डॉ. होमी भाभा यांना भारताच्या अणुऊर्जा प्रकल्पाचे शिल्पकार मानले जाते. अश्या डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ मध्ये मुंबई शहरात झाला. एका सधन पारशी कुटुंबात ते जन्माला आले. त्यांचे वडील जहांगीर होरमजी भाभा हे बॅरिस्टर म्हणजेच वकील होते. त्यांच्या आईचे नाव मेहेरबाई होते. ती गृहिणी होती. होमी भाभा यांना एक भाऊ होता त्याचे नाव जमशेद भाभा. दोघांचे बालपण हे मुंबईतच गेले. होमी भाभा यांचे आजोबा होरमजी भाभा हे म्हैसूर येथे शिक्षण महानिरीक्षक होते. थोडक्यात त्यांच्या घरात शिक्षणाचे महत्त्व होते. लहानपणापासूनच त्यांच्या पालकांनी त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यात आवड निर्माण केली होती. सोबतच त्यांच्या घरात आधीपासूनच वाचनाला पोषक असे वातावरण असल्याने घरातच भरपूर पुस्तके उपलब्ध होती. होमी भाभा यांना यामुळेच वाचनाची गोडी लागली. त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची पुस्तके फार आवडायची आणि यातूनच त्यांची विज्ञानातील रुची वाढत गेली. त्यांना वाचानाशिवाय चित्रकला आणि कविता यांचा देखील छंद होता.
होमी भाभा यांचे प्राथमिक तसेच पदवी पर्यंतचे शिक्षण हे मुंबईतच झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण बॉम्बे कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल येथे झाले. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी एलिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. होमी यांना गणित आणि भौतिकशास्त्र या विषयात रस होता तर त्यांचे वडील जहांगीर यांना आपल्या मुलाने इंजिनिअरिंग करावे असे वाटत होते परंतु होमी यांनी आपले मत ठामपणे आपल्या वडलांना सांगितले. शेवटी "इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणी प्राप्त करून दाखवायची" या अटीवर त्यांचे वडील तयार झाले व होमी यांचा गणिताचा गाढा अभ्यास करण्याचा मार्ग मोकळा झाला. वडीलांच्या अटी नुसार होमी यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळवला व इ.स. १९३० मध्ये त्यांनी प्रथम श्रेणीत इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा गणिताचा अभ्यास सुरू होता. इ.स. १९३३ मध्ये त्यांनी कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून त्यात डॉक्टरेट मिळवली. या दरम्यान त्यांना अनेक बक्षिसे आणि शिष्यवृत्ती देखील मिळाली. केंब्रिज ला असताना त्यांनी चुंबकत्व, वीजनिर्मिती, कॉस्मिक किरण, क्वांटम थिअरी इत्यादी विषयांवर संशोधन केले.
भारतात परतल्यानंतर त्यांनी जमशेदपूर येथील टाटा स्टीलमध्ये धातू शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले. त्याआधी १९३२ मध्ये गणिताची ट्रायपोस ही पदवी केंब्रिज विद्यापीठातून पूर्ण केली. १९३५ मध्ये भाभा यांनी रॉयल सोसायटीमध्ये इलेक्ट्रॉन - पॉझिट्रॉन संबंधी एक पेपर प्रकाशित केला. त्यांच्या या योगदानामुळे पुढे या स्कॅट्रिंगला "भाभा स्कॅट्रिंग" असे नाव देण्यात आले.
इ.स. १९४० मध्ये ते भारतात परत आले आणि त्यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. त्यावेळी सी.व्ही. रामन हे संस्थेचे प्रमुख होते. याच काळात त्यांनी आण्विक शास्त्र निर्माण केले होते. त्यांच्या या संशोधनाच्या कामासोबत त्यांनी इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना करायला मदत केली आणि त्याचे संचालक देखील झाले. १९६२ साली दक्षिण मुंबईतील नेव्ही नगर परिसरात या संस्थेचे स्थलांतर करण्यात आले. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर होमी यांच्या पुढाकाराने १० ऑगस्ट १९४८ साली अणू ऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली आणि याचेही संचालक होमी हेच होते. वीजनिर्मिती, शेतीसाठी उपयोग, नॅनो तंत्रज्ञानाचा विकास करणे ही या आयोगाची उद्दिष्ट्ये होती. त्यांच्या अपार प्रयत्नांमुळे भारतात अणू भट्टयांची स्थापना झाली. अणु उर्जेचा वापर हा शांततापूर्ण असावा असे मत संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिलेच होते. १९५६ मध्ये अणु ऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी "अप्सरा" कार्यान्वीत झाली. त्यांनतर "सायरस" आणि "झरलिना" या अणुभट्ट्या देखील स्थापन करण्यात आल्या.
डॉ. होमी भाभा यांनी अणु संशोधनाचा पाया रचला त्यामुळेच भारतात अनेक ठिकाणी अणु भट्टया स्थापित झाल्या आणि त्याचा उपयोग वीजनिर्मितीसाठी होऊ लागला. १८ मे १९७४ रोजी पोखरण येथे पहिली आण्विक चाचणी घेण्यात आली आणि भारताने पहिला अणु स्फोट घडवून आणला. होमी भाभा यांनी युरेनियमच्या साठ्याऐवजी थोरियमच्या साठ्यातून ऊर्जा मिळवण्याची योजना आखली. एका रेडिओ मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितलं होतं; "जर भारत सरकारने परवानगी दिली तर केवळ अठरा महिन्यात अणुबॉम्ब तयार करेन." त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळेच देश हादरले होते कारण त्या काळात फक्त विकसित देशांकडेच अणु ऊर्जा होती आणि भारताला बघण्याचा त्यावेळचा दृष्टिकोन देखील वेगळा होता.
भारत - चीन युद्ध झाल्यानंतर भाभा यांनी आक्रमकपणे आणि जाहीरपणे आण्विक शस्त्रे बनवण्यास सुरुवात केली. अचूक संशोधनानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि आज इलेक्ट्रॉन्स द्वारे पॉझिट्रॉन विखुरण्याच्या प्रक्रियेला "भाभा स्कॅटरिंग" म्हणून ओळखले जाते. होमी भाभा यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या ज्ञान, जिद्द यामुळेच भारताला आण्विक ऊर्जा आणि अवकाश संशोधन अश्या महत्त्वाच्या वैज्ञानिक आघाडीला नवे वळण लाभले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर होमी भाभा यांनी परदेशात असलेल्या भारतीय वैज्ञानिकांना मायदेशी बोलावून घेतले आणि त्यांच्या मदतीने अणु संशोधनाचे कार्य जोरात सुरु झाले. याच काळात त्यांना विक्रम साराभाई यांच्यासारख्या महान वैज्ञानिकांची साथ लाभली.
१९४३ मध्ये डॉ. होमी भाभा यांना ॲडम्स पुरस्कार मिळाला. त्यानंतर १९४८ मध्ये त्यांना हॉपकिन्स पुरस्कार मिळाला. १९५४ मध्ये डॉ. होमी भाभा यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना जवळजवळ पाच वेळा भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते परंतु त्यांना तो पुरस्कार प्राप्त होऊ शकला नाही. २४ जानेवारी १९६६ रोजी इटलीच्या माँट ब्लँकमध्ये अश्या या महान व्यक्तीचा देहांत झाला. एअर इंडिया विमान १०१ क्रॅश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत असले तरीही हा अपघात मुद्दाम घडवून आणला गेला असे एका अहवालात म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया मधील व्हिएन्ना येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेत जात असताना हा अपघात झाला. जिनिव्हा विमानतळ अधिकारी आणि वैमानिक यांच्यात विमानाच्या स्थिती बद्दल गैरसमज झाल्याने डोंगराला आदळून हे विमान क्रॅश झाले व इतर ११७ प्रवाशांसह डॉ. होमी भाभा यांचा मृत्यू झाला असे यावेळी सांगितले गेले होते. भारतातील अणुऊर्जा कार्यक्रम बंद करण्यासाठी जाणून बुजून होमी भाभा यांच्या विमानाचा घातपात केला गेला आणि या मागे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा सी.आय.ए. चा हात होता असे एका अहवालात म्हटले आहे.
होमी भाभा यांच्या अणु संशोधनाचे कार्य बघता त्यांच्या निधनानंतर १२ जानेवारी १९६७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मुंबईतील अणुऊर्जा प्रकल्पाचे नाव बदलून "भाभा अणुसंशोधन केंद्र" म्हणजेच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर असे ठेवले. तसेच उटी येथील रेडिओ दुर्बिणीची त्यांची कल्पना १९७० मध्ये सत्यात उतरली. आज होमी भाभा यांच्यामुळेच भारताला अणु ऊर्जा लाभली आणि याच्याच जोरावर आज भारत विकासाच्या नव्या टप्प्यावर आहे. आज अणु ऊर्जा आहे म्हणूनच अणु बॉम्ब, अणु वीजनिर्मिती, वाळवंटातील जमीन सुपीक बनवणे तसेच अंतराळात उपग्रहाचे प्रक्षेपण करणे हे शक्य झाले आहे. १९६० च्या दशकात विकसित देश विकसनशील देशांना "अणु उर्जेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा इतर पैलूंवर लक्ष केंद्रित करा." असा टोला लगावत होते परंतु डॉ. होमी भाभा यांनी ठामपणे याला विरोध करून अणु उर्जेचा वापर कसा विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि त्याचा शांततापूर्ण वापर कसा करता येऊ शकतो हे दाखवून दिले. त्यांचे विचार जितके प्रगल्भ होते तेवढेच ते स्वभावाने शांत आणि साधे होते. असे सांगितले जाते की, त्यांनी कधीही स्वतःची बॅग शिपायाला घेऊन जायला सांगितली नाही. डॉ. होमी भाभा असे व्यक्ती होते ज्यांनी एवढे यश संपादन करून देखील कधीच मोठेपणा गाजवला नाही. डॉ. होमी भाभा यांनी अणु संशोधना शिवाय स्पेस सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोबायोलॉजी, रेडिओ अॅस्ट्रोनोमी अश्या संशोधनांना देखील पाठिंबा दिला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा