कुछ ना कहो ( भाग ७) नवी कोरी रंगतदार कथा

कुछ ना कहो


कुछ ना कहो ( भाग ७)

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

आव्वांनी तिलोत्तमाच्या डोहाळजेवणाची सगळी तयारी केली होती. त्यांच्या मदतीला सरस्वती आणि रेवती दोघी आल्या होत्या. भागव्वा होती, पण ती फक्त वरच्या कामासाठी. बाकी सगळे आव्वा जातीने बघत होत्या. पंचपक्वांन केली होती. शिवाय पाटवडी, ओल्या नारळाच्या करंजी, दोन प्रकारच्या चटण्या, दोन भाज्या आणि मसालेभात असा बेत केला होता. रेवती आणि सरस्वतीने फुलांचे डेकोरेशन करून घर छान सजवले होते. तिलोत्तमाची आई सकाळी आल्यापासून तिच्या बरोबरच होती. तिलोत्तमाची तयारी करून घेत होती. सगळे लोक जमल्यावर तिलोत्तमाची आई तिला घेऊन आली. आव्वा, तिची आई अशा पाच सवाश्णींनी तिलोत्तमाचे औक्षण केले. तिची दृष्ट काढली. आव्वांनी तिला तिच्या पसंतीने साडी आणली होती. ती साडी तिला देऊन पाच फळांनी तिची ओटी भरली. तिच्या आईने देखील तिची ओटी भरली. आता तिच्यासमोर पंचपक्वांनानी भरलेले ताट ठेवले होते. दोन वाड्यात दोन पदार्थ झाकलेले होते. सर्वांना वाटीत काय निघते याची उत्सुकता होती. तिलोत्तमाने पहिली वाटी उघडली, वाटीत काही नव्हते ती रिकामी होती. तिने दुसरी वाटी उघडली, तीही रिकामी होती. ते बघताच तिलोत्तमा जोरात ओरडली , " हेच करायचे होते तर एवढा कार्यक्रम ठरवला कशाला? या वाट्या रिकाम्या निघाल्या तरी माझ्या पोटात बाळ आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणालाही मी माझ्या बाळाला हात लावून देणार नाही. " तिलोत्तमाची ओरडून बोलत होती आणि रडत होती. पद्मनाभ म्हणाला " अस कोणी मुद्दाम कशाला करेल. अव्वा आणि इतर सगळ्या सकाळपासून तुझ्यासाठी किती करत आहेत ते बघितले आहेस ना तू. बास आता. "
" कळू दे सगळ्यांना कोण कसे आहे ते. " तिलोत्तमा चिडली होती.
" बास आता. " पद्मनाभ म्हणाला.
" माझ्या आईने यापेक्षा चांगले केले असते. वाट्या रिकाम्या निघाल्याच नसत्या. " तिलोत्तमा म्हणाली.
" आव्वांनी ही सगळे चांगलेच केले आहे. तू तिला काही बोलायचे नाही. " पद्मनाभ.
" कुणा वांझोटीची दृष्ट लागली माझ्या लेकीला. " तिलोत्तमाची आई सरस्वतीकडे पहात म्हणाल्या. त्या कानडीत बोलल्या तरी घरच्या सगळ्यांना कळले होते. त्यावर पद्मनाभ चिडला आणि त्याने तिलोत्तमाच्या आईला चांगलेच सुनावले. त्या तिथून उठून निघून गेल्या. सरस्वती, रेवती आणि पद्मनाभ काही न दाखवता आलेल्यांना जेवायला वाढले. सगळी जेवण वगैरे झाल्यावर त्याने तिलोत्तमाच्या आई आप्पांनी बाहेर बोलवले आणि म्हणाला, " तुम्हाला तुमच्याकडे डोहाळजेवण करायचे होते तर करायचे ना? तेवढ्यासाठी इतके नाटक करायची काय गरज होती. आणि सरस्वतीला काही म्हणायचे नाही. त्यांना मूल हवे नको हा त्या दोघांचा प्रश्न आहे. तुमचा बोलायचा अधिकार नाही. " पद्मनाभचा आवाज चढला होता.
"आम्ही काय केले? तिलोत्तमाच्या आई नाटकीपणाने म्हणाल्या.
पद्मनाभने भागव्वाला हाक मारली. तिला पाहून त्या म्हणाल्या, " किती झाले तरी ती कामवाली बाई. पैशासाठी काम करणारी, तिच्यावर काय विश्वास ठेवायचा. "
" पण तुम्हीच तर तिला आमच्याकडे पाठवली ते विश्वास असल्याशिवाय का? आणि इतके तिलोत्तमाचे सगळे तिच तर करते आहे. \" पद्मनाभ म्हणाला. इतक्यात भागव्वा आली. तिला पाहून तिलोत्तमा तिच्या अंगावर धावून गेली आणि पाय घसरून पडली. सगळे खरे खोटे करायचे तिथेच राहिले आणि पद्मनाभला लगेच तिला घेऊन दवाखान्यात जावे लागले. डाॅक्टरांनी तिला एडमीट करून घेतले. ट्रिटमेंट सुरू केली. तिलोत्तमाला थोडा मानसिक धक्का पण बसला कारण त्यांचे खोटे उघडे पडले. तिलोत्तमाचे आईवडील तिच्याजवळ बसून होते. डॉक्टरांनी तिला अंडर ऑबझरवेशन ठेवले होते. बाकी काही काळजी करण्यासारखे नव्हते म्हणून पद्मनाभ थोडावेळ घरी गेला. घरी जाऊन त्याला आव्वाला आणि सरस्वतीला सांभाळायचे होते. झाला प्रकार सरस्वतीच्या मनाला खूप लागला होता. तो घरी येईपर्यंत सरस्वती आपल्या घरी निघून गेली होती. आव्वा आणि आप्पा देवासमोर डोळे मिटून हात जोडून बसले होते.

थोड्यावेळाने पद्मनाभ पुन्हा दवाखान्यात आला तेव्हा तिलोत्तमाला थोडे पोटात दुखत होते. बाळाचे ठोके नीट लागत नव्हते. डाॅक्टरांना सिझेरियनचा निर्णय घ्यायचा होता व त्यासाठी ते पद्मनाभचीच वाट पहात होते. तो आल्यावर तिलोत्तमाशी बोलला. " घाबरू नको. बाळ व्यवस्थित आहे. सगळे नीट होईल. " त्याने समजावले आणि पेपरवर सह्या करण्यासाठी तो डाॅक्टरांच्या पाठोपाठ गेला. त्याने डाॅक्टरांना विचारले, " बाळाला काही होणार तर नाही ना? "
" लेट्स होप सो. पण नंतर मात्र त्याची खूप काळजी घ्यावी लागेल. लवकर जन्मल्यामुळे ते कमजोर असू शकते. " डॉ. म्हणाले. आणि ते सिझेरियनसाठी ओ. टी. त गेले.


अर्ध्या पाऊण तासांनी एक नाजूक परी डाॅक्टरांनी पद्मनाभच्या हातात आणून दिली. तिला बघून पद्मनाभ आनंदाने हसू लागला. तिला त्याने "वीणा" अशी हाक मारल्यावर ती गोड हसली. त्याचे डोळे आनंदाने भरून आले. तिलोत्तमाच्या आईवडिलांना ही आनंद झाला. त्यांनी नातीला घेतले. तिलोत्तमाला थोडी शुद्ध आल्यावर पद्मनाभ तिच्याजवळ गेला. तिचा हात हातात घेऊन म्हणाला, " थॅंक्यू. एवढी गोड परी भेट दिल्याबद्दल. " पण तिलोत्तमाला त्याचे काहीच वाटले नाही. ती मान फिरवून झोपून गेली.

तिलोत्तमाला दवाखान्यात नेले त्यावेळी भागव्वा अव्वा, आप्पा आणि सरस्वती समोर आली. म्हणाली, " माझ्यामुळे आज तुम्हाला ऐकून घ्यावे लागले. तुमच्यावर ही वेळ आली. मी जर वाट्या रिकाम्या करायला आधीच नकार दिला असता तर हे घडले नसते. पण त्यांचे काय कारस्थान होते हे मला समजले नाही. मी फक्त त्यांच्याकडेच लहानाची मोठी झाले, त्यांच्या जीवावर जगले म्हणून त्यांचे काम केले. इतके दिस तुम्ही माझ्याशी कधीच वाईट वागला नाही. मला माफ करा. मी आता आक्काचे काम करणार नाही. मी जातो माझ्या गावाला. " आव्वानी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने ऐकले नाही. शेवटी आव्वानी तिला जाताना डबा भरून दिला व थोडे पैसे दिले. ती डोळे पुसत निघून गेली. ती गेली आणि पद्मनाभ घरी आला.

पद्मनाभने घरी येऊन ही गोड बातमी आप्पा आणि आव्वाला सांगितली. त्यांच्या पाया पडला. सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होते. देवाच्या पाया पडला. नंतर पद्मनाभ रामच्या घरी गेला. रामला त्याने कडकडून मिठी मारली आणि म्हणाला "माझी वीणा मला मिळाली. "

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all