१. दोघी सवती
"तो माझाही प्रियकर आहे.. पण तू त्याला माझ्याकडे फिरकूदेखील देत नाहीस.." पहिली चिडली होती.
"तू काळी आहेस.. त्याला आवडत नाहीस.." दुसरीनं पहिलीला खिजवलं.
"तुला तुझ्या उजळपणाचा गर्व झालाय.. माझा जीवलग माझ्या आयुष्यात नाही म्हणून मी अभागी ठरतेय.. सगळीकडेच.." पहिली खेदानं म्हणाली..
दोघींच्या भांडणाला चंद्र कंटाळला.. "तुम्ही दोघीही मला खूप आवडता.." तो मनापासून बोलला.. "पण तुम्ही दोघी दोन टोकांवर.. म्हणून तुझ्याकडे मी नाही राहू शकत ग.." चंद्र अमावास्येला उद्देशून काकुळतीनं म्हणाला.
"पण मी तुला उजळण्यासाठी एक रात्र बहाल करतो.. दीपावलीच्या रात्री लक्ष लक्ष दिव्यांनी तू उजळून निघशील.. 'हि'च्यापेक्षाही जास्त.." चंद्र पौर्णिमेकडे बघत म्हणाला.
त्या दिवशीपासून दिवाळीची रात्र सर्वाधिक उजळलेली असते.. पौर्णिमेपेक्षाही..!
*******
२. निर्णय
आपल्या हयातीतच संपत्तीच्या वाटणीचा निर्णय वडीलांनी घेतला अन् आईनं नाराजीनंच तो स्वीकारला.
"बाबा, दादाइतकाच मलाही संपत्तीत वाटा हवा.." मुलगी म्हणाली.
"संपत्तीत वाटा हवा तर जबाबदाऱ्यादेखील वाटून घ्याव्या लागतील.." भावानं बहिणीला सांगितलं..अन् बहीणभावांनी आपसांत खलबतं केली.
"आई, तू दादाकडे अन् बाबा माझ्याकडे.." लेकीनं निर्णय सांगितला.
"दोन ध्रुवांवर दोघे आपण.." वडील खेदानं आईला म्हणाले.
आई विचारमग्न झाली."चालते व्हा माझ्या घरातून.. आम्ही जबाबदाऱ्या काय? आम्हाला नाही करायची वाटणी.. संपत्तीची नाही अन् जबाबदाऱ्यांचीदेखील नाही.." आई कडाडली..
दोघं भावंडं निघून गेली.
"दोन ध्रुवांवर दोघे आपण" वडील मुलांना उद्देशून म्हणाले..
"आपली साता जन्माची गाठ आहे.. मुलांच्या स्वार्थापायी ती सुटू द्यायची नाही मी.. आईनं वडीलांना आश्वस्त केलं.
*******
३. भेटीलागी जीवा
वर्षभराच्या विरहाने भूमीच्या अंगाची लाहीलाही होऊ लागलीय.. ती डोळे वर करून बघू लागली.. तिच्या प्रियकराकडे.. आकाशाकडे.. मोठया आशेने..
युगानुयुगे दोन ध्रुवांवर असलेले ते दोन जीव भेटत फक्त वर्षातील काही महिने..
भूमीला विरह असह्य झाला की ती डोळ्यातल्या अश्रूंना वाफेचे रूप देऊन आकाशाकडे पाठवी.. भेटीची आर्त साद घालत..
आकाशाला तरी कुठे विरह सहन होई.. तो हळूवार फुंकर घाली अन् वाफेचे ढग भूमीवर बरसू लागत.
आत्ताही तसंच घडलंय.. 'भेटीलागी जीवा लागलीसे आस' अशी भूमीची अवस्था बघून पाऊससरींच्या रूपानं आकाश धावून आलंय.. अन् भूमी त्याच्या स्नेहील वर्षावात चिंब भिजलीय..
दोघांनाही माहितीय.. हा पावसाळा फक्त चार महिने.. पुन्हा ते दोघे दोन ध्रुवांवर असणार.. नेहमीसारखेच!
*******
४. दोन ध्रुवांवर दोघे आपण
"ह्या शेल्फवर बसून कंटाळा आलाय नुसता.." गुबगुबीत पाकिटातील पुऱ्या बोलल्या..
"हो,ना! मलाही करमत नाहीये तुझ्याशिवाय.." पलीकडच्या रॅकवर ठेवलेल्या पाणीपुरीच्या मसाल्यानं व्यथा सांगितली.
"व्हॅलेंटाईन सुरू आहे ना रे! चॉकलेट आणि पेस्ट्रीज चाखताना आपली आठवण कुठून होणार? पुऱ्या केविलवाणेपणानं म्हणाल्या, "तुझ्याशिवाय माझ्याही अस्तित्वाला अर्थच नाहीये रे!"
"दोन ध्रुवांवर दोघे आपण.. एकमेकांच्या आठवणीत रममाण होण्याशिवाय आपण दुसरं करू तरी काय शकतो?" पाणीपुरी मसाला खेदानं उद्गारला.
"असा निराश होऊ नकोस.." पुऱ्या म्हणाल्या.. "आपल्याशिवाय घरातील मंडळीही राहू शकत नाहीत फार दिवस.. लवकरच आपलं मीलन होईल अन् तिखट मिरचीपुदिन्याचं पाणी, उकडलेले चणेबटाटे अन् चिंचखजुराच्या आंबटगोड चवीसह मी तुला माझ्यात सामावून घेईन.. मग आपण दोघे खवय्यांची रसना तृप्त करू."
*******
५.विश्वास
बारावीत नव्वद टक्के मार्कस मिळवलेल्या शौनकला हॉटेल मॅनेजमेंट करायचंय हे ऐकून त्याच्या बाबांना धक्का बसला.
खरं तर शौनक इंजिनीअरिंगला जाईल म्हणून त्याच्या बाबांनी आर्थिक तरतूददेखील करून ठेवलेली.. पण इतके उत्तम गुण मिळवणारा शौनक हॉटेलात आचारी बनायचे स्वप्न बघतोय हे त्यांच्या मुळीच पचनी पडेना.
वडिलांचा विरोध पत्करून शौनकनं होस्टेलमध्ये राहून अर्धवेळ नोकरी करत शिक्षण घेतलं. आज त्याचं स्वतःचं सुप्रसिद्ध हॉटेल आहे.. शिवाय भरपूर यश अन् पैसादेखील..
पण बापलेकातील दुरावा आजही कायम आहे. दोघंही अहंकाराच्या नि हट्टाच्या दोन ध्रुवांवर उभे असले तरी दोहोंना सांधणारा रक्ताच्या नात्याचा पूल आहे.. त्या पुलाच्या मदतीनं आज ना उद्या बापलेक एकत्र येणारच ..दोघांनाही विश्वास आहे..
*******
६. दोन ध्रुवांवर दोघे आपण
तिरंग्यात लपेटलेला मेजर विराजचा मृतदेह बघून त्याच्या आईवडिलांनी हंबरडा फोडला. त्याची पत्नी नयना मात्र शांत होती. लग्नानंतर केवळ सहा महिन्यांतच काश्मीरमध्ये तैनात असलेल्या विराजला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं..
"नयनाला रडवा.." उपस्थितांपैकी कुणीतरी बोललं..
"त्याची गरज नाहीये.." नयना खंबीरपणे म्हणाली.. "विराज कुठेही गेलेला नाहीये.. तो फक्त पलीकडच्या तीरावर उभा राहून मला पाहतोय.. "मी माझं कर्तव्य पार पाडलंय.. आता तुझी पाळी.." तो मला सांगतोय.." नयना उद्गारली.
विराजच्या तिसऱ्या स्मृतीदिनी लेफ्टनंट नयना विराज ह्यांनी दोन अतिरेक्यांना काश्मिरात कंठस्नान घातल्याची बातमी सगळ्या न्यूजचॅनलची ब्रेकिंग न्यूज होती..
नयना मात्र अलिप्त होती. "पलीकडच्या जगातून विराज मला पाहतोय.. मला शाबासकी देतोय.." नयना तिच्या सासूसासऱ्यांना फोनवर सांगत होती..
*******
© कल्याणी पाठक
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा