कुछ ना कहो (भाग १७) नवी कोरी रंगतदार कथा

कुछ ना कहो


कुछ ना कहो ( भाग १७)

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


तिलोत्तमाला जाऊन वर्ष झाले होते. तिचे वर्ष श्राद्ध झाले. तिच्या आठवणीने वीणा बेचैन झाली होती. जगात आई शिवाय काहीच नाही. वीमा वीणाला आई इतकीच माया देत होती. तरीपण आईची उणीव होतीच. पद्मनाभ वीणाला खूप जपत होता. आव्वाचेही पूर्ण लक्ष वीणावर होते. पाचवीची शेवटची वार्षिक परीक्षा सुरू होती. आधीच गणिताचा पेपर आणि शाळेतून येताना वीणा रडतच घरी आली. तिच्या एक शिक्षिका तिला घरी सोडायला आल्या होत्या. वीणाच्या कमरेला एक बेडशीट वजा कापड गुंडाळले होते. वीमाला चटकन काय झाले असेल ते लक्षात आले. ती वीणाला घेऊन आत गेली. तिचे सगळे आवरायला लागली. तोपर्यंत आव्वाने वीणाच्या शिक्षिकेला सारे काही विचारले. त्यांना आधी वाटले तिचे कपडे फाटले असतील किंवा तिला खेळताना कुठेतरी वेडेवाकडे लागले असेल. पण तसे काही नव्हते. वीणा मोठी झाली होती. तिला नहाण आले होते. वीमाने तिला खूप समजावून सांगितले, आव्वाने ही सांगितले. " हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविभाज्य आणि महत्वाचा भाग आहे. हे सगळे नैसर्गिक आहे. ह्यावेळी स्त्रीच्या शरिरात बदल होत असतात. तिची सर्वांगीण वाढ होत असते. प्रत्येक स्त्री यातून जात असते. घाबरायचे नाही. फक्त आता सांभाळून रहायचे. " आव्वाने सांगितले. अशावेळी मुलींना आईचा खूप आधार वाटत असतो. तसाच तिला आव्वापेक्षा जास्त वीमाचा आधार वाटला. कारण वीमा तिला समजून घेत होती, तर आव्वा कडक शिस्तीची होती. आव्वाचे सोवळे ओवळे कडक होते. पद्मनाभला संध्याकाळी घरी आल्यावर समजले. पण काय कसे बोलावे हे त्याला लक्षात येत नव्हते. तिलोत्तमा असती तर तिने वीणाला सांभाळून घेतले असते. त्याची ही चलबिचल आव्वाच्या लक्षात आली. " वीमा हुशार आहे. तिने घेतले सावरून वीणाला. आणि सांगितले ही आहे सगळे. फक्त आता कार्यक्रम करायला हवा. पाच सवाष्णीकडून तिची ओटी भरायला हवी. मामा साडी नेसवतो. मामा म्हणून कोण येणार? " आव्वा म्हणाली.
" बघू. मी घेतो साडी रामला पुढे करायला सांगतो. पण कार्यक्रम कधी करायचा? " पद्मनाभने विचारले.
" आता चार दिवस तरी काही होणार नाही. पाचव्या दिवशी करू. गोडाधोडाचे जेवायला केले पाहिजे. रेवती ला मदतीला बोलवावे लागेल. एवढा दहा बारा जणांचा स्वयंपाक माझ्याकडून होत नाही आता. " आव्वा म्हणाली.
" अग वीमा आहे ना? तिला घे ना मदतीला. एरवी ती करतेच की. " पद्मनाभ म्हणाला.
" सोवळ्यात असतो स्वयंपाक. देवीची पूजा नैवेद्य असतो. नाही चालणार. " आव्वा.
" आव्वा राहू देत आता हे सोवळे. ती आपल्या घरातलीच एक आहे. ती आपल्या बरोबरच राहते. आपलीच आहे. " पद्मनाभने आव्वाला समजावण्याचा प्रयत्न केला.

पाचव्या दिवशी आव्वाने तेल लावून वीणाला नाहयला घातले. तिला साडी नेसलेली. सोवळ्यात सगळा स्वयंपाक केला. रेवती मदतीला होतीच. वीमाही वरचे काम करत होती. नैवैद्य झाल्यावर वीणाला पाटावर बसवले. पाटाभोवती रांगोळी काढली होती. तिला पाच सव्वाष्णींनी ओवाळले. केसात गजरे माळले. आव्वाच्या वतीने रेवतीने ओटी भरली. साडी दिली. शिवाय मामाची म्हणून रेवतीने ही तिला साडी आणली. वीमा हे सगळे भरल्या डोळ्याने पहात होती. वीणाचे होणारे कौतुक बघून तिला आनंद होत होता. तिच्यातले वात्सल्य जागे झाले होते. तिने ही वीणासाठी खास काहीतरी आणले होते पण ते तिला सगळ्यांसमोर द्यायचे नव्हते. सगळ्यांची जेवणे आवरली. सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. आव्वा दमून जाऊन जरा आडव्या झाल्या. वीमाने आणि रेवतीने मिळून मागचा सगळा निरानिपटा केला. संध्याकाळी वीमा, आव्वा आणि वीणा तिघीच घरात होत्या. वीमाने वीणाला तिने आणलेले पैंजण दिले. वीणाने खूश होऊन वीमाला मिठीच मारली. वीणाला पैंजण खूप आवडत होते. पण साडीच घ्यायची असते म्हंटल्यावर कुणी पैंजण घेणार नाही माहिती होते. पैंजण मिळाल्यावर वीणा खूप खूश झाली. आनंदाने नाचायला लागली. आव्वाने एक कटाक्ष वीणाकडे टाकला, ती पटकन थांबली आणि वीमाला बिलगली. पद्मनाभला आल्यावर वीणाने आनंदाने त्याला पैंजण दाखवले. त्याला ही खूप आवडले. " अग एवढे कशाला आणले? किती पैसे खर्च केलेस? " पद्मनाभने विचारले.
" भावनेपेक्षा पैशाला महत्व नसते. मी माझ्या लेकीला घेतले. पैशाचे काय त्यापुढे? " वीमा म्हणाली. पद्मनाभने समाधानाने वीमाकडे बघितले.
पद्मनाभच्या मनातील वीमा विषयीचे प्रेम आणखी दृढ झाले.

… … … … . … … … ..


पद्मनाभची बदली यावेळी आणखी लांब झाली. महाराष्ट्रातील कोल्हापूरला त्याची बदली झाली. वीणाची शाळा चांगली शिवाय मधेच तिची शाळा बदलणे शक्य नव्हते, म्हणून आव्वा, वीणा आणि वीमा बेळगावात राहिल्या. पद्मनाभ नसताना राम रोज येऊन आव्वा आणि वीणाची चौकशी करून जात होता. रेवती ही मधे कधीतरी येऊन आव्वाना भेटून जात होती. आता पद्मनाभला रोज घरी येणे शक्य नव्हते. तरी आठवड्यातून एकदा येण्याचा प्रयत्न करीत होता. वयाप्रमाणे आव्वाच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. गुडघे दुखी, बी. पी. मागे लागले होते. वीमा वीणा आणि आव्वा दोघींनाही बघत होती. वीणा आता दहावीच्या परीक्षेला बसली होती. मन लावून अभ्यास करत होती. तिच्या परीक्षेसाठी पद्मनाभ मुद्दामहून रजा घेऊन घरी राहिला होता. रोज तिला पेपरला सोडायला आणायला जात होता. वीणाची परीक्षा नीट पार पडली, आणि लगेच त्यांना त्यांचे घर बदलावे लागले. आधीचे घर जुने झाले होते. आता त्यांना अनगोळरोडला नवीन घर मिळाले. घरही बर्यापैकी नवीन होते. फक्त लांब होते. राम आणि पद्मनाभने दोघांनी मिळून घरातले सामान हलवले, तरी सामान लावणे वगैरे वीमाने केले. वीणा तिला मदत करत होती. नवीन घरात आल्यावर आव्वाला स्वतंत्र देवघर मिळाले. आणि पूर्वीसारखे देऊळ जवळ नसल्याने तिचे देवळात जाणे बंद झाले. त्यामुळे तिचे चालणे कमी झाले आणि गुडघे जास्तच धरले.

वीणा हुशार होती, पण तिला डाॅक्टर इंजिनिअर होण्यात रस नव्हता. "डाॅक्टर झालेच तर मनोरुग्णांच्या डाॅक्टर होईन" असे ती सारखे म्हणत होती. तिला मानसशास्त्रज्ञ व्हायचे होते. समाज सेवा करायची होती. पैसा मिळवणे हे तिचे उद्दिष्ट नव्हते. ती पद्मनाभ सारखीच पैशाला महत्वाचे समजत नव्हती. रामचा यशही तिच्या बरोबरीचा होता. तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असल्याने दोघांची दहावीची परीक्षा एकदमच होती. त्यालाही डाॅक्टर व्हायची इच्छा होती, पण कोणता डाॅक्टर हे ठरले नव्हते. याची आणि वीणाची मैत्री लहानपणी सारखीच अबाधित होती. पण याच्या मनात मात्र वीणा विषयी प्रेम रूजू पहात होते.


क्रमशः

सौ. हर्षाची प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all