कुछ ना कहो (भाग १४) नवी कोरी रंगतदार कथा

कुछ ना कहो
कुछ ना कहो ( भाग १४)

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

राम आणि पद्मनाभची बरेच दिवसात भेट झाली नाही. दोघेही आपापल्या कामात व्यस्त होते. दोघांनाही भेटीची ओढ लागली होती. पद्मनाभ बॅंकेतून परस्पर रामकडे गेला. खूप दिवसांनी दोन्ही मित्राच्या पोट भरून गप्पा झाल्या. रामने त्याच्या मनातले सल पद्मनाभला सांगितले. त्याच्या वडिलांकडे त्याचे थोडे दुर्लक्ष झाले असे त्याला वाटत होते. त्यामुळे तो अस्वस्थ होता. तो आईकडे पूर्ण लक्ष देत होता, पण वडील निवर्तल्यापासून ती पूर्ण निरिच्छ झाली होती. तिचे मनात कशातच नव्हते. अगदी जेवणखाण सुद्धा ती तोलून करत होती. कशाचीच तिला ओढ नव्हती. तिचे बोलणे पण अगदी मोजके झाले होते. आणि त्यामुळे रामला तिची काळजी वाटत होती.
पद्मनाभने त्याला इतके दिवस घडलेले सगळे सांगितले. तिलोत्तमाची फीट, ते येण्याचे कारण, तिच्या आईवडीलानंचे वागणे सर्व काही. वीणा बद्दलही सर्व सांगितले. त्याच्यापुढे आता दोन महत्त्वाचे प्रश्न होते. तिलोत्तमाची तब्येत, तिची ट्रिटमेंट आणि वीणाची चांगल्या ठिकाणी रहाण्याची सोय. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे पण त्याची उत्तरे पद्मनाभकडे नव्हती. राम त्याला म्हणाला, " नको एवढी चिंता करू. वहीनींना ही बरे वाटेल आणि वीणाची सोयही होईल कुठेतरी. आव्वा आप्पा कसे आहेत? तू आधी दोन दिवस जाऊन त्यांना भेटून ये. ते ही तुझी वाट पहात असतील. "
" हो जायच आहे, पण बॅंकेतले काम वाढले आहे. रजा मिळत नाही. मला पण खूप इच्छा आहे त्यांना भेटायची. पण जाईन पुढच्या आठवड्यात. " पद्मनाभला आता थोडे हलके वाटत होते. त्याच्या मित्राशी बोलल्यावर त्याला बरे वाटत होते.

लगेच पुढच्याच आठवड्यात तो आव्वा आणि आप्पांना भेटायला गावाकडे गेला. दोघेही तसे ठीक होते पण जेवढे काम ते करत होते तेवढेही त्यांना आता झेपत नव्हते. थकून जात होते बिचारे, पण पद्मनाभ त्यांना घरीही घेऊन जाऊ शकत नव्हता. त्याच्या चिंतेत आता आणखी भर पडली. तो दोघांना घेऊन डाॅक्टरांकडे जाऊन आला. तसे दोघे ठीक होते, पण वय बोलत होते. आणि त्याला इलाज नव्हता. मनावर ओझे घेऊनच तो परत घरी गेला. तो आव्वा आप्पांना भेटायला जाताना वीणाला रात्री ही घरीच थांबायला सांगून गेला होता. सुदैवाने तो नसताना तिलोत्तमाला काही झाले नाही.


वीणाला म्हणजे पद्मनाभच्या छकुलीला आता शाळेत घालायचे होते. त्यासाठी तिची मानसिक तयारी करून घ्यायला हवी होती. पद्मनाभ हळूहळू छकुलीला समजावून सांगत होता. " यश बघ कसा शाळेत जातो. म्हणून त्याला नवीन मित्र मैत्रिणी मिळाले. आता तो मोठा होणार हुशार होणार आहे. मग तुला पण मोठ व्हायचे आहे ना? मग शाळेत जायच ना? " छकुली पटकन "हो" म्हणाली. आणि खरचं शाळेत जायला तयार झाली. पद्मनाम तिच्यासाठी शाळेची चौकशी, प्रयत्न करू लागला. तिला मराठी शाळेत घालायचे होते. तिला बालगटात प्रवेश मिळाला. तिची शाळा सुरू झाली. ती शाळेत रमली. मुख्य म्हणजे रडली नाही. वीणा तिला शाळेत पोचवायचे आणि आणायचे काम सुद्धा बिनचूक करत होती. फक्त ती दहावी झालेली असली तरी तिला छकुलीचा अभ्यास घ्यायला जमत नव्हते.

तिलोत्तमाची तब्येत आता वरचेवर बिघडायला लागली होती. तिला वरचेवर फीट येत होत्या. तिच्या नेहमीच्या डाॅक्टरकडे घेऊन जायचे तर पद्मनाभला रजा काढून घेऊन जावे लागणार होते. त्याला सध्या रजा मिळत नव्हती. शेवटी त्याने बेळगावच्या प्रतिथयश डाॅक्टरांना दाखवायचे ठरवले. डाॅक्टर पोतदार, प्रसिद्ध न्युरोलाॅजीस्ट यांच्याकडे तो तिलोत्तमाला घेऊन गेला. त्यांनी सगळी व्यवस्थित तपासणी केली. परत एम. आर. आय. करायचा सल्ला दिला. त्यांना आत एखादी कुठली नर्व्ह चोक असेल का अशी शंका येत होती. तसे असेल तर ऑपरेशन करावे लागणार होते. पण ते तिथे बेळगाव मधे होऊ शकत नव्हते. एम. आर. आयचा रिपोर्ट आला. तिलोत्तमाचे ऑपरेशन करायला हवे होते, पण रिस्क होती. शिवाय ऑपरेशन झाल्यावर ती नक्की बरी होईल का हे ही सांगता येत नव्हते. त्यामुळे हे सगळे तिच्या आई आप्पांना सांगणे ही आवश्यक होते. पद्मनाभने त्यांना निरोप पाठवून बोलवून घेतले. त्यांना सर्व गोष्टींची कल्पना दिली. तो आप्पांना म्हणाला, " आप्पा मला वाटते ऑपरेशन करण्याची रिस्क आपण घेऊ नये. ती बरी होणार असती तर मी वाट्टेल ते केले असते. पण तिला नंतर जास्त त्रास होईल. तुम्हाला काय वाटते? "
" तुमचे बरोबर आहे. पण तिची तब्येत अशीच राहिली तर वीणाला ( छकुलीला) कोण बघणार? " आप्पा म्हणाले.
" मी आहे ना, ती सर्वस्व आहे माझे, मी आणि तिलोत्तमा दोघे मिळून बघू तिला, मोठे करू. " पद्मनाभ छकुलीकडे पहात म्हणाला. तिलोत्तमाच्या आईवडिलांच्या संमतीने तिचे ऑपरेशन करायचे नाही असे ठरले. पद्मनाभ तिचे औषधोपचार व्यवस्थित करत होता. वीणा घर आणि छकुलीला बघत होती. पण तिलोत्तमाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत नव्हती.

एक दिवस गावाकडून पद्मनाभला निरोप आला. आव्वा पाय घसरून पडली होती. आप्पांनी तिला दवाखान्यात नेऊन आणले होते, पण आता आव्वाला विश्रांती हवी होती. त्यामुळे स्वयंपाक कोण करणार हा प्रश्न होता. आप्पांना काही येत नव्हते. तसेच शेजारी पाजारी मदत करत होते म्हणून चार दिवस निघाले. पद्मनाभ रामला घेऊन ताबडतोब गावाकडे गेला. आव्वाला फार त्रास होत होता. पण सुदैवाने फ्रॅक्चर नव्हते. पण आठवडाभर तरी तिला विश्रांती आवश्यक होती. पद्मनाभला आता आव्वा आप्पांच्या स्वयंपाकासाठी पण बाई ठेवणे जरूरी होते. ती सगळी सोय लावून चार दिवसांनी तो परत आला, तर इकडे तिलोत्तमाला जोरात फीट येऊन गेली. तिचा ओठ दातात सापडल्यामुळे ओठातून रक्त आले. वीणा घाबरून गेली. शेजारच्या काका काकूंनी मदत केली म्हणून तिलोत्तमाला लगेच ट्रिटमेंट मिळाली. पद्मनाभला असे वाटले, " खरचं संकटे आली की एका पाठोपाठ एक येतच रहातात. त्यातून मार्ग तरी किती आणि कसा काढायचा. "
पण देवच सगळ्यातून मार्ग दाखवतो. फीट आल्यावर वीणानी तिलोत्तमाला खूप चांगले सांभाळले पण छकुलीला ही बघितले. आणि काळजीपूर्वक बघितले, त्यामुळे तिलोत्तमाचा वीणावर आणखीन विश्वास बसला. तिने पद्मनाभ जवळ वीणाचे कौतुक केले व म्हणाली, " मला वाटते तिला आपल्याकडे रहायलाच ठेवायचे का? तिची ही सोय होईल आणि आपल्याला ही बरे होईल. " पद्मनाभ आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला. वीणाच्या रहाण्याचा प्रश्न अशाप्रकारे सुटेल असे पद्मनाभला स्वप्नातही वाटले नव्हते.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all