दोन निगेटीव्ह

Story Of Two Negative Becomes Positive


दोन निगेटिव्ह
आज रविवार होता आणि त्यात आवरून बाहेर जायचं म्हणजे प्रियाला महा कंटाळा यायचा .. पण घरातल्यांच्या आग्रहापुढे काहीच चालायचं नाही बिचारीचं .
प्रिया म्हणजे वय वर्ष २८ ,सुबक सुंदरी , चंचल नयनी , मॉडर्न नसली तरी अगदी मागासलेली नव्हती .. ना विचारांनी ना वागण्याने . तिच्या बरोबरच्या सगळ्या जणींचे लग्न झाले होते पण हिचे काही लग्न झाले नाही आणि आलेली सगळी स्थळ हीचा भूतकाळ ऐकला कि नकार देत असत..
आई वडील दर आठवड्याला कोणी ना कोणी तिच्या समोर उभा करत असत आणि हि हीचा भूतकाळ सांगत असे आणि ते ऐकून आलेली स्थळ तिला रिजेक्ट करत असत .. आईने कितीदा तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला कि नाही सांगितलेस तरी चालेल ,.. होऊन गेलेला भूतकाळ का सांगतेस ? पण ती म्हणायची ‘ नाही ‘ कोणतेही नवीन नाते मला काही लपवून सुरु करायचे नाही .. मी जशी आहे तशी त्याने मला स्वीकारले तरच आमचा संसार छान होईल .. नाहीतर मला कायम हीच भीती लागून राहील कि माझा भूतकाळ समजला तर हा मला सोडून देईल .. त्यामुळेच ती तिचा भूतकाळ सांगत असे ..
जवळ जवळ २० मुलांकडून नकार मिळाल्या नंतरही ती ह्याच ठाम मतावर राहिली आणि त्यामुळेच तिचे लग्न जुळत नव्हते .. वय वाढत होते .. लग्नाची फ़ार काही आस राहिली नव्हती .. आणि तिची मनापासून तयारी हि होत होती .. मी माझ्या पायावर उभी आहे , माझा फ्लॅट मी घेतला आहे , मी सेल्फ डिपेंडंट आहे .. मला जगण्यासाठी कोणाचीही गरज नाही ..आणि जर कोणी आलाच आयुष्यात तर तो माझ्या भूतकाळा सकट मला स्वीकारणार असेल तरच येईल,
शेवटी आता तिला बिजवर , डिव्होर्सी अशी स्थळ येऊ लागली .. त्या लोकांना सुद्धा तिचा भूतकाळ मान्य नव्हता .. बिजवर आणि डिवोर्स झालेली मुलं सुद्धा तीला रिजेक्ट करत असत..
आज तिच्या हक्काच्या सुट्टीच्या दिवशी तिला अमोल भेटायला येणार होता ..
अमोलचे लग्न गेल्या वर्षी झाले होते पण संसार काही फुलला नाही . एक वर्षांच्या आतच त्याची बायको त्याला सोडून निघून गेली ..
त्या धक्कयातून तो सावरला नव्हता . मनाने दुःखी होता .. कोणीतरी आपल्याला आपली चूक नसताना फसवलंय .. विश्वासघात केलाय याची सल मनात होती .. तर असा हा दुःखी , मनात फार काही आशा नसताना तो हि आई वडिलांच्या आग्रहा खातिर हिला भेटायला तयार झाला होता ..
आज तिला राहून राहून तिच्या भूतकाळातला व्हॅलेन्टाईन्स डे आठवत होता कारण आज तारीख १४ फेब्रुवारी होती.प्रियाने आज तिची ठेवणीतील खास रेड साडी काढली .. तिने तिच्या व्हॅलेन्टाईन्स डे साठी घेतलेली ती साडी , जी साडी तिने तिच्या पहिल्या पगारातून घेतलेली ती साडी तिने बॅगेतून बाहेर काढली .. रेड साडी .. हाताला फुगे असलेला ब्लाउज , त्याला गोल्डन बारीक काठ .. थोडे केस मोकळे सोडले .. पुढच्या केसांना थोडे कर्ल केले .. डोळ्यांत काजळ , आणि ओठांवर लाल पण जास्त डार्क नाही अशी लिपस्टिक लावून .. डिझानर पर्स ,मोबाईल , कार्ड घेऊन ठरलेल्या रेस्टोरंटला तिच्या कारने वेळेच्या आधीच आली .. आज त्या रेड साडीमुळे तिचे सौन्दर्य कमालीचे खुलले होते .
थोड्याच वेळात अमोल त्याच्या टू व्हीलरने तिथे आला .. ब्लू जीन्स , व्हाईट वर ब्लू स्ट्रिप्स .. कॉलरचे साधेसे टी शर्ट घालून तो आला .. फार काही हँडसम कॅटेगरी मध्ये अजिबात नव्हता .. दाढी सुद्धा त्याने केली नव्हती .. पण गबाळा नव्हता एवढं खरं .. केसांमध्ये एखाद दुसरा केस चमकत होता म्हणजे पांढरा झाला होता .. तिच्या समोर होता तरी पण खात्री व्हावी म्हणून त्याने तिच्या मोबाईल वर काँल केला .. तिने हातानेच खुणावले मी इथे आहे ..
एक क्षण तिला असे इतके सुंदर पाहून त्याचा ठोकाच चुकला होता .. लग्न रखडलेली मुलगी म्हणजे कोणीतरी काळपट , बधिर , थोडीशी डिप्रेस असेल असे काहीसे त्याला वाटले पण इथे तर उलट हि सुंदर मुलगी .
समोर बसला .. ग्लास मध्ये पाणी ओतून पाणी प्यायला .. रुमालाने तोंड पुसले
अमोल " हाय .. मी अमोल "
ती " हाय , मी प्रिया "
अमोलने खिशातून त्याचे व्हिसीटींग कार्ड काढून तिला दिले " हे माझे कार्ड , हे माझे प्रोफाइल .. मी गेले ४ वर्ष याच कंपनीत आहे कामाला .. सॅलरी स्लिप मी तुमच्या वडिलांना पाठवलीय .. बहुदा तुम्ही पाहिली असेलच. "
तिने पण तिचे व्हिसीटींग कार्ड दिले .. कार्ड बघितल्यावर त्याला कळले कि हिची कंपनी आपल्या पेक्षा जास्त चांगली आहे .. आणि कदाचित पॅकेज पण माझ्या एवढेच असू शकते .. किंवा जास्तही असेल ."
प्रिया " तर मूळ मुद्द्याचं बोलूयात? "
अमोल " हो नक्कीच ?"
प्रिया " मी हि साडी २०१६ साली घेतली होती .. म्हणजे मी तेव्हा कॉलेजला फायनल इयरला असताना घेतली होती .. "
अमोल मनात " मग मी काय करू ? हे कशाला सांगतेय ? साडी बद्दल ?"
अमोलला नक्की कसे एक्सप्रेशन द्यावे ते कळे ना
अमोल " ओके .. छान आहे " बोलला पटकन
प्रिया " थँक यु .. साडी खरंच खूप छान आहे .. पण ना माझ्यासाठी अनलकी आहे .. "
अमोल " ओह !! तरीही आज हि साडी .. आधीच नकार द्यायचा विचार आहे वाटतं ?"
प्रिया " नाही .. असे काही नाही .. आज हि साडी नेसावी वाटली कारण आज डेट तीच आहे ?"
अमोल " १४ फेब्रुवारी "
प्रिया " हो "
अमोल " व्हॅलेन्टाईन्स डे”
प्रिया " हमम..... मी आणि माझा बॉयफ्रेंड सतीश जवळ जवळ ३ वर्ष एकत्र होतो .. अख्या कॉलेजला माहित होते कि मी आणि तो आम्ही दोघे रिलेशन मध्ये आहोत .. आज २०१६ साली तो मला लग्नासाठी सगळ्यांसमोर प्रपोज करणार होता .. म्हणून मी हीच साडी नेसून अशीच छान तयार होऊन ठुमकत चमकत आनंदात कॉलेजला निघाले .. जाताना आईला बोलले
" आई , आज सतीश लग्नासाठी मागणी घालेल .. तुला जावई म्हणून तो पसंत आहे ना ?"
आई जवळ सगळ्या गोष्टी शेअर करते मी .. तिला माहित होते आमचे रिलेशन .. इतके कि सतीश ने मला पहिल्यांदा किस केले ते हि मी तिला सांगितले होते .. तेव्हा जरा नाराज झाली होती .. म्हणाली आता पुन्हा असे करू नकोस .. मी पण हो म्हणून सांगितले होते तिला .. आईला मिठी मारून आनंदात घरा बाहेर पडले .. कॉलेजला आले नेहमीच्या कट्टयावर सगळे फ्रेंड्स भेटतो तिथे आले .. सगळे मला छान दिसतेय असे सांगत होते पण .. सतीश गप्प गप्प होता .. तो ना मला पिडायला असे करायचा .. मला माहित होते तो मुद्दामून मला छळतोय .. मी पण दुर्लक्ष केले आणि क्लासला जाऊन बसले .. वर्गातून बाहेर बघितले तेव्हा सतीश एकटाच कट्टयावर बसला होता .. मी सरांना सांगितले मला जरा बरं वाटत नाहीये .. आणि बाहेर आले त्याच्याशी बोलायला ..
सतीशचा मूड अजूनही खराब होता .. मला घेऊन तो एका टेकडीवर आला .. मला वाटले हा त्याचा प्लॅन असेल .. तो मला तिथे प्रपोज करेल .. इतकी आतुर झाले होते त्याच्या तोंडून शब्द ऐकायला ..
त्याने मला सांगितले " सॉरी .. आई बाबा नाही म्हणतायत .. मी लग्न नाही करू शकत तुझ्याशी ? मी काल खूप बोललो बाबांशी पण ते इंटरकास्ट मॅरेजला परमिशन नाही देत आहेत .. सॉरी .. " त्याच्या डोळ्यांतून अश्रू येत होते .. पण मी एकदम शॉक मधेच गेले .. तो काय बोलतोय मी काय ऐकतेय .. काही समजेच ना मला
मी त्याला रडतच हसत बोलले " तू जोक करतोय ना हा .. तुला सवय आहे मला त्रास द्यायचा .. प्लिज असा जोक नको करू ?"
सतीश " नाही ..हे खरं आहे .. इट्स नॉट जोक "
अवसानच गळून गेलं होत माझं .. वेड लागायचं बाकी होते .. सतीश माझ्या आयुष्यात नाही असा विचारच कधी केला नव्हता मी .. "
थोड्या वेळाने सतीश म्हटला " चल , निघू जाऊ कॉलेज ला .. खूप उशीर झालाय "
मी म्हटले " तू जा .. मी येईन .. मला जरा एकांत हवाय .. "
त्यानेही मला फ़ार आग्रह नाही केला .. त्या टेकडीवर मला एकटीला सोडून तो निघून गेला .. "
हे सांगताना पण तिचा गळा दाटून आला होता
अमोलने समोरचा टिशू तिच्या हातात दिला .. पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला ..
अमोल " सॉरी , म्हणून तू लग्न केले नाहीस .. ? "
तिने पाणी पिले .. डोळे पुसले " तो मला तिथे सोडून गेला त्या क्षणाला मी त्याच्यातून बाहेर आले .. दुसऱ्या दिवशी त्याने दिलेल्या सर्व वस्तू त्याच्या घरी जाऊन स्वतः पोहचवून आले .. त्याच्या आईला भेटून आले त्यांना बोलले " काकू , तीन वर्ष आम्ही दोघे रिलेशन आहोत हे तुम्हांला माहित होते .. मी दुसऱ्या कास्ट ची आहे हे हि तुम्हांला माहित होते .. मग हे तुम्ही त्याला आधी का नाही सांगितलंत ? तो तर म्हणत होता माझ्या घरी चालतं सगळे ?
काकू काही बोलल्या नाहीत .. आणि मी मन रिकाम करून आले " त्याला शुभेच्छा देऊन आले .. पुढे दोन वर्षांनी त्याने त्याच्याच कास्ट मधल्या मुलीशी लग्न केलं ..
कधी कधी आठवलं कि वाटतं " सुंदर मुलगी आपली गर्ल्फ्रेन्ड असावी अशी क्रेझ होती त्याला म्हणून ३ वर्ष मला फिरवले .. कदाचित वापरले . आणि लग्नाची वेळ आली तेव्हा आई बाप आठवले त्याला .. म्हणजे त्याचे प्रेम नव्हतंच माझ्यावर .. पण मी मात्र प्रेम केलं होते त्याच्यावर खरं ..
तर हा आहे माझा भूतकाळ .. तीन वर्ष एका मुला बरोबर रिलेशन मध्ये होते एकदा किस आणि अनेकदा मिठीत घेतलंय त्याने मला .. त्यापूढे नाही गेलो कधी .. हे ऐकून तुम्हांला पुढे काही बोलायचं नसेल याची खात्री आहे मला ..
प्रिया " वेटर , दोन कॉफी आणा “
प्रिया " , एवढया लांब तुम्हांला बोलावंल त्याबद्दल सॉरी .. कॉफी घेऊन निघूया. "
अमोल थोडावेळ शांतच बसला .. तिला त्या दुःखा तुन सावरायला वेळ दिला त्याने कदाचित
प्रियाने कॉफीचे पैसे ठेवले आणि उठली
अमोल " एक विचारू ?"
प्रिया खाली बसली " हमम "
अमोल " अजून प्रेम करतेस का त्याच्यावर ?"
प्रिया " नाही .. पण रागही नाहीये त्याच्यावर .. कारण कदाचित आई वडिलांना दुखावले नाही त्याने हे सत्य असेल "
अमोल " मग हे का सांगितलेस मला ? मी रिजेक्ट करावं म्हणून? "
प्रिया " माझा भूतकाळ लपवून ठेवायचा नाहीये मला .. मी प्रेम केलं होते .. पाप नाही .. त्यामुळे मला बघायला आलेल्या प्रत्येक मुलाला मी हे सत्य सांगितले .. तो माझा भूतकाळ आहे हे हि सांगितले तरीही मला कोणीही होकार दिला नाही .. त्यांना मी रिजेक्टड यूज्ड वाटते .. "
अमोल " तुझी काय अपेक्षा समोरच्या कडून ?"
प्रिया " भूतकाळ काही केल्या मी बदलू शकत नाही .. मला माझ्या भूतकाळा सकट स्वीकारावे हीच .. बाकी काही नाही .. कारण उद्या लग्ना नंतर कुठून काही कळले कि मग डीवोर्स होण्या पेक्षा हे चांगलं आहे नाही का ?"
अमोल " थोडक्यात आपल्या दोघांच्या भांवनाचा वापर केला गेलाय .. माझाही विश्वासघात झालाय .. माझ्या बायकोचे आधीच बाहेर अफेअर होते .. आणि तिला जेव्हा संधी मिळाली तेव्हा ती पळाली त्याच्या बरोबर .. माझे काय होईल ? लोक मला काय बोलतील ? माझी समाजात किती छी थू होईल याचा जराही विचार केला नाही तिने ? स्वतः मस्त मजेत असेल .. पण माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली तिने ."
प्रिया " ओह !! सॉरी "
अमोल " प्लिज , डोन्ट बी सॉरी "
दोघे एकदम शांत झाले होते .. अमोलने बिल पे केले .. दोघे चालत बाहेर आले .. तिच्या बरोबर दोन पाऊलं चालू लागला तो
अमोल " आईस्क्रिम खायचं ?"
प्रिया " चालेल "
दोघे चालत आईसस्क्रिम पार्लरला निघाले
अमोल " तुला जर मी पसंत असेल तर आपण दोघे लग्न करूया का ? म्हणजे मला तू आवडलीय .. कुठेतरी माझे दुःख तुझ्या दुःखाशी मिळतंय असे वाटतंय ?"
प्रिया हसतच " लोक पत्रिका जुळवतात आपली दुःख जुळली."
अमोल " काहीतरी जुळतंय हे छान आहे नाही का ?"
प्रिया " यु ह्याव पॉसिटीव्ह अँप्रोच"
अमोल "उम्म्ह !! मघाचं पर्यंत नव्हता .. तुला बघितल्यावर आपोआप पॉसिटीव्ह विचार येऊ लागले"
प्रिया " हे म्हणजे ते " दोन निगेटिव्ह एकत्र आले कि पॉसिटीव्ह बनतात तसे झाले "आणि खळखळून हसली
अमोल "छान दिसतेस .. हसतेस तेव्हा .. फ्लर्ट नाही करत आहे .. मनापासून सांगतोय .. कीप स्माईलिंग"
प्रिया "थँक यु."
अमोल "मी उद्या घरी येऊन लग्ना बद्दल बोलतो , पुढल्या महिन्यात रजिस्टर मॅरेज करू .. मग छोटेसे रिसेप्शन करू"
प्रिया"पुन्हा लग्न करायला भीती वाटतेय तुला ?लोक काय म्हणतील असे वाटतंय का ?"
अमोल "हमम .. नको वाटतंय . कोणाला कशाला सांगायचं ?. आपल्याला मागून हसतात ग लोक"
प्रिया "उलट दुसऱ्यांदा लग्न करतोयस तर पहिल्या पेक्षा मोठं आणि दणक्यात करू ..कारण माझे पहिलेच लग्न आहे"
अमोल "नजर लागायची भीती वाटते मला"
प्रिया " त्या निमित्ताने अक्षता पडतील रे माझ्या अंगावर. "
अमोल "ठीक आहे , तू म्हणशील तसे"
दोघे चालत आईस्क्रिम पार्लरला आले
अमोल विचारणार होता कोणता फ्लेवर हवाय तर
अमोल “मला मी मँगो..
ती " मँगो “
दोघे एकदम बोलले "मँगो"
दोघेही एकमेकांकडे बघून हसले " बहुदा खूप काही जुळतंय असे वाटतं " ती हसत बोलली
मग आईस्क्रिम खात खात चालताना विश्वासाने भरलेले हात एकमेकांच्या हातात आले.
समाप्त!!