Feb 26, 2024
वैचारिक

द्रौपदी वदते जेव्हा.. भाग २

Read Later
द्रौपदी वदते जेव्हा.. भाग २

माता कुंती.. 

तसे पाहावे तर मी त्यांची स्नुषा होते ; परंतु त्यांनी मला अगदी त्यांच्या पुत्रीप्रमाणे वागवले. देवी कुंतींचा माझ्या जीवनावर खूप गहिरा परिणाम आहे. देवी कुंती ह्या माझ्या तीनही पतींच्या माता आहेत. पाच अजेय वीरांचा सांभाळ त्यांनी केला. तसेच महावीर कर्णाच्याही त्या माता आहेत. कुरुकुलाच्या पराक्रमी महाराज पांडू यांच्या त्या भार्या. खरे तर त्या वीरांगना होत्या. त्यांना राजधर्माची पुरती जाणीव होती. त्यांनी आयुष्यभर मला प्रेम दिले.. पण ह्याचा अर्थ त्यांनी माझे जीवन केवळ सुखकरच बनविले असे नाही. 


            वारणावतच्या कटातून सहीसलामत निसटून माझे पाचही पती आणि माता कुंती एक ब्राम्हणाच्या गृही राहत होते. त्याच काळात माझे स्वयंवर योजिले होते. माझ्या पित्याने लावलेला महत कठीण प्रण केवळ यासाठी होता, की त्यांच्या मते माझा विवाह अर्जुनांशी व्हावा आणि माझ्या भाग्याने अर्जुनांनी तो प्रण पूर्ण करून स्वयंवर जिंकलेही.. मात्र आम्ही गृही परतलो असता, माता कुंतीने आतूनच जी भिक्षा आणली आहे ती पाचही जणांनी वाटून घ्या असे सांगितले..

आणि हे मातेचे आज्ञाधारक पुत्र... 

द्रौपदीने आम्हा सर्वांशी विवाह केला पाहिजे हा हट्ट धरून बसले. मी मात्र याला सहमत नव्हते. तरी द्वारकधीशाने मध्यस्थी करून मी पाचही पांडवांसमवेत विवाह केला. मागल्या जन्मी मी पाच गुणांनी युक्त असणारे पती मागितले होते. एकाच पुरुषात सर्व गुण असणे शक्य नाही,त्यामुळे माझा विवाह पाच पतींशी झाला, हे जरी सत्य असले...

परंतु ते काय होते ?

मी भिक्षा होते का ? 

की मी कोणती जिंकलेली वस्तू होते ? 

मी एक उपवर कन्या होते. माझा वर निवडण्याचा हक्क मला होता. तरीही परिस्थितीशी जुळवून घेऊन, माझ्या भ्रात्त्यासमान असणाऱ्या कृष्णाच्या मध्यस्थीचा मान राखत मी विवाह केला. 

म्हणजे काय केले ?

तह करविला स्वतःच्या आयुष्याचा... आणि तो का ? 

तर देवी कुंतींच्या मुखातून अजाणतेपणी बाहेर पडलेल्या त्या आज्ञेमुळे.. देवी कुंतीनी क्षणांत माझी स्वप्ने विभागून टाकली. मला मान्य आहे हे अजाणतेपणी घडले ; 

परंतु जेव्हा देवी कुंतीनी दारात मला उभे असलेले पाहिले, तेव्हा त्या आपले शब्द मागे घेऊ शकत नव्हत्या का ?

मातेच्या एका आज्ञेवर पाचही जणांशी विवाह करण्याचा हट्ट धरून बसलेल्या त्यांच्या आज्ञाधारक पुत्रांनी.. त्यांची आपले शब्द परत घेतल्याची आज्ञा ऐकली नसती का ?

एक स्त्री असूनही माझ्या भावनांचा खेळ मांडताना.. हेलावले नसेल का त्यांचे मन...?

जाणवले नसेल का माझे दुःख..? 


            आम्ही वनवास आणि अज्ञातवास भोगणार होतो, तेव्हा त्यांनी मला नक्कीच रोखले. मी जाऊ नये असा हट्ट धरला. मला वनवास सहन होणार नाही हे त्यांना उमजले होते. त्यांच्या मातेसारख्या प्रेमाने मी भारावून गेले होते. परंतु त्यांच्या ज्या आज्ञेने मला त्यांच्या पाचही पुत्रांची पत्नी बनविले होते... त्या आज्ञेखातर...पतिव्रता धर्माखातर मला जाणे भाग होते.. आणि मला त्याचा खेद नाही. 

             देवी कुंती अत्यंत सहनशील नारी आहेत. त्यांनी कुमारी अवस्थेत पुत्रापासून दूर होणे.. पतीचा अकाली मृत्यू.. त्यांच्या मुलांना दिली जाणारी दुय्यम वागणूक.. त्यांच्या विरूध्द रचले गेलेले कट यांना खूप धैर्याने तोंड देत आपण वीरांगना असल्याचेही सिद्ध केले. परंतु जिने स्वतः आयुष्यात दुःख सहन केले ती माझे दुःख पाहू शकली नाही, याचा मला खेद आहे. माता कुंती नेहमी माझ्या मातेसमान माझ्याशी वागल्या..

परंतु माझ्या आयुष्यातले सर्वात मोठे दुःख त्यांनीच मला प्रदान केले हे मी विसरणे शक्य आहे का ?

नाही..

कदापि नाही..

देवी कुंतींचा मी माता म्हणून आदर करत असले.. त्या माझ्यावर आपल्या पुत्रिव्रत प्रेम करीत असल्या.. 

तरीही...

त्यांच्या त्या आज्ञेसाठी ही द्रौपदी त्यांना कधीच माफ करणार नाही.... 


वीर पुत्र मला सोपवताना..

मातेहून देवी बनलात..

पुत्रांच्या सुखाकरिता तरीही...

माझा विचार दूर सारलात... 


पुत्रीसमान वागविलेत मला...

मी तुमचे उपकार विसरणार नाही..

परंतु तुमच्या त्या आज्ञेमुळे..

मी तुम्हांला माफ करणार नाही.. 


प्रेम जरी मनात असले ..

तरी तुमच्याबाबत क्रोधही आहे..

प्रेम अन क्रोधाच्या अग्नीत जळतेय..

मी अग्निकन्या द्रौपदी आहे.. 

______________________


क्रमशः. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//