दोन घडीचा डाव! भाग -१०

कथा एका विस्कतलेल्या डावाची!

दोन घडीचा डाव!

भाग-दहा.


"मुलं कशाला घराबाहेर काढतील? मीच सर्वांशी नाते तोडलेय. तुम्हाला माझ्याविषयी ऐकायची खूप हौस आहे ना? मग ऐकाच माझी कहाणी. ऐकल्यावर तुम्हालाही लाज वाटेल माझ्याशी नाते जोडायची. मग ते नातं माणुसकीचे असू दे नाहीतर आणखी कुठले." त्याच्या नजरेला नजर देत श्रीधर बोलत होता.


"मी श्रीधर. एक सुशिक्षित, उच्चभ्रू सोसायटी मध्ये राहणारा. उच्च पदावर कार्यरत असणारा. सगळं कसं उच्च कोटीचं. पण हे फार दिवस नाही उपभोगू शकलोय. शून्यातून विश्व उभारले मी. हात जणू गगनाला पोहचले होते. असं वाटायचं आता कोणत्याही क्षणी सूर्याला स्पर्शू शकेल. असा लोभ, हव्यास खूप वाईट रे. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणे केव्हाही चुकीचेच. आयुष्यात बक्कळ पैसा कमावला आणि मग हळूहळू गुर्मी चढायला लागली अंगात. गुर्मी.. पैश्यांची. गुर्मी.. अहंकाराची. अन त्या गुर्मीनेच रसातळाला पोहचलो मी."त्याच्या डोळ्यातून धार लागली होती.


"आजोबा, शांत व्हा. तुम्हाला त्रास होत असेल तर आपण आत्ता नको बोलायला. नंतर मग कधी निवांत बोलूया." त्याच्या डोळ्यातील पाणी बघून श्रीनय म्हणाला.


"त्रास? हो, खरंच होतोय मला त्रास. आपल्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या माणसाला आपल्यामुळेजो त्रास होतो, त्यापेक्षा माझा त्रास कमीच म्हणायचा. मीच दिला ना तिला त्रास, मनस्ताप. मग त्याची सजा मला मिळायला नको का? तीच सजा भोगतोय मी. आता या त्रासातून काही सुटका नाही बघ." त्याच्या ओठावर हसू आले. छोट्याशा स्मितातून लगेच त्याचे रूपांतर गडगडाटी हास्यात झाले. त्याच्या चेहऱ्यावर वेडसरपणाची झाक झळकत होती.


"कसले भारी बोलता हो? काय काय ते शब्दप्रयोग. कॉलेजमध्ये असताना नाटकात वगैरे काम करायचात काय हो? की प्रेमपत्र लिहीत बसायचात?" श्रीधरचा मूड बदलावा म्हणून श्रीनयने विषय बदलायचे ठरवले.


"नाटक!" श्रीधरच्या हसण्याचा आवाज एकदम थांबला. "नाटकंच तर करत आलोय मी आयुष्यभर. कधी बायकोशी तर कधी स्वतःचीच. सगळी फसवणूक साली. आता या नाटकाचा एन्ड नाही. ते तर माझ्यावरच उलटलेय. माझी सुटका नाही हो यातून." चेहऱ्यावर पुन्हा छद्मी हास्य उमटले.

"आणि काय, प्रेमपत्र म्हणालात ना? लिहायचो मी प्रेमपत्र. इंग्लिश लिटरेचर शिकताना शेक्स्पिअर असा नसानसात भिनला होता की त्याने अजुनपर्यंत माझा पिच्छा सोडला नाहीये. कित्येकींना लिहिली होती मी प्रेमपत्रे. पण केवळ टाइमपास म्हणून. खरंखूर प्रेमपत्र तर एकीच्याच नावाने लिहिले होते."

"ओहो, आजोबा? प्रेमात पडला होतात की काय? मला आवडेल तुमची स्टोरी आवडायला. तरी मला गेस करू दे, हम्म.. चित्रा? चित्रा होती का ती? हॉस्पिटलमध्ये असताना त्याच नावाचा तुमचा जप चाललेला असायचा." त्याच्याकडे बघून श्रीनय दिलखुलास हसला.


"सुमन. सुमन होती ती. नाजूकशी, गुलाबाच्या नुकत्याच उमललेल्या फुलासारखी. पार वेडा झालो होतो तिच्या प्रेमात. तिच्यासाठीच पहिल्यांदा उचलली होती लेखणी, आणि गुंफले होते शब्दफुलांना एकाच माळेत. ती शब्दफुलांची माळ देतानाच घातली होती तिला लग्नाला मागणी. जन्मोजन्मी तीच मिळावी, म्हणून भारलो होतो वचनांनी."


"वॉव! आजोबा किती सुंदर बोलताय? इंटरेस्टिंग. मग पुढे काय झाले?" श्रीनय रंगत चालला होता. सायंकाळी त्याचे हॉस्पिटल नव्हते त्यामुळे तो निवांत होता.


"नकार. नकार दिला तिने." श्रीधरच्या आवाजाला एकाएकी रागाची किनार जाणवू लागली. "म्हणाली, केवळ प्रेमाने संसार होत नाही. त्यासाठी पैसा लागतो. माझ्या नजरेसमोर तिने आपल्या एका धनाढ्य मित्रासोबत लग्न करतेय असे सर्वांसमोर जाहीर केले. अपमान केला रे तिने माझा. अव्हेरले तिने माझे प्रेम. का? तर त्यावेळी एक कफल्लक होतो म्हणून? मनात आणलं असतं तर स्वकष्टाने तिच्यासाठी राजमहाल उभारला असता मी. तेवढी धमक होती माझ्यात. पण तिने दुसरा चान्सच दिला नाही." त्याच्या डोळयात अंगार पेटला होता. 


"ओह, सॉरी." श्रीनयाच्या तोंडून आपसूकच निघून गेले.


"तू का सॉरी म्हणतोस? चूक तर माझ्या हातून घडली ना. चूक नाही, खूप मोठा गुन्हा केला मी. गुन्हेगार आहे मी तिचा." श्रीधर परत हतबल झाल्यासारखा बोलायला लागला.


"सुमनचा? पण तिनेच तर तुम्हाला नकार.."


"चित्राचा." श्रीनयचे बोलणे मध्येच थांबवत तो म्हणाला.


"चित्राचा गुन्हेगार आहे मी. सुमनने मला नाकारले. तिचा तो नकार नाही पचवू शकलो मी. मनात एकच ध्यास होता, कोणीतरी मोठं बनण्याचा! पण त्यासाठी पैसा हवा होता. सुमनच बोलली होती ना की संसार फक्त प्रेमावर चालत नाही तर सोबतीला पैसा हवा असतो म्हणून. मग मीही कॉलेजमधील मुलींसमोर प्रेमाचे जाळे पसरवायला सुरुवात केली. माझं बोलणं, माझं रूप, हुशारी.. कित्येक मुली भाळायच्या माझ्यावर. पण लग्नाला तयार होणारी अशी एकही श्रीमंत मुलगी नजरेसमोर येत नव्हती." त्याने एक लांब श्वास घेतला. मघापासून बोलत असल्यामुळे घसा सुकला होता.


"पाणी?" त्याच्यापुढे ग्लास ठेवत श्रीनय.


त्याने सावकाश पाण्याचा घोट घेतला. नजर जराशी स्थिर झाली होती. "डॉक्टर, तुम्ही आता जाऊ शकता. माझं बोलून झालं आता."

"असं कसं? तुम्ही तर मला तुमच्याबद्दल सारं काही सांगणार होतात ना? मला तुमचा संपूर्ण भूतकाळ ऐकायचा आहे." श्रीनय हसून म्हणाला.

"मीरा." अचानक श्रीधर दाराकडे बघत मोठ्याने म्हणाला.

"कुठे आहे?" श्रीनय दचकून.

"नुसतं नाव ऐकून घाबरलात ना डॉक्टर? म्हणजे प्रत्यक्षात किती घाबरत असाल?" श्रीधरचे पुन्हा तेच मुक्त हसणं. 


"कधीकधी घाबरावं लागतं हो." श्रीनय त्याच्या हसण्यात सामिल झाला.


"बट शी रिअली लव्ह्ज यू. तिच्या डोळ्यात दिसलं मला. डॉक्टर यू आर लकी, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत तुमचं लग्न होतंय आणि मुळात तुमचेही तिच्यावर खूप प्रेम आहे. वन ॲडव्हाईस, प्लीज डोन्ट हर्ट हर. आपल्या आवडत्या माणसाकडून जेव्हा दुखावतो ना आपण तेव्हा असह्य त्रास होतो. शरीराला, मनाला, आपल्या सर्वस्वाला." त्याचे डोळे पुन्हा भरून आले.


"सुमनमुळे तुम्ही खूप हर्ट झाला आहात ना?" मंद स्वरात श्रीनयने विचारले.


"मी हर्ट केलं.. चित्राला." एक दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला.


"तुमची चित्रा म्हणजे मला ना एक कोडं वाटायला लागलंय. प्लीज सोडवा ना ते कोडं." तो श्रीधरकडे बघून म्हणाला.


"चित्रा आणि कोडे?" तो पुन्हा हसला. "चित्रा कसले कोडे नव्हती हो डॉक्टर. ती तर अगदी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ होती. पारदर्शक. कोडं तर मी होतो. जे तिला कधी उलगडताच आले नाही." तो गुढपणे म्हणाला.


श्रीनय त्याच्याकडे काही न बोलता केवळ बघत होता. आता त्याला मध्ये थांबवून काही विचारण्यापेक्षा तो काय सांगतोय हे ऐकायचे होते.


"रघू, माझा कॉलेजचा जीवभावाचा मित्र. दिवाळीच्या सुट्टीत मी त्याच्याकडे गेलो होतो. तिथे मला चित्रा भेटली. त्याचीच ती मोठी बहीण होती. त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी म्हणजे ओघाने माझ्यापेक्षाही मोठी. शांत, साधी, सरळ, गरीब गाय बिचारी. भावाचा मित्र या नात्याने तिने माझा चांगला आदरसत्कार केला. दिवाळसण म्हणून गोडाधोडाचे पदार्थही केले. तिच्या आईपेक्षा तिच्या हाताला भारी चव होती


माझ्या घरी सतत नांदत असलेली गरिबी, त्यामुळे असलं गोडधोड फारसं खायला मिळायचं नाही. रघू बऱ्यापैकी सधन घरचा होता. त्याचे घर, त्याच्या घरातील माणसे, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी आईवडील.. मला खूप आवडले ते घर. कित्येक वर्षांपासून मला बाबाचे प्रेम मिळालेच नव्हते. कळायला लागल्यापासून दारूच्या आहारी गेलेले वडील मी बघितले होते. त्यांच्या व्यसनापायी आम्ही कफल्लक झालो होतो. रघुच्या घरचे वातावरण बघून माझ्या मनात खूप दाटून येत होते. काही काही विचार यायचे. हा मुलगा किती नशीबवाण म्हणून हेवा वाटायला लागायचा. माझे मन मला काहीतरी सांगू पाहत होते पण काय मला कळत नव्हते."


"दुसऱ्यांदा प्रेमात पडल्याची जाणीव होती का ती?" मध्ये बोलायचे नाही असे ठरवून देखील परत श्रीनय बोललाच.


"प्रेमात पडलो होतो खरं, पण यावेळी मी कुण्या सजीव माणसांच्या नाही तर त्या निर्जीव वास्तूच्या प्रेमात पडलो होतो. तिथल्या खेळीमेळीच्या वातावरणाच्या प्रेमात पडलो होतो. हे असं मी कधी अनुभवलंच नव्हतं. नंतर मला रघुबद्दल कळलं की त्याचे प्रेमप्रकरण सूरू आहे आणि त्याच्या बहिणीच्या लग्नाशिवाय तो पुढे काही करू शकणार नाही. कोणास ठाऊक का पण मित्राच्या त्या अडचणीचा फायदा उचलायचे मी ठरवले."

"कसला फायदा?" श्रीनयच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.


कसल्या फायद्याबद्दल श्रीधर बोलत होता? वाचा पुढील भागात.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

******

फोटो गुगल साभार.



🎭 Series Post

View all