कुछ ना कहो (भाग ६) नवी कोरी रंगतदार कथा

कुछ ना कहो


कुछ ना कहो ( भाग ६)

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

पद्मनाभ रामच्या समोर नुसता बसून होता. आय बोलावे, रामला सगळे कसे सांगावे त्याला काही कळत नव्हते. रेवतीने दोघां समोर गरमागरम काॅफी आणून ठेवली आणि ती आत जायला वळली तर पद्मनाभ म्हणाला, " वहिनी, तुम्हीपण थांबा. मला जे बोलायचे आहे ते तुमच्या समोर बोलायला हरकत नाही. "
" नको भाऊजी, तुमचा पुतण्या यश ( राम रेवतीचा मुलगा) फार द्वाड झालाय. उठेल आता आणि धडपड करेल. " एवढेच बोलून रेवती आत गेली रामने पद्मनाभच्या जवळ येऊन बसत काॅफी मग उचलला आणि त्याला दिला.
" राम, आपण फसवले गेलो. पूर्णपणे फसलो. " पद्मनाभ.
" म्हणजे? बॅकेत काही प्राॅब्लेम झालाय का? " राम.
" तिलोत्तमाचा आहे प्राॅब्लेम. ती आजारी होती, आहे. गेली कित्येक वर्ष अगदी तिच्या वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून तिला फीट्स येतात. तिला न्युरोलाॅजीस्टची ट्रीटमेंट सुरू आहे. प्राॅब्लेम खूप मोठा किंवा सिव्हीअर नाहीये, पण कायमचा आहे. ". पद्मनाभ.
" असू दे. चांगले औषधोपचार घेऊ आपण. बरं वाटेल त्यांना. नको इतकी काळजी करू. " राम
" प्राॅब्लेम फक्त एवढाच नाही. तो काय आधी नंतर केव्हाही होऊ शकतो. पण स्वभाव, वर्तणूक त्याचे काय करू? ती घरात कोणाचेही ऐकत नाही. कुणालाही जुमानत नाही. आव्वांना, आप्पांना मला सगळ्यांना उलट उत्तर देते. पदोपदी अपमान करते. त्यांच्या श्रीमंतीचे तिला गर्व आहे. तिला कुठलेच काम येत नाही, सवयही नाही. आणि करण्याची शिकण्याची इच्छा नाही. सगळे आव्वालाच करावे लागते. म्हणून बोललो तर तिच्या वडीलांनी त्याच्याकडची एक कामवाली पाठवली. मी तिला व्यवस्थित समजावून सांगितले " मला नाही आवडत. स्वयंपाक घरच्या बाईने केला की त्यात तिचे प्रेम उतरते. आणि आपली कामे आपण करावीत. " तर ती म्हणते " तुम्हांला कामवाल्या बाईंचे पैसे द्यावे लागणार नाहीत. तशी पण तुमची ऐपत नाही. माझे आप्पा पैसे देतील. " तिच्या औषध पाण्याचेही पैसे आप्पा देतो म्हणत होते. मग मात्र मी पण सुनावले, म्हणालो, " माझ्या बायकोच्या औषध पाण्याचा खर्च मी करू शकतो. तेवढे, त्यापेक्षाही जास्त मी कमावतो. मी लग्न केले ते माझ्या कुटूंबाची सर्व जबाबदारी घ्यायला मी सक्षम आहे म्हणून. " त्यांनी पाठवलेल्या त्या बाईने सांगितले की तिलोत्तमा ला फीट्स येण्याचा त्रास आहे आणि त्यासाठी तिला रेग्युलर औषध घ्यावे लागते. " पद्मनाभ रामकडे बघत बोलत होता.
" बापरे, ही तर फसवणूक आहे. असं का केले पण त्यांनी? आता काय ठरवले आहेस तू? " रामने पद्मनाभला विचारले.
" मी तिला बोलत असताना तिला चक्कर आली म्हणून हा सगळा खुलासा झाला. तिने किंवा त्यांनी स्वतः काहीच सांगितले नाही. त्या भाग व्वा बोलल्या म्हणून समजले तरी. आज डाॅक्टर पुन्हा तिला तपासायला आले होते. तेव्हा त्यांनी सांगितले की " ती आई होणार आहे " . आता मी काय करणार? मी काहीच करू शकत नाही राम. मी पुरता अडकलो, पुरता फसलो. "पद्मनाभ.
थोड्यावेळ दोघ ही शांत होते.

" पण ही खूप आनंदाची गोष्ट आहे पद्मा. तू बाबा होणार आहेस. आता त्याचा विचार कर. देव जे देतो आहे त्याचा आनंदाने स्वीकारतो कर. वहीनींची आता जास्त काळजी घ्यावी लागेलच. पण त्या घेत असलेल्या औषधांचा बाळावर काय परिणाम होतो का याचीही माहिती करून घे. आता तुझ्या बाळासाठी ही जबाबदारी तुलाच घ्यावी लागणार आहे. तुमच्या फॅमिली डाॅक्टरांना औषधांच्या साईड इफेक्ट विषयी सर्व काही विचारून घे. अव्वा काय म्हणतात? " रामने आनंदाने पद्माचे हात हातात घेतले व थोपटले. त्याचे मनापासून अभिनंदन केले.

" अव्वा पदर खोचून नातवंडाच्या स्वागताला तयार झाली आहे. " पद्मनाभ डोळे पुसत म्हणाला. " काय नशीब आहे बघ राम माझे. मी लग्नच करणार नव्हतो. अव्वा आप्पांना सुखी करण्यासाठी लग्न केले. वाटले होते तिलोत्तमा माझ्या हृदयाची तार छेडेल , माझी ताकद होईल. तर तिने असे रंग दाखवले. बाप होणार आहे पण तो आनंदही मी नीट उपभोगू शकत नाही. साजरा करू शकत नाही.मग मी कसा आनंदी होऊ? आता बाळ होणार आहे, पण तिलोत्तमाची आजार बाळाला झाला तर? " पद्मनाभ.
" होईल सगळे नीट. आता काळजी घेणे तुझे कर्तव्य आहे ते तू करशीलच. वहिनीच्या आजाराचे सावट बाळावर पडू नये इतकेच मागणे आपण देवाकडे मागू. बाळ सुदृढ व्हावे. " राम म्हणाला

… … … … … … .


पद्मनाभ स्वतः तिलोत्तमा बरोबर डाॅक्टरांच्याकडे गेला. तिची, तिच्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेतले. तिच्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे जाणून घेतले. आव्वाला पण त्याने सगळे समजावून सांगितले. शिवाय ती भागव्वा कामवाली होतीच. तिने स्वयंपाकघराचा ताबा घेतला होता. तिलोत्तमाला हवे नको ते तिच पहात होती, पण डाॅक्टरांनी सांगितलेले पथ्य व डाएट ही मन लावून पाळत होती. पण या सगळ्यात आव्वा आप्पांना मात्र त्याच्या मनासारखे जेवण मिळत नव्हते. भागव्वाच्या हाताला चव होती पण तिच्या स्वयंपाकात तिखट मीठ थोडे जास्त असायचे. तिखट मसालेदार जेवणामुळे आप्पांना पित्ताचा त्रास होत होता. पण ते होणाऱ्या नातवंडासाठी ते शांतपणे जे समोर येईल ते खात होते. तिलोत्तमा साठी भागव्वा रोज काहीतरी वेगळे करत असे. पण घरात जे घडेल त्याची खबर मात्र तिलोत्तमाच्या आईवडीलांना पोचवली जात होती. तिलोत्तमाची अवस्था आता "आधीच मर्कट त्यात मद्य प्याला" अशी झाली होती. आधीच तिला काम नकोच होते. आता काम न करायचे चांगले कारण होते. पाण्याचे भांडे सुद्धा भागव्वा तिच्या हातात देत होती. तरीही तिचे तोंड कायम वाकडे होत होते. कारण तिच्यावर थोडीशी बंधने आली होती. तिच्या बाहेर फिरल्यावर, बाहेरचे चटपटीत खाण्यावर बंदी होती. तिला त्या सगळ्याचा कंटाळा येत होता. आव्वा तिला नेहमी सांगे, " थोडी हालचाल करावी नाहीतर बाळंतपण जड जाते, त्रास होतो. पण तिलोत्तमा त्याकडे दुर्लक्ष करून दिवसभर पलंगावर लोळून काढत होती. तिलोत्तमाला बघण्यासाठी म्हणून तिचे आईवडील दर महिन्याला यायचे व दोन तीन दिवस तरी त्यांचा मुक्काम असायचा. मुद्दाम तेच तिलोत्तमाला दाखवायला घेऊन जायचे आणि " जावईबापूंना सुट्टी काढायला नको म्हणून आम्ही जातो. " अशी वल्गना करायचे. डाॅक्टर बॅंकेचे कस्टमर असल्याने पद्मनाभच्या ओळखीचे होते, तो दर तपासणी नंतर न चुकता सगळी चौकशी करत होता. शिवाय घरी आल्यावर देखील तिलोत्तमाची सगळी विचारपूस करून तिच्या व बाळाच्या प्रकृती विषयी जाणून घेत होता. त्याच्या देखील मनावर सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊन त्याच्या मनात बाळाची ओढ निर्माण झाली होती. मला मुलगीच व्हावी अशी तो देवाची मनोमन प्रार्थना करीत होता.
आव्वांना तिलोत्तमाचे डोहाळजेवण थाटामाटात करायचे. तशी तयारी ही त्यांनी सुरू केली.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all