कुछ ना कहो (भाग १८) नवी कोरी रंगतदार कथा

कुछ ना कहो


कुछ ना कहो ( भाग १८)

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


पद्मनाभची बदली झाल्यामुळे आव्वा आणि वीणा दोघींची जबाबदारी वीमावर येऊन पडली. पण वीमा बिना तक्रार सारे काही करत होती. अव्वाच्या तब्येतीमुळे आव्वाचे सोवळे पण आता कमी झाले होते. घरातले सारे व्यवहार, आणणे करणे सारे काही वीमालाच बघावे लागत होते, तरी आव्वाने पैसे वीमाच्या हाती दिले नव्हते. जेवढे लागतील तेवढेच ती वीमाला काढून देत होती.
वीणा चिटको दहावीचा निकाल लागला. ती बोर्डात आली. तरीही तिने विज्ञान शाखेत प्रवेश न घेता कला शाखेत प्रवेश घेतला. रामच्या यशलाही चांगले मार्क मिळाले व त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. त्यामुळे यश आता पूर्ण व्यस्त राहू लागला. वीणा मात्र कला शाखेत प्रवेश घेतल्यामुळे थोडी रिकामी होती. तिने तो वेळ सार्थकी लावायचे ठरवले आणि तिने दुसरी परदेशी भाषा शिकण्यासाठी जर्मन भाषेच्या क्लासला प्रवेश घेतला. दोघांची काॅलेज व्यवस्थित सुरू होती.

पद्मनाभ दर शनिवारी बेळगावला येत होता. त्याची आणि रामची भेट होत होती. तो रामच्या घरी जाई रेवती, यश, रामची आई सगळ्यांची भेट घेई. पद्मनाभ आला की वीणा खूश होत असे कारण पद्मनाभच्या आवडीचे काहीतरी निराळे पदार्थ वीमा बनवत असे. आव्वा ही खुश असे. वीमा ची खुशी ती गाणे गुणगुण लागली की कळत असे.

असे होता होता वर्षे सरली. वीणा आता मानसशास्त्र विषय घेऊन एम. फील. करत होती. यश एम. बी. बी. एस., एम. डी. होऊन त्याने स्वतःचा दवाखाना सुरू केला होता. तो अस्थीरोगतज्ञ झाला होता. त्यामुळे अव्वाच्या गुडघेदुखीसाठी आता तोच औषधोपचार करत होता. राम आणि रेवतीच्या मनात आता त्याच्या लग्नाचे विचार येत होते. एक दिवस सामने विषय काढला. " यश तुझे शिक्षण पूर्ण झाले आहे, तुझा दवाखाना ही सुरू झाला आहे. आता तुझे लग्न व्हावे असे आम्हा दोघांना वाटते आहे. मग मुली बघायला सुरुवात करायची का? " रामने यशला विचारले, पण यश चुळबूळ करू लागला. कसे बोलावे त्याला कळत नव्हते. सामना ते ओळखले. " हे बघ तू एखादी मुलगी बघितली असलीस तरी आमची हरकत नाही. पण कमीतकमी ती आपल्यातली असावी एवढेच वाटते. " राम म्हणाला.
" बाबा माझ्या मनात आहे, पण तिच्या मनात काय आहे कळत नाही. मी अजून तिच्याशी बोललो नाही. " यश बोलत होता आणि रेवतीचा चेहरा पडला. रामने ते पाहिले आणि म्हणाला, " असू दे रेवती तो सुखी होणार असेल तर त्याने त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायला हवे. " रामने रेवतीला सांगितले. " कोण आहे ती मुलगी? सांग आता. हवे तर आम्ही बोलतो तिच्या आई वडीलांशी. " रामने पुन्हा यशला विचारले.
" बाबा तुम्ही ओळखता तिला. वीणा, मला वीणाशी लग्न करायची इच्छा आहे. " हे ऐकल्यावर राम आणि रेवती उडाली, त्यांच्याही मनात तेच होते. ते ऐकून त्यांना खूप आनंद झाला.
" पण बाबा ती हो म्हणेल की नाही याची भिती वाटते. शिवाय पद्मा काकांची पण भिती वाटते. " यश म्हणाला.
" अरे भिती कसली, प्रेम आहे ना तुझे तिच्यावर? मग बिनधास्त विचार पद्माला. " राम.
" नको आई बाबा तुम्हीच विचारा ना? मला नाही जमणार. " यश लाजून खोलीत पळाला. राम पद्मनाभ कोल्हापूरहून येण्याची वाट पाहू लागला. तोपर्यंत रेवती ने वीणाशी बोलावे असे ठरले. रेवती वीणाशी भेटायला तिच्या क्लासजवळ गेली आणि
गप्पा मारायला तिला जवळच्या देवळात घेऊन गेली. " आम्ही यशसाठी मुलगी बघायची म्हणतो आहे. तुला माहिती आहे का ग त्याला कशी मुलगी हवी आहे?. तुम्ही बोलताना नेहमी म्हणून विचारले." रेवती वीणाला म्हणाली.
\" नाही ग काकी, आम्ही या विषयावर कधी बोलली नाही. पण छान आहे, आता मला चिडवायला आणखी एक विषय मिळाला. आता बघतेच त्याच्याकडे. " वीणा ने सांगितले.
" आणि तुझा काय विचार आहे. तुझेही वय झाले की लग्न करायचे. " रेवती ने वीणाला छेडले.
" तुला आव्वाने पाठवले ना माझ्याशी बोलायला. सारखी मागे लागलीय लग्न कर म्हणून. पण मग मला सांग काकू, बाबांचे काय? मला बाबांची काळजी वाटते. माझ्या शिवाय त्यांना दुसरे कोणीही नाही. त्यामुळे मी लगेच लग्नाचा विचार नाही करत आहे. " वीणानी पटकन सांगून टाकले. रेवती शांत बसली. पण तिला वीणाच्या प्रश्नाचे उत्तर माहिती होते फक्त ते तिने वीणाला सांगायचे टाळले. रामच हे काम चोख करतील याची तिला खात्री होती. तिने मुद्दामच सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी वीणाला जेवायला बोलावले. रविवारी वीणा येणार म्हंटल्यावर यश खूश झाला. पण राम आणि रेवतीने त्याला थोडावेळ बाहेर जायला लावले. रविवारी वीणा आली आणि आल्या बरोबर यशची चौकशी सुरू केली. रामने तिला बसवले आणि म्हणाला, " वीणा तुला खरचं असे वाटते तुझ्या लग्नानंतर पद्मा एकटा पडेल? अग आम्ही आहोतच की? " राम मुद्दामच म्हणाला.
" ते आहेच हो काका पण, बाबांजवळ सारखे कोणीतरी हवे ना. आत्ताच त्यांना बी. पी.शुगर दोन्ही आहे. शिवाय माझ्या शिवाय त्यांना दुसरे कोण आहे? " वीणा म्हणाली.

" आहे " राम.
" काय? " वीणाला प्रचंड धक्का बसला.
" हे बघ अशी नको बघू माझ्याकडे. मी काय सांगतो ते शांतपणे ऐक. अगदी लहान म्हणजे नववी दहावीला असल्यापासून पद्माचे एका मुलीवर प्रेम होते. पण तिला काही माहिती नव्हते. तिचे लग्न तिच्या आईने लवकर केले, त्यावेळी पद्मा शिक्षण घेण्यासाठी शहरात आला होता. पुढे कितीतरी वर्षे तिच्याबद्दल त्याला काही समजले नाही. तो लग्न करणार नव्हताच पण आव्वा आप्पासाठी त्याने लग्न केले. आणि त्याचे पुढे काय झाले तुला माहिती आहेच. " राम सांगत होता.
" पुढे बेळगावला आल्यावर ती एक दिवस अचानक त्याच्या समोर आली. ती तिचे सगळे काही गमावून बसली होती. पण पद्माचे आणि तुझ्या आईचे लग्न झाले होते त्यामुळे तो काहीच करू शकला नाही. आणि लग्न झाले नसते तरी काही करू शकला असता की माहिती नाही. ती आपल्या जातीची नाही. तिची आई धुणीभांडी करायची. आणि तुझी आव्वा आणि आप्पा अतिशय कर्मठ होते. त्यामुळे हे कधी झाले नसते. पण आता तू त्या दोघांना एकत्र आणू शकतेस. " राम वीणाला म्हणाला.
" पण म्हणजे बाबांनी आईला.. " वीणा म्हणणार इतक्यात राम म्हणाला, " नाही तुझ्या बाबांनी तुझ्या आईला फसवले नाही किंवा तिच्याशी प्रतारणा ही केली नाही. तो काय म्हणायचा माहिती आहे, ते प्रेम आहे, आकर्षण नाही. त्याचे प्रेम सच्चे आहे. ते वासनेच्या आधीन नाही. " हे ऐकल्यावर वीणाच्या डोळ्यात पाणी आले. " मी नक्की त्या दोघांना एकत्र आणीन. पण कोण आहे ती भाग्यवान? " वीणा ने विचारले.
" बघ आता आणखीन एक धक्का बसेल तुला. तू कल्पनेत ही असा विचार केला नसशील. " राम.
" सांगा ना काका लवकर. मी खूप अधीर झाले आहे. " वीणा.
" वीणा " राम.
" कोण? " वीणा.
" तुझी वीमा, वीणा मावशी. " राम.
वीणा आता फक्त बेशुद्ध पडायची बाकी होती.
" तिला हे माहीत आहे. " वीणा.
" नाही. तिला काहीच माहिती नाही. ती एक गाणे म्हणायची. ते गाणे पद्माला खूप आवडायचे. ती सावळी होती, दिसायला चांगली होती, यापेक्षा ही ती माणूस म्हणून खूप चांगली होती. आहे आणि याचा अनुभव तुला ही आहे. " राम म्हणाला.
" काका मी तुम्हांला वचन देते, मी त्या दोघांना एकत्र आणेन . पण तुम्ही मला मदत कराल ना? "
राम वीणाकडे बघून समाधानाने हसला.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all