Feb 24, 2024
वैचारिक

द्रौपदी वदते जेव्हा..भाग १

Read Later
द्रौपदी वदते जेव्हा..भाग १

मी द्रौपदी.. 


मी द्रौपदी.. 

ओळखलंत ना मला ? का नाही ओळखणार ?

महाभारतातील एक महत्वाची व्यक्ती आहे न मी ? 

महत्वाची की अपराधी ? 

वर्षानुवर्षे मला अपराधी ठरवले गेले. घडलेल्या महाभारतासाठी.. आणि मी...

सहन केले ते.. नेहमीप्रमाणे.. 

द्रौपदी अपराधी भासली सर्वांना.

द्रौपदी सर्व घटनांना कारणीभूत भासली. पण कोणाला द्रौपदी एकटी का भासली नाही.. एकटीच ती झुंजतेय.. परिस्थितीशी लढतेय, हे का जाणवत नाही ? 

सांगा ना.. ? 

माझे पिता द्रुपद.. त्यांच्या गृही माझा जन्म अपेक्षित होता का ? नव्हताच ना. त्यांना हवा होता एक पुत्र जो त्यांच्या अपमानाचा सूड घेऊ शकेल. जो द्रोणाचार्याना पराजित करू शकेल. पण अग्निकन्या तथा अघन्या म्हणून मी त्यांच्या गृही जन्मले आणि माझ्या नंतर द्युष्टदृम्यचा जन्म झाला. अग्निकन्या नुसती नावापुरतीच नव्हते मी.. माझा स्वभाव अग्नी होता तसा माझा जन्म सुद्धा अग्नीचाच होता. 


आयुष्यभर केवळ दाह अन दाह..

जन्म झाल्यापासून मृत्युपर्यंत मी जळत राहिले... 

कधी विरहाच्या.. 

कधी प्रतारणेच्या...

कधी अपमानाच्या..

कधी एकटेपणाच्या अग्नीत.. दाह होत राहिला मला. परंतु त्यावर जल शिंपडून शांत करायला कोणी आले नाही. आले नाही कशाला, कोणाला यावेसे वाटले नाही.

           का वाटले नसेल कोणाला की माझ्या डोळ्यांतून.. माझ्या दृष्टिकोनातून बघावे माझ्या आयुष्याकडे ?

जन्मदात्याला अपेक्षा नसताना माझा जन्म...

ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केले त्या अर्जुनाकडूनच प्रतारणा.. 

पण अर्जुनाने जिंकूनही माझ्या इच्छेखेरीज झालेला पाच भावांशी विवाह..

बरे, त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे तोच आयुष्यात आलेले ते द्यूत..

तो लांच्छनास्पद वस्त्रहरणाचा प्रसंग.. 

त्यांनंतर एक वर्षाच्या अज्ञातवासात भोगलेली अनेक दुःख.. 

तद्नंतर ज्याचा दोष सतत मलाच दिला गेला ते महाभारताचे महायुद्ध..

युद्ध जिंकून जरा कुठे आनंद पदरात पडतो तोच अश्वत्थामाकडून माझ्या पाचही पुत्रांचा वध...

आणि मरेपर्यंत राज्ञी म्हणून मिरवले तरी आयुष्यभर एकटी जळत राहण्याचे दुःख... 

कुठवर आणि कसे सोसले मी हे आयुष्य. का नाही विचार करत कोणी ? का द्रौपदीला कायमच वंचित ठेवले गेले त्या मान सन्मानापासून ज्याची ती पात्र आहे ? कोण होती ओ द्रौपदी ? महाभारताच्या महायुद्धामागे असणारी कुटील राजकारणी नव्हती ती, नियतीच्या पटावरील एक प्यादं होती फक्त..! फक्त एक प्यादंच.

तुम्हांला अपराधी भासते ना मी.. पण मला मी वीरांगना भासते. परिस्थितीशी एकटी झुंझणारी वीरांगना..

तुम्हांला अपराधी भासत असले, तरी मला मी अपराध नाही तर माझ्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेतलेला आठवतो..

तुम्हांला अबला भासते ना मी..पण मला मी अग्निकन्या असल्याचे वारंवार स्मरण होते. 

तुम्हांला पापी वाटत असेन मी.. पण मला, मी द्वारकाधीशाचा मोक्ष प्राप्त करून देणारा सहवास लाभलेली त्याची पुण्यवान भगिनी भासते.

             हो.. आज नाही कोण थांबवू शकणार मला. मी बोलेन माझ्या आयुष्यातल्या प्रत्येकाबद्दल बोलेन. माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या पतींपासून ते माझ्यावर अन्याय करणाऱ्या प्रत्येकापर्यंत.. सर्वांविषयी बोलेन मी.  मी ज्यांची माता आहे त्या माझ्या सहा पुत्रांबद्दल बोलेन.. माझ्या बहिणीसमान सवतींबद्दल बोलेन.. माझ्या मातेसमान असणाऱ्या देवी कुंतींबद्दल बोलेन.. कुरुकुलाच्या त्या सर्व व्यक्तींबद्दल बोलेन ज्यांनी मला स्नुषा मानूनही माझ्यावर होत असलेला अन्याय सहन केला.. आणि सरतेशेवटी.. मला आधार देणाऱ्या माझा प्राणसखा कृष्णाबद्दल बोलेन मी.. 

           आज मला बोलायचे आहे. आज माझ्या जीवनातले प्रत्येक पान माझ्या दृष्टिकोनातून उलघडायचे आहे. तेव्हा नाही बोलू शकले. पण आज मी बोलतेय. सर्वांना सांगू इच्छितेय..

मी द्रौपदी..


_______________________

क्रमशः. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//