गरिबीचं प्रदर्शन नको!

Don't like to show off poverty.

गरिबीचं प्रदर्शन नको!

वीरुचे बाबा एका कंपनीत कामाला जायचे. कशीबशी हातातोंडाची जुळवाजुळव व्हायची. महिन्याला सातेक हजार पगार होता. त्यातच किराणा,घरभाडं,वीरु व त्याच्या लहान बहिणीचा चिंगीचा शाळेचा खर्च. संसाराचा गाडा ओढताना वीरुच्या बाबांचा व आईचा जीव मेटाकुटीला यायचा.

एक मात्र होतं, ते कुटुंब आहे त्यात समाधानी होतं. वीरुच्या बाबांना कोणत्याही गोष्टीचं व्यसन नव्हतं व आईलाही कोंड्याचे मांडे करुन सण साजरे करायची सवय होती. दोघंही अंधरुण पाहून पाय पसरायचे. वीरुच्या आईने कधीही वीरुच्या बाबांकडे महागड्या साडीसाठी वगैरे हट्ट धरला नव्हता.

 मुलंही त्या दोघांच्या संस्कारात वाढलेली त्यामुळे बाहेर मित्र पिझ्झा,बर्गरची कितीही तारीफ करेनात,हे खाल्लं ते खाल्लं म्हणून सांगेनात, या भावंडांना पक्क ठाऊक होतं की तसलं चैनीचं खाणं हे आपल्यासारख्या गरीबांसाठी नसतं तर आईच्या हातची भाजीपोळीच रुचकर असते. दोघंही भावंड समंजस होती. कधीच आईबाबांकडे महागड्या वस्तूंसाठी हट्ट करत नव्हती. शेजारपाजारचेही आपल्या मुलांना वीरु व चिंगीचे दाखले द्यायचे.

कोरोना आला नि वीरुच्या बाबांची नोकरी गेली. कंपनीच बंद पडली. आता पुढे काय हा यक्षप्रश्न त्या कुटुंबापुढे उभा राहिला. पोळीभाजी करुन विकायचं म्हंटलं तर तेवढं गिर्हाईक त्या वस्तीत नव्हतं शिवाय नाही म्हंटलं तरी त्या व्यवसायाला थोडं का होईना भांडवल लागतच. वीरुच्या आईचा रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता. एकदा वीरु वाण्याकडे गेला असता वाण्याने त्याला मास्कबद्दल हटकलं. कधीही कोणत्या गोष्टीसाठी हट्ट न करणारा वीरु यावेळी मात्र आईला म्हणाला,"आई,मला मास्क हवा गं. खरा तर आपल्या सर्वांना एकेक मास्क हवा. तीस रुपयाला मिळतो. चौघांसाठी एकशेवीस रुपये लागतील." 

चिंगी म्हणाली,"दादा,आपणच हे मास्क बनवले तर. आपल्याकडे तर मशीन पण आहे. आईला येतील बनवता."

"येखारदं सँपल मिळालं आसतं बघायला तर बरं झालं अआसतं." आई म्हणाली.

"आई,बाबांच्या मोबाईलमधून युट्यूब लावून देतो तुला. त्यावर बघ. नक्की जमतील तुला."

वीरुने आईला मास्क शिवण्याचे विडिओ दाखवले. त्यासाठी लागणारा कच्चा माल आणणं आवश्यक होतं. आई कापडाच्या घडीत ठेवलेले पैसे शोधू लागली तसं वीरु व चिंगी आपापला पैशांचा डबा घेऊन आले. 

वीरु म्हणाला,"आई,या तुझ्या उद्योगाची सुरुवात तू आम्ही साठवलेल्या पैशातून कर." वीरुच्या बाबांच्या डोळ्यात पाणीच आलं. ते म्हणाले,"किती गुणी लेकरं दिलैस रं देवा मला. नोकरी गेली तरीबी नाय घाबरणार मी. माझी वाघीण नि तिची पिल्लं माझ्या साथीला हायती. मी कशापायी घाबरायचं?" वीरुच्या बाबांनी दोन्ही लेकरांचे मुके घेतले. दोघांच्या डब्यातले पैसे सतरंजीवर पसरले व मोजले असता आठशे रुपये भरले. शाळेत,चाळीत मिळालेल्या बक्षीसांचे पैसेही गल्ल्यात ठेवल्याने बऱ्यापैकी रक्कम जमा झाली होती. वीरुच्या बाबांनी त्यात दोनशे रुपयाची भर घातली.

 होलसेल मार्केटमधून रंगीत फुलाफुलांची,चेक्सची सुती कापडं आणली. सगळं सामान देवापुढे ठेवलं व देवापुढे हात जोडले.

वीरुच्या बाबांनी कपड्याचं कटींग करुन दिलं. अगदी लहान मुलं,मध्यम वयातली असे वयानुरुप कपडयाचं कटींग केलं नि वीरुच्या आईने पन्नासेक मास्क बनवले. दुसऱ्या दिवशी वीरु त्याच्या सायकलवरून मास्क विकत फिरला. कोणी मास्क हातात घ्यायचं,नुसतच बघायचं तर कुणी कापड चाचपडून बघून त्याला परत देऊन टाकायचं तरी वीसेक मास्कची विक्री झाली. सगळे मास्क विकले न गेल्याने वीरु थोडा नाराज झाला होता. 

एकतर ऊनही बरंच लागत होतं. तेवढ्यात समोरुन येणारी कार त्याच्याजवळ येऊन थांबली. दार उघडून एक तरुणी बाहेर आली.

"कितवीत आहेस तू?"

"मी नं मी सहावीत."

नाव काय रे तुझं?"

"वीरेंद्र. सगळी वीरु म्हणतात मला. ताई मास्क घ्या ना. माझ्या आईने शिवलेत. इलेस्टिकही मजबूत आहे बघा."

"बरं कितीला एक मास्क?"

"फक्त पंचवीस रुपये ताई."

"बरं मी तुझे हे सगळे मास्क विकत घेते. किती पैसे होतील?"

"तीस गुणिले पंचवीस म्हणजे बघा पंचवीस त्रिके पंच्याहत्तर..हां सातशे पन्नास रुपये." 

"बरं दे पेक करुन नि जरा असा उभा रहा माझ्यासोबत."

"ते कशासाठी ताई?"

"अरे वीरु मला सेल्फी काढायचा आहे तुझ्यासोबत. आपण या बाजुच्या आईसक्रीम सेंटरमधे जाऊया. तिथे मी तुला आईसक्रीम खाऊ घालते. तुझ्या आवडीचं."

"माफ करा ताई पण हे सेल्फी प्रकरण नको. तुम्ही श्रीमंत लोकं आमचे असे फोटो काढता. आम्हाला खाऊ दिल्याचे,आमच्या वस्तू खरेदी केल्याचे फोटो काढता नि ते तुमच्या फेसबुकवर अपलोड करता. 

ताई मी गरीब आहे पण मला माझ्या गरीबीचं अशाप्रकारे कुणी प्रदर्शन केलेलं मुळीच आवडणार नाही. आज माझे वीस मास्क विकले गेले. उद्या अजुन जास्त फिरीन. अजुन लक्षवेधी डिझाइनचे मास्क बनवीन पण क्रुपा करुन मला दया नको,सांत्वन नको. हां तुमच्या शुभेच्छा जरुर द्या."

ती तरुणी एवढ्याशा मुलाचा स्पष्टवक्तेपणा ऐकतच राहिली. गाडीच्या आत तिचे वडील बसले होते. इतका वेळ त्यांनी वीरुचं व आपल्या मुलीचं बोलणं ऐकलं होतं. त्यांना वीरुचं कौतुक वाटलं. ते बाहेर आले व म्हणाले,"माझं मेचिंग सेंटर आहे. मी तुम्हाला कपडा देत जाईन. तुम्ही मला मास्क शिवून द्यायचे, कबूल?"
"कबूल," वीरु खुशीत म्हणाला. 

वीरुच्या मानी स्वभावामुळे त्याच्या कुटुंबाला अर्थार्जनाचं साधन मिळालं. पुढे त्याच मेचिंग सेंटरमधे वीरुच्या बाबांना नोकरीही मिळाली. 

---------सौ.गीता गजानन गरुड.