कुछ ना कहो (भाग १३) नवी कोरी रंगतदार कथा

कुछ ना कहो


कुछ ना कहो ( भाग १३)

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


तिलोत्तमाला विश्रांती सांगितल्यामुळे आधीच आळशी आणि काम नको असलेली तिलोत्तमा आणखी आळशी झाली. तिलोत्तमाचे स्वयंपाकघर वीणाच्या हातात गेले. वीणा हुशार चटपटीत आणि तितकीच चांगली असल्यामुळे ती याचा गैरफायदा घेत नव्हती. पण छकुली उर्फ वीणा आणि तिलोत्तमा पूर्णपणे वीणावर अवलंबून झाल्या. वीणा संध्याकाळी घरी जात होती. आणि सकाळी लवकर पुन्हा हजर होत होती. वीणा उर्फ छकुलीला अंघोळ घालण्या पासून तिला जेवायला भरवणे सारे काही वीणाच करत होती. सकाळी पद्मनाभचा डबा, सगळ्यांचा नाष्टा सर्व काही वीणा बघत होती. तिलोत्तमाची ही काळजी घेत होती.

एक दिवस तिलोत्तमाचे आई आप्पा तिला बघायला आले. चार दिवस येऊन लेकी जवळ राहिले. आराम केला. आणि निघून गेले. काय झाले, कशामुळे झाले कशाचीही चौकशी केली नाही. किंवा इतर काही विचारणे देखील नाही. आपले आणि आपल्या लेकीचा काही भांडण झाले आहे याचा मागमूसही लागू दिला नाही त्यांनी. नाही तिचे डाॅक्टर काय म्हणाले, विश्रांती घेण्याची गरज का आहे, हे विचारले. ती व्यवस्थित आहे एवढेच त्यांच्यासाठी बास होते. आपल्या लेकीबद्दल आधी असलेले प्रेम उमाळा अचानक कुठे गेला? पैशाची एवढी घमंड की त्यापुढे आपली लेकीचे आजारपण ही महत्वाचे नव्हते? पद्मनाभ विचारच करत राहिला. त्यांच्या वागण्यामुळे त्याचे आव्वा आप्पा खूप दुखावले गेले, त्यांना गावाकडे जाऊन रहावे लागले, या वयात त्यांना इतके कष्टप्रद जीवन जगावे लागते ह्याचे त्याला फार वाईट वाटत होते. त्यांना परत इकडे आणावे का असे त्याच्या मनात येत होते. पण परत इकडे आल्यावर तिलोत्तमाने परत तसेच तमाशे केले तर या वयात त्यांना ते त्यांना सहन करायला लावायचे का? त्यांचा अपमान करायला तिलोत्तमाला उगीच संधी द्यायची का? असे प्रश्न ही त्याला पडत होते.


तिलोत्तमाच्या नवीन औषधोपचाराचा परिणाम म्हणून तिला दुपारी ही रात्री सारखी गाढ झोप लागत होती. छकुलीला ही वीणा ने दुपारी झोपायची सवय लावली होती. छकुली झोपल्यावर वीणा भाजी निवडत बसली होती. पद्मनाभला तिच्याबद्दल जाणून घ्यायचेच होते. त्याने वीणाला विचारले, " तुझे लग्न झाल्यानंतर तू पुढे इकडे कशी आलीस? तुला आक्काकडे जावसं नाही का वाटले. "

" माझे लग्न म्हणजे नरकाचे दारच ठरले माझ्यासाठी. नवरा जनावर होता. रोज रातच्याला फाडून खात होता. तरी बी त्याचे समाधान नव्हते. रातबी पुर व्हायची नाय त्यासनी. त्यात ते वंगाळ दारू भी पिईत व्हत. अन् काय कसलं नाद होत कुमार ठाव? आक्काला काय सांगायच तर तिच्याकडं जाला बी देत नव्हतं. सासू तशी बरी होती जेवा खायला देयाची पण तिला लवकर नातवंड थोबाड बघाचं हुत. . दिवसभर कामे करून मी कधी पाठ टाकते अस वाटलं तरी त्या जनावराच्या तावडीतून सुटका नव्हती. बरं न्हायसं झालं, एकांद सुदीक काम राह्यल तर सासू आंदी बोलत राह्यची. मंग डाग बी द्यायाला लागली. नंतर पोर ह्योत नाय म्हणून मारायची, त्यो बी लई मारायचा. एक दिस दुसऱ्या बाईक घरात आनली, आन रातच्याला मला दिलन हाकलून, काढलं नव का घराबाहीर. रात काढली ततच, मंग आक्काकडं आलो तर आक्काच्या झोपड्याला हा ह्येवडा ताला. मंग हिकड तेकड वाट फुटलं तस चाललो. जे पडलं ते काम केल. शेतात राबलो, गुरांची, रस्त्यावरची घान काढली. कोनाच बी उष्ट पाष्ट खालं. उकिरड्यावर फेकलेलं दिकून खालं. मग एक बाय गाठ पडली अन तिच्या बरोबर हित आलो. हित एक दो जरा काम मिळाली, राह्यलो हतच." वीणानी एका दमात तिची कर्म कहाणी सांगितली, जे ती कमीतकमी दहा बारा वर्षे भोगली होती. म्हणतात ना रानावनात वाढणारे फूल जात्याच घट्ट असते. पण कोमल फुलाला रानावनातील हवा मानवत नाही, ते लगेच कोमेजून जाते. इतके सगळे सोसून देखील वीणा ताठ उभी होती. कामकरून लोकांचे उरले सुरले खाऊन जगत होती. तेच सगळ्या सोईसुविधा असूनही तिलोत्तमा मात्र कोमेजली होती.
" मग तू रहातेस कुठे? जवळच की लांब. " पद्मनाभने विचारले.
" हाईत एक बाई, त्यांच्या झोपड्यात र्हातो. पर रातच्याला बाहीर झोपावं ल्यागत. गुरं असत्यात बाजू. " वीणा.
" का? " पद्मनाभने आश्चर्याने विचारले.
" रातच्याला त त्यांच्याकडे कोनबी येतया. मंग मी कसं झोपावं त्यात. " वीणा म्हणाली पण पद्मनाभच्या अंगावर काटा आला.
" पण तुला त्रास होत नाही का त्याचा? " नकळतपणे पद्मनाभचा आवाज चढला.
" तसा एकदोन वेळा प्रकार झाला, पर म्या असा इंगा दावला की परत कोन नादा लागत नाय. तवाधरनं कोयता जवळ घेऊन झोपाया लागलो. आता भिती बी नाय वाटत. त्या बाईनच कोयता दिला." वीणा सांगत होती, पण पद्मनाभ च्या काळजात धस्स होत होते. " किती भोग बिचारीच्या नशीबात. आकाराने थोड शिकवले असते, लग्नाची थोडी थांबली असती तर जीवन वेगळं असतं तिचे " मनाशीच पद्मनाभ बोलत होता पण चुकूनही त्याला तिची घृणा वाटली नाही. त्याच प्रेम होतेच तसे, ते तिच्या शरीरावर, भाषेवर, किंवा सौंदर्यावर नव्हतेच. कोवळ्या वयात जडलेले तिच्या व्यक्तीत्वावर जडलेले निस्सीम प्रेम होते. ना त्याला शरीराचे आकर्षण होते, ना परिस्थितीची, भोगलेल्या भोगाची घृणा. कदाचित ह्यालाच "खरे प्रेम " म्हणत असावेत. वासना, स्पर्शाची भूक म्हणजे प्रेम नव्हेच. स्पर्श ही प्रेम व्यक्त करण्याची भाषा असू शकते कदाचित. एखाद्या व्यक्तीला मनापासून मनातले सगळ्यात महत्त्वाचे स्थान देणे म्हणजे प्रेम, त्याला सर्वस्व मानणे म्हणजे प्रेम. आपले मन त्याला अर्पण करणे म्हणजे प्रेम. असे निस्सीम निर्व्याज प्रेम होते त्याचे वीणावर.


आता मात्र पद्मनाभला दोन्ही वीणांची काळजी वाटू लागली. कितीही म्हंटले तरी दिवसातला बराच वेळ त्याची छकुला वीणा बरोबर असायची. मग तिच्या वागण्या बोलण्याचा प्रभाव छकुलीवर पडणारच. तिलोत्तमाने छकुलीला पूर्णपणे वीणावर सोडून दिले होते. तिचे छकुलीकडे अजिबात लक्ष नव्हते. वीणावर तिला चांगली सांभाळत होती. प्रश्न तो नव्हता, पण छकुलीवर चांगले संस्कार होण्यासाठी वीणाला आधी त्या नरकातून बाहेर काढायला हवे होते. तिला चांगले संस्कार देणे आवश्यक होते. तिची भाषा तिचे राहणीमान, मुख्य म्हणजे तिच्या रहायच्या जागेची चांगली सोय करणे आवश्यक होते. आता पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न पद्मनाभला सतावत होता.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all