Login

दोष त्यालाच का? (टीम दुनियादारी)

प्रणव, अतिशय हुशार, सोज्वळ, सुसंस्कृत घरात वाढलेला मुलगा. कधी कुणाला उध्दट बोलणार नाही, आपले मत ??

दोष त्यालाच का??

प्रणव, अतिशय हुशार, सोज्वळ, सुसंस्कृत घरात वाढलेला मुलगा. कधी कुणाला उध्दट बोलणार नाही, आपले मत शांतपणे समोरच्या व्यक्तीला समजावणारा, कधी कुणाशीच कसलेच वाद-विवाद न घालणारा.. एकंदरित कधीच कुणाच्या वाकड्यात जायचा प्रयत्न न करणारा असा हा प्रणव. आजपर्यंत कोणत्याही मुलीकडे डोळेही वर करून त्याने कधी पाहिले नव्हते. एखाद्या मुलीकडे पाहिलेच नव्हते तर एखादी मुलगी त्याला आवडणे वगैरे शक्यच नाही. घरचे नेहमी त्याला चिडवायचे की याला एकही मैत्रीण नाही. पण याचा अर्थ आपण नामर्द नि घळे, असं त्याला कधीच वाटायचं नाही.

तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला पुण्यातल्या जीपीपीमध्ये शिकत होता. प्रत्येकच वर्षी स्कॉलरशीप घेत तो पुढे शिकत होता. वर्गात पहिला येणारा, सर्वात हँडसम, शांत, अबोल .. कधी कोणत्याच मित्रांच्या घोळक्यात न दिसणारा, असा हा प्रणव सगळ्याच मुलींना फार आवडायचा. प्रत्येकीचं असं स्वप्नं असायचं की एकदा तरी याच्याशी बोलावं. पण तो मात्रं कधी कोणत्याच मुलीशी स्वतःहून बोलला नाही. तसा तो लाजरा नव्हता पण इतर मुलांसारखं फ्लर्टिंगही त्याला जमत नव्हतं.

कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून शिवानीलाही प्रणव खूप आवडायचा. शिवानी तशी फारच बोलकी, डॅशिंग गर्ल होती. एखादी गोष्ट आवडली की ती जीव ओतून, जीवाचा आटापिटा करून ती गोष्ट मिळवतच असे. स्वतःवर जरा जास्तंच विश्वास असलेली शिवानी अगदी वेड्यासारखी प्रणववर प्रेम करत होती. सतत त्याला कॅंटीन, लायब्ररी, प्रॅक्टिकल रूम सगळीकडे ती त्याला फॉलो करायची. इतर मुलं प्रणवला तिच्याबद्दल सांगायचे पण त्याने कधीच तिच्याकडे पाहिलेही नाही.

आता शेवटचे वर्ष असताना तिने मनाशी ठरवलं की आता हा असा लपंडाव, मागे पळणं बंद. आता सरळ त्याला प्रपोज करायचा. तसेच, ती अतिशय सुंदर मुलगी होती. नुसतीच सुंदर नाहीतर तेवढीच सेक्सीही. प्रत्येक मुलगा तिच्या मागे आणि ती मात्र प्रणवरवर फिदा होती.

प्रणवसारखी तीसुध्दा हुशारच होती आणि तिला यावर पूर्ण विश्वास होता, की प्रणव तिला नाही म्हणणारच नाही. पण एका मैत्रिणीने तिला समजावले,

“मुलांना अशा स्वतःहून प्रपोज करणाऱ्या मुली मुळीच आवडत नाही. म्हणजे, प्रणवसारख्या मुलाला तरी... त्यापेक्षा तू त्याचा नंबर घे, त्याच्याशी स्वतःहून मैत्री कर, त्यापुढे जे होईल ते नॅचरली असेल. आणि मी तुला सांगते, तो स्वतःहून तुला प्रपोज करेल. अशी घाई करू नकोस.”

युक्ती लढवून तिने एकेदिवशी त्याला मेसेज केला. अमुक-अमुक पॉईंट मला समजत नाहीये, प्लीज मला थोडी हेल्प करशील का. असं म्हणत तिने त्याच्याशी बोलायला सुरूवात केली.

सुरूवातील प्रणवला यात काही वावगे वाटले नाही. ज्ञान दिल्याने वाढते अशा विचारांचा तो होता. तो वेळ-काळ कशाचा विचार न करता तिला हवी तशी अभ्यासात मदत करत होता. सुरूवातीचे काही दिवस सगळे कसे विषयाला धरून चालले होते. फक्त आणि फक्त अभ्यास. पण याच निमित्ताने त्यांचे भेटणे वाढले होते. प्रणव काय तिच्याकडे आकर्षिला वगैरे जात नव्हता, पण त्या दोघांमध्ये गोड मैत्री होत होती. दोघेही एकमेकांच्या घरी येत जात असे, त्यांच्या घरच्यांच्याही एकमेकांशी ओळखी झाल्या होत्या. त्यामुळे शिवानी कधी-कधी रात्रीही प्रणवच्या घरी थांबत असे.

प्रणवला आता तिची इतकी सवय झाली होती की ती त्याला त्याच्या मित्रांसारखी जवळची वाटू लागली होती, त्यामुळे तोही त्याचे सगळे प्रॉब्लेम्स, सुख-दुख तिच्याशी शेअर करायचा. पण त्याला कधीही शिवानीविषयी मैत्री सोडून वेगळे विचार मनात आले नाही.

एके दिवशी लायब्ररीमध्ये शिवानी त्याला म्हणालीच, “तू एवढा हँडसम आहेस, हुशार आहेस, तुला गर्लफ्रेंड तर असेल...”

त्यावर तो हसत म्हणाला, “छे.., मला आणि गर्लफ्रेंड. तू पहिली मुलगी असशील जिच्यासोबत मी पहिल्यांदा एवढा बोलतोय, तिच्यासोबत एवढा फिरतोय... गर्लफ्रेंड वगैरे हे असल्या फंद्यात मी नाही पडलो कधी...”

त्याने तिला खास म्हणून संबोधल्यामुळे ती आणखीनच आनंदी झाली.

“म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी तुझी गर्लफ्रेंड...” शिवानी बावळटासारखं बोलली.

पण दुसऱ्याच क्षणाला तिला समजलं की आपण काय बोलून गेलोय, पण त्यावर प्रणव हसला, “काही पण काय..., असं कधी म्हटलो मी...?”

त्याचं हे विचित्रं उत्तर ऐकून तर शिवानीला स्वतःचा खूप राग आला...

 पण त्यावर ती लगेच म्हणाली, “काय पण काय म्हणजे मी तुझी गर्लफ्रेंड होऊ शकत नाही....?”

तिने त्याला प्रश्न केला.

“ए, वेडी आहेस का. मला नाही असल्या गोष्टीत पडायचं. माझा अभ्यास भला नि मी भला. नेक्स्ट मन्थमध्ये चांगल्या कंपनीत प्लेसमेंट झाली की मला सरळमार्गी माझं जीवन जगायचंय.”

“किती वेडा आहेस रे तू, किती मुली तुझ्या मागे आहेत आणि तू मात्रं अजून कोणत्या मुलीकडे पाहिलंही नाहीस, असा कसा रे तू...?”,

“हे बघ, मी कॉलेजमध्ये फक्त आणि फक्त शिकायला आलोय, हे चार वर्षापूर्वीही माझ्या मनात सेट होतं आणि आजही आहे. मुळात गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड हे रिलेशनच मला आवडत नाही, त्यापेक्षा ना मित्रं मैत्रीणीचं नातं आवडतं मला..आणि या कॉलेजमध्ये अशी कुणी मुलगी नाही जिला मी माझी मैत्रीणी मानू शकेल...”

शिवानीला चांगलाच पॉईंट सापडला, ती लगेच म्हणाली, “मी आहे की तुझी मैत्रीण.” तिने लगेच हात पुढे केला आणि म्हणाली, “मी फ्रेंडच आहे ना...?”

त्याला तिचा हा मनमोकळेपणा आवडला, तशी ती मुलगी ठिक होती. कधी ती इतर मुलींसारखी वाय्यतपणा करायची नाही. अभ्यासातही हुशार होती.

प्रणव हसत म्हणाला, “ओके.” त्यानेही तिच्या हातात हात दिला...

आणि फायनली त्यांच्यामध्ये गोड मैत्री सुरू झाली...

मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी होतंय याची शिवानी वाट पाहत होती.

पण प्रणव एवढा प्रामाणिक मुलगा होता ज्याने कधी चुकूनही या मैत्रीचा गैरफायदा घेतला नाही. अशा खूप वेळा आल्या जेव्हा तो सहजपणे शिवानीसोबत प्रेमसंबंध करू शकला असता, पण त्याने कधीच असे वाईट पाऊल उचलले नाही.

याचाच शिवानीला राग येत होता. ती सारखं सारखं त्याला त्यांच्यामध्ये वाढत चाललेली मैत्री नोटीस करून देत होती. रोज शिवानी प्रणवच्या घरी येत-जात असे, काही कारण नसताना ती अभ्यासाच्या नावाने तास-न तास त्याच्यासोबत वेळ घालवायची.

यामध्ये पूर्ण वर्षं गेलं. दोघांना चांगल्या कंपनीत नोकरी लागली. आता फक्त फायनल एक्झाम बाकी होती.

सेंड ऑफच्या दिवशी त्या क्लासमध्ये ऑलमोस्ट सर्वांच्या जोड्या ठरल्या होत्या. तर काहीजण लास्ट डेला आपल्या क्रशला प्रपोज वगैरे करणार होते.

पण इकडे प्रणव मात्रं नेहमीसारखाच शिवानीशी वागत होता, नेहमीसारखे ते दोघं कॉलेजला आले. निरोपसमारंभ दोघेही आनंदाने एन्जॉय करत होते..

पूर्ण क्लास खाली हॉलमध्ये असताना शिवानीने प्रणवला थांबवून घेतले.

शिवानीचे वेगळे रूप पाहून तो हसत म्हणाला, “काय झालंय?, एवढी टेन्शनमध्ये का वाटत आहेस..?”

ती अस्वस्थपणे म्हणाली, “पुढे काय प्रणव..?”

प्रणवला काही समजले नाही, “काय पुढे...?”

शिवानी खूपच अस्वस्थपणे त्याला चिकटली आणि म्हणाली, “तुला माझ्याविषयी काही वाटत नाही...?”

प्रणव तिला दूर करत म्हणाला, “काही नाही वाटत म्हणजे...?”

“झाली एक वर्ष आपण सोबत आहोत ना, तुला मी फक्त तुझी मैत्रीण वाटते का...?”

“हो, का... असं का विचारत आहेस तू..?”

ती रडत म्हणाली, “मला वाटलं तुला काहीतरी वेगळं वाटत असेल.., पण मी बावळट आहे, मला काही कळत नाही, चुकलं माझं..”

ती तिथून निघाली...,

पण प्रणवला ती काय बोलतेय काही कळत नव्हतं.. तो तिला थांबवत म्हणाला, “तू रडतेयस का., काय झालंय, सांगशील का...”

ती रागाने तिथून निघून गेली..

प्रणव संभ्रमित चेहऱ्याने उभा होता.

त्या दिवशी तोही अस्वस्थच होता. त्याने शिवानीला फोन केला पण तिचं म्हणणं होतं, तुला कळणार नाही....

प्रणवला खरंच काही कळत नव्हतं...,

फायनल एक्झाम झाल्यावर वर्गातील सर्वांनी एका मित्राच्या घरी गेट-टूगेदर ठेवले आणि त्यात पुन्हा या दोघांची भेट झाली.

यावेळी मात्रं प्रणवने तिला विचारले, “काय झाले आहे, माझ्यावर का चिडली आहेस तू....?”

ती त्याच्यावर त्याचप्रकारे खेकसत म्हणाली, “कारण तुला मैत्री आणि प्रेम यातला फरकच कळत नाही...”

प्रेम हा शब्द ऐकून प्रणव थबकला, तो इकडे तिकडे पाहू लागला...

“हे बघ शिवानी, असं काहीही नाहीये..., तुला...”

“काय तुला..., तुला माझ्याविषयी काहीच वाटत नाही का...?”

“काय वाटत नाही का म्हणजे काय वाटलं पाहिजे मला...” तो वैतागत म्हणाला....

ती रागाने हाताच्या मुठी आवळू लागली...,

तो तिला समजावत म्हणाला, “तू काहीतरी वेगळंच मनात भरून घेतलंयस..., आपण दोघं मित्रं आहोत अगं..., प्रेम वगैरे असं काही नाही...”

ती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, “खरं..., मग का दोन-दोन तास आपण तुझ्या बेडरूममध्ये उगाचच ते शिकलेलेच पॉईंट्स रिवाईज करत बसायचो, का लायब्ररीमध्ये, गार्डनमध्ये, एकांतात वेळ घालवायचो.. एक वर्ष आपण जे एकमेकांना शेअर केलंय ते प्रेम नाही का...?”

आता प्रणव वैतागत म्हणाला, “वेडी आहेस का तू,...?”

“मी नाही तू आहे.. आजपर्यंत कोणत्या मुलीकडे न पाहणारा तू, तू माझ्यासोबत एवढं सारं काही शेअर केलं आहेस, अरे एका ताटात जेवलेलो आहे आपण... मग याला प्रेम नाही समजावं का....?”

प्रणव चिडत म्हणाला, “तू मला गृहीत का धरत आहेस..., प्लीज..” तो डोक्याला हात लावत म्हणाला.

शिवानीने इकडे तिकडे पाहिले आणि रागाने त्याच्याकडे पाहत एकदमच तिचे ओठ तिने त्याच्या ओठांवर टेकवले...

काही क्षण प्रणव बधीर झाला पण तिच्या ह्या अशा वागण्याने प्रणवने लगेच तिला दूर ढकलले पण ती मात्र रागत होती ती पुन्हा त्याला बिलगली आणि म्हणाली, “आय लव्ह यू....

प्रणव पुन्हा तिला दूर करत म्हणाला, “आय एम सॉरी शिवानी..., तू आपली मैत्री सगळी दुषित करून टाकली आहेस...”

तो असं म्हणून निघाला पण शिवानीने पुन्हा त्याला आत ओढले आणि दरवाजा बंद केला...

प्रणव तिला समजावत होता, “शिवानी हे चुकीचे आहे...”

पण तिने त्याला तिच्या बाहूपाशात ओढले आणि रडत म्हणाली, “आय लव्ह यू प्रणव...”

प्रणव अस्वस्थ होत म्हणाला, “मी नाही करत पण तुझ्यावर प्रेम.” त्याने तिला बेडवर ढकललं आणि तिथून निघून जाऊ लागला...

पण शिवानी पुन्हा दारापाशी आली आणि त्याच्या शर्टाचे बटन्स काढत म्हणाली, “मला काही माहित नाही, तू माझ्यावर प्रेम करतो एवढंच मला माहित आहे...”

ती बटणं काढत होती आणि तो मात्रं तिला विरोध करत होता...,

दहा-पंधरा मिनिटे विरोध करून शेवटी व्हायचे तेच झाले..., दोघेही एक झाले, एकमेकांमध्ये सामावून गेले...,

आणि नाईलाजाने, चुकीने, अपघाताने त्याच्या हातून चूक झाली...,

आणि असे पुढे सहा महिने ती चूक होत राहिली...

प्रणव वारंवार तिला हे चूक आहे म्हणून सांगत होता, पण ती काही ऐकत नव्हती.

एक वर्षाने तिने लग्नाचा विषय काढला.

त्यावर त्याने स्पष्टपणे नकार दिला.

पण आत्ता मात्रं ती त्याच्यावरच उलटली, “म्हणजे तू मला फसवलंस...??”

तिच्या ह्या उलट्या बोलण्यावर तो गोंधळून म्हणाला,” मी तुला फसवलं नाहीये शिवानी, मी तुला आधीपासून सांगत आलोय, माझं प्रेम नाहीये तुझ्यावर,मी लग्न नाही करणार तुझ्याशी...”

“म्हणजे तू माझा वापर केलास आणि आता हे बोलत आहेस.”

प्रणव खूप आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. त्याला काय बोलावे सुचत नव्हते.

हे सगळं प्रकरणं दोघांच्या घरापर्यंत गेलं. प्रणवच्या नकाराने दोघांच्या घरचे त्यालाच बोलू लागले.

पण प्रणवने ओरडून त्याचं मत सांगायचा प्रयत्न केला.

यावर सर्वांनी त्याच्यावरच घान आरोप केले. आणि शिवानीला मात्रं सर्वजण सहानुभूती दाखवत होते..,

शिवानीच्या घरच्यांनी हे प्रकरण पोलिस चौकीत नेलं. आणि प्रणवने शिवानीवर सहा महिने बलात्कार केला असा गुन्हा त्याच्यावर लावण्यात आला.

शिवानीच्या घरचेही सुशिक्षित असूनही त्यांची मानसिकता अशीच होती. मुलीची चूक त्यांना दिसत नव्हती आणि जे झालं त्यात तिचीच चूक आहे हे तो सांगूनही कुणी त्याचे ऐकत नव्हते.

शेवटी मुलीशी लग्न करा किंवा अमुक-अमुक पैसे द्या., असा पोलिंसनाची सौदा ठरला आणि प्रणवने पैसे द्यायचे ठरवले, कारण शिवानीसारख्या मुलीसोबत तो एक क्षणही जगू इच्छित नव्हता. त्यात शिवानीच्या घरच्यांसमोर पोलिसांनी ज्याप्रकारे त्याला वागणूक दिली, त्या वागणुकीनेच तो पूर्णपणे संपला, खचला.

त्याच्यावर बलात्कार केल्याचा शिक्का लागला तो लागला, त्यात काही दिवस जेलमध्ये काढावे लागले....समाजामध्ये सगळेजण त्याच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहू लागले. आख्ख्या कॉलेजमध्ये ही गोष्ट पसरली.

कुणाचा यावर विश्वास बसत नव्हता पण गुन्हेगार हा छुपाच असतो आणि या अशा विचित्र प्रवृत्तीचे लोक चेहऱ्यावरून कळत नाहीत असं म्हणत सर्वजण त्याच्याबद्दल वाईट साईट बोलू लागले...

अगदी त्याच्या घरच्यांचंही हेच मत होते, तिच्याशी शरीरसंबंध ठेवताना आपण तिच्याशी लग्न करणार आहोत की नाही याचा विचार करायचा होता., पण त्यांना कुठे माहिती की हा तर त्याच्यावरच झालेला बलात्कार होता.

त्याची नोकरी गेली. आता दुसरी नोकरी लवकर बघता येणं शक्य नव्हतं, आणि मिळेल याची शाश्वतीही नव्हती. सात-आठ महिने तो नैराश्यात होता. शेवटी जगण्याला कंटाळून एक दिवस त्याने आत्महत्या केली.

त्याचदिवशी त्याच्या सो कॉल्ड गर्लफ्रेंडने त्याच्या फोटोसहित “Miss you dear” म्हणत स्टेटस ठेवले.

ती सुटली, तिचं नंतर चांगल्या मुलाशी लग्नं झालं. त्याने फसवलं मला, तो थोडा डोक्यात कमी होता, त्यामध्येच त्याने हे सगळं केलं, म्हणूनच त्याने जीव दिला... असं सांगून ती नामानिराळी झाली.....,

आणि मेल्यानंतरही लोक दोष त्यालाच देत होते. झेपत नव्हतं तर गर्लफ्रेंड करायची नव्हती, मग ही अशी जीव द्यायची वेळ आली नसती, असं म्हणत काहीजण त्याच्या परिस्थितीवर हसतही होते.

कथा समाप्त.......

सात-आठ महिने मुलीच्या समंतीने कधी बलात्कार होतो का?.... मुलाला स्वतःकडे आकर्षित करून त्याच्याकडून ते कृत्य घडवून घेणं हा तिच्यावर होणार अत्याचार असतो की त्याच्यावर?

तो नाही म्हणत असताना, नकार देत असताना तिने त्याच्याशी लगट केली पण शेवटी बलात्काराचा शिक्का त्याच्या माथी बसला.... हे कितपत योग्य आहे... स्त्री वादीचा नारा फिरवणाऱ्या या देशात अशा पुरूषांचाही नाहक बळी जातो याकडे कुणीच लक्ष देत नाही आहे.

सगळ्या स्त्रिया सारख्या नसतात तसेच सगळे पुरूषही सारखे नसतात... पण अशा प्रकरणात नेहमी मुलालाच का बरं दोष दिला जातो... जगात असे कित्येक बलात्कार हे झालेले नाही तर ओढवून घेतलेले असतात....,

प्रत्येक वेळेस मुलांना दोष देणं कितपत योग्य आहे...,

मुली स्वतःच्या आवडीने बॉयफ्रेंड निवडतात, समोरचा मुलगा आपल्याशी लग्न करणार नाही हे माहित असून त्यांच्यासोबत सगळं शेअर करतात,. मग शेवटी स्वतःचा इगो दुखावा नाही म्हणून किंवा त्या मुलाला अद्दल घडवायची म्हणून हे असे उलटे डाव आखतात. कारण त्यांना माहित असते, एकदा का मुलाने त्या मर्यादा ओलांडल्या की त्याच्यावर सहजणे बलात्काराचा शिक्का लावता येतो.

प्रत्येक वेळी पुरूष चुकीचे नसतात..., नाण्याला दोन बाजू असतात आणि अशा प्रकरणात शिक्षा ही दोघांना झाली पाहिजे...

फक्त त्यालाच दोष देणं थांबवलं पाहिजे...

*****

यावर तुमचं मत नक्की कळवा.

कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व!