द्रौपदी शस्त्र उठालो

द्रौपदी शस्त्र ऊठालो.. खुद को मदत खुद करो....

द्रौपदी शस्त्र उठालो…. 









"तर मिस संगीता.." ... अडव्होकॅट.





"आता काय मिस अन् मिसेस? सगळंच गेलंय, संगीताच म्हणा अडव्होकॅट साहेब." ....संगीता कुत्सितपणे हसत म्हणाली. 





          संगीताचे बोलणे ऐकून कोर्ट एकदम शांत झाले. तिला बघून वकील तर थंडच झाला. पुढे काय बोलावे, त्याला काही सुचत नव्हते. 





"आम्ही आमच्या नियमानुसार बोलतो मिस संगीता. तर कोर्टाचा जास्ती वेळ न घेता तीन नोव्हेंबरच्या रात्री काय काय घडले ते कोर्टामध्ये सविस्तर सांगा." ....ऍडव्होकेट.





"का.....?" ....संगीता. 





           ऍडव्होकेट आणि बाकी सगळे तिच्याकडे अजब नजरेने बघत होते. एवढे सगळे घडूनही ही मुलगी इतकी निडर कशी? सगळे विचारात, तिच्याकडे बघत होते. संगीताने एक नजर कोर्टमध्ये चारी दिशेने फिरवली, एक मोठा श्वास घेतला आणि परत बोलू लागली. 





"का....? म्हणजे.....तुम्ही पेपरू वाचले नाहीत काय? पोलिसांनी सगळं रेकॉर्डही केलंय आणि लिहून पण घेतले आहे. त्याच्या बऱ्याच कॉपी सुद्धा असतील, कारण गेल्या चार महिन्यांपासून रोज रोज तेच विचारत आहेत आणि मी तेच सांगत आहे. एकही शब्दच काय, अक्षारतही बदल नाही झाला आहे. तुम्ही इथे येण्याआधी स्टडी नाही केले काय? की तुम्हाला कोणाला वाचता नाही येत? की परत परत झालेली गोष्ट एका मुलीच्या तोंडून ऐकायला मजा येते? फुकटचा शो तसाही कोणाला बघायला नाही आवडत आणि ऐकायला, नाही काय?" ...संगीता.  





"मिस संगीता, तुम्ही असे बोलून कोर्टाचा अनादर करत आहात. इथे तुम्हाला नियमांनी बोलावे लागेल. हे कोर्ट आहे, न्यायदेवतेचे मंदिर. न्यायदेवता आहे इथे, याचा अपमान तुम्हाला करता येणार नाही." ….ऍडव्होकेट.





"खरंच न्याय मिळतो इथे? नाही म्हणजे न्यायदेवतेचा डोळ्यावर पट्टी आहे म्हणून विचारले."... संगीता. 





"मिस संगीता, तुम्ही कोओपरेट करत नाही आहात. तुम्ही कोर्टाच्या कामामध्ये व्यत्यय आणत आहात. मी विचारतोय, तेवाढया प्रश्नांची उत्तरे द्या." ....ऍडव्होकेट.





"मिस संगीता, प्लीज कॉऑपरेट." .. जज.





"काय जाणून घ्यायचे तुम्हाला? त्या रात्री काय झाले? त्या हरामखोरांनी माझ्यासोबत काय केले? कसे केले? मी तिथे काय करत होते? माझ्यासोबत कोण होते? मी काय घालून होते? त्यांनी मला कसे आणि कुठे पकडलं? कुठे कुठे हात लावला? मग आधी कपडे फाडले की केस ओढलेत? मग एक होता, की दोन होते की चार होते? मग त्याने मला कुठे स्पर्श केला? कसा स्पर्श केला? मी ओरडले की नाही? आजूबाजूला मदत मागितली की नाही? मग तो तोच होता की दुसरा कोणी? मी नीट बघितले की नाही? माझा गैरसमज झाला तर नाही? मी का मारले त्या मुलांना? की मीच त्यांना भुरळ पाडत माझ्या मागे आणलं? नाही द्यायची कशाचीच उत्तरं. बोला काय करणार? फासी देणार की जन्मठेप देणार? की मारणार? मार तर तसाही खाऊ घातलाच आहेत पोलिसांनी, गुन्हा कबूल कर म्हणून. पण मी नाही केलेल्या गुन्ह्याची जी शिक्षा मला मिळाली आहे त्यापुढे तुमच्या या शिक्षा काहीच नाही." ...संगीता म्हणाली. बोलता बोलता तिचे डोळे पाणावले होते. 





          संगीताचा एक एक शब्द तिथे बसलेल्या बाईमाणसाच्या काळजावर एखाद्या तीर प्रमाणे वार करत होते. सगळेच स्तब्धपणे तिच्याकडे बघत होते. 





"मिस संगीता, तुम्ही पोलिसांवर खूप मोठा आरोप करत आहात आणि जर असे काही घडलेच आहे, जसे तुम्ही म्हणत आहात पोलिसांनी तुम्हाला मारले, त्याची तुम्ही सविस्तर कंप्लेंट का नाही केली?" ....ऍडव्होकेट.





"काय गोष्ट करता साहेब, इथे कुठलीही गोष्ट सांगायची म्हणजे पुरावे लागतात. तुम्हाला काय वाटते, बलात्कार झाला, पोलिसांनी मारले, या सगळ्याचे पुरावे शाबूत असेल आतापर्यंत? ते कधीचेच मिटावले गेले असतील. आम्हा गरिबांसाठी नसते हे कंप्लेंट वगैरे गोष्टी. आम्ही कंप्लेंट करायला गेलो ना, की आम्हालाच दोन चार केसमध्ये फसवून तुम्ही लोकं मोकळे होता. गरिबाला परवडते काय हे सगळे? जगणं कठीण होऊन जाते साहेब. आणि वर म्हणता कंप्लेंट का नाही केली." .... संगीता. 





         आता तर तिथे उपस्थित पोलीस वर्ग अचंभित होत तिच्याकडे बघत होता. त्यांचा मुख्य अधिकारी तर रागाने तिच्याकडे बघत होता. संगीताने त्याच्याकडे बघितले, त्याचा रागाला न जुमानता ती पुढे बोलू लागली. 







"खरं बोलण्याची शिक्षा मिळणार साहेब आता. तुम्हीच लोकं इथे भगवद्गीतावर हात ठेवून सत्य बोलायला शपथ घ्यायला लावता.आणि सत्य बोलले की शिक्षा देणार." ....संगीता विक्षिप्तपणे हसत म्हणाली. 







"हे बघा, आम्ही इथे तुम्हाला न्याय मिळवून द्यायला आहोत. तुमची मदत करायला आहोत. आणि तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तर नीट बोलत होत्या. घाबरून बसल्या होत्या." ....ऍडव्होकेट.







"अहो तिथे मी अशी बोलले असते ना, तर या पोलिसांनी मलाच मारले असते, श्रीमंत बापाची होती ना ती मुलं. हे पोलीस विकले गेले आहेत. पैशाने तोंड बंद केली गेली आहेत त्यांची. मी म्हणत नाही सगळेच पोलीस लाचखाऊ आहेत, प्रामाणिक पोलीस सुद्धा आहेत जे आपले काम चोख करतात, पण त्यांच्या वरच्या माणसांनी त्यांना ती काम करू दिली पाहिजेत ना? हीच लोकं मदत नाही करू शकली, तुम्ही काय मदत करणार? आठ दिवसांनी तुम्हाला पण डबल फी मिळणार आणि मग तुम्ही पण हे न्याय मिळवून देणे वगैरे विसरणार. मग कशाला हवा आहे प्रश्न उत्त्तरांचा खेळ. मी त्या मुलांचा खून केला आहे, आणि मला त्याचा काहीच पछतावा नाही. अरे माझे चालले असते तर या दोन मुलांचा सुद्धा मी जीव घेतला असता. पळाले म्हणून वाचले ते ...." संगीता.





            संगीताच्या बोलण्यात निडरपणा होता. स्पष्टपणा होता. ती डोळ्यांना डोळे भिडवत बोलत होती.







        संगीताची आई, तिची लहान बहीण, तिचा होणारा नवरा, सगळे तिच्याकडेच बघत होते. आज अचानक त्यांच्या छुईमुई संगीताने दुर्गेचं रूप धारण केले होते.  







             तिच्या बोलण्याने आता सगळीकडे कुजबुज होऊ लागली. समोर बसलेली तिची आई तिला शांत राहा म्हणून खुणावत होती. पण आज संगीता कोणाचेच ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. ती बऱ्यापैकी उद्धटपणे, निडरपणे बोलत होती. तिला आज कोणाचीच भीती वाटत नव्हती. ना पोलिसांची, ना लोकांची, ना पत्रकारांची, ना ही तिला स्वतःचा जीव जाण्याची. 







          संगीता, एक तेवीस वर्षाची नोकरी करणारी सुंदर सालस तरुणी. घरात कमावणारी एकटीच, घरात खाणारी पाच तोंड. घराची परिस्थिती बेताचीच. वडील रिटायर्ड, आई गृहिणी, म्हातारी आजी आणि कॉलेजमध्ये शिकणारी एक लहान बहीण. संगीता एका प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंट डिपार्टमेंटमध्ये कामाला होती. ती दीड वर्षापासून तिथे काम करत होती. तिला नोकरी लागली तशी घरची परिस्थिती थोडी सुधारली. घराचे रूप पालटले, घरात आनंदाने, सुखाने शिरकाव केला होता. जिथे दोन वेळ जेवायची भ्रांत होती, तिथे आता सुख चैन नांदायला लागली होती. 









        घर, शिक्षण, नोकरी यामध्ये संगीता रमत होती. तिने कधीच बाहेर फालतूच्या गोष्टींमध्ये मन रमवले नाही. आपल्या कामाशी काम ठेवणे आणि आईबाबा म्हणतील तसे वागणे, एवढेच काय तिलायेत होते. परिस्थिती सुद्धा तशीच होती, इतर गोष्टी करायला वेळ सुद्धा नव्हता.  







         दिवाळी जवळ आली होती. दिवाळीला थोड्या जास्ती दिवस सुट्ट्या घ्यायचा म्हणून दिवाळी आधी ऑफिसचे सगळं काम आटोपून घ्यावे विचाराने संगीता 3 दिवसांपासून ऑफिसमध्ये उशिरा पर्यंत काम करत होती. घरी यायला तिला रोज रात्रीचे नऊ वाजत होते. 3 नोव्हेंबरच्या दिवशी नेमकी तिची दूचाकी खराब झाली होती. त्यादिवशी ती ऑटोने ऑफिसला आली होती. रात्रीचे दहा वाजून गेले तरी तिला ऑटो मिळाला नव्हता. कसाबसा बऱ्याच वेळाने तिला ऑटो मिळाला. ऑटोमध्ये बसून ती घरच्या दिशेने निघाली होती. ऑफिसपासून घर तसे थोडे लांबच आठ नऊ किलोमीटर होते. थोड्या लांब येऊन ऑटो बंद झाला तो पण नेमका एका सूनसान जागी. ऑटो खराब झाला म्हणून पुढल्या चौकात दुसरा ऑटो पकडू, असा विचार करत संगीता पायीच निघाली होती. आता रात्रीचे अकरा वाजत आले होते. तिला एकटीला बघून दारूच्या नशेने धुत चार मुलांनी तिला अडवले होते. चाकुची भीती दाखवत त्यांनी तिला उचलून तिथेच एका गोडाऊनसारख्या दुकानाच्या मागच्या भागात नेले. संगीताने त्यांच्यापुढे तिला सोडून देण्याची खूप गयावया केली, खूप हात जोडले, रडली, पाया पडली, पण नशेने धुत, वासनेने सवार त्या राक्षसांवर तिच्या बोलण्याचा, रडण्याचा काहीच फरक पडला नव्हता. त्यातलाच एक मुलगा तिच्याजवळ येत, तिचे कपडे फाडत तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला होता. बाकीची तीन मुलं मागे उभे होते, आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत जोरजोराने हसत मजा घेत होते. तिच्यासोबत जबरदस्ती करणारा मुलाचा थोड्यावेळसाठी कंट्रोल गेला, तो त्याच्यातच मग्न होता, आणि बाकीची व्हिडिओ काढण्यात आणि हसण्यात मग्न होते. रडत रडत, ओरडत, संगीता हातपाय मारत होती. आणि अचानक तिच्या हाती त्या मुलाचा बाजूला पडलेला चाकू लागला. 







               आतापर्यंत न्यूजमध्ये ऐकलेल्या बलात्काराच्या बातम्या संगीताच्या डोळ्यासमोरून जाऊ लागल्या, ज्यात बलात्कार केल्यावर मुलीला जीवाने मारून टाकण्यात आले, आणखी काही काही आठवू लागले. आता आपल्याजवळ दुसरा कोणताच रस्ता उरलेला नाही विचार करत, आपले मन मजबूत करत, आपली सगळी शक्ती एकवटून, तिने चाकू हातात घेतला आणि तिच्या अंगावर असणाऱ्या मुलाच्या मागून पाठीत खुपसला. व्हिडिओ काढणाऱ्या एका मुलाचे लक्ष गेले तसे तो तावातावाने तिच्या जवळ येत होता, तिला पकडत जबरदस्ती करत होता. तिने तो चाकू त्या मुलाच्या पोटात पण खुपसला. हे सगळे बघून बाकीची दोन मुलं शुद्धीत येत तिथून पळाले होते. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी तिला अटक केली होती. मानसिक, शारीरिक अत्त्याचार, वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या सहन होणार नाही अशा वैद्यकीय चाचण्या, आणि काय काय तिच्या सोबत सुरू होते...चार महिन्यांपासून ती जेलमध्ये होती. आणि आज खटला कोर्टात गेला होता. 







"मिस संगीता, तुम्ही तुमच्या अशा वागण्याने तुमच्या आयुष्याचे नुकसान करून घेत आहात. आम्ही तुमची मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत." …..ऍडव्होकेट.









"आयुष्याचे नुकसान?" संगीता कुत्सितपणे हसली. 





"साहेब नुकसान ऑलरेडी झाले आहे. आता अजून काय व्हायचे बाकी राहिले आहे. माझे, माझ्या परिवाराचे सगळ्यापरिने नुकसान झाले आहे. गरीब होतो पण आत्मसन्मानाने जगत होतो. आता या गोष्टीने झालेला मनस्ताप, अपमान, मानसिक - शारीरिक त्रास, परत आणून देणार आहात? माझी गेलेली अब्रू परत येणार आहे? माझ्यामुळे माझ्या परिवाराला जो त्रास होत आहे, तो थांबणार आहे काय? माझ्या बहिणीचे भविष्य खराब झाले आहे, ते ठीक होणार आहे? माझं लग्न जमले होते, आता या महिन्यात लग्न होते, माझ्या सुखी संसाराची स्वप्न सगळी मातीमोल झाली आहेत, ती परत फुलणार आहेत? शरीरावरची घाव भरूनही निघतील, पण मनावरचा घावांचे काय? आणि हा समाज वेळोवेळी मरेपर्यंत आमच्या आयुष्यावर अपमानास्पद, तिखट घाव घालतील त्याचे काय? मुलीची चूक नसूनही आयुष्यभर तिलाच त्याची शिक्षा भोगावी लागते त्याचे काय? कुठे कुठे मदत कराल तुम्ही? " ......संगीता.









            वकिलाच्या लक्षात आले की संगीता विचारलेल्या प्रश्नांची सरळ उत्तर नाही देणार. म्हणून त्यांनी जास्ती वेळ न घालवता त्याच त्या प्रश्नावर गोल गोल फिरण्यापेक्षा, पुढला प्रश्न केला.









"तुम्ही, तुमच्यावर असणाऱ्या मुलाचा खून केला, ठीक आहे. पण तुम्ही त्या दुसऱ्या मुलाचा खून का केला?" .......ऍडव्होकेट.







"माझ्या अंगावर असणाऱ्या मुलानंतर त्याचाच नंबर होता, माझ्यावर बलात्कार करण्याचा. हा उठला असता, मग तो आला असता. मग तिसरा, मग चौथा. दुसरे म्हणजे ती तिघे व्हिडिओ काढत होती. डोळ्यांसमोर होणाऱ्या वाईट गोष्टीचा, गुन्ह्याचा विरोध करायचा सोडून मजा बघत होती. मला तर बाकी या दोघांना पण मारायचे होते, पण ते बाहेर पळून गेले. माझ्या अंगावर नीट कपडे नव्हते म्हणून मी बाहेर नाही गेली. तुम्हाला काय वाटते हे जे माझ्यासोबत करत होते, ते यांचे पहिल्यांदा केलेले असेल? कमी जास्त प्रमाणात आधीही त्यांनी अशी कामं केली असणार. वाईट कॉमेंट्स, गर्दीत कुठल्यातरी मुलीला वाईट स्पर्श केले असणार, मुलीला बघून अश्लील हातवारे करणे, हे पण बलात्कार करण्यापेक्षा कमी नाही आहे. मुलीचे जगणे नको नको करून सोडायचे. जेव्हा यांच्या गुन्ह्याची सुरुवात झाली, तेव्हा कोणी काही बोललं नाही, काही शिक्षा झाली नाही म्हणून ते निडर झाले. आपल्याला कोण काय करू शकत नाही, त्यांना कळले. वरतून मोठ्या घरची, काही झाले तरी आहे सोडवायला बाप आहेच, अन् मायबापाचे आंधळे प्रेम. त्यांनी माझे निर्वस्त्र व्हिडिओ, फोटो काढले होते, ते वापरून मला सतत धमकावत माझ्यासोबत आणखी अत्याचार केला असता. त्यादिवशी तर त्यांना सोडले असते ना, तर त्यांनी माझा वापर करून झाल्यावर, मलाच मारून कुठेतरी फेकून दिले असते आणि परत मोकळे झाले असते ते, दुसऱ्या संगीताचे आयुष्य खराब करण्याकरिता. ते तर माझं नशीब चांगले की माझ्या हाती तो चाकू लागला, देवाने दिलेली ती आज्ञा माना अथवा संदेश, अथवा मदत, त्यावेळी माझी सरक्षणकर्ता मीच होते. कोणी मदतीला येईल आणि मला वाचवेल, याची मी वाट नव्हते बघू शकत. मी त्या मुलांचा खून केला." ...संगीता.







        पहिल्यांदा कोर्टमध्ये कुठलीतरी मुलगी, तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत इतकी बिनधास्तपणे, कशाचीही पर्वा न करता बोलत होती. खरेतर कोर्टमध्ये असे बोलण्यासाठी परवानगी दिली नसती, पण पहील्यांदा एक मुलगी न घाबरता बोलत होती. ती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नीट देत नाही आहे आणि केस हाताबाहेर जात आहे बघून तिच्याकडून आलेल्या वकिलाने संगीताची तब्बेत ठीक नसल्याचे कारण सांगून पुढची तारीख मिळवली होती. 







*******







"आकाश, मला विसर आणि आयुष्यात पुढे जा." ...संगीता.





"तू निर्दोष आहेस, मला माहिती आहे. मी वाट बघेल तुझी." ....आकाश.





"आकाश, माझ्यासोबत तुझं, तुझ्या घराचे, सगळ्यांचेच भवितव्य खूप वाईट आहे, अंधारात आहे. मला माहिती सुद्धा नाही मी कधी इथून बाहेर सुद्धा पडेल. ती लोकं खूप श्रीमंत आहेत, त्यांची ओळख खूप दूरपर्यंत आहे. खूप फरफट होत आहे रे माझ्यामुळे सगळ्या घराची. एकटी पडली ती लोकं. नाही बघवत मला त्यांचे हाल . माझ्यामुळे माझ्या परिवाराला तर धोका आहेच, आधीच मारण्याचा धमक्या येत आहे. तू तरी दूर रहा यापासून, नाहीतर तुला आणि तुझ्या परिवाराला पण धोका असेल आहे.".....संगीता. 







"नक्कीच बाहेर येशील या सगळ्यामधून, मी नेहमीच तुझ्यासोबत असेल आणि एक रिक्वेस्ट करतो प्लिज वकिलांना सहकार्य कर." ....आकाश.







"धन्यवाद आकाश. मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात खरेच काहीतरी चांगले काम केले असेल, जे तुझ्यासारखे लोकं माझ्या आयुष्यात आले. खूप ऋणी आहे मी सगळ्यांची. काळजी घे." ...संगीता. 







       जेलमध्ये भेटायला आलेल्या आकाश सोबत संगीता जेलच्या सलाखांच्या मागे उभी बोलत होती. तिला असे जेलमध्ये बघून आकाशच्या हृदयाचे अन्गिणत तुकडे झाल्यासारखे वाटत होते. त्याचा धीर सुटत होता. पण त्याला असे हरून चालणार नव्हते. तो खूप धीराने घेत होता. 





          आकाश आणि संगीताचे अरेंज मॅरेज ठरले होते. आता तिला तिची परिस्थिती चांगलीच कळली होती. तिचे सगळे अस्तित्वच ती गमावून बसली होती. ती त्याला आयुष्यात पुढे जायला विनवत होती. 





*****









          संगीताचा असा रवैय्या बघत किंवा त्याला जास्ती पैसे मिळालेले असावे, तिच्या वकिलाने तिची केस सोडली होती. 





            संगीताचे परखडपणे बोलणे, झालेल्या गोष्टीचा निडरपणे सामना करणे, या सगळ्या गोष्टी न्यूज पेपर, न्यूज टीव्ही चॅनल मधून सगळीकडे पसरले होते. बरेच woman care NGO तिला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे आल्या होत्या. त्यातूनच एक प्रसिद्ध वकील ॲड. लीना यांनी तिची केस फ्रीमध्ये लढायची ठरवली होती. त्यांच्यावर सुद्धा बरेच प्रेशर आले होते, धमक्या येत होत्या पण ॲड. लीना या कशालाही न जुमानता संगीताची केस लढत होत्या. तीन वर्षाच्या अथक परिश्रमातून ॲड. लीना आणि संगीता बलात्काराविषयी केस जिंकल्या होत्या. संगीताने स्वबचावसाठी खून केला होता हे सुद्धा सिद्ध झाले होते. पहिल्या मुलावर बलात्कार केल्याचा आरोपही सिद्ध झाला होता. बाकी उरलेल्या दोन मुलांना मुलीची छेडछाड, बलात्कार करण्यासाठी मदत, मुलीला अगवा करणे असे गुन्हे सिद्ध झाले होते आणि त्यानुसार त्यांना शिक्षा झाली होती. संगीताची निर्दोष सुटका झाली होती. पण या सगळ्यासाठी जवळपास तीन ते चार वर्षाचा कालावधी लागला होता. 





         सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. संगीताच्या नावाचा जयघोष होत होता. संगीताने एक वेगळे उदाहरण समाजापुढे प्रस्थापित केले होते. ज्याचे समाजाला तिचे कौतुक वाटत होते. सगळ्या न्यूज चॅनलवर संगीता आणि तिची वकील झळकत होत्या. त्यांचे इंटरव्ह्यू येत होते. 





******





"संगीता, तुमच्यामध्ये एवढी हिम्मत कशी काय आली? तुम्ही या सगळ्यांचा सामना कसा केला?" .... न्यूज रिपोर्टर.





"मी सुद्धा घाबरली होती. माझ्या सुद्धा त्या राक्षसांचा प्रतिकार करतांना अंगातून त्राण निघून गेला होता. अक्षरशः मरण डोळ्यासमोर बघत होते. कुणीतरी मदतीला येईल, देवाची मनोमन विनवण्या करत होते. पण हे कलयुग आहे, इथे स्वत:चे रक्षण स्वतः करायला लागणार आहे, नाहीतर या असे वासानाधीन राक्षस तुमचा बळी घेणार. " ... संगीता. 







"तुम्ही कोर्टात निडरपणे सगळ्या गोष्टींचा सामना केला. तुम्हाला भीती नाही वाटली काय?" ...न्यूज रिपोर्टर.





"एका मुलीसाठी तिची आणि तिच्या परिवाराची इज्जत, मान सन्मान सगळ्यात महत्वाचा असतो. ते सगळंच घालवून बसले होते. तर आता अजून काय हरणार होते? जेलमध्ये असताना शारीरिक, मानसिक दृष्ट्या इतका जास्ती त्रास झाला होता, की कालांतराने सगळं सहन करायची सवय झाली होती. जे झाले त्यापेक्षा आणखी काय वाईट आणि जीवघेणे होणार होते? नंतर ठरवले रडत, वाकत नाही जगायचं, जे होईल त्यासाठी हिंमतीने सामोरे जायचे आणि ताठ मानेने उभे राहत सत्यासाठी लढायचे." .....संगीता.







"मुली, बायकांना काय संदेश द्याल?" ...न्यूज रिपोर्टर.







"माझी एक चूक झाली, मी स्वसंरक्षणाचे धडे नाही घेतले. माझं नशीब चांगले होते की माझ्या हाती तो चाकू लागला. पण अशी परिस्थिती ओढवलेल्या मुलींचे नशीब नेहमीच असे चांगले असेल, असे नाही. आपल्या समाजात मुलींना घरतील कामं शिकवली जातात, त्याला फार महत्व दिले जाते. पण मी म्हणेल ते नाही आले तरी चालतील, पण लहानपणापासूनच मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यायला पाहिजे. प्रोपर क्लासेस, टीचर कडून ते शिकवले गेले पाहिजे . शिक्षणासोबतच स्वसंरक्षणाचे शिक्षण पण खूप महत्वाचे आहे. तर मी सगळ्यांना सांगेल, रादर मी सगळ्या मुलींच्या आईवडिलांना रिक्वेस्ट करेल की आपल्या मुलींना स्वसंरक्षणाचे शिक्षण द्या, आजचे उद्यावर टाळू नका... मुलींसाठी समाज अजूनही सुधारला नाही आहे. या अशा राक्षसांची, नराधमांची संख्या वाढत आहे. आता राम कृष्ण येणार नाहीत. स्वतःच दुर्गा कालीचे रूप घ्या. आता बायकांच्या बाजूने बरेच चांगले कायदे आहेत, तरी सुद्धा लढावं तुम्हालाच लागणार आहे.".... संगीता. 







        संगीताचे बोलणे ऐकून सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. 







******







"Will you marry me my brave lady?" ... आकाश तिच्यासमोर गुढग्यावर खाली बसत, आपला एक हात समोर करत तिच्याकडे खूप प्रेमाने बघत होता. 





             त्याला असे समोर बघून तिच्या डोळ्यात पाणी तरळले. ती हो की नाही म्हणू, द्विधा मःस्थितीत होती. ती, आणि क्रमाने तिच्या संबंधित सगळे ज्या मरणयातना मधून गेले होते, तिला ते आकशसाठी नको वाटत होते. कारण जरी ती सगळं जिंकली होती, तरी भविष्यात याचे काही ना काही वाईट पडसाद उमटणार होते. ती भरल्या डोळ्यांनी त्याला बघत होती. तो चार वर्ष तिच्यासाठी तिची वाट बघत थांबला होता. यातच तिला तिच्या आयुष्याचे सगळे सुख मिळाले होते. अरेंज मॅरेज जुळले होते, कधीही तो तीला सोडून जाऊ शकत होता, संगीताने सुद्धा त्याला आयुष्यात पुढे जा म्हणून सांगितले होते, पण तो तिला सोडून गेला नव्हता. त्याच्या डोळ्यात तिला तिच्याबद्दल प्रेम, खूप आदर दिसत होता. त्याला काय उत्तर देऊ , याच विचारात त्याच्याकडे बघत ती शांत उभी होती...







"Say Yes " ...." Say yes " .......





        संगीताला आवाज आला तसा तिने वरती बघितले, आकाशची आई, बाबा, बहीण, मोठा भाऊ, भावजयी, संगीताची आई, बाबा, आजी, आणि लहान बहीण सगळे एकसाथ बोलत होते.       



            त्या सगळ्यांना असे समोर बघून तिच्या चेहऱ्यावर हसू उमलले. सगळे तिला होकार दे म्हणून सांगत होते. 







"हो ....." .....संगीता.





"Yeah!!" ......आनंदातच त्याने तिला आपल्या हातांवर उचलून घेत गोल गोल फिरवत होता. 







******





            ती जरी झालेल्या सगळ्या गोष्टींमधून निर्दोष मुक्त झाली होती, तरी आपल्या या समाजात राहत तिला अजून बऱ्याच कसोटीना पार करायचे होते. तिच्यासोबत एक गोष्ट चांगली होती की या सगळ्यामध्ये तिचा परिवार तिच्यासोबत होता. 







******





समाप्त 





*****





         ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. याचा कुठल्या व्यक्तीशी किंवा घटनेशी काही संबंध नाही. तसे काही आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. 





Thank you! 







©️ मेघा अमोल