दोन घडीचा डाव

Aayushya chi Gola Berij
दोन घडीचा डाव


दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव

खरंतर आत्मचरित्र हे आयुष्याच्या संध्याकाळी किंवा आयुष्यात काहीतरी भव्य-दिव्य किंवा नेत्रदीपक कामगिरी केल्यावर लिहितात. पण माझ्यासारख्या मध्यम वर्गीय सर्वसामान्य गृहिणीने आत्मचरित्र लिहावं असं काही फारसं मोठ माझ्या आयुष्यात अजुन पर्यंत घडलं नाही आणि चार लोकांनी माझं आत्मचरित्र वाचावं असं काही आकाशाला गवसणी घालणारं यश किंवा मोलाची कामगिरी अजून तरी मी केली नाही.

पण तरीही आयुष्यात आलेल्या अनुभवातून, चढ-उतारातून, केलेल्या संघर्षातून मी काय बोध घेतला? आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर अनुभवांची किती नाणी माझ्याजवळ शिल्लक राहिली? आयुष्याच्या आनंदाचा जमा-खर्च आज मी इथे लिहिते आहे.

एका मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबातलं चार बहिणीतलं मी शेंडेफळ. खरंतर माझ्या वेळी घरी आजी-आई-पप्पा सगळ्यांनाच मुलगा हवा होता पण झाली मुलगीच त्यामुळे त्यांचा विरस झाला असेल आणि ते साहजिकच होतं म्हणा; पण त्यामुळे मुलगा-मुलगी हा भेदभाव मला त्यांच्या वागण्यातून कधी समजला नाही. माझा जन्म राखी पौर्णिमेचा म्हणून मग 'राखी' नाव आणि मुलगा होईल म्हणून प्रायव्हेट दवाखान्यातली आईची प्रसूती म्हणजे छान छानच की!

आम्हा चौघीही बहिणींवर पप्पांनी भरभरून प्रेम केलं. रविवारी आईला खूप कामं असायची म्हणून आमचे केस धुवून देणे ही जबाबदारी पप्पांनी आनंदाने स्वीकारली. रेल्वेच्या पोस्ट विभागात पप्पांची रात्रपाळीची ड्युटी झाली की, दुसऱ्या दिवशी त्यांना सुट्टी असे मग दुपारी ते मला खूप गोष्टी सांगत. पप्पांच्या तोंडून गोष्टी ऐकूनच मी मोठे झाले. त्यांना रामाचा पाळणा खूप छान म्हणता यायचा तर तोच पाळणा ते रात्री म्हणून मला झोपवायचे. पप्पा सोबत असले की वाटायचं पप्पांची मी लाडकी राजकन्याच आहे की काय! शनिवार रविवार दूरदर्शनवर येणारे सिनेमे, क्रिकेटच्या मॅचेस किंवा निवडणुकांचे निकाल आम्ही पप्पांबरोबर बसून निवांत टीव्ही बघायचो. माझे वडील माझ्या आयुष्याचे हिरो होते. अनेक स्तोत्र श्लोक गीतेचा 14 वा अध्याय त्यांना अगदी मुखपाठ होता. देवीच्या नवरात्रात दुर्गा सप्तशती पाठ संस्कृत मधून म्हणून देवीची आराधना करायचे.

माझ्या जन्माच्या वेळी आम्ही भाड्याने राहत होतो, तिथल्या घरमालकीण बाई-अम्मा, मला बघून नेहमी माझ्या आईला म्हणायच्या, "भाभी तेरी बेटी को भगवान ने बहुत फुर्सत से बनाया है." ; म्हणजे लहानपणी मी खूप सुंदर दिसत होते म्हणे! तर माझी आजी-म्हणजे वडिलांची आई, ती मला मांडीवर घेऊन बसे आणि म्हणे, "माझा गुलाब अंगणी फुलला ग." गुबऱ्या-गुबऱ्या गालांची, मोठ्या मोठ्या डोळ्यांची, कुरळ्या केसांची, गोरी-गोरी जपानी बाहुली असं माझं वर्णन, माझी मावस बहीण मला नेहमी सांगत असते!

पण ते म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अगदी तसंच मी वर्षभराची असताना; आमच्या घराच्या भूमिपूजनाची राहत्या घरी घाई सुरू होती आणि मी दहा पैशाचं नाणं गीळलं! सांगा किती बिलंदर होते मी त्या वयातही, पण मग पप्पांनी माझ्या घशावर एक बुक्की मारली आणि नाणं बाहेर आलं.

घर बांधताना पप्पांना खूप अडचणी आल्या. त्यांचं लोन लवकर पास झालं नाही; त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांचा एकापाठोपाठ एक मृत्यू, त्यामुळे मोठे घर बांधायचे नियोजन असूनही आम्ही स्वतःच्या दोन खोल्यांमध्ये राहायला गेलो. सध्या जरी अकोल्याचा गोरक्षण भाग गजबजलेला असला तरी चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी तसं नव्हतं. विजेची सोय नव्हती, आमच्या कॉलनीत फारशी घरही नव्हती. एकट-दुकट घरं आणि घरात कंदिलाचा उजेड! माझ्या मोठ्या बहिणींनी तर कंदीलाच्या उजेडातच अभ्यास केला.

मी सहा महिन्यांची असताना आईची मोठी बहीण वारली आणि तिच्या तीन मुलांचा प्रश्न निर्माण झाला. त्यातल्या मुलीला-छोटी ताईला आई आमच्याकडे घेऊन आली आणि तिचे दोन भाऊ माझ्या मामाकडे राहायला गेले. ती माझी छोटी ताई तिचं लग्न होईपर्यंत आमच्याकडे होती. ती मला दिवस-रात्र अंगा-खांद्यावर खेळवे. आजही ती मला खूप जीव लावते. दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी, जेव्हा मी जिवंत वाचण्याची अजिबात शक्यता नव्हती; तेव्हा या माझ्या बहिणीने महादेवाला अक्षरशः साकडं घातलं होतं. तिची स्वतःची मुलगी सुद्धा तिला म्हणते, "आई तू माझ्यापेक्षा राखीताई वर खूप प्रेम करतेस."

लहानपणी मी खूपच खोडकर आणि उपद्व्यापी होते. कॉलनीतल्या पप्पांच्या मित्राच्या आईला त्यांच्याच घरी जाऊन मी वाकुल्या दाखवे, अंगण मोठे असल्याने खूप झाडे होती; त्यातच मी एकदा लोखंडी सळईने विहीर खोदायची म्हणुन डाव्या भुवईवर दोन टाके पाडून घेतले. प्राथमिक शाळेत जाताना रोज भोकाड पसरणे ही तर नित्याचीच बाब. चौथ्या वर्गात जाईपर्यंत अभ्यास करायचा असतो हेही मला कळत नव्हते. तोपर्यंत आजूबाजूला बऱ्यापैकी घरे झाली होती; आणि त्यातल्या आठ-दहा मैत्रिणी जमा करून मी रोज दुपारी भातुकली, घरकुल, लंगडी, डीग्गर आणि अजून कितीतरी खेळ खेळत असे. मग पाचवीत मोठ्या बहिणींच्या मागोमाग 'ज्योती विद्यालयात' प्रवेश घेतला. या शाळेत मात्र माझी प्रतिभा फुलून आली. वक्तृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, स्वागत गीत सगळ्या स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायचे आणि नंबरही मिळवायचे.

सातवी पर्यंत पहिला दहात असणारी मी आठवीत इंग्रजी माध्यम झेपणार नाही, म्हणून मराठी माध्यमातच राहिले आणि वर्गात पहिली येऊ लागले.

दहावी 69% गुण मिळाले. त्यावेळी मला गणित फारसं जमत नव्हतं म्हणून मग दहावीनंतर आर्ट्स घेतले पण तेवढ्यात एका स्नेहांनी पप्पांना सांगितले की आय.टी.आय. केल्याने नोकरी लवकर मिळते मग माझा आय.टी.आय. इलेक्ट्रॉनिक्सला प्रवेश झाला. तिथे दोन वर्षात खूप मैत्रिणी मिळाल्या. आयुष्याचे अनुभवही खूप आले. पण आय.टी.आय. पास झाल्यावर कळले की, आय.टी.आय. इलेक्ट्रॉनिक्सला विदर्भात मागणी नाही; पुण्या-मुंबईकडे जावे लागेल! त्यासाठी पप्पा तयार नव्हते. म्हणून मग बारावी सायन्सला प्रवेश घेतला. 75 टक्के गुण मिळाले. इंजीनियरिंगला नंबरही लागला पण पैसे नव्हते.

खरंतर 2000 साली इंजिनिअरिंगची एका वर्षाची फी केवळ दहा हजार रुपये होती; पण पप्पांना तेही शक्य नव्हतं, कारण मी दहावीत असतानाच पप्पा रिटायर्ड झाले होते. केवळ मोठ्या ताईचं लग्न झालं होतं आणि मधल्या दोघी अजून लग्नाच्या बाकी होत्या. त्यामुळे माझ्या शिक्षणापेक्षा पप्पांना माझ्या बहिणीच्या लग्नाची काळजी जास्त होती. ते सहाजिकही होतं म्हणा.

बारावीनंतर मी बी.एस्.सी. कॉम्प्युटर केलं. बी.एस्.सी. करताना ई.बी.सी. सवलतीसाठी तहसील कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला काढणे, जात प्रमाणपत्र काढणे, वीज बिल भरणे, गॅसच्या सिलेंडरची नोंदणी करणे, पप्पांचे बँकेचे व्यवहार असे सगळी कामं मीच करत होते. त्यादरम्यान शुगर मुळे त्यांच्या एका डोळ्याला आत मधून खूप दुखापत झाली, तर त्यांना लुनावर बसवून डोळ्यांच्या डॉक्टरकडे ने-आण करणेहेही काम माझ्याकडे होते. बी.एस.सी. ला असताना मी राष्ट्रीय सेवा योजना या विद्यापीठाच्या उपक्रमात भाग घेतला होता. 26 जानेवारी 2001 ला जेव्हा भुजला भूकंप आला त्यावेळी मी आणि माझ्या काही मैत्रिणींनी आमच्या कॉलेजमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांकडून एक एक रुपया वर्गणी गोळा करून भुज साठी ब्लॅंकेट्स आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या पाठवल्या होत्या. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाचे प्रमुख नानोटी सर हे आम्हाला खूपच छान मार्गदर्शन करायचे. राठोड सर तर आमच्या सोबत अगदी विद्यार्थी होऊन जायचे.

2003 ला जून महिन्यात माझ्या दोन नंबरच्या बहिणीचे लग्न झालं आणि त्यानंतर केवळ पंधरा दिवसात मोठ्या ताईच्या घरचे वारले! त्यांच्या जाण्यामुळे पप्पा खूप सैरभैर झाले होते. मोठ्या ताईचे सासू-सासरे तिला ठेवून घेण्यास तयार नव्हते. ती आमच्याकडे परत आली आपल्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन! केवळ सहा वर्षात तिचं वैवाहिक जीवन संपलं होतं. त्याचेळी मी माझ्या शाळेत दहावीच्या मुलांना कम्प्युटर विषय शिकवू लागले; संध्याकाळी एका कोचिंग क्लास वर गणित हा विषय शिकवत होते.

2004 ला लोकमत सखी मंच सहसंयोजिका म्हणून माझी निवड झाली. लोकमत वृत्तपत्र समूहात काम करणे हा एक अपूर्व अनुभव होता. सध्या जे लोकमत पुण्यामध्ये मुख्य वृत्त संपादक आहेत आणि आय.बी.एन. लोकमतला काम करतात ते संजय आवटे सर यांच्या हातात खाली तब्बल दीड वर्ष काम करण्याचा खूप छान अनुभव मला मिळाला. कार्यक्रमाची बातमी कशी बनवायची, जाहिरात कशी बनवायची, जाहिरात आकर्षक बनवण्यासाठी मोजक्याच परंतु अर्थ गर्भ शब्दांची निवड कशी करायची हे सगळं मी आवटे सरांकडून शिकले.

अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, मुर्तीजापुर, बाळापुर, तेल्हारा, वाशिम, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, खामगाव,चिखली, जळगाव जामोद, नांदुरा एवढ्या तालुक्यांचा कारभार मी आणि आमच्या संयोजिका अर्चना नवघरे मॅडम दोघी मिळून बघत होतो. त्यानंतर सरिता पवार या संयोजिका म्हणून आल्या. सरिता ताई आणि अर्चनाताई दोघींनीही मला खूप छान सांभाळून घेतलं. अनेक गोष्टी समजावून सांगितल्या आणि लोकांशी कसं वागायचं, ज्याला पब्लिक रिलेशन म्हणतात तेही शिकवलं.

सखी मंच साठी जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करणे, त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवणे; त्यासाठी हॉल बुक करणे, पाहुण्यांना निमंत्रण देणे, पाहुण्यांचे योग्य प्रकारे स्वागत करणे आणि इतर अनेक बाबींनी शिकले. महिलांमध्ये काम करतानाही अनेक अनुभव आले, पण माझ्यात असणाऱ्या सभा-धिटपणामुळे मला कुठेही अडचण आली नाही. 2005 ला सखीमंचचा आम्ही जिल्हा मेळावा आयोजित केला होता, त्यावेळी श्वेता भोसले, प्रतीक्षा लोणकर यांना आम्ही प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावलं होतं. खूप सुंदर कार्यक्रम झाला होता तो! सखी मंचच्या माध्यमातून राज्यस्तरीय दांडिया स्पर्धा आयोजित केली होती; त्यानिमित्ताने आणि राज्यस्तरीय सखी मंच बैठकीच्या निमित्ताने मी जळगाव खान्देश, नाशिक आणि नागपूर अशा शहरांना भेटी दिल्या. अकोल्यासारख्या निमशहरी भागात राहणारी मी माझ्यासाठी ही शहर खरोखरच खूप मोठी होती. लोकमत वृत्त समूहात काम करणारे मोठे मोठे संपादक, न्यूज एडिटर आणि शाखा व्यवस्थापक यांच्याशी ओळख झाली. मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन कसं करायचं? स्वतः प्रेझेंट टेबल कसं राहायचं? हे सगळं सगळं मी सखी मंचच्या माध्यमातून शिकले

2005 ला स्थानिक आकाशवाणी केंद्रात उद्घोषकांच्या आणि निवेदकांच्या जागा निघाल्या होत्या. तिथेही प्रवेश परीक्षा आणि स्वर चाचणी दिल्यावर माझी युवावाणी मराठी या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली.

आकाशवाणी अकोल्याला मी जवळपास पाच वर्ष काम केले. तोही अनुभव खूप छान होता. युवकांसमोर असणाऱ्या अनेक समस्यांवर मी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलले. रोजगार प्रशिक्षण, सार्वजनिक सणांचं युवकांच्या दृष्टिकोनातून महत्व, लग्न जुळवताना कुंडली जुळणे आवश्यक आहे की तुमचे आरोग्य तपासणी?, युवतींना मासिक पाळी मध्ये येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर तज्ञांचे मार्गदर्शन, पर्यावरण जागृती वर तयार केलेले नभो-नाटक 'ऋतुचक्र' ही त्यावेळी खूप गाजले होते, आकाशवाणी मध्ये तरुण होतकरू युवकांची मुलाखत घेण्याची संधी मला अनेकदा मिळाली. आमचे कार्यक्रम प्रमुख एकनाथ नाडगे सर आणि विजय दळवी सर; नेहमी म्हणायचे की राखी सारखी मुलाखत कोणीच घेऊ शकत नाही. अकोल्याची प्रथम लेफ्टनंट जनरल रेणुका भोजने, न्यानो टेक्नॉलॉजिस्ट चिन्मय दामले, युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवलचा मानकरी ठरलेला नंदू डोंबाळे, हेअर कट मध्ये लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलेला आशिष, दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या मुलाखती यासारख्या अनेकांच्या मुलाखती मी घेतल्या. गुरुपौर्णिमेनिमित्त विविध महाविद्यालयात जाऊन तेथील विद्यार्थ्यांच्या गुरुप्रतीच्या प्रतिक्रिया, अमिताभ बच्चनचा त्याच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम, आणि एका विरहणी प्रेमिकेच्या भावनांवरचा शेरोशायरीचा कार्यक्रम हे आणि असे अनेक कार्यक्रम मी रेडिओच्या माध्यमातून आकाशवाणी अकोल्याला सादर केले, आणि ते प्रचंड गाजलेही.

आकाशवाणीसाठी कार्यक्रम सादर करताना युवकांच्या दैनंदिन समस्या, त्यांचे आरोग्य विषयक प्रश्न आणि रोजगाराभिमुख कार्यक्रम कसे घेतले जातील याचे मार्गदर्शन आमचे कार्यक्रम प्रमुख आम्हाला करायचे. आकाशवाणीत काम करतानाच, आऊटडोअर ब्रॉडकास्टिंग, संदर्भ शोधणे, युवकांसाठीच्या कार्यक्रमांच्या निवेदनामध्ये वेगवेगळ्या चारोळ्या, शेरोशायरी यांचा समावेश करणे, बोलताना आवाजाची पातळी, उच्चार आणि महत्त्वाच्या शब्दांवर जोर देऊन कसं बोलायचं? ह्या सगळ्याच तंत्रशुद्ध शिक्षण आम्हाला आकाशवाणी अकोल्याला मिळालं.

खरंतर आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करताना केवळ आपला आवाज श्रोत्यापर्यंत जात असतो; बोलणारी व्यक्ती श्रोत्याला दिसत नसते, त्यामुळे आवाजावर नियंत्रण आणि चढ-उतार याला निवेदनात खूप महत्त्व असते. आवाजावर स्वतःची पकड कशी निर्माण करायची ह्याचं शिक्षण प्रशिक्षण आम्हाला तिथले उद्घोषक संजय ठाकरे सर यांनी खूप छान दिलं.

2005 ला सखी मंचच्या एका कार्यक्रमाहून येताना रात्री साडेदहाला माझा जोरदार एक्सीडेंट झाला आणि त्यानंतर पप्पांनी निक्षुन सांगितलं की आता सखी मंच बंद करायचं. म्हणजे तोपर्यंत माझं असं सुरू होतं की, दिवसभर सखी मंचच्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करायचं, त्यासाठी स्थानिक महिलांची मदत घ्यायची आणि संध्याकाळी आकाशवाणीच्या केंद्रात जाऊन कार्यक्रम सादर करायचा.

पण कार्यक्रमाहून घरी यायला रात्री कधीकधी फार उशीर व्हायचा. माझ्या पप्पांना ते अजिबात आवडत नसे. आजूबाजूचे लोकही कुरकुर करत भावसार यांची लहानी रात्री उशिरा घरी येते. पण सखी मंचला असताना एक गोष्ट खूप छान घडली, माझं रोज लोकमत वृत्तपत्रांमध्ये नाव यायचं. सखी मंचच्या कार्यक्रम संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर आणि नाव छापून येई. काही काही लोक तर ही आपल्याच भावसार जातीची मुलगी आहे का हे पडताळून पाहण्यासाठी ऑफिसमध्ये मला भेटायला यायचे त्या वेळी मला त्या गोष्टींची खूप गंमत वाटायची.

मग ताईच्या आग्रहाखातर मी बी.एड.ची एंट्रन्स दिली आणि २००६ ला बी.एड.ला माझा बुलढाण्याला नंबर लागला.

बुलढाण्याला मावशीकडे राहायला गेले पण तिच्या घरापासून माझे कॉलेज जवळपास पाच किलोमीटर लांब होते. बुलढाण्याला जाताना घरून सायकलवर निघाले आणि बस स्टॅन्ड ला एका हमालाच्या मदतीने ती सायकल मी बसच्या टपावर टाकली. बुलढाण्यालाही सायकलवरूनच मी मावशीच्या घरी पोहोचले. आयुष्यात प्रत्येक काम स्वतः करायचे हे बाळकडू पप्पांनी दिलेले असल्यामुळे मला कुठल्याच कामाची लाज वाटली नाही आणि भीतीही.

पण त्यावेळी घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिघडलेली होती. मी नोकरी करणे क्रमप्राप्त होते. पण बुलढाण्याला राहून ते शक्य नव्हते; त्यामुळे मला कसेही करून अकोल्याला परत यायचे होते. नशिबाने एका मुलीला बुलढाणा हवे होते. तिने अगदी पुण्याहून म्युचल ट्रान्सफर ची ऑर्डर आणली आणि मी अकोल्याला परत आले.

मधल्या काळात 2004 मध्ये माझ्या तिसऱ्या बहिणीचे लग्न झाले होते. मोठ्या ताईच्या मुलाला आमच्या घरी ऍडजेस्ट करणे जरा जडच गेले. सासरहुन परत आल्यावर ताईने लगेच नोकरीसाठी शोधाशोध केली आणि एक प्रायव्हेट शाळेत तिला नोकरीही मिळाली. ताईने स्वतःच्या शाळेत तिच्या मुलाची-सनीची पहिलीला ऍडमिशन करून घेतली. सखी मंच मध्ये माझी निवड झाल्याने मला मानधन मिळत होते. त्या मानधनातून मी सनीला कधी बगीच्यात घेऊन जायचे, तर कधी सिनेमाला. सनीचे बालमन रमावे एवढाच माझा त्यात उद्देश होता.

मी आणि सनीने मिळून किती सिनेमे बघितले असतील माहित नाही. हॅरी पॉटर सिरीज मधले, स्पायडरमॅन सिरीज मधले, बंटी और बबली, क्रिश, दस,असे कितीतरी सिनेमे आम्ही बघितले.

त्यावेळी मी जितका वेळ माझ्या भाच्याला देऊ शकले आणि त्याच्यासोबत जितकी मजा मस्ती केली, त्यातला अर्धा वेळही मी आता माझ्या स्वतःच्या मुलांना देऊ शकत नाही त्याची खंत मनात आहे.

2005 ला माझ्या तीन नंबरच्या बहिणीची डिलिव्हरी होती. डिलेवरी साठी तिला माहेरी आणायचे होते; त्याचवेळी मुंबईला खूप पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. 2005 चा पाऊस म्हटला की आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा येत असेल. कितीतरी लोक आठवडाभर त्यांच्या ऑफिसमध्ये अडकून पडले होते; आणि पप्पांना हार्ट अटॅक येऊन गेल्यामुळे, ते अकोला ते नाशिक हा प्रवास करू शकत नव्हते पण तीन नंबरच्या बहिणीची सासू, 'माहेरचे कोणी घ्यायला आल्याशिवाय मी तिला डिलिव्हरीसाठी पाठवणार नाही अशा हट्टला पेटली होती.' नाशिकला जाण्यासाठी मी तीनदा रीजर्वेशन केले आणि प्रत्येक वेळी रेल्वे कॅन्सल होत होती. शेवटी एसटी महामंडळाच्या बसने मी नाशिकला गेले.

सकाळी साडेसातला अकोल्याहून निघालेली बस संध्याकाळी साडेसहाला नाशिकला पोहोचली. जिजाजी मला घ्यायला आले होते. रात्रभर थांबून दुसऱ्या दिवशीच्या स्पेशल ट्रेनने मी आणि माझी तीन नंबरची बहीण अकोल्याला परत आलो. माझ्या त्या बहिणीच्या सासूचा आडमुठेपणा पाहून मला मनस्वी चीड आली होती. समोरच्याची अडचण जाणून न घेता केवळ स्वतःचाच हेका मीरवणारी अशी लोक दिसली की मला अजूनही संताप येतो.

2006 ला मी बी.एड.ला प्रवेश घेतला हे मगाशीच सांगितलं. बी.एड. कॉलेज माझ्या घरापासून जवळपास पाच किलोमीटर लांब होतं. माझ्या घरापासून अर्धा किलोमीटर चालत गेल्यावर बसचा स्टॉप होता त्यामुळे सकाळी साडेदहाची बस मला काहीही करून पकडावीच लागे. ती बस चुकल्यावर मग नंतर दुसरी कुठलीही बस नसायची. नेमकं त्याचवेळी आईच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे सकाळी साडेदहापर्यंत स्वयंपाक करून, डब्यात दोन पोळ्या आणि भाजी भरून मी बस स्टॉप वर बसची वाट पाहत उभी राही. एका हातात फळा, शैक्षणिक साधने, दुसऱ्या खांद्यावर बॅग आणि बस मधली गर्दी अशी सर्कस करत मी धावत पळत कॉलेज गाठण्याचा प्रयत्न करी. सकाळी 11 वाजता माझे कॉलेज सुरू होत असे. बस जिथे थांबेल तिथूनही कॉलेजपर्यंत पोहोचायला दहा मिनिटे चालत जावे लागे.

कॉलेजमध्ये पोहोचायला पाच मिनिटं जरी वेळ झाला तरीही 'खताळ सर' लेट मार्क लावायचे. आमचे हे सर खूपच कडक शिस्तीचे होते. त्यामुळे कॉलेजमध्ये उशीर होऊ नये आणि सलग तीन लेट मार्क लागले की एक सुट्टी असा नियम असल्याने, वेळेवर कॉलेजमध्ये पोहोचण्यासाठी घरी स्वयंपाक तयार असूनही, भूक लागलेली असूनही, मी डब्यात दोन पोळ्या घेऊन बसची वाट धरे.

संध्याकाळी साडेपाचला कॉलेज संपले की, कॉलेज पासून परत तीन-साडेतीन किलोमीटर आकाशवाणी पर्यंत चालत येऊन, संध्याकाळी साडेपाच ते सात तिथे युवावाणी कार्यक्रम सादर करून, मी संध्याकाळी साडेसातला घरी येई.

घरी आल्यावर खूप थकून जायला होत असे. पण तरीही पर्याय नव्हता. मी धावपळ केली त्याचं चीज झालं आणि मला बी.एड.ला 75 टक्के गुण मिळाले. पण या गुणांचाही काही उपयोग नव्हता कारण मला सरकारी नोकरी लागणार नव्हती.

म्हणून घराजवळच्याच एका कॉन्व्हेंट मध्ये मी प्राथमिक विभागात नोकरी सुरू केली. त्या शाळेमध्ये दुपारी मुलांना कम्प्युटर शिकवण्याची ऑफर तिथल्या मुख्याध्यापकांनी मला दिली. मी ती स्वीकारली. सकाळी साडेसातला घरून निघायचं साडेबारापर्यंत सकाळची शाळा करायची. घरी येऊन जेवण करायचं आणि दीड वाजता परत दुपारच्या मुलांना शिकवायला जायचं. पाच वाजता घरी आलो की परत फ्रेश होऊन आकाशवाणीत ड्युटी साठी पळायचे. माझी तारेवरची कसरत सुरूच होती.

पण या दुसऱ्या शाळेमधल्या माध्यमिक विभागातल्या एका सरांना माझ्यापासून काय प्रॉब्लेम होता कुणास ठाऊक त्यांनी माझ्याविरुद्ध त्या शाळेत कुभांड रचले. माझ्याविरुद्ध मुलांकडून खोटे नाटे अभिप्राय आणि कंप्लेंट लिहून घेतल्या, पण त्याच शाळेचे ज्युनिअर कॉलेज मधले सर माझ्या ओळखीचे होते. बारावीला मी त्यांच्याकडे भौतिकशास्त्राची शिकवणी लावली होती. मी माझ्या त्या भौतिकशास्त्राच्या सरांना, झालेलं सगळं घाणेरडे राजकारण सांगितलं. त्या सरांनी मग संस्थेच्या अध्यक्षांना माझ्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या शिक्षकांविषयी सांगितलं आणि त्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली. पण झालेला प्रकार माझ्यासाठी खूप धक्कादायक होता आणि मी ती शाळा सोडली.

दरम्यानच्या काळात माझ्या इतर मैत्रिणींची लग्न केव्हाच झाली होती,आणि एक दिवस अचानक माझ्या पप्पांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातून ते वाचले खरे पण माझं लग्न ही बाब आता त्यांच्या लेखी सर्वोच्च प्राथमिकतेची होती. त्यातच भांडेकरांच स्थळ मला चालून आलं. चंद्रशेखर भांडेकर एम. एस. सी. कम्प्युटर झालेले, स्वतःचा कम्प्युटर हार्डवेअरचा व्यवसाय असणारे, तेही घरात सर्वात लहान. घरी शेती, चार भावांच्या परिवारात सर्वांचे उत्पन्नाचे साधन वेगवेगळे. शेतीवर कुणीही अवलंबून नव्हते, नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. साधेपणाने विवाह पार पडला. चौकोनी कुटुंबातून मी दहा-बारा जणांच्या गोकुळात आले.

घरी सासूबाईंचं आणि नंणदांच कडक सोवळ. सणवार अगदी रीतीनुसार होत. आजही होतात. घरात सनातनी वातावरण, कुळधर्म, कुळाचार सगळच आहे. सगळे सण अगदी साग्र संगीत आजही साजरे केल्या जातात.हे सगळं सांगण्याचे कारण म्हणजे आमचे अहो मुळातच अबोल आणि ह्या सगळ्या धबडग्यात आणि व्यवसायाच्या टेन्शनमध्ये त्यांना माझ्याशी बोलायला फारसा वेळ मिळतच नव्हता. तसा तो आजही मिळत नाही तो भाग वेगळा.

लग्नाच्या एका वर्षातच मी एका गोंडस परीला जन्म दिला. घरात मोठ्या दोन्ही जावांना मुलीच असल्यामुळे माझ्या मुलीच्या आगमनाने आनंदापेक्षा सगळ्यांच्याच डोक्यावर आठ्याच जास्त पसरल्या.

पण आयुष्य कोणासाठी थांबत नसतं. ते त्याच्या वेगाने पुढे जात राहते. मधल्या काळात मी नागपूर विद्यापीठातून प्रथम श्रेणीत एम.एड. पूर्ण केलं. पण तिथेही संघर्ष माझ्या पाचवीला पुजलेला. एम. एड. ची एंट्रन्स दिल्यावर नवरा म्हणाला पेमेंट वाली सीट घ्यायची नाही. पण एंट्रन्स मध्ये चांगले मार्क्स असल्याने गव्हर्नमेंट सीट मिळाली आणि पी.जी. डिपार्टमेंटला माझ्या ऍडमिशन झाली. त्यावेळी आमच्याकडे एकच एक्टिवा होती. मोठ्या जाऊबाई म्हणाल्या, "मी एक्टिवा देणार नाही. मला घरातली काम असतात, मुलींच्या ट्युशन्स असतात." मी पण गाडी हवी म्हणून हट्ट केला नाही. सकाळी लवकर उठून माझं आणि मुलीचं आवरून, घरातल्या सगळ्यांसाठी कुकर लावून, कणिक भिजवून, मी मुलीला माझ्या सासूबाई जवळ नेऊन ठेवे, कारण तेव्हा माझं घर बांधणं सुरू होतं, त्यामुळे सासुबाई आणि लहान दीर री-कन्स्ट्रक्शनवाल्या घराच्या दोन खोल्यांमध्ये राहात होते. दोन नणंदा मी आणि मोठ्या जाऊ बाई फ्लॅटमध्ये राहत होतो. मुलीला सासूबाई जवळ सोडून, मी परत फ्लॅट जवळच्या बस स्टॉप वर उभी राही आणि कॉलेजला जाई. कॉलेजला जाताना दोनदा बस बदलावी लागे. ऑफिस टाइमिंग असल्याने बसेसला प्रचंड गर्दी असे आणि इतर वाईट अनुभव जे सगळ्या बायकांना येतात ते मलाही येत होते. मधल्या काळात जावेनी आणि नंणदेने नवऱ्याचे काय कान खाल्ले कुणास ठाऊक? त्यांनी माझे कॉलेजमध्ये जाणे बंद केले. मग मधल्या दिरांच्या सांगण्यावरून नवरा ऑफिसला गेल्या नंतर मी कॉलेजला जाई. आमच्या कॉलेजचा नियम होता 80 टक्के उपस्थिती असल्याशिवाय ते परीक्षेला बसू देत नसत; त्यामुळे मला रोज कॉलेजला जाणे भाग होते. कॉलेजच्या वार्षिक परीक्षेच्या शेवटच्या पेपरला नवऱ्याने मला नवीन एक्टिवा घेऊन दिली. साडेचारला कॉलेज सुटल्यावर घरी येऊन, परत रात्रीचा सगळ्यांचा स्वयंपाक, स्वयंपाक झाला की लगेच डबा घेऊन सासूबाई कडे जात होते. दिवसभर मला सोडून राहिल्याने माझी लेक मला अधिकच बिलगे.

2014 मध्ये माझे वडील हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वारले. त्याच्या एक दिवस आधी नंणदेने नवऱ्याला माझ्याविषयी काही बाही सांगून घरात खूप तमाशा केला होता. या सगळ्या गोंधळात मी माझ्या वडिलांशी फोनवर अखेरचे बोलु सुध्दा शकले नाही, ती सल अजूनही माझ्या मनात बोचत राहते.


काही वैयक्तिक आणि पारिवारिक कारणांनी माझे सलग तीन गर्भपात झाले होते त्यामुळे, मी मानसिक आणि भावनिकरीत्या फारच हळवी झाले होते. पण ज्याला यायचे असते तो येतोच आणि मला परत एकदा मातृत्वाची चाहूल लागली. यावेळी मात्र माझ्या जोडीदाराने माझी छान काळजी घेतली.

पहिल्यावेळी ते कधीच माझ्या तपासणी करता डॉक्टरांकडे आले नव्हते पण, यावेळी मात्र दर महिन्याला ते स्वतः जातीने मला डॉक्टरांकडे घेऊन जात. मला कडक डोहाळ्यांचा त्रास होत होता तेव्हा, माझ्या खाण्यापिण्याकडे ते जातीने लक्ष घालत. घरी मात्र नंणदांच अखंड आकांड-तांडव सुरूच होत. 'बायकोचे फजील लाड करतो, आम्ही नाही पाहिल्या एवढ्या तपासण्या आणि डॉक्टरच्या वाऱ्या, फारच कौतुकाची बायको आहे.' वैगेरे वैगेरे ……. अजून काय काय.

यथावकाश 27 जुलै 2017ला मी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर जे काही झालं आहे ते मी माझ्या मागील एका लेखात लिहिलं आहे त्याचा पुनरुच्चार करत नाही. पण डिलिव्हरी मध्ये झालेल्या कॉम्प्लिकेशनच्या वेळी नवऱ्याने माझ्यासाठी जो अमाप पैसा खर्च केला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून माझं ऑपरेशन होत असताना त्याने केलेलं दोनदा रक्तदान, आणि ऑगस्ट महिन्याच्या भर पावसात आय.सी.यू. च्या बाहेर देवाची माझ्यासाठी भाकलेली करुणा मी आयुष्यभरात कधीच विसरू शकणार नाही. असं वाटलं जीवावरच्या दुखण्यातून मी बचावले. मुलगाही झाला, वाटलं आता सगळं सुरळीत होईल. पण सगळं सुरळीत होईल याला आयुष्य थोडीच म्हणतात?

2018 च्या डिसेंबर मध्ये माझे सगळ्यात मोठे दीर वारले. चौघा भावांमधले ते सगळ्यात मोठे तर माझे पती सगळ्यात लहान. कोरोनाच्या सेकंड वेव मध्ये माझे मधले दीर गेले आणि घरातला माझा मोठाच आधार गेला. एम.एड.च्या वेळी मला पाठिंबा देणारे, नवऱ्याच्या मनातलं संशय पिशाच्च उतरवण्यासाठी प्रयत्न करणारे, माझे दीर गेले, तेव्हा मला काय वाटलं ते मी शब्दात सांगू शकत नाही.

2021 सालचा तो मे महिना विसरु म्हणता मला विसरता येत नाही. मधले दीर आय.सी.यू. मध्ये होते. नवराही कोरोना केअर सेंटरला होता. मी पण पॉझिटिव्ह होते. माझी दोन्ही लेकरं माझ्याजवळ होती. मधल्या फ्लोअर वर नणंद आणि लहान दीर तेही क्वारंटाईन. तर पहिल्या माळ्यावर माझ्या दोन पुतण्या क्वारंटाईन. एकाच बिल्डिंगमध्ये असूनही आम्ही एकमेकांसाठी काहीच करू शकत नव्हतो. मधले दीर गेल्यानंतर माझ्या नवऱ्याचा धीर खूपच खचला होता, आणि आधी घडलेल्या प्रसंगाचा राग ते माझ्यावर काढत होते. त्यावेळी तर माझ्या सहनशक्तीचा अगदी कस लागला होता.

लग्न झाल्यावर एकदा नव्हे तर दोनदा मला विमान प्रवास घडवणारा, दुसऱ्या बाळंतपणात मोठ्या सर्जरीच्या वेळी माझ्यासाठी दोनदा रक्तदान करणारा, मुंबईला इंजेक्शन्स मिळत नाही म्हणून बेंगलोर, चेन्नईहून इंजेक्शन्स मागवणारा माझा नवरा, भर पावसात स्वतःच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करून माझ्यासाठी देवाकडे आयुष्य मागणारा नवरा, बायकोचा जीव वाचला पाहिजे म्हणून पाण्यासारखा पैसा खर्च करणारा माझा नवरा, तो हाच का असा प्रश्न मला वारंवार पडत राहतो.

पण प्रश्नांच्या उत्तरांचा शोध म्हणजेच कदाचित आयुष्य असावे. 2020 मध्ये मला ईरा व्यासपीठ लिखाणासाठी माझ्या बहिणीने सुचवलं आणि मी लिहिते आहे.

इथेही मला खूप छान मैत्रिणी मिळाल्या. लेखन प्रवास सुरू आहे; थोडं फार यश मिळालं आहे; पण अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा स्त्री आई झाली की, ती मागे वळून पाहू ही शकत नाही आणि जाऊ पण शकत नाही. म्हणूनच आई पण भारी देवा.

एकल कुटुंबातून तुम्ही जेव्हा एकत्र, मोठ्या कुटुंबात येता त्यावेळी नवऱ्याचा आधार असेल तर गोष्टी खूपच सहज आणि सोप्या होतात; पण तो जर नसेल तर घरात तुम्हाला काहीच किंमत नसते. याची अनुभूती मला लग्नाच्या 14 वर्षानंतरही वारंवार येते. म्हणूनच स्वतःला शोधण्यासाठी मी लेखणीलाच माझा आधार मानते.

आयुष्यात क्षणोक्षणी मला हेच जाणवलं की, 'दोन घडीचा डाव त्याला जीवन असे नाव.'

लिहिण्यासारखं पुष्कळ आहे पण आता काहीतरी मोठं केल्यावर. कुणीतरी माझी दखल घेण्यासारखं कर्तुत्व गाजवल्यानंतरच लिहायचंय तोपर्यंत………..

पूर्णविराम!

©® राखी भावसार भांडेकर
नागपूर.