दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 10

Drushti, Drushtikon, sight, vision, perspective, ani, marathi, katha, kathamalika, Viraj, Rujuta, viewpoint


मागील भागात आपण पाहिले ...


फोन ठेवून विराज खुर्चीवर मागे डोके टेकवून डोळे मिटून बसला होता. सहज त्याच्या डोळ्यापुढे कालच्या घडामोडी डोकावल्या. वेळोवेळी दिसणारे ऋजुताच्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे भाव मनात एकामागून एक हजेरी लावू लागले. घरी परत जाताना तिच्या चेहऱ्यावर असणारे निखळ हास्य आठवून त्याच्याही चेहऱ्यावर आपसूक हास्य उमटले. आज दोनतीनदा तिच्या डेस्कवर त्याने केलेला फोन आठवून त्याला स्वतः चेच हसू आले.

"रोहितला ऋजुताचा पर्सनल नंबर कशाला हवा होता? खरं तर सहसा बाहेरच्या कोणाला देत नाही आम्ही एम्प्लॉयीचा पर्सनल नंबर . पण रोहितला नाही नाही म्हणू शकलो मी. उगाच तेवढ्याने प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून. असेल काहीतरी काम . ऋजुताला विचारेन नंतर", असा विचार करून विराज परत कामात गुंतला.

*****
आता पुढे ....

दुपारी ...

ऋजुताच्या आई रेखाताईंनी विराजच्या घरी फोन केला.

"हॅलो, वीणाताई, रेखा बोलतेय", ऋजुताची आई.

"अगबाई, रेखाताई , तुम्हाला फोन करणारच होते मी , विराजने तुम्हाला लागल्याचं सांगितलं मला सकाळी".

"वीणाताई, त्यासाठी धन्यवाद देण्यासाठीच फोन केलाय हो. खूप गुणाचा आहे विराज. काल आमची एवढी मदत केलीय त्याने. संध्याकाळी लाईट गेले आणि अंधारात अंदाजच आला नाही मला. पडले पाय अडकून. अगदी उठताही येत नव्हतं मला. उशीर झाला तर ऋजूला सोडायला म्हणून आला होता विराज . ती त्याला घरी घेऊन आली, तर मी ही अशी पडलेली होती . दोघांनी मिळून उठवलं मला आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन चेक करून आणलं बघा. नेमके 'हे'ही गावात नव्हते. उठताना आधार देण्यापासून ते डॉक्टर कडे नेऊन आणेपर्यंत.... ऋजुबरोबर माझे सगळे अगदी आपलेपणाने केले विराजने  .

"अहो  करायलाच हवे होते ना त्याने ! अडचणीच्या वेळी मदत करायलाच हवी ना. कशी आहे तब्येत आता ?", वीणाताई.

"ठीक आहे . काही दिवस दुखणार तर आहेच आता थोडंफार . पण पडून राहून, बसून बसून कंटाळा येतो हो. काय करायचं दिवसभर असं ? सवय नसते ना आपल्याला. सारखं काहीतरी कामात राहण्याची सवय. चुकल्या चुकल्या सारखं होतंय", रेखाताई.

"हो ना . बरोबरच आहे . खरं म्हणजे मी भेटायला येण्याचा विचार करत होते", वीणाताई.

"अहो मग या ना. कधी येताय, आज की उद्या ? ऋजूही आहे घरी", रेखाताई.

"उद्या दुपारी येतो साडेपाच च्या दरम्यान..", वीणा ताई

हो चालेल , या. तेवढयाच गप्पाही होतील. रेखाताई.

*****
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ...

"हॅलो निकिता, जरा केबिनमध्ये ये", विराजने निकिताला डेस्कवर फोन करून बोलावले .

"ओके, आलेच", निकिता म्हणाली.
"अरे देवा , आता माझं चुकलं बिकलं की काय काहीतरी?  मला ओरडणार आहेत का सर? बघू ,चला ... आलिया भोगासी असावे सादर", असे मनात म्हणत निकिता केबिनमध्ये गेली.

"निकिता, यात काही फाईल्स आहेत.  त्या वाचून थोडे स्टडी कर आणि नंतर त्यावर प्रेझेंटेशन बनव . काही अडचण असेल तर विचार. तुझं झालं की मला दाखव. मग आपण डिस्कस करू", विराज.

"ओके सर", निकिता.

निकिताने प्रेझेंटेशन बनवायला घेतले. दुपारपर्यंत ते बनवून झाले. विराजने त्यात काही छोटेमोठे बदल सुचवले आणि शेवटी संध्याकाळपर्यंत ते फायनल झाले.

"निकिता हे प्रेझेन्टेशन मला दे यात", विराज म्हणाला.

"ओके", निकिताने विराजला पेन ड्राईव्ह मध्ये प्रेझेंटेशन टाकून दिले.

****
दुपारी विराजच्या घरी ...

" विधी लवकर आटप. चल, रेखाताईंना साडेपाचला येतो असं सांगितलं आहे", वीणाताई.

"हो ग, झालंच . चल.  अरे , छान पाऊस येतोय भुरभुर", विधी.
"हं, रिक्षानेच जाऊया ", आई.

काहीवेळाने दोघी ऋजुता कडे पोचल्या . दारात छोटीशी रांगोळी काढलेली होती.

"छान आहे ना रांगोळी?", आईचे लक्ष वेधत विधी आईला म्हणाली.

"हो ना, छोटीशी पण सुबक आहे", आई.

ऋजुताने दरवाजा उघडून दोघींचे हसून स्वागत केले.

"या काकू. ये विधी", ऋजुता दोघींना म्हणाली .

"या वीणाताई,  ये विधी. बसा ना", रेखाताई.

ऋजुताने दोघींसाठी पाणी आणले .

"काय म्हणता ? सक्तीचा आराम, नाही का? लागलय का हो फार ? हात बांधलेला दिसतोय",  वीणाताई.

"हो ना . हात बांधावा लागला . बाकी पायाला आणि कमरेला  मुकामार होता. त्यादिवशी पेक्षा ठीक आहे आता", रेखाताई.

"हं अच्छा", वीणाताई.

इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या.  बोलता बोलता विधीचे आजूबाजूलाही लक्ष होते. घर फार मोठे नाही पण सुंदर रित्या सजवलेले दिसत होते. भिंती आणि पडद्यांची रंगसंगती सुरेख साधलेली होती. भिंतीवर एक दोन हाताने सुरेख कलाकुसर केलेल्या  फ्रेम्स लावलेल्या होत्या. फुलदाणीत रंगीत कागदी फुले सजवून ठेवलेली होती.

"काकू , हे कुणी केलेय? ", विधीने विचारले.
"ऋजुने केले होते ते कॉलेजच्या दिवसांमध्ये. तिलाच भारी हौस आहे या सगळ्यांची. आताशा वेळ नाही मिळत तेवढा ऑफिसमुळे. कधीतरी करते असं काही फुलं वगैरे", रेखाताई.

"सुंदर आहे", विधी म्हणाली.

तिथे ठेवलेल्या फोटोफ्रेम कडे वीणाताईंचं लक्ष गेलं. "हा कोण ?"

"हा माझा मुलगा रजत. सध्या लंडनला गेलाय कंपनीतर्फे वर्षभरासाठी", रेखाताई.

ऋजुता स्वयंपाकघरात काही करायला गेली होती. भज्यांची तयारी तिने करूनच ठेवली होती. गरमागरम भजी तळायला तिने सुरवात केली होती.

तेवढ्यात रेखाताईंच्या फोनवर रजतचा विडिओ कॉल आला.
फोन जरा दूर टेबलवर होता.

"ऋजू, अग फोन वाजतोय माझा , देतेस का जरा पटकन, कॉल बंद व्हायचा नाहीतर", रेखाताई.

"अग आई माझे हात खरकटे आहेत, आणि भजी सुद्धा होत आहेत ".

"असू दे काकू, मी देते ना", विधी उठत म्हणाली.

"पटकन कॉल रिसिव्ह कर. अन मग दे मला इकडे", रेखाताई.

विधीने जाऊन फोन हातात घेतला आणि कॉल रिसिव्ह केला. पलीकडून रजत होता. तो विधीला पाहून गोंधळला. आणि क्षणभर पाहतच राहिला. विधीसुद्धा एकटक बघत होती.

"मी ...तर...  ते... आईला फोन केला होता ... सॉरी, चुकून तुम्हाला लागला वाटतं.... पण मी तर बरोबर आईचा नंबर ....", रजत गोंधळून नंबर बघत म्हणाला.

"हो हो, त्यांचाच आहे ... मी देते त्यांना", विधीने भानावर येत फोन रेखाताईंना दिला.

रेखाताईंनी थोडंस बोलून नंतर बोलूया म्हणून फोन ठेवला. आणि पुन्हा वीणाताईंशी गप्पांमध्ये रंगल्या. ऋजुताने तोपर्यंत सर्वांसाठी प्लेट्समध्ये गरमागरम भजी आणली होती .


इकडे ऑफिस सुटण्याची वेळ होत आली होती.

"विराज, आता फार दिवस घालवून चालणार नाही. दुसऱ्या ध्येयाचा पाठपुरावा करायला हवा आहे. You have a long way to go , man", विराज स्वतःशीच विचार करत होता.

विराजने एक फोन केला.

"कुठे आहेस ?" , विराज .

"***** इथेच आहे", समोरचा फोनवर.

"येतो मी थोड्या वेळात तिथे .... काल मी सांगितले होते ना, मला त्याबद्दल सगळी माहिती हवी आहे", विराज.

"हो, ठीक आहे, आहे मी इथेच तोपर्यंत",  फोनवर बोलणारा समोरचा.

"ऑफिस सुटते आहे. येतो मी तासाभरात . मग बोलू", विराजने फोन ठेवला.

"जाता जाता ऋजुताचे घर रस्त्यात लागेल. तिला आणि काकूंना भेटून पुढे जावं", विराजने विचार केला.

त्याने वाटेत काही फळे घेतली . आज दोन दिवसांनंतर तो ऋजुताला भेटणार होता. एक अनामिक आनंद त्याला होत होता. भेटण्याची ओढ जाणवत होती. ठरवल्यानंतर कधी एकदा भेटतो असे झाले होते. "काय वाटेल तिला, मी असा अचानक गेलो तर? आनंद होईल की गोंधळेल ती?", विराज विचार करत होता.

काही वेळात तो ऋजुताकडे पोहोचला आणि बेल वाजवली. ऋजुताने दरवाजा उघडला. विराजला बघून ती आश्चर्यचकित झाली.

"विराज तू सुद्धा ?", ऋजुता आश्चर्यमिश्रित आनंदाने म्हणाली.

"हे घे , काकूंसाठी आणले आहेत. देशील त्यांना", हातातली फळांची पिशवी ऋजुता कडे देत तो म्हणाला.

"मीसुद्धा ... म्हणजे? आणखी कोण आले आहे ?", असे म्हणता म्हणता विराजची नजर हॉलमध्ये सोफ्याकडे गेली आणि आता आश्चर्यचकित होण्याची पाळी विराजची होती.

"आई, विधी, तुम्ही इथे?", भजी खात असलेल्या वीणाताई आणि विधीला बघून विराज आश्चर्याने म्हणाला.

"मग काय, तू एकटाच येऊ शकतोस का ?", विराजची आई हसून म्हणाली. "रेखाताईंना भेटावं म्हटलं... म्हणून आलो".

"पण तू कसं काय आज इथे?", वीणाताई विचारत्या झाल्या.

"अगं, उद्या क्लाएंट मिटींग आहे ना, तर त्यासाठी ऋजुताला फाईल्स द्यायच्या होत्या आणि इकडेच एका ठिकाणी जायचेही होते.  म्हणून म्हटलं तेही होईल आणि काकूंनाही भेटून जावं एकदा", विराज हॉलमध्ये येत म्हणाला.

"विराज ये ना. बस", रेखाताई.

"वीणाताई, खरच सांगते, त्या दिवशी विराज नसता तर आम्ही कसे केले असते काय माहिती", रेखाताई विणाताईंना म्हणाल्या.

" ऋजू , विराजसाठीही आण भजी", रेखाताई ऋजुताला आवाज देत म्हणाल्या.

"हो , आणते", ऋजुता.

ऋजुता एका प्लेटमध्ये भजी आणि पाण्याचा ग्लास ट्रे मध्ये ठेवून घेऊन आली आणि विराजला तिने प्लेट दिली.

"ऋजुता, अगदी मस्त झालीयेत हं भजी",  वीणाताई कौतुकाने म्हणाल्या.

"पावसाचा असा एक शिरवा पडून गेल्यावर भजी खाण्याची मजा काही औरच असते, नाही का?" ,वीणाताई.

"हो ना, पावसामुळे छान गार झालंय वातावरण", रेखाताई.

नेहमी चुलबुली असलेली विधी मात्र भजी खाता खाता शांतपणे सर्वांचे आणि तिच्या दादाचे निरीक्षण करण्यात गुंतली होती.

"ऋजू, तूही घे ना", वीणाताई.

"हो , आधी चहा ठेवते. उकळेल तोपर्यंत", ऋजुता.

ऋजुता ने मस्त आले आणि गवती चहा टाकून चहा उकळण्यासाठी ठेवला आणि प्लेटमध्ये दोनचार भजी घेऊन येऊन बसली.

"Wow , काय सुगंध येतोय चहाचा... ऋजुता तर एकदम छान सुगरणच दिसतेय.... भजी पण मस्त, आता चहा पण मस्त... दादा तुझी चॉईस तर खूपच छान आहे हं... दादाच्या मागेच लागते मी आता हीच वहिनी आण म्हणून.... आणि हा दादा बघा ! याची तर नजरही हटत नाहीये तिच्यावरून.  आपल्याच विचारात आहे", विधी मनात विचार करत होती.

काही वेळात ऋजुताने सर्वांसाठी चहा आणला. चहा घेता घेता वीणाताई म्हणाल्या , " चहा पण एकदम फक्कड झालाय ऋजुता. मूड एकदम फ्रेश झाला बघ. हो ना विराज?"

विराजचे बोलण्याकडे लक्षच कुठे होते... तो तर आपल्याच तंद्रीत ऋजुताकडे बघत हरवला होता. विधीने विराजला हळूच धक्का दिला तसे विराज गडबडला आणि इकडे तिकडे बघायला लागला.

"अं ?", विराज गोंधळून म्हणाला.

"अरे चहा कसा झालाय ? मला तर खूप आवडला", विराजची आई .

"हां, चहा होय ?  चहा खूप छान झालाय , एकदम फ्रेश वाटतय चहा प्यायल्यानंतर", विराज सावरत म्हणाला.

विधी मात्र गालातल्या गालात हसू लागली. "आई आणि काकू गप्पांमध्ये व्यस्त आहेत . म्हणून तुझं फावतंय दादा, नाहीतर तुझं काही खरं नव्हतं ", विधी हळूच त्याला म्हणाली आणि त्याने तिला डोळ्यांनीच दटावले.

चहा घेऊन झाल्यावर विराजने खिशातून पेन ड्राइव काढला आणि ऋजुताला देत म्हणाला," ऋजुता यात एक प्रेझेंटेशन आहे. निकिताने बनवले आहे . तू ते डोळ्याखालून घाल एकदा. उद्या रोहितकडे हे प्रेझेंटेशन द्यायचे आहे तुला. वाटलं तर उद्या डिस्कस करूया ऑफिसमध्ये".

" ओके ", पेन ड्राइव्ह घेत ऋजुता म्हणाली.

"आई , मी निघतो. मला एका ठिकाणी जायचं आहे", विराज.

" हो ठीक आहे . आम्हीही निघतच आहोत", वीणाताई.

" येतो हं रेखाताई , लवकर बऱ्या व्हा", वीणाताई.
"खूप बरे वाटले तुम्ही आलात तर. या पुन्हा", रेखाताई.

तिघेही ऋजुता कडून निघाले. विराज आपल्या कामाला गेला आणि विधी आणि वीणाताई आपल्या घरी गेल्या.

*****

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ...

"ऋजुता इकडे ये लॅपटॉप घेऊन , प्रेझेंटेशन आणि आणखी काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत", विराजने डेस्कवर फोन करून ऋजुताला केबिनमध्ये बोलवले.

"ओके, आलेच", ऋजुता.

ती केबिनमध्ये आल्यावर...

"बस ना. रोहित चा फोन आला होता का ग? त्याने तुझा पर्सनल नंबर घेतला होता माझ्याकडून", विराज ऋजुताला म्हणाला.

"हो. आला होता", ऋजुता.

"काय म्हणत होता?", विराज.

"काही खास नाही. सहज केला होता", ऋजुता.

"सहज?", विराज.

"हो , ते एच आर ने त्या हॉटेलला लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे हे सांगितलं त्यांनी ", ऋजुता.

"आणखी ?", विराज.

"काही नाही" ,ऋजुता.

"काही नाही?", विराज काहीसे न पटल्यामुळे म्हणाला .

"नाही", ऋजुता.

"ओके", विराज.

"मला तर हे आधीच सांगितले होते, तरी रोहितने फक्त एवढं सांगण्यासाठी तिला पर्सनल फोन केला? सुट्टीवर असताना पर्सनल फोन करायची काय गरज? आणखी काही बोलला असेल का रोहित? ऋजुताने मला सांगितले नसेल का? ऋजुताने लपवले असेल का माझ्यापासून? काय करू? कसे शोधू याचे उत्तर ?", विराज विचार करत बेचैन झाला होता.

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.


विराज कोणाला भेटायला जातोय? काय असेल विराजचे पुढचे ध्येय?

बघू या पुढील भागांमध्ये. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

🎭 Series Post

View all