Feb 29, 2024
पुरुषवादी

दोन घडीचा डाव! भाग -१

Read Later
दोन घडीचा डाव! भाग -१

दोन घडीचा डाव!

भाग -एक.

"डॉक्टर, बेड नंबर सहाच्या पेशंटला शुद्ध आलीये. सकाळी थोडे पाणी प्यायला तो." राऊंडला आलेल्या डॉक्टर श्रीनयला वॉर्डमधल्या इन्चार्ज सिस्टर सांगत होती.


"ओके. गुड! काही बोललेत का ते? त्यांच्याबद्दल काही माहिती सांगितली?" डॉक्टर श्रीनय विचारत होते.


"नाही. बोलण्याच्या अवस्थेत तर नाही वाटले मला. काहीतरी \"चित्रा..\" असं बडबडताना दिसले पण तेवढ्यापुरतंच. आता परत झोपलाय तो म्हातारा."


"सिस्टर, काय हो? असं नसतं बोलायचं. वयाने आपल्यापेक्षा मोठे आहेत ते आजोबा. रिस्पेक्ट नाही तर किमान आजोबा तरी म्हणू शकता ना?" श्रीनय जरा नाखुशीने तिच्याकडे बघत म्हणाला.


"सॉरी सर. पण कधीकधी पेशंटशी कुठले नाते जोडायला नको वाटतं." ती म्हणाली.


"ओके, आपल्या हॉस्पिटलला आहेत तोवर त्यांना आजोबा म्हणा, बाहेर गेल्यावर ओळख नाही दाखवली तरी चालेल. चला आता राऊंडला."


"तुम्ही अजून लहान आहात डॉक्टर. दुनियादारी कुठे अजून तुम्हाला कळलीय? अशीच नाते जोडत असताना मी मनिषच्या प्रेमात पडले, त्याच्याशी लग्न केलं आणि दोन वर्षात माझ्यावर चारित्र्यहीनाचा ठपका ठेवून तो मला सोडून निघून गेला. नंतर मला कळलं की हीन चारित्र्याचा तर तोच होता. माझ्याआधी दोन मुलींना त्याने फसवले होते. तेव्हापासून भीती वाटते हो कोणाशी नाते जोडायला."


"सिस्टर, भूतकाळ जर वेदनादायक असेल तर त्याला फारसे चघळत बसू नये. आणि सहा नंबरचे ते पेशंट आजोबा वृद्ध आहेत. मिनिमम पंच्याहत्तर वर्षांचे. या वयात ते काय आपल्याला धोका देणार? सो चिल अँड लेट्स गो." श्रीनय हसला तसे सिस्टर देखील मान डोलावून हसली.

*******

"गुडमॉर्निंग आजोबा! कसे आहात? इतर पेशंटना तपासून डॉक्टर श्रीनय सहा नंबरच्या बेडकडे आले.


"आय एम फाईन डॉक्टर." थरथरत्या आवाजात पेशंटने उत्तर दिले.

"तुमचं नाव सांगू शकाल? आठवतेय ना तुम्हाला?" श्रीनयच्या प्रश्नावर उत्तरादाखल तो म्हातारा हसला.


"यू नो डॉक्टर? द ग्रेट राईटर शेक्सपियर टोल्ड द्याट व्हॉट इज इन द नेम? सो व्हॉट इज इन द नेम?" त्याने प्रश्नार्थक श्रीनयकडे पाहिले.


"हो,पण आम्हाला केस पेपरवर तुमचं नाव लिहावं लागतं. तेव्हा नाव सांगाल तर कृपा होईल आजोबा." नर्सच्या खणखणीत आवाजाने त्याने तिरकसपणे तिच्याकडे पाहिले आणि मग पुन्हा नजर श्रीनयकडे वळवली.


"डॉक्टर आय एम श्रीधर. श्रीधर नाव आहे माझं." दुसऱ्यांदा बोलला तेव्हा त्याने नर्सकडे कटाक्ष टाकला.


"आजोबा इंग्लिश कळतं बरं का मला." कसेनुसे तोंड करून त्याचे नाव लिहीत नर्स म्हणाली.


"आणि राहता कुठे?" तिच्या प्रश्नावर श्रीधर पुन्हा हसला.


"लुक आऊटसाईड. द्याट ओपन स्काय इज माय होम. धिस ब्युटीफूल नेचर इज माय नेबरहूड!" श्रीधर खिडकीतून बाहेर बघत उत्तरला.


"ओ आजोबा, तुम्हाला सरळ काही बोलता येत नाही का हो?" आता नर्स खरच चिडली होती.


"सिस्टर चुकीचं काय बोललो? मी मोकळ्या आकाशाखाली तर राहतो. तेच माझं घर, तोच माझा निवारा. बाकी उरतो तो सगळा पसारा."


"येड लागलय म्हातार्‍याला. डॉक्टर तुम्हालाच काय विचारायचं ते विचारा. एवढा मरणाच्या दारातून आला तरी यांची अक्कड नाही गेली." सिस्टर मागे सरत म्हणाली.


"अहो आजोबा, डिस्चार्ज झाल्यावर तुम्ही कुठे जाणार आहात?" श्रीनयने तोच प्रश्न दुसऱ्या बाजूने फिरवून विचारला.


"कुठे जाणार? तेच तर सांगतोय. पाय नेतील तिकडे जाणार. या मोकळ्या आकाशात विहारणार आणि एक दिवस स्वतःला झोकून देणार." श्रीधर.


"डॉक्टर, हा पेशंट जरा सनकी दिसतोय. याला काय द्यायचं ते सांगा आणि पुढच्या पेशंटकडे चला. याच्याकडे रिकामा वेळ असेल पण आपली भरपूर काम पडली आहेत." त्याला काय द्यायचे त्या औषधांची नावे सांगून श्रीनय नर्ससोबत पुढच्या पेशंटकडे गेला.


"बघितलंत डॉक्टर, असे असतात काही पेशंट. म्हणून मला कोणाशी नातं जोडायला आवडत नाही. आपण विचारतोय काय आणि तो काय सांगत होता? ठार वेडा आहे तो." नर्स नुसती धुसमसत होती.


"बहुतेक त्यांच्यावर कशाचा तरी परिणाम झालाय हो सिस्टर. इथे आहेत तोवर आपली जबाबदारी." श्रीनय हसून म्हणाला.

******

"येड लागलंय म्हाताऱ्याला." सिस्टर जे बोलली तेच श्रीधरच्या डोक्यात फिरत होते.


'एम आय मॅड? नो, नो, नेव्हर. श्रीधर इज व्हेरी स्मार्ट, ब्रिलिअन्ट, क्लेवर! मग ती नर्स का तशी म्हणाली? खरंच वेडा झालोय का मी? ती नर्स म्हणते तसा सनकी आहे मी? अकडू आहे मी?' तो स्वतःलाच विचारत होता.  'हो तसाच तर आहे, म्हणून माझी ही वाताहात झालीय.' त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले.


'मी हा असा, पडलोय मृत्यूशय्येवर. अस्थीपंजर झालेले माझे शरीर अन बोथट झालेल्या संवेदना.. मृत्यूच्या प्रतीक्षेत क्षणाक्षणाला तरसत असलेली ही डोळ्यांतील बुब्बूळे. डोळ्यांच्या तर खाचा झाल्यात. हे तर तेच डोळे ना, ज्यांच्यावर कित्येक ललना आजवर भाळल्या होत्या. आता मात्र कुणीच सोबत नाहीत. कुणी असावीत ही अपेक्षाही नाही. आज माझ्या आयुष्याची अखेरची घटका असावी असे वाटते आहे.

प्रामाणिकपणे सांगू? आज मात्र मला तिची खूप आठवण येतेय. मी अखेरचा श्वास सोडल्यानंतर तरी तिला माझी आठवण येईल का? तिच्या डोळ्यातून दोन टीपं गळतील माझ्यासाठी?' त्याच्या घाऱ्या डोळ्यातील थेंब गालावर येऊन विसावले.

त्या अश्रुंची आता ना कोणाला पर्वा होती अन ना खंत! वाहणाऱ्या डोळ्यात त्याची नजर धूसर होत गेली. समोरचे नीटसे त्याला काही दिसत नव्हते, भूतकाळ मात्र त्या धूसर रस्त्यातून मार्ग काढत त्याच्यासमोर उभा ठाकत होता.


"ती बघा.. तीच ती चित्रा! चेहऱ्यावर अजूनही तोच करारीपणा आहे. आणि ती? ती लिली. कशी दात विचकटवून फिदी फिदी हसतेय. लिली.. आय हेट यू, आय हेट यू."


शेवटचे वाक्य तो पूर्ण जोर एकवटून बोलला. त्याच्या जोराच्या आवाजाने इतर पेशंट त्याच्याकडे बघायला लागले. रागाने त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या. आणि त्यामुळे त्याची सलाईन निघून रक्त वाहू लागले होते.


"ओ आजोबा, काय चाललंय तुमचं? कशाला गोंधळ घालताय?" नर्स त्याच्याकडे धावत येत म्हणाली.


"ए, तू बाजूला हो." नर्सकडे त्याने रागीट नजर टाकली.

"ती बघ लिली कशी हसतेय? आणि ती एकटीच नाहीये. तिच्यासोबत आणखी खूप जणी आहेत. ती वानिता, ती राखी.. अजून बऱ्याच. सगळ्या इथे जमा झाल्या आहेत." तो तसाच पुढे बोलत होता.


"लिली माहित नाही, पण तुमच्या रक्ताने सगळीकडे लालेलाल होत आहे. वेडा आहे म्हातारा." त्याच्या हाताला पुन्हा सलाईन लावायचा प्रयत्न करत नर्स म्हणाली.


"हो, आहे मी वेडा. श्रीधर इज फूल. श्रीधर इज मॅड. बट यू कॅन्ट जज मी बाय माय फुलिशनेस. यू डोन्ट नो, हू एम आय." बोलताना त्याला धाप लागत होती.


"आजोबा, गुमान सलाईन लाऊ द्या. नाहीतर मी सरांना बोलावेन बरं." ती त्याचा हात नीट पकडत थोडाशा रागाने म्हणाली.


"एय, मी नाही घाबरत कोणाला. फक्त रिस्पेक्ट करतो तेही माझ्या आईचा."तो पुन्हा हात झिडकारून म्हणाला.


"ती बघ माझी आई, माझ्यासाठी डोळ्यात पाणी घेऊन उभी आहे. आई मला माफ करशील ना? तुझा श्रीधर चुकलाय गं. आता तुझ्याजवळ तुझ्या कुशीत येऊन मला माझ्या चुकांची कबुली द्यायची आहे. आई रडू नकोस ना गं. अशा नालायक मुलासाठी तू नको ना डोळ्यात पाणी आणू." त्याचा आवाज हळूहळू क्षीण होत चालला होता.

:

क्रमश :

©®Dr. Vrunda F. ( वसुंधरा..)

कोण आहे हा श्रीधर? काय झालेय त्याला? वाचा पुढील भागात.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//