कुछ ना कहो ( भाग ४) नवी कोरी रंगतदार कथा

मनात भावना बोलते


कुछ ना कहो ( भाग ४)

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


पद्मनाभ पुढच्या शिक्षणासाठी म्हणून शहरात गेला. त्याला आयसीडब्लूए किंवा सीए करायचे होते. पण रेग्युलर शिक्षण , होस्टेल आणि सीए दोन्हीसाठी खर्च करणे आप्पांना परवडणारे नव्हते. म्हणून त्याने एक पार्टटाईम नोकरी करायला सुरवात केली. हे सगळे करता करता त्याला रेग्युलर अभ्यासाला देखील वेळ मिळत नसे. परीक्षेच्या आधी अभ्यास करून तो चांगले मार्क मिळवी. तो खूप हुशार होता. नोकरी करून सगळे मॅनेज करत होता. तो सी. ए. एंट्रन्स पास झाला आणि साईड बाय साईड बी. काॅम. फर्स्ट इयर पण पास झाला. त्याची सीए फर्ममध्ये आर्टीकलशीप सुरू झाल्यामुळें त्याला नोकरी सोडावी. सीए फर्ममध्ये देखील तो थोड्याच कालावधीत सगळ्यांचा आवडता झाला. दिवस जात होते. नवीन क्षण नवीन अनुभव देत होते. नवीन शिक्षण नवीन नवीन काम आयुष्य प्रगती पथावर नेत होते. अधूनमधून गावी अव्वा आप्पाकडे गेला की त्याची नजर वीणाला दिसते का बघत रहायची. गावी येऊन वीणाची आठवण आली नाही असे व्हायचे नाही. मग तो हळवा होऊन परत शहराकडे परतायचा.

त्यांच्या चाळीत रहाणारा राम ही पुढच्या शिक्षणासाठी शहरात आला. रामला शहर नवीन असल्यामुळे तो पद्मनाभ च्या ओळखीने त्याच्याच हाॅस्टेलवर येऊन राहू लागला. तिथेच दोघांची अगदी घट्ट मैत्री झाली. दोघे आपल्या मनातल्या गोष्टी एकमेकांशी शेअर करू लागले. तरीही वीणाबाबत रामला काहीच माहिती नाही असे पद्मनाभला वाटत होते. एक दिवस उदास होऊन डोळे मिटून पद्मनाभ तेच गाणे गुणगुणत होता. " उनको ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते। " पद्मनाभच्या गालावर डोळ्यातून पाणी ओघळत होते. आणि त्याच वेळी राम पद्मनाभकडे आला. पद्मनाभच्या डोळ्यात पाणी बघून तो म्हणाला, " काय झाले पद्मा? पाणी का तुझ्या डोळ्यात? " रामने विचारले.
" काही नाही रे, जरा चुरचुरता आहेत डोळे. " पद्मनाभ.
" आठवण आली का कोणाची" राम.
" नाही रामा, कालच नाही का आप्पा भेटून गेले. " पद्मनाभ.
" मग, वीणाविषयी काही कळले का? " राम म्हणताच पद्मनाभने आश्चर्याने रामकडे पाहिले आणि पुढच्याच क्षणी त्याने रामला मिठी मारली. राम फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिला. " पहिले प्रेम विसरता येत नाही. पण ते विसरायचे कशाला? सोनचाफा सुटला तरी त्याचा गंध दरवळत राहतो. "

… … … … … .. ..

पद्मनाभ सीए पास झाला. त्याला एका बॅंकेत ऑफिसर म्हणून नोकरी लागली. नोकरी लागल्यावर आणि सरस्वतीचे लग्न झाल्यावर तो अव्वा आप्पांना शहरात घेऊन आला. सरस्वतीचे लग्न होऊन ती सासरी आपल्या लोकांबरोबर सुखात होती. पद्मनाभ बरोबर रहात असल्याने अव्वा आप्पा ही सुखात होते. राम पद्मनाभच्या घरी वरचेवर जाणे होई. "मावशी मावशी" करून त्याने अव्वांनाही आपलेसे केले होते. आप्पांना मात्र तो जरा घाबरत होता. राम आता शेवटच्या वर्षाला होता. त्यामुळे तो आता अभ्यासाला लागला होता. पदवी मिळाल्यानंतर त्यालाही बॅंकेत नोकरी करायची होती. रामची आणि पद्मनाभची मैत्री दिवस जातील तसे जास्त घट्ट होत होती. राम बी. काॅम झाला आणि लगेचच पद्मनाभ ने त्याला आपल्या बॅंकेत जाॅईन करून घेतले. रामचेही नोकरीचे रूटीन सुरू झाले.

पद्मनाभ साठी मुली सांगून येत होत्या. पण पद्मनाभ लग्नाला तयार होत नव्हता. अव्वा आणि आप्पांनी खूप सांगून पाहिले पण तो ऐकत नव्हता. एकदा अप्पांचे एक स्नेही त्यांच्या एका मुलीला घेऊन घरी आले होते. त्यांच्या बोलण्यावरून व एकंदर वागण्यावरून ते मुलगी दाखवायला आली आहे हे लक्षात आले. तो काम आहे म्हणून घरातून निघून गेला आणि रात्री जेवायच्या वेळी घरी आला. अव्वा आणि अप्पा सांगून थकले. शेवटी अव्वा आणि आप्पांनी रामला त्याच्याशी बोलण्याची गळ घातली. रामनी एक दिवस फिरायला बाहेर नेऊन विषय काढला. " तू लग्न का करत नाहीयेस पद्मा? " रामने एकदमच विचारल्यावर पद्मनाभ गांगरला. पण म्हणाला " तसे काही नाही रे. "
" मग बघ एखादी चांगली मुलगी आणि कर लग्न. " राम.
" लग्न करणे गरजेचे आहे का? मला खरचं नाही करायच लग्न. " पद्मनाभ.
" थोडा अव्वा आप्पांचा पण विचार कर. त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस तू. त्यांना नसेल का वाटत तू लग्न करून सुखी व्हावे. मला माहिती आहे तू मनापासून प्रेम केलसं. पण ते मनातच राहिले ना. पहिले प्रेम कोणीच विसरू शकत नाही. प्रेम मानसिक आणि शारीरिक दोन पातळीवर असत पद्मा. तू मनातून वीणावर प्रेम केलसं ते तसचं अबाधित ठेव. तू वीणा सानेकर विसर अस मी कधीच म्हणणार नाही. पण दुसऱ्या कुणाला तरी प्रेम देऊ शकतोस ना? कदाचित ती दुसरी वीणा पेक्षा चांगली असेल आणि येणाऱ्या मुलीशी सूर जुळवून घे. तुलाही सुख मिळवण्याचा हक्क आहे. सुखी हो. एकट्याने रडत जगण्यापेक्षा लग्न करून सुखी हो. " राम.

" पण ही प्रतारणा नाही का? मी वीणाला कधीच विसरणार नाही. मग मी त्या मुलीला फसवल्यासारखे होईल. " पद्मनाभ.
" आता वीणा परत तुझ्या आयुष्यात येणार नाही. आणि तूही तिच्या आयुष्यात डोकावणार नाही. त्या दुसरीला कधीच काही समजणार नाही. मग कुठली प्रतारणा? वीणाशी असलेले पहिले प्रेम एका कुपीत बंद करून मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून दे. आणि पाटी पुसून कोरी करून त्याच्यावर पुन्हा नव्याने चित्र काढ. स्वतःच्या बरोबर अव्वा आप्पांना ही सुखी कर. " राम पद्मनाभचे हात हातात घेऊन त्याला सांगत असतो. पद्मनाभने हसून रामकडे पहात डोळ्यातले पाणी पुसतो.


क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all