द्रौपदीला कृष्ण भेटला………
मौनानं ही होतं एवढं रामायण
हे माहिती असतं तर,
शब्दांच्याच स्वाधीन झाले असते.
पण शब्दांनी नेली असती वरात
भलत्याच दिशेला.
शब्द म्हणजे अंध कौरव
ओठात एक पोटात भलतंच.
मौनाचं रामायण सहन करता येतं
सीता होऊन,
पण शब्दांचं महाभारत सोसायला
पाठीशी कृष्ण हवा.
- पद्मा गोळे
कृष्णाची अनेक रुप आहेत. कुणाला तो बाळकृष्ण म्हणून आवडतो तर, कुणाला राधेचा कान्हा म्हणून. कुणाला तो आवडतो गीता सांगणारा योगेश्वर म्हणून तर, कुणाला त्याचं वनमाळी गुराख्याचा रूप भावतं. पण कृष्ण आणि महाभारताचा विषय निघाला की,माझ्यासमोर उभा राहतो तो द्युतगृहातला द्रौपदीचा चीर हरणाचा प्रसंग………….
********************************************
तोरण स्फटिका या द्युतगृहात युधिष्ठिर आणि इतर पांडव अधोवदन बसले होते. द्युतामध्ये धर्मराज स्वतःसह आपल्या भावांना हरले होते.गोधन, राज्य, संपत्ती आधीच त्यांनी द्युतपटावर लावली होती. शकुनीच्या चिथावणीवर अखेरचा डाव म्हणून युधिष्ठिराने पांचालीला पणाला लावलं आणि सर्वस्व गमावून बसला.
या घाणेरड्या विजयाने उन्मत झालेल्या दुर्योधनाने प्रतीकमीला आज्ञा दिली.
दुर्योधन-" प्रतीकामी अंतःपुरात जा आणि आमची दासी द्रोपदीला आमच्या सेवेसाठी घेऊन ये".
प्रतिकामी एकटाच परतल्याचे पाहून चिडून दुर्योधनाने विचारलं-
दुर्योधन-" प्रतिकाम्या कुठे आहे आमची दासी?
प्रतिकामी-" युवराज महाराणी द्रोपदी राज्यसभेत येऊ शकत नाहीत".
दुर्योधन-" येऊ शकत नाही म्हणजे काय? ती आता महाराणी नाही".
प्रतिकामी-" युवराज द्रोपदी एक वस्त्रा रज:स्वला आहेत.नुकतेच ऋतुस्नात होऊन त्या आपल्या केसांना उदवून केशरचना करीत आहेत.
प्रतिकामी (युधिष्ठिराकडे वळून)-" महाराज युधिष्ठिर द्रौपदीने आपल्याला एक प्रश्न विचारला आहे!
दुर्योधन (रागाने)-" कुठला प्रश्न?"
प्रतिकामी-" महाराज युधिष्ठिर तुम्ही द्रोपदीला द्युतात स्वतः हरल्यावर पणाला लावले की आधी? "
युधिष्ठिर- "प्रतिकर्मा पांचालीला सांग, आता ही वेळ प्रश्न उत्तराची नाही.तू एक वस्त्रा रज:स्वला असलीस तरी राज्यसभेत तूला यावच लागेल."
युधिष्ठिराचे बोल ऐकून प्रतीकर्माचे डोळे विस्फारले, श्वास रोधला गेला. समस्त राजसभा श्वास रोखून स्तब्ध झाली, परंतु द्युताची धुंदी चढलेल्या दुर्योधनाने दु:शासनाला आज्ञा दिली-
दुर्योधन -"दु:शासना जा त्या रूपगर्विता अहंकारी द्रोपदीला केसांना धरून फरपटत या राजसभेत घेऊन ये. "
दु:शासनाने खरेच ऋतुस्नात द्रौपदीच्या केसांना धरून तिला फरफटत राज्यसभेत आणले. आपल्या हाताची नाजूक बोटं तिने राज्यसभेच्या द्वाराच्या छीद्रात रुतवली, पायाच्या टाचा महाद्वाराच्या उंबरठ्याला अडकवल्या पण त्याचा उपयोग झाला नाही. दृष्ट दु:शासन तिच्या केसांना हिसडे देत तिला राज्यसभेत घेऊन आला. द्रौपदीची ही विकल,असाहय अवस्था बघून भीम मात्र गरजला……
भीम-"दु:शासना द्रोपदीचे केस तु ज्या घाणेरड्या हाताने धरलेस, ते हात मी तुझ्या धडावेगळे केल्याशिवाय राहणार नाही."
परंतु युधिष्ठिराच्या तिरप्या नेत्रकटाक्षा बरोबर भीम खाली बसला. युधिष्ठिराचे हे वागणे पाहून द्रोपदी भानावर आली, तिने निश्चयपूर्वक आपली मान वर केली,एका हाताने केस सावरीत,दुसऱ्या हाताने अपुऱ्या वस्त्रातील लज्जा झाकण्याचा प्रयत्न करीत ती उभी राहिली. आपल्या पतींची दीनवाणी अवस्था बघून ती संतापाने उसळली. रक्तलांछित अर्धवस्त्र अवस्थेत ते भिष्माचार्याकडे वळली.
द्रोपदी-"पितामह तुम्ही तरी मला न्याय द्या! सर्व हरल्यानंतर स्वतःला पणाला लावून जो स्वत:च दास बनला आहे, त्याला पत्नीला पणाला लावण्याचा काय अधिकार?पितामह आता तुम्हीच सांगा मी हरले काय?
पितामह- "हे सुभगे आता माझ्याकडे हो किंवा नाही चा प्रश्नच उरत नाही. तुझ्या पतीनं राज्यसभेत कबुल केलं आहे की, तुझ्या समवेत त्याचे चार बंधू आणि तो कौरवांचा दास आहे."
पितामहांच्या या वागण्याने आणि बोलल्याने द्रोपदी मटकन खाली बसली.विजयाच्या धुंदीत विवेक विसरलेला दुर्योधन दु:शासनाला म्हणाला…….
दुर्योधन-" दु:शासना माझ्या या दासीला माझ्या मांडीवर बसव. (त्याने स्वतःची मांडी उघडी केली.)
रागाने संतप्त भिमाने त्याच क्षणी आणखी प्रतिज्ञा केली……
भीम -" ज्या दू:शासनाने द्रौपदीच्या केसांना स्पर्श केला, त्याचं वक्षस्थळ नखाग्रांनी फोडून मी त्याचं रक्त प्राशन करीन अन , उन्मत्तपणे भरसभेत उघडी मांडी दाखविणाऱ्या दुर्योधनाची मांडी माझ्या गदेने छिन्नविछिन्न करून टाकीन. "
दुर्योधन-"सेवकांनो पाहता काय? माझ्या राज्यसभेत माझेच दास मला मारण्याच्या प्रतिज्ञा करीत आहेत. त्यांची राजवस्त्र आणि आभूषण काढून घ्या".
युधिष्ठिराने राजवस्त्रे काढली त्याचे अनुकरण इतर पांडवांनी केले. पतिची ती केविलवाणी अवस्था पाहून द्रौपदीने आपले मुख झाकून,डोळ्यांवर हात ठेवले.
त्याच क्षणी कर्ण गरजला…..
कर्ण - " दु:शासना या पांचालीला विवस्त्र कर! राजहंसी कशी असते ते आज सुतपुत्राला बघायचं आहे.सामान्य स्त्री पेक्षा राजस्त्री केवढी वेगळी असते ते मला आज जाणून घ्यायचं आहे".
कर्णाच्या या वाक्यासरशी सारेच भान हरपले!दु:शासनाने पुढे टाकलेले पाऊल पाहताच द्रोपदी भयाने व्याकुळ होऊन मागे सरकली, आणि संतापाने थरथरणारे भीष्म गरजले………
पितामह-" थांब दु:शासना पुढे पाऊल टाकू नकोस, जोवर हा भीष्म इथे उभा आहे तोवर अबलेला विवस्त्र करण्याचं धाडस कोणीही करू नये. दु:शासना मागे फिर ही माझी आज्ञा आहे. "
त्याच क्षणी दु:शासन थांबला आणि दुर्योधन गरजला…
दुर्योधन-"पितामह तुम्ही या राज्याचे राजे नाही, केवळ रक्षक आणि सेवक आहात. नको त्या आज्ञा देऊ नका!"
दुर्योधनाच्या या वाक्याने पितामह सुन्न झाले. त्यांचा आवेश ढासळला, सर्वांगाला कंप सुटला, दुर्योधनाने मर्माघात केला होता.पितामह राज्यसभा सोडून जाऊ लागले…
दुर्योधनाने दु:शासनाला संकेत केला, तो द्रौपदीकडे वळला. द्रौपदीने आपले अंकुश आणि वस्त्राचा पदर पकडून संपूर्ण राज्यसभेत प्रत्येकाकडे मदतीची याचना केली पण, त्या कुरुंच्या सभेत एका अबलेचं शील रक्षणाचं सामर्थ्य कुणाकडेच नव्हतं. अखेरीस पांचाली ध्रुतराष्ट्र महाराजांच्या सिंहासनाच्या पायऱ्यांवर डोक आपटू लागली तिचा आक्रोश,किंचाळ्यानी राज्यसभा थिजून गेली. ती याज्ञसेनी एवढेच बोलली…..
द्रौपदी -"जिच्यात वृद्ध नाहीत ती सभा नव्हे, जे धर्म सांगत नाही ते वृद्ध नाहीत, ज्यांच्यात सत्य नाही तो धर्म नव्हे आणि ज्याच्यात कपट दुष्टावा आहे ते सत्य नव्हे. "
दु:शासनाने द्रौपदीच्या पदराला हात घातला आणि त्या पतिव्रतेने माधवाला आळवले. आपले दोन्ही हात जोडून, डोळे बंद करुन तिने मधुसूदना चा धावा केला. एक प्रचंड तेजाचा झोत कल्याणी वर पडला आणि पांचालीचा पदर ओढता ओढता दु:शासन बेशुद्ध झाला.
द्युतगृहात कृष्णाला अचानक आलेले पाहून, सारेच स्तब्ध झाले. त्याने कल्याणीला आधार दिला.
द्रोपदी-" कृष्णा स्वाभिमानाने जगावे असे आता माझ्या आयुष्यात काहीच नाही रे! मला कुलटा, वेश्या म्हटले, मला उघड्या मांड्या दाखवल्या गेल्या, नेत्र कटाक्ष झाले. मधुसुधना ज्यांनी माझे रक्षण करावे त्यांनीच माझे चीर हरण करण्याचा प्रयत्न केला. केशवा मला आता जगावेसे वाटत नाही!"
कृष्ण- "कल्याणी रडू नको! स्त्रीची अब्रू एवढी स्वस्त नसते!! स्त्रीच्या शीलाचा विनाश म्हणजे समग्र मांगल्याचा नाश!!! तुझ्या वरचा अन्याय ईथे ज्यांनी ज्यांनी मूकपणे बघितला त्यांचा विनाश अटळ आहे. त्यांच्या स्त्रियाही तुझ्याप्रमाणे आजीवन आक्रोश करतील हीच उपस्थित सर्व नरशार्दुलांना शिक्षा असणार आहे".
कृष्णाने पांचालीची लाज राखली!आणि द्रौपदीला कृष्ण भेटला!!
समाप्त.
धार्मिक प्रसंगावर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे चुकल्यास क्षमस्व.
जय हिंद!
*********************************************
संदर्भसूची
1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.
2. राधेय, लेखक रणजित देसाई.
3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.
फोटो - साभार गुगल.