डबल बर्थ - टीम दुनियादारी

A story of a girl and boy who travelled in a bus at same birth

डबल बर्थ:-

गाडी निघायला 10 मिनिटे असताना ती तिथे  संगमवाडी ला पोहचली. पार्किंग 3 शोधेस्तोवर आणखी 5 मिनिटे गेली. ड्रायव्हर चा कॉल आलाच " मॅडम कुठे आहेत? गाडी निघते आहे!"
रात्री 9 ला पाच कमी असताना तिने गाडीत पाऊल टाकले. धावतपळत गाडी जवळ आली. दमलेली, थकलेली, वैतागलेली ती चिडचिडत बस मध्ये चढली आणि आपली जागा शोधत तिथे जाऊन बसली.
  सॅक तिने बर्थ वर अक्षरशः फेकल्यासारखी टाकली आणि धपकीने जाऊन बर्थवर पडली. पाण्याची बाटली काढली आणि बाटलीत असलेले सगळे पाणी घटाघटा संपवून टाकले.
केस क्लचर ने वर बांधले आणि मान मागे टेकून क्षणभर निवांत होण्यासाठी डोळे मिटले.
नागपूर पर्यंतचा 15 तासाचा प्रवास करायचा होता. आता तिला स्वतःबद्दल विचार करायला भरपूर वेळ होता.
क्षणात दिवसभराचा सगळा पाढा तिच्या नजरेसमोरून गेला.
एका इंटरव्ह्यू साठी ती आज सकाळी पुण्याला आली होती. कॉलेजचे शिक्षण झाले तसे घरच्यांनी लग्नाचा आग्रह धरलेला पण तिला स्वतःच्या पायावर उभे राहायचे या साठी तिची धडपड. मग जॉब सर्च करत तिला हा कॉल आला आणि ती आजच सकाळी आली होती.
गाडी 9 ला निघाली आणि तिच्या लक्षात आले गाडी खचाखच भरली आहे. ऐनवेळी ऑनलाईन तिकीट काढल्याने  तिला गाडीमध्ये वरचा बर्थ आणि तो सुद्धा डबल असा मिळाला होता. बहुतेक लेडीज सीट ह्या भरल्या होत्या त्यामुळे डबल बर्थ घेण्याशिवाय तिला पर्याय नव्हता.
गाडी पुढच्या स्टॉप ला विमान नगर ला थांबली आणि कोणी तरी गाडीत चढले. तिच्या सीट जवळ येऊन  क्लीनर ने माणसाला सांगितले की, हा तुमचा बर्थ!
ती एकदम दचकून खडबडून जागी झाली. पडदा हलवून तिने  डोकावले तर तिच्याच वयाचा एक मुलगा खांद्याला सॅक घेऊन उभा होता. ती एकदम ओरडली " ही लेडीज सीट आहे!"
तो मुलगा शांतपणे उभा राहिला.
" मॅडम आज बस मध्ये लेडीज-जेन्ट्स असे काही नाही, सगळ्या गाड्या फुल चालल्या आहेत! तुम्हाला ऐनवेळी जागा मिळाली हेच खूप आहे."
ती चवताळली आणि म्हणाली " ही काय पद्धत आहे का? रात्रीचा प्रवास त्यात एखाद्या अनोळखी मुलासोबत करायचा. एका मुलीला तुम्ही असे बुकिंग देताच कसे? तुम्हाला नीट बुकिंग देता येत नाही का?
"मॅडम सगळ्या सिंगल सीट ह्या आधीच बुक झाल्या आहेत! आणि डबल वर फॅमिली आहेत. तुम्ही आपापसात विचारा कोणी तयार असेल ऍडजस्ट करायला तर तुम्ही बघा"
त्या मुलाने क्लिनर ला विचारले की,  केबिन मध्ये झोपायला जागा आहे का? तर दुसरा ड्रायव्हर तिथे झोपला आहे, असे म्हणत क्लीनर निघून गेला.
गाडीतील कोणीच उठले नाही, तिने एक-दोनदा विचारले पण कोणीच हलले नाही.
हिने खूप आरडा ओरड केला, 15 मिनिटे गाडी तिथेच होती. काहीच ऑपशन दिसत नाही म्हटल्यावर ती बर्थच्या आतल्या साईडला गेली.
तिने सॅक आणि पाण्याची बाटली मध्ये ठेऊन कंपार्टमेंट तयार केले आणि म्हणाली " जर माझ्या केसांना जरी धक्का लागला तरी पोलीस कम्प्लेन्ट करेन."
त्या मुलाचा पेशन्स निर्विवाद होता. तो काहीच बोलला नाही.
गाडी निघाली, लाईट बंद झाले तशी ती आतून प्रचंड चिडली. दिवसभराचा मनस्ताप आणि रात्रीची अशी अवस्था  त्यामुळे पुन्हा परत पुण्याला यायलाच नको असे तिने ठरवले.
11.30 वाजून गेले तरी गाडी जेवणासाठी थांबली नाही तेव्हा तिची चुळबुळ सुरू झाली . बाजूला वळून पाहिले तर बर्थच्या छोट्याशा कोपऱ्यात स्वतःचे मुटकुळे करून तो झोपला होता. गाडीत पूर्ण लाईट बंद असल्याने कोणाशी बोलावे तिला कळत नव्हते! त्यात त्यांचा बर्थ हा सेकंड लास्ट त्यामुळे ड्रायव्हर पर्यंत पोचायचे कसे हा मोठा प्रश्न होय.
पोटात भुकेचा डोंब आणि घशाला कोरड अशी तिची अवस्था होती.
शेवटी नाईलाजाने तिने त्या मुलाला हलवले तो धडपडून जागा झाला. "मॅडम मी धक्का नाही लावला तुम्हाला, चुकून लागला असेल" असे म्हणतच तो उठला.
त्याच्या बोलण्याचे तिला हसू आले
"थोडे पाणी आहे का?" तिने विचारले.
त्याने त्याची पूर्ण बाटली तिच्या हातात दिली.
"गाडी जेवणाला थांबली नाही अजून" ती म्हणाली.
"ह्या गाडीला डिनर हॉल्ट नाही आहे मॅडम!"
ती एकदम ओरडली " काय? माझे तर जेवण राहिले आहे!"
त्याने तिथला लाईट लावला. आपल्या बॅग मधून त्याने एक पॅकेट बाहेर काढले. त्यात मेथीचे ठेपले,दही, सॉस आणि लोणचे होते ते तिच्यापुढे ठेवले.
"घ्या मॅडम" तो म्हणाला.
ती एकदम ओशाळली.
एका अनोळखी माणसाकडून ज्याला आपण बोललो त्याच्याकडून काही घ्यायचे की नाही याचं विचारात ती शांत बसली.
"घ्या मॅडम! माझे खाणे झाले आहे..हे मी बॅक अप साठी ठेवले होते"
शेवटी जास्ती विचार न करता तिने ते घेतले आणि अधाशासारखे सगळे खाल्ले..तसे तिच्या लक्षात आले की दिवसभर न खाल्ल्यामुळे तिची जास्ती चीड चीड होत होती. आता खाल्यावर तिला जरा बरे वाटत आहे.
तो मुलगा सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा सांभाळत तिचे होईस्तोवर मोबाईल मध्ये बघत बसला होता. एकदाही त्याने ती खात असताना तिच्याकडे पाहिले नव्हते.
खाणे झाल्यावर तिने" थँक्स "म्हटले.
काही न बोलता त्याने लाईट बंद केला आणि परत उलट दिशेने तोंड करून झोपायला गेला.
त्याने जेवण दिल्यावर तिची त्याच्याशी बोलायची ईच्छा होती पण सुरवातीलाच वागलेल्या गोष्टीमुळे आता काही बोलणे योग्य वाटत नव्हते. खिडकीतून बाहेर काही दिसते आहे का हे ती बघत होती..
गाडी बरीच स्पीड मध्ये चाललेली होती.
तेवढ्यात कसलातरी मोठ्याने आवाज झाला आणि गाडी वेडीवाकडी होत कशालातरी जाऊन धडकली. ते झाल्यावर तिने एकदम मोठमोठ्याने आरडाओरड, किंकाळ्या  ऐकल्या आणि एक जबरदस्त धक्का तिला स्वतःलाही जाणवला..तिला लक्षात आले की उजव्या पायातून रक्ताची धार बाहेर येत आहे. गाडीत कुणीतरी दिवे लावले आणि सगळे लोक गडबड गोंधळ करत गाडीतुन बाहेर पडायचे प्रयत्न करत होते. तिने उठायचा प्रयत्न केला पण तिला उठताच येत नव्हते.
तेवढ्यात शेजारच्या मुलाच्या डोक्यातून तिला रक्त येताना दिसले.. तो निपचित दिसत होता. खूप गदागदा हलवल्यावर त्याला चेतना आल्यासारखे झाले.
ती प्रचंड घाबरली होती. काय घडतंय हे तिला कळत नव्हते. डोके बसलेल्या झटक्याने बधिर झाले होते.
एकमेकांकडे बघत ते उठले. गडबड होत असल्याने त्याने अंदाज घेतला तर लक्षात आले की गाडी एका मोठ्या टँकर ला धडकून पुढे झाडाला क्रॅश झाली होती. ड्रायव्हर जागीच गेला होता आणि बस पुढून पार चेपली होती.. थोडीशी जागा होती तिथून अंग चोरत लोक बाहेत पडत होती.
याने लगेच इमर्जन्सी एक्सिटची खिडकी शोधून लोकांना बाहेर पडायला मदत केली.
बरेच लोक बाहेर काढले पण ती मुलगी का येईना हा विचार करत
शेवटी तो पुन्हा जागेवर आला आणि त्याने तिला यायला सांगितले.
ती फक्त रडत होती पण बाहेर येत नव्हती.  त्याने पाहिले तर तिला हलता सुद्धा येत नव्हते. त्याने विचार न करता तिला सरळ उचलले आणि खांद्यावर तिची सॅक घेऊन बाहेर पडला.
त्याने तिला एका सेफ जागेवर ठेवले तोवर लोकांनी फोनाफोनी करत अँब्युलन्स ला बोलावले होते.
रात्रीचा किर्रर्र अंधार, आजूबाजूला वस्ती नाही अशी परिस्थिती! घाबरलेल्या आणि रडत असलेल्या तिला " मी आहे सोबत, घाबरू नको सगळं ठीक होईल" इतकेच तो बोलला आणि आश्वासकतेने तिच्याकडे पाहिले.
त्या नजरेने तिला खूप काही सांगितल्यासारखे ती शांत झाली.
तिच्या हातापायाला जखमा झाल्या होत्या आणि पाठीला मार लागला होता.
त्याने तिला पूर्णपणे सोबत करत अंबुलन्स मधून हॉस्पिटलमध्ये आणले. त्याही गर्दीत तो तिची आपुलकीने काळजी घेतोय हे तिला जाणवले.
हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर डॉक्टरांना तिला काय लागले आहे ते सांगितले आणि अचानक तो उभ्याउभ्या कोसळला!
ती घाबरली आणि ओरडली तसे डॉक्टरांनी पाहिले की त्याच्या डोक्याच्या मागील बाजूला जबर मार बसला होता. कसाबसा तग धरलेला तो आता मात्र हतबल होऊन निपचित पडला होता.
लगेच डॉक्टर ने त्याचे सिटी स्कॅन केले. ही घाबरून सगळं बघत होती. तोपर्यंत इंजेक्शन मुळे तिचे दुखणे कमी झाले होते ती बेचैन होऊन त्याच्या रिपोर्ट ची वाट पाहत होती. दरम्यान तिने घरी फोन करून घरच्यांना लगेच यायला सांगितले होते त्याचा फोन घेऊन बघितले तर फोन ला लॉक नव्हता.
तिने बाबा या नावाने सेव असलेला नंबर ला डायल केले आणि काय झाले आहे ते त्या व्यक्तीला सगळे सांगितले.
तिथल्या लोकेशन चा अड्रेस  मॅप वर दिला. 
डॉक्टरांनी सांगितले की याचे  ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल तसे तिने सांगितले प्लिज करा. गार्डीयन च्या नावाने तिने त्याच्या कनसेन्ट फॉर्म वर  सही पण केली.
अत्यंत अस्वस्थता करत ही रात्र चालली होती.
तिला चालता येत नव्हते पण सतत सिस्टर ला ती ऑपरेशन कसे झाले हे विचारत होती.
शेवटी 2 तासाने थकलेल्या नजरेने डॉक्टर तिच्यापाशी आले आणि सांगितले की आपण ऑपरेशन लगेच केले हे खूप छान झाले नाहीतर तो कोमा मध्ये गेला असता.
आता ठीक आहे पण पुढचे 72 तास खूप महत्वाचे.
तिने डॉक्टराना विनंती करून तिचा बेड त्याच्या रुम मध्ये शिफ्ट करायला लावला.
दुसऱ्या दिवशी पुण्याहून त्याचे आईवडील आले तर नागपूर वरून तिचे आई बाबा आले.
या मुलीने किती लवकर निर्णय घेऊन आपल्या मुलाचे प्राण वाचवले हे कळल्यावर त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यातून फक्त पाणी येत होते.
हिचा गवत देवाचा धावा चालला होता..मला जॉब नको, पैसे नको पण ह्याला वाचव एवढाच जप ती करत होती.
जवळपास 3ऱ्या दिवशी त्याला शुद्ध आली.
डोळे उघडत त्याने समोर पाहिले तर बाजूच्या कॉटवर पहिली तीच दिसली. ती त्याच्याकडे बघून हसली तसे त्याच्या चेहऱ्यावर हलकेच हसू आले.  आणि ती त्याला शुद्धीत पाहून एकदम प्रसन्न झाली.
ती त्यांची नजरभेट खूप काही बोलत होती.
काहीच न बोलता ती परत रडायला लागली आणि तिच्या रडण्याने तो अचंबित होता.
त्याला हसता किंवा रडता येत नव्हते पण तरिही त्याला सगळे कळत होते.
तेवढ्यात बेल वाजवून तिने सिस्टर आणि डॉक्टराना बोलावले.
सगळेच जण धावत पळत आले.
त्याच्या आई आणि बाबा त्याला शुद्धीत पाहून आनंदाने रडायला लागले.
डॉक्टरांनी चेक करून आता तो आऊट ऑफ डेंजर आहे असे सांगितले.
तिच्या नजरेत खूप आनंदाचे भाव होते. त्याने तिच्याकडे पाहून न बोलता अलगद तिचे आभार मानले.

या दोघांनाही बघणारे दोघांच्याही घरचे सगळे भाव हळूच टिपत  होते.

काही दिवस त्याच हॉस्पिटलमध्ये रिकव्हर करणारा तो आणि त्याची काळजी घेणारी ती यांच्यात नकळत बंध निर्माण झाले होते.
नंतर त्याला त्याचे आईवडील पुण्याला  घेऊन जायला निघाले आणि तिचे आईवडील नागपूर ला.
या दोघांच्या जीवाची घालमेल चालू झाली.
हे होणारच होते हे माहिती होते पण कधी होईल हे माहिती नव्हते.
त्या रात्री पासून सुरुवात झालेल्या त्यांच्या अबोल नात्याला आता एक बोलका आधार प्राप्त झाला होता.
निघायच्या दिवशी ती त्याला म्हणाली, "माझे आईवडील माझे लग्न लावून देणार होते. मला ते नव्हते करायचे म्हणून मी पुण्याला आले. पुण्यात आलेल्या अनुभवावरून परत कधी पुण्याला यायचे नाही असे मी ठरवले. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळे असावे. आता मला लग्न ही करायचे आहे आणि पुण्यात सुद्धा यायचे आहे.
तुझ्या बरोबर राहायचे आहे. तुझी ईच्छा आणि तयारी आहे का?"
तिच्या या बोलण्यावर त्याने तिचा हात आपल्या हातात पकडला आणि म्हणाला, "मी तेव्हाही म्हणालो होतो की मी आहे सोबत आणि आताही म्हणतो की मी आहे तुझ्या सोबत"
त्याच्या या बोलण्याच्या आधारावर ते दोघे पुढे त्यांच्या जीवनाचा प्रवास साकारणार होते.
तिला कळले होते की बसमध्ये तिला  मिळालेला डबल बर्थ हा तिच्या देवानेच तिला मिळवून दिला होता.

©®अमित मेढेकर