डबल इंजिन

why there is a difference in working women and working men

डबल इंजिन

आज  लॉक डाऊन नंतर, ऑफिस सुरू झालं होतं ,लॉकडाउनच्या काळात, सगळ्यांचा पेमेंट अर्ध केलं होतं. आता सगळे ऑफिसला आल्यामुळे, सगळ्यांनी मिळून अर्ज द्यायचं ठरवलं ,सगळ्या सहकाऱ्यांमध्ये, चर्चा सुरू होती, काही जेन्ट्स स्टाफ होता आणि काही लेडीज स्टाफ. त्यातील एक जेन्टस स्टाफ म्हणाला, ह्यांच बरं आहे ,यांचा डबल इंजिन आहे ,यांना काही काळजी नाही, कमी पगार झाला तरी ,काही फरक पडत नाही ,कारण तुमचा जरी पगार अर्धा झाला ,तरी तुमच्या नवऱ्याचा पगार तर येतोच ना. झालं, त्यांचं बोलणं ऐकलं आणि त्यात एक जी लेडीज स्टाफ होती ,ती चिडली आणि बोलायला लागली, हो का , ऑफिस मध्ये सगळी कामं लेडीज स्टाफ ने करायची, घराची जबाबदारी ही सांभाळायची, ज्यांची लहान मुले आहे त्यांना ते पाळणाघरात ठेवून येतात ,असं मुलांपासून दूर राहायचं,शिवाय ऑफिस मधली सगळी काम काहीही सबब न देता पूर्ण करायची. एखाद्या वेळेस जर काही प्रॉब्लेम झाला, तर त्या गोष्टीचा तुम्ही लोक बाऊ करता, आमच्या मुलांची दहावी असेल ,आम्ही सुट्टी मागितली, तर आम्ही कामचुकार,  तुमच्या बायका घरात असूनही, मुलांना शाळेत सोडण्यासाठी ,तुम्ही  कामाच्या वेळेत जाऊन येता ,का तर ते तुमचं कर्तव्य असतं .आम्ही  सुट्टी मागितली, लगेच बोलणार, की तुम्हाला जमत नाही तर जॉब कशाला करता, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून, आम्ही तुमच्या इतकेच काम करतो ,मग आम्हाला पगार कमी मिळाला तर का चालेल, आम्ही तेवढेच हकदार आहोत. असं तर नाही ना ,की आमच डबल इंजिन आहे, मग आम्हाला कामात काही सूट मिळते, आम्ही जेव्हा नोकरी करतो ना, तेव्हा आमचा नवराही बरोबरीने आम्हाला मदत करतो .तुम्ही तुमच्या बायकांना जॉब करून देत नाही ,कारण तुम्हाला सगळं हातात हवं असतं. तुम्ही शिकलेल्या बायका केल्या, पण त्यांना घरात बसून न ठेवता ,नोकरी करायला लावायची होती आणि तिला त्यात मदतही करायचे होती,यासाठी मन खूप मोठं असावं लागतं. बायकांना सन्मान देतो असं म्हणणं आणि त्यांना सन्मानाने वागवणं यात फरक आहे .

बाहेर फिरायला गेलो, एखादा कार्यक्रम छान केला, की लगेच लोक म्हणतात, त्यांच काय बाबा,डबल इंजिन आहे, पण संसाराचा गाडा ओढताना,जी त्रेधा तिरपीट उडते ,ती डबल इंजिन असणारे लोक समजू शकतात.

पण जे असं तिरसट बोलणारे आहेत, त्यांना मला अभिमानाने सांगावसं वाटते, हो आहे आम्ही डबल इंजिनवाले ,पण त्याचा मला सार्थ अभिमान आहे, कारण त्यामुळे आम्ही सहजीवनाची परिभाषा शिकलो ,ज्या मूलभूत गरजा आहेत , त्या भागवून ,आम्ही स्वतःच्या इच्छा पूर्ण करू शकतो ,हौस-मौज करू शकतो, रोज कटकट करण्‍यापेक्षा ,सुट्टीच्या दिवशी आनंदाने दिवस घालवतो.

घरी राहणाऱ्या स्त्रीचा मुलगा किंवा मुलगी बिघडली ,तर म्हणतात, मुलगा तसा होता किंवा मुलगी तशी होती.

तेच जर दोघेही नोकरी करणारे ,यांच्या घरात घडले तर , समाजाची प्रतिक्रिया अशी असते , की दोघेही पैशाच्या मागे असतात ,त्यांचं कुठे मुलांकडे लक्ष असतं.

आपण म्हणतो ,समाज सुधारला, बायका नोकरी करतात, पण प्रत्यक्षात मात्र असं वाटत नाही ,पुरुषांच्या बरोबरीने बायकांनी काम केली, तरी त्यांना नेहमी दुय्यम स्थान मिळत आहे.हे कुठेतरी थांबले पाहिजे ,आपण आपली विचारधारा बदलली पाहिजे, तुम्ही जर माझ्या मतांशी सहमत असाल, तर हा लेख नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.

रूपाली थोरात