Login

कुछ ना कहो (भाग १६) नवी कोरी रंगतदार कथा

कुछ ना कहो


कुछ ना कहो ( भाग १६)

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


पद्मनाभची बदली बेळगावहून जवळ शहापूरला झाली. त्यामुळे त्याला घरातून तासभर आधी निघावे लागत होते. यायला ही तासाभरापेक्षा जास्त उशीर होई. वीमा आणि आव्वा दोघींनी वीणा आणि तिलोत्तमाची जबाबदारी घेतली होती. वीणाचे सगळे छान होते. वीमा तिचे सगळे लाड पुरवीत होती, तर आव्वा तिचा अभ्यास घेत होती. अव्वाच्या संस्कारात वीमा आणि वीणा दोघी वाढत होत होत्या, मोठ्या होत होत्या. वीणाला आव्वा संस्कृत भाषेतील श्लोक ही शिकवत होती. तिच्या बरोबर वीमा ही शिकण्याचा प्रयत्न करत होती. वीणा मोठी होत होती तर वीमा बदलत होती. वीमात खूप बदल होत होता. तिची बोली भाषा बदलली होती. वागणे, रहाणे बदलले होते. ती आता सुसंस्कृत वाटत होती. हिंदी भाषा बोलू शकत होती. जरूरी पुरते इंग्रजी तिला समजत होते. मराठी, कानडी तिला आधीपासून येत होत्या. त्यामुळे वीणा बरोबर कुठेही जाताना ती बिचकत नव्हती. आता प्रत्येक वेळी पद्मनाभला जायची गरज पडत नव्हती. तिची पालक म्हणून वीमा जाऊ शकत होती.

वीणा चौथीत शिकत होती. ती शिष्यवृत्ती परीक्षेला बसली होती. त्या दिवशी तिची शिष्यवृत्तीची परीक्षा होती. वीमा तिचे आवरत होती.वेणीफणी करत होती. आणि तेवढ्यात तिलोत्तमा उभ्या उभ्या कोसळली. तिचे डोकं तुळईच्या खाली लावलेल्या दगडावर जोरात आपटले. आव्वा मंदीरात गेली होती. वीमाने पटकन कसेतरी तिलोत्तमाला उठून बसवले आणि वीणाला शेजारच्या काकांना बोलवायला पाठवले. वीमा तिलोत्तमाला जागे करण्याचा प्रयत्न करत होती. शेजारचे काका रिक्षा घेऊन आले. वीमा आणि काका तिलोत्तमाला घेऊन दवाखान्यात गेले. तोपर्यंत आव्वा आली पण वीणाची परीक्षा कुठे होती तिला ठाऊक नव्हते. वीणाची परीक्षा द्यायची तयारी होती पण तिला जाता आले नाही. तिलोत्तमाला दवाखान्यात नेले तर डॉक्टरांनी तिला आय. सी. यू. मधे एडमीट करू घेतले आणि "ती सिरियस आहे" असे सांगितले. वीमाने काकांना पद्मनाभला निरोप द्यायला पाठवले आणि स्वतः राम कडे गेली. रामला परिस्थिती सांगून ती घरी गेली. घरी आव्वा आणि वीणा तिची वाट पहात होत्या. वीणाची परीक्षा चुकली म्हणून ती रडत होती. वीमाने तिला समजावून सांगितले. आणि आईची तब्येत बरी नाही हे ही सांगितले. तासाभराने पद्मनाभ दवाखान्यात पोचला. तिलोत्तमा शुध्दीवर येत नव्हती. डाॅक्टरांचे प्रयत्न चालू होते. रात्री जेवणाचा डबा घेऊन वीमा दवाखान्यात निघाली तोपर्यंत राम घरी सांगत आला. तिलोत्तमा हे जग सोडून गेली होती. एवढ्याशा कोवळ्या वीणाला पद्मनाभच्या पदरात टाकून ती कायमची निघून गेली. तिलोत्तमाला घरी आणले. वीणाला ती देवाघरी गेली एवढे समजण्या इतकी ती मोठी होती. तिला घरी आणल्यावर वीणा तिलोत्तमाला मिठी मारून रडू लागली. तिला सावरणे कुणाला शक्य होत नव्हते. सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होते. तिलोत्तमाचे आई वडील आले आणि त्यांनी आरडाओरडा करत रडून कहर केला. तिलोत्तमाचा सर्व सवाष्णीचा मान करण्यात आला. हिरवी साडी, हिरव्या बांगड्या घालून कपाळावर मळवट भरला. खणा नारळाची तिची ओटी भरली मगच तिला पुढच्या विधीसाठी नेण्यात आले. तिला उचलताना आव्वाला अश्रू आवरले नाहीत. तिने प्रेमाने वीणाला जवळ घेतले आणि तिला मिठीत घेऊन ती खूप रडली. तिलोत्तमाचे अंतिम दर्शन घ्यायला येणारी प्रत्येक स्त्री एकच वाक्य बोलत होती " भाग्यवान आहे बाई, अहेवपणी मरण आले. " पण किती आयुष्य जगली ती? कशी जगली? आता पुढे तिच्या मुलीचे काय होईल हा विचार कुणाच्याच मनात आला नसेल का? या विचारांनी आव्वा आणि वीमा मात्र बेचैन झाल्या होत्या. पद्मनाभला काही सुचत नव्हते. त्याला कितीही राग असला तरी ती त्याची बायको होती, सहधर्मचारिणी होती. तो आतल्या आत रडत होता. तिची प्रत्येक आठवण त्याला त्रास देत होती. तिचे सर्व क्रियाकर्म आवरुन पद्मनाभ घरी आला. प्रत्येक वेळी राम त्याच्या बरोबर होता. आताही तो अंघोळ वगैरे आटोपून रेवती ला घेऊन पद्मनाभकडे आला. रेवती वीणाला जवळ घेऊन बसली होती. पद्मनाभची अंघोळ वगैरे झाल्यावर वीणा त्याच्या जवळ गेली आणि त्याला बिलगून बसली. दोघेही मूकपणे एकमेकाच्या जवळ बसून होते.


तिलोत्तमा गेली आणि वीणा आणखीन अबोल झाली. अशी ही बाहेर ती कुणाशी जास्त बोलत नव्हती,मिसळत नव्हती. यश सोडला तर फारसे कोणी तिला मित्र मैत्रिणी देखील नव्हते. तिलोत्तमा गेल्यानंतर तिच्या आई आप्पांनी पद्मनाभ आणि वीणाच्या नावाने थोडी रक्कम देऊ केली. पण पद्मनाभने ती साभार परत केली. तो त्यांना म्हणाला, " जिला याची गरज आहे असे वाटत होते, जिच्यासाठी ह्याला फार महत्त्व होते, ती तर गेली. माझ्या लेखी ह्याला फार महत्त्व नाही. आमची आहे ती मीठ भाकर आम्हाला पुरेशी आहे. आम्हाला हे वीष नको. " आणि त्याने पैसे नाकारले. "वीणासाठी , तिच्या लग्नासाठी म्हणून तरी आमच्याकडून घ्या " असे ते दोघेही विनंती करत होते. पण तो नाही म्हणाला. तिलोत्तमानंतर तसेही त्यांचे काही संबंध राहतील असे त्याला वाटत नव्हते. तिलोत्तमाच्या डोहाळे जेवणाच्या वेळी अपमान झाला म्हणून निघून गेलेली सरस्वती एकदम तिलोत्तमा गेल्यानंतर आपल्या भावाला भेटायला आली. ती सुद्धा तिच्या नवरा बरोबर असताना. आप्पा गेल्यानंतर सुद्धा ती आव्वाला भेटायला गेली नव्हती. तिला अजूनही मूल झाले नव्हते. आणि परत कोणाकडून काही ऐकून घ्यायला नको म्हणून तिने सगळ्यांकडे जाणे कमी करून टाकले होते. आत्ता ही आव्वाला भेटायला आल्यावर ती आव्वाला बघून खूप रडली, पण थांबली नाही. तिच्या नवर्याबरोबर घरी निघून गेली.

आता घरात फक्त चौघेजण उरले. पद्मनाभ, आव्वा वीणा आणि वीमा. तिलोत्तमा गेल्यामुळे घरातले काम खूप कमी झाले. तिच्यासाठी रोज निराळा स्वयंपाक करावा लागेल. शिवाय तिची देखभाल करणे हे ही मोठे काम होते. ते सगळेच आता संपले. वीमाचाही कामाचा व्याप कमी झाला. तिलोत्तमाला जाऊन सहा महिने होऊन गेले. आता आव्वाला पुन्हा पद्मनाभने लग्न करावे असे वाटत होते. एकदा राम घरी आलेला असताना आणि वीणा आणि वीमा घरी नसतानाच तिने विषय काढला. ती पद्मनाभला म्हणाली, " पद्मा एकट्याने रहाणे अवघड आहे. शिवाय वीणाकडे बघायला ही कुणीतरी हवे. एक दोन मुली आहेत बघण्यात. बघून घ्यायच्या का? "
" आव्वा माफ कर, पण पुन्हा लग्नाचा विषयही काढू नको. मला आधीच लग्न करायचे नव्हते, तुमच्यासाठी केले त्याचे काय झाले ते तू बघितले आहेसच. आता पुन्हा तेच नको. " पद्मनाभने निक्षून सांगितले आणि तो विषय तिथेच संपवला.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

0

🎭 Series Post

View all