Jan 19, 2022
सामाजिक

डॉ.ज्योत्स्ना

Read Later
डॉ.ज्योत्स्ना

#डॉज्योत्स्ना

श्रीरामपूरमध्ये डॉ.ज्योत्स्नाचे इस्पितळ प्रसिद्ध होते. हे इस्पितळ ज्योने स्वतःच्या कष्टाने उभे केले होते. वेटिंग रुममध्ये कॉर्नरला बाळकृष्णाची हसरी मुर्ती होती. डॉ.ज्योत्स्ना आपल्या वैद्यकीय व्यवसायाला आपला देव मानणाऱ्या डॉक्टरांपैकी एक होती.

एप्रिल,मे महिना म्हणजे डिलिव्हरीचा सिझन असायचा. सगळं अगदी प्ल्यानिंगने करणारी हल्लीची युवापिढी,नंतर एडमिशनच्या वेळेला झंझट नको म्हणून एप्रिल,मेमध्ये डिलिव्हरी होईल अशी तयारी करायची शिवाय थोरलं लेकरु असलं की त्याच्या शाळेच्या द्रुष्टीनेही ते बरं पडायचं.

या दोन महिन्यांत थोडं जास्त काम असायचं. आजही डॉ.ज्योत्स्ना दोन महिलांची डिलीव्हरी उरकून नुकतीच घरी आली होती.  आठ वर्षाच्या निरागस,निष्पाप लेकीच्या जवळ पहुडली. तिच्या लाडक्या परीला तिने कुशीत घेतले.  

ज्योला आजची सकाळ आठवली. आज सकाळी परीने ज्योला गोड पापा दिला होता व आजीसोबत लॉनवर खेळत बसली होती. परीने तिची स्कुटी स्टार्ट केली व दहा मिनिटांत 'श्रीकृष्ण' मेटर्निटी होममध्ये गेली. 

आज जास्त पेशंटची गर्दी नव्हती. ओपीडी संपवून ज्योने ऑलरेडी एडमिट असलेल्या व बाळंत झालेल्या बायांना तपासले. डॉ.ज्यो वयाने लहान असली तरी कडक होती. बाळंतपणाच्या वेळी हातपाय झाडणाऱ्या,वेदनेने आरडाओरडा करणाऱ्या बायांना मायेने समजवायची पण काहीजणी तर तिला हातही चालवू देत नसत. अशांना डॉ.ज्यो सज्जड दम भरे. कधीकधी तर फटकवे.  होता होईल तो नैसर्गिक बाळंतपण करण्याकडे तिचा कल होता म्हणून तर तिचे इस्पितळ नेरुळमध्ये प्रसिद्ध होते. 

डॉ.ज्योने बाळंत झालेल्या चारही बायांना तपासले.  त्यातल्या एकीचं काल संध्याकाळी सिझर करावं लागलं  होतं पण ती उठायलाच तयार नव्हती. डॉ.ज्योने तिला दम भरला,"प्रिया,आजपासून इथून जाईपर्यंत तू बेसमेंटमध्ये फेऱ्या मारल्या पाहिजेस."  मग ती सिस्टरला ओरडली,बाळाला दुधाला लावलं नाही म्हणून. सिस्टरने प्रियाला उठवून तिच्या पाठीशी उशी ठेवली व बाळाला दुधाला लावलं पण प्रियाची स्तनाग्रे आत असल्याकारणाने बाळ दूध ओढीना. शेवटी सिरींजने दूध काढून बाळाला भरवलं तेंव्हा बाळ मिटक्या मारु लागलं.  डॉ.ज्योने प्रियाच्या दंडाला धरुन तिला उठायला मदत केली व भिंतीला धरुन चालण्यास भाग पाडलं.

ज्यो स्कुटी स्टार्ट करुन घरी जायला निघाली.  रस्त्याच्या दुतर्फा रक्तवर्णी गुलमोहराची,पिवळ्या पंगेऱ्याची झाडे बहरली होती. या फुलांच्या सड्याने रस्त्यावर पायघडीच घातली होती. ज्योचे सिल्की केस वाऱ्यासोबत हेलकावे घेत होते. 

ज्यो घरी आली. वॉश घेऊन परीजवळ गेली. परी चित्रकलेची वही,रंगीत खडूंची पेटी घेऊन बसली होती. अगदी मग्न होऊन चित्र काढत होती. तिचे केसही तिच्या आईसारखेच मऊशार होते. केसांचे दोन बो बांधून त्यात बागेतल्या झेंडूचं फुलं खोवलं होतं. ज्योने गुडघ्यावर बसून लेकीचं चित्र पाहिलं. त्या चित्रात डोंगर होते,वरती ढग,चार उडणारे पक्षी,डोंगरातून झुळूझुळू वहाणारी नदी,एक सुबकसं घर,घरासमोर विहिर,बाजूला शेत व त्या शेतात तीन मुली हातात हात गुंफून उभ्या होत्या.. मधोमध पेटीफ्रॉक ल्यालेली परीराणी.. तिच्या उजव्या बाजूला उंच,गोरीशी टॉप व जीन्स घातलेली तिची मम्मुटली व डाव्या बाजूला फुलाफुलांची साडी नेसलेली ठुसकीशी तिची लाडकी आज्जी.  

परीराणीच्या या चित्रात  तिचा बाबा मात्र नव्हता.  परीने बऱ्याचदा मम्माला बाबाविषयी विचारलं होतं पण ती विषय बदलायची किंवा गप्पच रहायची..मग तिला आज्जीनेच तुझे बाबा परदेशात ऑफिसच्या कामासाठी गेले आहेत व तिथेच रहातात असं सांगून सावरलं होतं,पण कधीतरी परीला सत्य सांगाव लागणार होतं. 

सासूने वाढलेल्या वरणभाताचा एक घास ज्योने तोंडात घातला तोच फोनची रिंग वाजली..

सिस्टर अर्पिता बोलत होती,"डॉक्टर, इमरजन्सी आहे. डॉ.निकम यांची पेशंट आहे. डॉ.निकम यांना तातडीच्या कामासाठी गावी जावे लागले होते. जायच्या आधी त्यांनी डॉ.ज्योत्स्नाला अर्जंट केस आली तर ऑपरेट करण्यास विनंती केली होती. ज्यो ताट तसंच ठेवून परत इस्पितळाकडे निघाली.  वाटेत तिला परत रक्तवर्णी गुलमोहर भेटला खरा पण आत्ता तिचे सगळे लक्ष इस्पितळाकडे लागले होते.  डॉ.ज्योने पेशंटची फाईल पाहिली,पेशंटला तपासले. बाळाचे ठोके फारच कमी पडत होते. सिस्टरने बाकी सगळी तयारी करुन ठेवली होती. डॉ. ज्योने हात चालवला. प्रसुतीमार्ग फारच अरुंद होता,त्यामानाने बाळाचं डोकं मोठं होतं.  

पेशंटला कळा येत नव्हत्या. कळा यायचं इंजेक्शन दिलं असतं व पेशंटने हातपाय जोरात आपटले असते तर आधीच थकलेल्या बाळाच्या जीवाला धोका होता.  सिझर करावं लगणार असा डिसिजन घेऊन तिने पेशंटच्या नातेवाइकांना केबिनमध्ये बोलावण्यास सांगितलं.

दार उघडून एक व्यक्ती आत आली. ज्यो भुलतज्ञांना फोन लावत होती. 

"डॉक्टर आत येऊ?"

डॉ.ज्योने मान वर करुन पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली.  समोर उभा होता तो सहा फुटी, कानात बीकबाळी ल्यालेला,गौरवर्णाचा,घाऱ्या डोळ्यांचा,पीळदार शरीरयष्टीचा तिचा वसंता. वसंतालाही क्षणभर काहीच सुचेना. डॉ.ज्योने काही क्षण जाऊ दिले. अत्यंत शांत डोके ठेवून वसंताला पेशंटची कंडीशन समजावून सांगितली.

"वसंता,तुला माझ्यावर भरवसा नसेल तर मी माझे कलिग डॉ. सुर्यवंशींना बोलवते.

"नो नेव्हर. आय हेव फुल फेथ इन यु ज्यो. गो अहेड."

वसंताने ऑपरेशन पेपर्सवर सही केली.

ज्यो तेथून निघाली.  मनातली सारी वादळं तिने ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ठेवली. भुलतज्ञांनी पेशंटच्या मणक्यात इंजेक्शन दिले. काही मिनिटांत सीझर सुरु केलं. पेशंटच्या ओटीपोटाला छेद दिला. डॉ.ज्योने बाळाला अलगद बाहेर काढलं व सिस्टरकडे दिलं. सिस्टरने ते पुसून बालरोगतज्ज्ञ डॉ.केयुरकडे दिलं.  डॉ.केयुरने बाळाचा ताबा घेतला व त्याच्या नाजूक पावलांवर टिचक्या मारु लागला. थोड्याच क्षणात बाळाने टँटँ केले तेंव्हा कुठे सर्वांचा जीव भांड्यात पडला.  डॉ.ज्यो ओटीपोटाला टाके घालत होती.  पेशंटला मग बाहेरच्या स्पेशल वॉर्डमध्ये आणण्यात आलं. 

डॉ.ज्योने बाळाला कवेत घेतलं. ती बाळाला निरखून बघू लागली.  बाळाचं नाक,लांब कान,घारे डोळे..सगळंच वसंतासारखं दिसत होतं. तिच्या वसंतासारखं, जो आत्ता तिचा नव्हता. तिचं मन फार पाठी गेलं. एमबीए शिकणारा वसंता त्यांच्या कॉलनीत भाड्याने रहात होता.  ज्यो तेंव्हा नुकतीच एम.डी. झाली होती. बेसमेंटमध्ये कॉलनीतल्या मित्रमैत्रिणींसोबत टेबलटेनिस खेळताना तिची वसंताशी ओळख झाली. तिथेच त्यांच सुत जुळलं. प्रेमाच्या आणाभाका झाल्या. 

ज्योने घरी आईआप्पांना वसंता व तिच्या प्रेमाबद्दल सांगितलं. आप्पांना ते अजिबात मान्य नव्हतं. आप्पांना ज्योचं लग्न एखाद्या निष्णात डॉक्टरशी करायचं होतं. वसंताला तर नोकरीही नव्हती,वडील नव्हते. ज्योने रडूनभेकूनही आप्पांनी तिच्या लग्नाला पाठींबा दिला नाही. आईचा प्रश्नच नव्हता. त्याकाळच्या इतर घरांतील स्त्रियांप्रमाणेच नवऱ्याच्या शब्दाबाहेर बोलण्याचा तिला हक्क नव्हता. 

एके दिवशी निवडक मित्रमैत्रिणींच्यासमक्ष ज्यो व वसंताने नोंदणीकृत विवाह केला. त्या दिवसापासून आप्पांच्या घरचे दरवाजे त्यांच्या ज्योसाठी कायमचे बंद झाले. वसंता ज्योला घेऊन त्याच्या नेरुळच्या घरी गेला. दोन रुमचं भाड्याचं घर होतं ते. वसंताच्या आईने त्यांच्यावरुन भाकरतुकडा ओवाळून टाकला. त्यांच्या पापण्यांना पाणी लावलं. उंबरठ्यावरचं माप ओलांडून ज्यो सासरच्या घरात प्रवेशली.

वसंताच्या आईला सगळी परिस्थिती माहित होती. तिने ज्योला कुशीत घेतले तेंव्हा ज्योने मनमोकळं रडून घेतलं. 

ज्योची सासू खूप लाघवी होती. ती ज्योला सांभाळून घ्यायची. वसंताला नोकरीत इंटरेस्ट नव्हता. त्याला बिझनेस करायचा होता. ज्योने वसंताच्या या निर्णयाला पुर्ण पाठींबा दिला. घराची आर्थिक धुरा ती सांभाळू लागली. वसंताने मित्रासोबत जॉइंट व्हेंचर सुरु केले. त्याच्या लाघवी बोलण्यामुळे,परफेक्टनेसमुळे एकेक प्रोजेक्ट त्याला मिळत गेले.

ज्यो आई होणार हे जेंव्हा वसंताला कळले तेंव्हा त्याला ज्योला कुठे ठेवू कुठे नको असं झालं होतं. ज्योची सासू तिची खूप काळजी घेत होती.  

तिची आईही आप्पांच्या अनुपस्थितीत तिला फोन लावायची व तिची विचारपूस करायची पण आप्पांपुढे तिची जबर इच्छा असुनही तिला ज्योला भेटता येत नव्हतं.  नववा महिना लागला अन् ज्योने एका सुंदर कन्येला जन्म दिला. लेकीचे डोळेही बाबासारखे घारे होते. ज्योच्या आईची इच्छा असुनही ती नातीला बघायला येऊ शकली नाही. 

ज्योच्या सासूने मात्र ज्योचे सगळे लाड पुर्ण केले.  ज्यो व  वसंताची परीराणी हळूहळू बाळसं घेत होती.. काही महिन्यात रांगू लागली. तिच्या पायातल्या पैंजणांनी घरभर छुमछुमचा नाद होऊ लागला.

वसंताचा व्याप वाढत चालला होता. परदेशचे क्लायंट्स मिळत होते..डील फायनल झालं की लेट नाईट पार्टीज होत होत्या. ज्योही काही महिन्यात तिच्या कामाला लागली. परीराणी आज्जीसोबत छान रहायची. त्यामुळे ज्योला परीराणीची जास्त चिंता नव्हती. दरम्यान तिच्या इस्पितळाचंही कामं चालू होतं. 

यात वसंता तिच्या हातून तिच्याही नकळत निसटत चालला होता आणि एके रात्री वसंताने ज्योला सांगितलं की त्याचं त्याच्या सेक्रेटरीवर प्रेम आहे. प्रेमात ती दोघं फार पुढे गेली आहेत.

ज्योला काय बोलावं तेच समजेना. तिचे ओठ रागाने थरथरत होते. एवढा मोठा विश्वासघात तिचा..तोही तिच्या वसंताकडून, ज्याच्यासाठी ती तिच्या आप्पांशी भांडली होती,ज्याच्यासाठी तिनं तिच्या माहेरावर कायमचं पाणी सोडलं होतं. 

ज्योला वसंताशी खूप खूप भांडायचं होतं. तिला खूप खूप राग ,चीड आली होती. एका क्षणात वसंताने तिचं स्वप्न उद्ध्वस्त केलं होतं पण वसंताशी भांडायचं त्राण नव्हतं तिच्यात. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. फुटत होते नुसते आर्त हुंकार,वेदनांचे..यातनांचे. 

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हीच गोष्ट वसंताने त्याच्या आईला सांगितली तेंव्हा त्या माऊलीने त्याच्या श्रीमुखात दोनचार भडकावल्या. ती माऊली म्हणाली,"अरे ,तुझे वडील तू दोन वर्षांचा असताना मला टाकून गेले तेंव्हापासून मी तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला. माझ्या सगळ्या हौसीमौजी बाजूला ठेवून तुला लहानाचं मोठं केलं. नक्षत्रासारखी बायको लाभली तुला, कमवत नव्हतास तेंव्हा हुं की चू न करता तीनेच पोसलं तुला. भाड्याच्या घरातून तिच्याच पैशाने घेतलेल्या ओनरशीपच्या घरात रहायला आलास आणि आत्ता मोठा साहेब झालास तर माझ्या लक्ष्मीसारख्या सुनेची प्रतारणा करतोस. तिच्या उरावर सवत आणून बसवतोस! मी जीवंत असेपर्यंत बघतेच मी कसा दुसरं लग्न करतोस ते.

त्याचवेळी परीराणीला पाजून ज्यो बाहेर आली. बाहेरचं मायलेकरांच संभाषण तिनं ऐकलं होतं. रात्रभर रडल्याने तिच्या गालांवर ओघळलेली आसवं सुकली होती. तिचा चेहरा खूपच निर्जीव, थकलेला जाणवत होता. ती सासूला म्हणाली,"आई मी हरले. माझा वसंता आत्ता माझा राहिला नाही. जर त्याच्या मनातच माझ्यासाठी जागा नसेल तर कायद्याच्या दोऱ्यांनी मी त्याला अडकवून ठेवणार नाही." मग वसंताकडे नजर रोखून म्हणाली,"वसंता,तुला तुझे मार्ग मोकळे आहेत." 

म्युच्युअल अंडरस्टँडींगने ती दोघं वेगळी झाली. वसंताची आई मात्र ज्योसोबत व तिच्या लाडक्या नातीसोबत राहिली. तिचाच काय तो ज्योला आधार होता. 

ज्योने बाळाला आईच्या कुशीत ठेवलं व केबिनमध्ये आली. डॉ.केयुरही तिच्या पाठोपाठ केबिनमध्ये आला. दोघं मिळून कॉफी घेत होते. थकलेल्या ज्योला हलक्याफुलक्या विनोदांनी डॉ.केयुर हसवण्याचा प्रयत्न करत असतानाच वसंताने केबिनचं दार उघडलं. डॉ.केयुरची ज्योशी चाललेली सलगी त्याला रुचली नाही. त्याच्या मस्तकावरची शीर त्याच्याही नकळत तटतटली.

ज्योला वसंताच्या चेहऱ्यावरील बदल जाणवले. अत्यंत निर्विकारपणे ज्योने वसंताला प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं व घराकडे निघाली..तिच्या परीराणीला भेटायला..आत्ता तीच तीचं विश्व होतं. 
रस्त्यावरचा गुलमोहर त्याचा पसारा घेऊन डोलत होता. स्रुष्टीचा वसंतोत्सव सुरु होता. 

तिच्या आयुष्यात मात्र आत्ता वसंत कधीच बहरणार नव्हता?

डॉ.केयुरला त्याच्यापेक्षा सात वर्ष मोठी असणारी डॉ.ज्यो आवडू लागली होती. तिचा पुर्वेतिहास त्याला माहित होता. अधुनमधून डॉ.केयुर आत्ता डॉ.ज्योच्या घरी जाऊ लागला. परीराणीसाठी गेम्स,चॉकलेट्स,गोष्टींची पुस्तकं नेऊ लागला. 

कधीकधी परीराणीच्या हट्टापायी ती तीघं एकत्र मॉलमध्ये,समुद्रकिनाऱ्यावर जाऊ लागली. डॉ.केयुरमुळे परीराणीला बाबाचं प्रेम मिळत होतं. डॉ.केयुर डॉ.ज्योच्या निरागसतेवर फिदा झाला होता. तिला ज्या वेदनांतून जावं लागलं होतं ते ज्यो एक मित्र म्हणून केयुरशी शेअर करु लागली होती. 

रात्री उशिरापर्यंत ती दोघं कॉफीचे सीप घेत गप्पा मारत बसत तेंव्हा ज्यो अगदी लहान मुलीप्रमाणे केयुरला तिच्या आयुष्यातली सगळी दु:ख,व्यथा सांगे. तसं केलं की तिला अगदी हलकं वाटायचं. 

----------------------

डॉ.केयुरने त्याच्या मम्मीला डॉ.ज्योबद्दल सांगितलं. आपला मुलगा त्याच्यापेक्षा सात वर्षाने मोठ्या असलेल्या एका परित्यक्ता, स्वत:च अपत्य असलेल्या स्त्रीशी लग्न करतोय ही गोष्ट काही डॉ.केयुरच्या मम्मीच्या पचनी पडली नाही. केयुरची मम्मी समाजसेविका होती.  महिलांचे प्रश्न हिरीरीने सोडवायची.  

परित्यक्ता, विधवा स्त्रियांची लग्नं लावून द्यायची पण हे सारं तिच्या घरापासून दोन हात लांब होतं. तिच्याच घरात हे वादळ येणार याची तिला कल्पना नव्हती.  

केयुरची मोठी बहीण कायराही त्याच्या निर्णयावर नाराज होती.  तिला माहित होतं की केयुर कमालीचा हट्टी आहे. त्याने जे मनात आणलय ते तो करणारच. त्याचा स्वभावच तसा होता.

कायराला भिती होती ती एवढ्याच गोष्टीची की केयुरने नंतर पाय मागे घेतले तर ज्योचं व तिच्या लेकीचं काय होणार.  कायरा जरी ज्योला भेटली नव्हती तरी तिने केयुरकडून ज्योबद्दल व तिच्या लेकीबद्दल खूप काही ऐकलं होतं पण केयुरच्या धरसोड व्रुत्तीचीही तिला कल्पना होती.

कायराने एके दिवशी केयुरला सुनावलं की तू आत्ता हो म्हणतोयस पण नंतर काही कारणाने तुझं मन बदललं तर?  ती ज्यो,तिची मुलगी व सासू आत्ता कुठे स्थिरस्थावर होताहेत..दु:ख पचवून जगायला शिकताहेत. तू त्यांना दगा दिलास तर ..

केयुरने मग कायराला चांगलच सुनावलं,"कायरा, तुझं आत्ता लग्न झालंय.  तू तुझ्या संसारात लक्ष दे. माझं भलंबुरं मला समजतं."  केयुर त्याच्या घरच्यांना न जुमानता ज्योच्या घरी गेला.

ज्योने केयुरच्या हातात तिचा हात दिला. आत्ता परीराणीला तिचा बाबा मिळाला.  ज्योची सासूही मनापासून खूष झाली कारण तिच्या मुलामुळे सोन्यासारख्या ज्योचं नुकसान होतंय याची टोचणी तिला आयुष्यभर लागली होती. 

केयुरच्या मम्मीचा संधीवात बळावत चालला तशी नाइलाजात्सव तीही ज्योच्या घरी रहायला गेली. ज्योने व परीने तिलाही आपलंस केलं. कायराही आत्ता अधनामधना येऊन जात होती. सगळं छान,सुरळीत चालू होतं. परीराणीही खूप छान अभ्यास करत वरच्या वर्गांत जात होती.

पण नियतीला हे मान्य नव्हतं. खरंतर बऱ्याचदा कर्म माणसाची असली तरीही माणूस नियतीच्या माथी खापर फोडत असतो.  डॉ.केयुरला आत्ता स्वतःच बाळ हवं होतं. ज्योची पस्तिशी उलटली होती.  तिला खरंतर मुल नको होतं पण केयुरच्या इच्छेकरता तिने परत आई होण्याचा निर्णय घेतला.  बरेच प्रयत्न करुनही मुल झालं नाही. 

डॉ.केयुर बाप बनण्यास असमर्थ होता. त्याच्या या कमीचा राग तो परीराणीवर काढू लागला. तिला उगाचच ओरडू लागला.  अडनिड्या वयातली पोर ती,डॉ.केयुरमध्ये तिचा हरवलेला बाप शोधत होती पण ती जेवढी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायची,तितक्याच जोराने तो तिला दूर लोटायचा.

काही वर्षांपूर्वी परीबद्दल डॉ.केयुरच्या मनात फुटलेला मायेचा झरा, तो स्वतः अपत्य जन्माला घालण्यास पात्र नाही हे कळताच आटू लागला..अगदी कोरडाठाक झाला.
डॉ.केयुरची बहीण,कायराला तिच्या भावाबद्दल जी भिती होती ती खरी ठरत होती. 

मध्यंतरी पुलाखालून बरंच पाणी गेलं. परीराणी आत्ता नेफ्रॉलॉजिस्ट झाली होती. प्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉ.सामंत यांच्या हाताखाली ट्रेन होत होती. डॉ.केयुरच्या सततच्या धुम्रपानाच्या सवयीने त्याची दोन्ही मुत्रपिंडे खराब झाली होती. डॉ.सामंतांच्या इस्पितळात आठवड्यातून दोनदा त्याचं डायलिसीस करावं लागत होतं. 

परीराणी डॉ.केयुरच्या तब्येतीवर विशेष लक्ष देत होती. त्याला मानसिक आधारही देत होती. डॉ.केयुरने जरी परीला झिडकारलं होतं तरी तिच्या मनात मात्र तोच तिचा बाबा होता. त्याच्या जीवासाठी ती काहीही करायला तयार होती. डॉ.ज्यो, डॉ.केयुरच्या पथ्याकडे नीट लक्ष देत होती. डॉ.केयुरला आत्ता त्याच्या वागण्याचा फार पश्चाताप होत होता..

------------------

वसंताच्या आईचं..ज्योच्या सासूचं आकस्मिक निधन झालं. मरण्यापुर्वी तिने ज्योला सांगून ठेवलं होतं की तिचं शेवटचं क्रियाकर्म तिनेच करायचं. वसंताला तो अधिकार नाही..तरीही ज्योने वसंताच्या मित्रांकडून त्याचा संपर्क क्रमांक मिळवला व वसंताला झाल्या घटनेबाबत कळविले.  

वसंता,त्याच्या मुलाला व बायकोला घेऊन तिथे पोहोचला. वसंताचा मुलगा,जीवन वयात आला होता.  बापासारखाच उंचापुरा, तसेच घारे डोळे,कमालीचे देखणे रुप. 

ज्योने व परीने सर्व अंतिम विधी पार पाडले. वसंता व त्याचे कुटुंब तर नावाला तिथे होते. वसंतानेही बऱ्याच वर्षाने ज्योला व परीराणीला पाहिलं. ज्योच्या केसांत एक पांढरी बट चमकत होती. तिचे डोळे खोल गेले होते.  

परीराणी.. वसंताची रक्ताची मुलगी पण कोणत्या तोंडाने तो तिला साद घालणार होता? परीराणीला जेंव्हा बापाची गरज होती तेंव्हा तो तिच्यापासून फार दूर निघून गेला होता. परीराणी जेंव्हा वयात आली तेंव्हाच तिला ज्योने या साऱ्या गोष्टींची कल्पना दिली होती. 

वसंताच्या लेकाला..जीवनला मात्र यातली काडीचीही कल्पना नव्हती.  आपण कुठे आलोय,हे काय चाललय..ही आज्जी कोण..हीचा नी माझ्या पप्पांचा काय संबंध..असे अनेक प्रश्न त्या नुकतच मिसरुड फुटलेल्या पोराच्या मनात उमटले होते.

काही गोष्टींचा तो त्याच्या पद्धतीने ताळमेळ लावायचा प्रयत्न करत बाहेरच्या पार्कात बसला होता. परीराणी जीवनच्या शेजारी जाऊन बसली. तिने जीवनला तिची ओळख करुन दिली. त्याच्याशी हस्तांदोलन केलं.  जीवन परीला म्हणाला,"मी जीवन. मी नं टोटली कन्फ्युज्ड झालोय. तुम्ही सगळी कोण अहात व तुमचा माझ्या पप्पांशी काय संबंध,मला काहीच कळत नाहीए."

परी जीवनपेक्षा सात वर्षाने मोठी होती.  तीने जीवनच्या पाठीवर हात ठेवला व त्याला थोपटले. परी त्याला म्हणाली,"तू माझा भाऊ आहेस. आपल्या दोघांची मम्मी वेगवेगळी आहे व पप्पा मात्र सेम आहेत." ज्योने त्याला सगळं नीट समजावून सांगितलं. तीने जीवनला तिच्या नवीन वडिलांविषयी माहिती दिली. ज्यो म्हणाली," जीवन,आज मला माझा भाऊ मिळाला." 

ज्यो व जी्वन त्या घटनेनंतर एकमेकांना भेटू लागले. त्यांच्यातले नातेसंबंध अधिकच द्रुढ झाले. जीवन एक गुणी मुलगा होता. परी व जीवनमधील व्रुद्धिंगत होत जाणारं भावाबहिणीचं प्रेम पाहून ज्योला फार बरं वाटत होतं. आपल्यानंतर आपली परी एकटी नाही. तिचा भाऊ,जीवन सतत तिच्यासोबत राहील याची तिला शाश्वती वाटू लागली.

--------------------

ज्यो परीच्या बेडरुममध्ये गेली. परीने तिला एक चिठ्ठी दिली.  ज्योने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. परी नजरेनेच 'वाच' म्हणाली. ज्यो बेडवर पहुडली. तिने चिठ्ठी उघडली..स्वत:शीच विचार करत,किती दिवस झाले असं चिठ्ठी वगैरे वाचून!

चिठ्ठीमधलं अक्षर पहाताचं ज्यो अवाक झाली. हे हस्ताक्षर तिच्या ओळखीचं होतं. अरे हे तर आप्पांच हस्ताक्षर,ज्यो स्वतःशीच म्हणाली. ज्यो वाचू लागली.

प्रिय ज्योस,

            प्रेमपुर्वक आशिर्वाद,

                           ज्यो बाळा, ओळखलंस का ग? मीच तो करंटा बाप ज्याने माझ्या फुलासारख्या नाजूक ज्योला हद्दपार केलं पण ते नुसतं घरातून होतं ग.  माझ्या ह्रदयात तू कायमच आहेस. 

लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? समाजातील माझी प्रतिष्ठा कमी होईल का? तुझं भविष्य वसंतासोबत सुरक्षित कसं राहिलं या भितीपोटी मी तुझ्या व वसंताच्या लग्नाला मान्यता दिली नाही. ज्यो,तुझ्या आठवणीत तुझ्या आईने कित्येक रात्री रडून काढल्या आहेत.  मीही रडायचो पण आतल्या आत. रडण्यातही माझा पुरुषार्थ आडवा यायचा. तुला लेक झाली तेंव्हा तुझी आई माझ्या पाठी लागलेली,तुझ्याकडे जाऊया म्हणून पण माझा इगो आड आला.  

मीही आलो नाही व तुझ्या आईलाही तुझ्याकडे येऊ दिलं नाही. नातीचे कोणतेच लाड पुरवावेसे वाटूनही मी पुरवले नाहीत. काही वर्षांनी उडत उडत वसंताच्या अफेअरची बातमी कळली. म्हंटल, नशीब तुझं. तेंव्हाही एक बाप म्हणून तुझ्या पाठीशी उभा राह्यला मी कमी पडलो.  ते काम तुझ्या सासूने केलं. तुझ्या पाठीशी देवासारखी उभी राहिली. 

मग तसंच उडत उडत तुझ्या व डॉ.केयुरबद्दल कळलं. परत तुला मनात चार शिव्या घातल्या. 

ज्यो,मला हल्ली थोडा लघवीचा त्रास होतो म्हणून आपल्या फेमिली डॉक्टरांनी डॉ. सामंतांकडे जायला सांगितलं. कालच तुझी आई व मी, डॉ.सामंतांच्या इस्पितळात गेलो होतो. 

डॉ. सामंत माझा शाळेतला मित्र निघाला. त्याच्या हाताखाली एक चुणचुणीत,गोड पोरगी मला अटेंड करत होती. मला व हिला तिच्यात काहीतरी आपलंस वाटत होतं म्हणून मग आम्ही डॉक्टरांकडे तिच्याविषयी  चौकशी केली. तेंव्हा कळलं की ती डॉ.ज्योत्स्नाची म्हणजे तुझी मुलगी व आमची नात आहे.

तुझ्या आईने नातीला कुशीत घेतलं. कितीतरी वेळ तिचा चेहरा बघत होती. कदाचित.. कदाचित ती परीमध्ये तिच्या लेकीला शोधत होती.

ज्यो,तुझ्या आप्पांना क्षमा करशील ना ग! कधीतरी आम्हा म्हाताराम्हातारीला भेटायला येत जा ग बाळा. रागरुसवा सोडून दे गंगेच्या पाण्यात. तुला भेटण्याची तीव्र इच्छा झाली आहे बघ.

                                                तुझे आप्पा

ज्योच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. तीला आज खूप हलकं वाटत होतं. बऱ्याच वर्षांच मळभ दूर झालं होतं. ज्योने तिच्या लाडक्या,समंजस परीराणीला घट्ट मिठी मारली व म्हणाली," परी बेटा, दिस हेज बीन द बेस्ट गीफ्ट यू हेव गीव्हन मी एव्हर."

लागून आलेल्या रविवारी ज्यो व परी आईआप्पांकडे गेल्या. बऱ्याच वर्षांनी ज्यो, तीचं माहेराचं घर,तिथला परिसर पहात होती. डोळ्यांत साठवून घेत होती. 
आईआप्पांना भेटून ज्योला खूप आनंद झाला. 

ज्यो,आईच्या हातचं सुग्रास जेवण जेवली. लहानपणी झोके घ्यायची त्या झोक्यावर बसली. ज्योने पाहिलं,तिच्या आईने तिची खोली अगदी होती तशी नीटनेटकी ठेवली होती. तिची वह्या,पुस्तकं कपाटात जिथल्या तिथे होती. भिंतीवर ज्योचे लहानपणीचे फोटो होते. शोकेसमध्ये तिची भातुकली मांडून ठेवली होती. 

तिची निळ्या डोळ्यांची,सोनेरी केसांची,आकाशी फ्रॉकवाली बाहुलीही शोकेसमध्ये दिमाखात उभी होती. ज्योच्या व तिच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओसंडून वहात होते. कितीतरी वर्षांनी अशी भावूक झालेली परीराणीची मम्मा परीराणी अनिमिष नेत्रांनी पहात होती. 
परीराणीचे आजोबा तिला दिवाणखान्यात घेऊन गेले व तिला त्यांनी माऊथ ऑर्गनवर छान छान जुनी गाणी ऐकवली. परत येतो असं आश्वासन देऊनच त्या दोघी घराकडे निघाल्या.

डॉ.केयुरही आत्ता ज्योशी व परीराणीशी आपुलकीने वागत होता. त्याला त्याची चूक कळली होती. डॉ.केयुरच्या आईचं तर ज्योशिवाय पानच हलत नव्हतं. डॉ.केयुरचं पथ्यपाणी ज्यो जातीने सांभाळत होती. लवकरच त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली व त्याने हॉस्पिटल जॉइंट केलं.

आज सकाळी डॉ.केयुरला जाग आली ती मोगऱ्याच्या सुगंधाने. त्याने डोळे उघडले. ड्रेसिंग टेबलपाशी डॉ.ज्यो कुठल्याशा समारंभाला जाण्यासाठी तयार होत होती. लाल रंगाची सोनेरी किनारवाली साडी,सैलसर अंबाडा व त्यावर टपोऱ्या मोगऱ्याचा गजरा तिने माळला होता. नाकात मोत्याची नथ घातली होती. डॉ.केयुरच्या नकळत त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले,"ज्यो, काय सुंदर दिसतेस ग!" पण ज्योचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं.

ज्योने आत्ता मनाशी पक्क ठरवलेलं,स्वतःचा आनंद स्वतः शोधायचा. स्वतः वर प्रेम करायचं. 

समाप्त(कशी वाटली कथा,अभिप्राय नक्की कळवा.????????)

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now