अजिबात सहन होत नाही रे. पण काय करणार? आपण जेवढं करू शकतो तेवढं करायचं, बस" , ऋजुता.

"हं", विराजचा मनातला एक निश्चय आता अजूनच पक्का झाला होता.

सगळे ऐकल्यावर ऋजुताला  विराजने स्वतः थांबून त्या आजोबांना मदत केल्याचे आश्चर्यही वाटले आणि आनंदही झाला .

"आय डोन्ट बिलिव विराज , आपण आता फ्रेंड्स आहोत. मला तर आधी भीतीच वाटायची तुझी . म्हणजे तुझ्या रागावण्याची. मी कधी त्यापलीकडे विचारच केला नव्हता. कदाचित तू केबिनमध्ये वेगळा बसलेला असतोस आणि आम्ही सगळे इकडे एकत्र असतो . फक्त कामापूरताच तेवढा काय तो संबंध यायचा ना तुझ्याशी. त्यामुळेही असावं"

"हं, खरं आहे", विराज.

"पण त्याच्यामागे एवढा जिंदादिल , नौटंकीबाज आणि हसरा , दुसऱ्याला आधार देणारा विराज आहे हे आता कळले", ऋजुता.

"हं खरं सांगायचं तर असे होण्यामागे एका मैत्रिणीचा हात आहे", विराज हसून म्हणाला.

विराज विधीबद्दल बोलत असावा असे वाटून ऋजुता म्हणाली,

"ओह ,अच्छा !".

"चला, वेळेच्या पाच मिनिटे आधीच पोचलो आपण", विराज गाडी थांबवत घड्याळात बघत म्हणाला.

आणि दोघेही उतरून रोहितच्या ऑफिसमध्ये गेले.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.


आधीचा विराज आणि आताचा विराज. किती फरक वाटतोय ना!

बघूया  रोहितच्या ऑफिसमध्ये काय होतं? ऋजुता मीटिंग कशी हँडल करते? पुढे काय होतं? इत्यादी इत्यादी पुढील भागांमध्ये.

कथेला देत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार.

🎭 Series Post

View all