डॉ.शिल्पा क्षीरसागर : मानवतेच्या देवदूत

ईरा : शब्दांचा सेतू

     डॉक्टरांचे नाते हे मानवी जीवनाशी अतूट आहे.माणसाला दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्या निर्माण होत असतात त्यामध्ये आरोग्याच्या समस्या या गंभीर स्वरुपाच्या असतात याचे वेळीच निरसन केले नाही तर आरोग्य धोक्यात येते अशावेळी सर्वांना उपयोगी पडतात ते माणसातील देवदूत म्हणजे डॉक्टर ..!!

      मुलांना सुसंस्काराचे वळण लाऊन त्यांना शैक्षणिक क्षेत्रात उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी आईवडिल झटत असतात.त्यांना समाज आरोग्याने समृद्ध व्हावा ही प्रबळ इच्छा असते.अशाच लहाणपणापासून उच्च ध्येयाने प्रेरित असणा-या आणि आईवडिलांचे  बुलंद स्वप्न साकार करणाऱ्या आदरणीय लेखिका व डॉक्टर शिल्पा क्षिरसागर या होय.

         डॉ.शिल्पाजी या लहाणपणापासूनच हुशार व तल्लख आहेत.शालेय जीवनात त्या फार वक्तशीर होत्या.वेळेवर अभ्यास करणे , 

गुरुजनांचा आदर राखणे त्यामुळे त्या शाळेत गुरुजनांच्या प्रिय होत्या.आपल्या हुशारीची झलक त्यांनी शालेय जीवनात दाखवल्यामुळे त्यांचे पुढील शैक्षणिक ध्येय वेगळ्या वाटेने सुरु झाले.वैद्यकिय क्षेत्राचा ओढा असलेमुळे त्यांनी वैद्यकिय पदवी नैपुण्याने मिळवली तेथे आपल्या बुद्धिमत्तेने सर्वांना चकीत केले.वैद्यकीय सेवा करण्याची ईच्छा डॉक्टर या पदवीने आधिक सक्षम झाली आणि एका प्रेरणादायक प्रवासाला सुरवात झाली.

       डॉक्टर शिल्पाजी यांची रुग्णसेवा अफलातून आहे.एखाद्या गरीबानं यावं आणि शिल्पाजींच्या सेवेने बरे व्हावं यासारखे समाधान कुठले असेल….! रुग्णाची केलेली अगतिकतेने केलेली विचारपूस , त्याला दिलेला आधार , त्यांच्याबरोबर केलेले गोड संवाद यामुळे त्यांची सेवा निरालस भावनेनं भारलेली असते.रात्री आपरात्री मदतीसाठी मारलेल्या हाकेला तितकाच सकारात्मक प्रतिसाद यामुळे त्या अष्टोप्रहर  तत्पर असतात.

         डॉक्टरी सेवा बजावताना शिल्पाजी यांनी अनेक छंद जपले आहेत.माणुसकी जपने हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य आहे.प्रेमाने माणसं जोडणे त्यांना गोड संवादाने आपलेसं करणे ही त्यांची कला फार अनुकरणप्रिय वाटते.व्यक्त होणं हा त्यांचा स्थायी भाव आहे.आपल्या शैक्षणिक मुल्यांचा आणि वैचारिक प्रतिभेला त्यांनी लेखणीच्या माध्यमांतून सकसता दिली आहे.स्वतः एक निष्णात डॉक्टर असलेमुळे स्रीयांच्या अनेक समस्या या त्यांनी लेखनातून मांडल्या आहेत.स्रियांच्या मानसिकतेवर भाष्य करणारे हतबलता , कोरोना लस , गर्भारपणातील उलट्या , पिरियडबद्दल भिती  असे स्री मनाला स्पर्श करणारे विषय त्यांनी हाताळून मार्गदर्शन केले आहे.त्यांचे सविस्तर मार्गदर्शनामुळे  महिलांना  चांगली माहिती मिळते. ईरा व्यासपीठावरही लेखनयात्रा सुरु आहे.त्यांच्या कथेतून मार्मिक,  सामाजिक  संदेशही दिला जातो. व्हिडीओच्या माध्यमांतून त्या समाजप्रबोधन करतात.ईरावर त्यांच्या लाईव्ह सेशनमुळे उपयुक्त माहिती मिळते.उत्तम सादरीकरणामुळे त्यांचे मार्गदर्शन सर्वांना आवडते.

      त्यांच्या कोरोनाकाळातील सेवेला सलाम केला पाहिजे.सर्वत्र कोरोनाचा हाहाकार माजला असताना त्यांनी आपली सेवा अहोरात्र केली.आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णांना वेळेत उपचार करुन जीवनदान दिले.त्यामुळे त्यांच्या महान कार्याची महती लक्षात येते.हे सर्व करत असताना कौटुंबिक जबाबदारीही आनंदाने सांभाळली आहे.मुलांना संस्कार आणि मार्गदर्शनाबरोबरच कुटुंबामधिल सर्वांना छान जपले आहे.

          मनापासून लिहणे,  वाचणे स्वतःच स्वतःला सापडणे , त्यांच्या कार्याला मिळणारा उदंड  प्रतिसाद , आनंदी वृती , मदत करण्याची भावना , सकारात्मक आणि प्रेरणादायक विचार  यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व फार प्रेरणा देते.समाजाला अशा चतुरस्र व्यक्तिमत्वांची व आदर्श डॉक्टरांची फार गरज आहे.माणुसकी व सेवा संपत चालली आहे असे वाटत असताना शिल्पाजींनी आपल्या सेवाभावाने सगळ्यांच्यापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.त्यांची ही सेवा अशीच चालू रहावी , त्यांचे लेखनकार्य असेच बहरावे , त्यांना हे सामाजिक कार्य करण्याची शक्ती मिळावी यासाठी "  डॉक्टर्स  डे " निमित्त खूपसा-या शुभेच्छा …!!

     ईरा व्यासपिठाने डॉक्टर्स डे निमित्त  त्यांच्या महान सेवेबद्दल व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभार …!!

     अपार तुमची सेवा 

       संकटकाळी तुमचा धावा 

          तुमच्या दिलदारपणाचा  

              सदैव आदर्श घ्यावा 

  

सर्व डॉक्टरांना मानाचा मुजरा ….!!

              ©®नामदेवपाटील