दोन घडीचा डाव! भाग-९

कथा एका विस्कटलेल्या डावाची.

दोन घडीचा डाव!

भाग -नऊ.

"एक करता येईल." अचानक त्याचे डोळे चकाकले.


"काय?" ती.


"तुझ्या वडिलांनी तुला जे शेत दिले होते ते विकूयात. तशीही ती जमीन दूरच्या गावी असल्यामुळे आपल्या फार कामाची नाहीये. ती विकून आलेल्या पैशातून ही नवी जमीन घेता येईल." त्याने अलगद तिला फासात अडकवले.


"नाही श्रीधर, ती बाबाने दिलेली जमीन आहे. ती का विकायची?"


"तुला कळत नाहीये चित्रा. अगं त्या जमिनीचा फारसा उपयोग नाही. त्यापेक्षा आपण इकडेच चांगली जमीन घेऊया की." त्याच्या बोलण्याला ती फारसा विरोध करू शकली नाही आणि त्यातच तिचा होकार समजून त्याने नव्या जमिनीचा सौदा केला.

आत्ता कुठे त्याने पाहिलेल्या स्वप्नाला सुरुवात झाली होती.

*****


ड्रायव्हरने बसचा ब्रेक करकचून दाबला आणि बस थांबली. तसा श्रीधर भानावर आला.


"ओ आजोबा, शेवटचा स्टॉप आहे हा. उतरा आता. की जिथून आलो तिथेच परत जायचे आहे?" कंडक्टर त्याच्याकडे बघून म्हणाला तसे त्याने आजूबाजूला मान हलवली. बसमध्ये त्याच्याशिवाय कोणीच उरले नव्हते. स्वतःला सावरत उद्विग्न मनाने तो खाली उतरला.


ज्या शहरातून निघून तो चित्राला भेटायला गेला होता, पदरात तिचा नकार घेऊन तो परत तिथेच परतला होता. पाय नेतील तिकडे तो चालत होता. नाही म्हणायला इथली सवय होतीच त्याला. कधी बसस्टॉप, कधी रेल्वे स्टेशन तर कधी एखाद्या चौकात.. कुठे ना कुठेतरी असायचा तो. लिलीशी शेवटचे भांडण झाल्यावर तो इथेच तर आला होता आणि या शहराने आता त्यालाही आपल्यात सामावून घेतले होते.


चालता चालता तो एका मोठ्या पुलाच्या कठड्यावर आला होता. नुकताच सरलेला पावसाळा.. खाली दूधडी भरलेली सरिता निश्चलपणे वाहत होती. वाटलं त्याला झोकून द्यावे स्वतःला इथेच, अन जावं वाहवत ही नेईल तिकडे. काही क्षणांनी नाकातोंडांत पाणी जाऊन जीवही जाईल कदाचित. जाऊ दे. इथे कोणाला पडलीये? कोण आहे माझं?

विचारांच्या गर्तेत हरवलेल्या श्रीधरचा पाय पुढे पडणार तोच कोणीतरी त्याला बाजूला ओढले.


"हे काय करताय तुम्ही?" प्रश्न विचारणाऱ्या त्याला तो अनोळखी नजरेने पाहत होता.


"कोण?" त्याची नजर त्याला विचारत होती.


"आजोबा, अहो मी श्रीनय. डॉक्टर श्रीनय? सिव्हिल हॉस्पिटल?"


"अरे, डॉक्टर तुम्ही? का तुम्ही मला प्रत्येकवेळी वाचवायला येता?"


"का तुम्हाला तुमचा जीव जड झालाय?" श्रीनय त्याला प्रतिप्रश्न करत होता.


"श्री, हे कोण?" त्याच्यासोबत असणारी तरुणीने त्याला विचारले.


"मीरा, मी तुला परवा एका पेशंटबद्दल बोललो होतो ना तेच हे. आणि आजोबा ही मीरा. तुम्ही विचारलं होतं ना लग्न झालंय का म्हणून? हिच्याशी लग्न करणारे मी."


"ओह, डॉक्टर मीरा? यू आर ब्युटीफुल!" श्रीधर तिच्याकडे बघून म्हणाला मीराने श्रीनय कडे प्रश्नार्थक नजर टाकली.


"अगं मीच त्यांना तू डॉक्टर आहेस हे सांगितले होते." त्याच्या उत्तरावर तिने केवळ खांदे उडवले. 'असा कसा हा कोणालाही माझ्याबद्दल सांगत बसतो? पेशंटना सुद्धा?' तिला थोडा रागच आला होता.


"आजोबा, तुम्ही गाडीत बसा आणि चला माझ्याबरोबर." श्रीधरकडे बघत तो.


"श्री,आपल्याला एकत्र वेळ घालवायचा आहे म्हणून आज आपण बाहेर निघालोय ना?" चेहऱ्यावर नकारात्मक भाव आणून मीरा म्हणाली.


"मीरा, फक्त अर्धा तास त्यांना आपल्या सोबत राहू दे. त्यानंतर पुढचा आपला प्लॅन जसा आहे तसाच होईल." तो तिच्या डोळ्यात एक अर्जव घेऊन बघत होता.


काही न बोलता नाईलाजाने ती कारच्या आत येऊन बसली. कुठून या घडीला शहराबाहेर फिरायला जायचे सुचले याचा तिला राग येत होता.


"नको डॉक्टर. मी माझा जाईल." श्रीधर आढेवेढे घेत म्हणाला.


"कुठे जाणार? बसा गुमान." त्याच्या जरब आवाजाने तो खरंच गप्पपणे आत जाऊन बसला.


अर्ध्या तासाच्या प्रवासात कोणीच काही बोलत नव्हते. हेडफोन कानात कोंबून मीरा डोळे मिटून फ्रंट सीटवर बसली होती. तर भेदरलेल्या नजरेने इकडे तिकडे बघत होता आणि श्रीनय शांतपणे कार चालवत होता.


'सावली' नावाच्या एका वृद्धाश्रमाजवळ श्रीनयने कार थांबवली. 

"आजोबा बाहेर या." तो.

"मी आधीच इथल्या व्यवस्थापकांशी बोललोय. तुमची इथे चांगली सोय होईल." श्रीधरला आत नेत तो म्हणाला.


"डिअर डॉक्टर आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुमची डेट स्पॉईल झालीय." एक कटाक्ष मीराकडे टाकून तो म्हणाला.


"अहो, असे काही नाही. पण डिअर म्हटलंत म्हणून एक सांगतोय, इथून कोणाला न सांगता बाहेर पडू नका. कळलं ना? मी जमेल तर उद्या नाहीतर परवा तुम्हाला भेटायला येईन." त्याला तिथल्या संचालकाकडे सुपूर्द करत श्रीनय बिल्डिंगच्या बाहेर आला.


"अजूनही रागावलेली आहेस?" मीराच्या कानातील हेडफोन काढत श्रीनय तिला विचारत होता. एक हात कारचे स्टीअरिंग सांभाळत होते.


"अहं." ती बाहेर बघत म्हणाली.


"ए, कमऑन मीरा. एकतर खूप दिवसांनी असे निवांत भेटतोय तर मूड नको घालवूस ना." 


"तेच तर तुला कळत नाहीये ना? कोणालाही गाडीत बसवून त्यांची सेवा करायला लागतोस. सोबत मी आहे हेही विसरून जातोस."


"सॉरी ना." कार थांबवत तिच्या गळ्यात हात गुंफत तो म्हणाला त्याची ती प्रेमळ नजर बघून तिचा राग कुठल्याकुठे पळाला.

*******


श्रीधर काही न बोलता तेथील व्यवस्थापकांच्या बरोबर आत गेला. आत त्याच्यासाठी एक बेड आधीच तयार करून ठेवला होता.


"धिस इज फॉर मी?" त्याने आश्चर्याने विचारले.


"हो."


"पण मी तर आज इथे येतोय, तरी माझ्या नावाचा बेड आधीच कसा तयार आहे?" त्याचे आश्चर्य अजूनच वाढत होते.


"डॉक्टर साहेबांनी तीन दिवसाआधीच तुम्ही इथे येणार म्हणून सांगितले होते." व्यवस्थापक.


"डॉक्टरसाहेब? यू मिन डॉक्टर श्रीनय?"


"हम्म. तेच. खूप चांगले डॉक्टर आहेत ते. दर पंधरा दिवसांनी ते इथे सगळ्यांची आरोग्य तपासणी करायला येतात. तेही अगदी निशुल्क. खरा समाजसेवक कसा असावा हे त्यांना बघून शिकले पाहिजे असे आहेत ते. वयाने लहान आहेत पण खूप चांगले आहेत. आता परवा येतीलच तेव्हा परत भेट होईल तुमची." व्यवस्थापक सांगत होते.

"चला, थोडा वेळ आराम करा. साडेसात वाजता जेवणाची बेल वाजेल तेव्हा सर्वांसोबत भोजनकक्षात या." जाता जाता ते सांगून केले.


*******

"आजोबा कसे आहात? मनावरचा ताण गेलाय ना?" दोन दिवसांनी आश्रमात आरोग्यतपासणी करायला आलेला श्रीनय त्याला विचारत होता. त्याच्याशी बोलायचे म्हणून मुद्दाम त्याने सर्वात शेवटी श्रीधरला तपासायला घेतले.


"नाही. म्हणजे असे बंदिस्त आयुष्य नाही जगता येत हो मला. मी म्हणालो होतो ना की मोकळे आकाश हेच माझे घर आहे. असे चार भिंतीच्या आत जीव गुदमरतोय माझा." श्रीधर.


"तरीही इथून पळून गेला नाहीत? द्याट्स गुड." श्रीनय स्मित करून म्हणाला.


"तुमच्यासाठी डॉक्टर. तुम्हाला खूप मान आहे इथे. तुम्ही मला इथवर घेऊन आलात मग तुम्हाला भेटल्याशिवाय कसा जाऊ ना? माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून थांबलोय. बट लेट मी टेल यू वन थिंग डॉक्टर, माझ्या नादात नका हो पडू. मला माझ्या परीने जगू द्या." तो श्रीनयकडे पाहत म्हणाला.


"आणि मरू पण द्या, करेक्ट? परवा मी तिथे पुलावरून जात नसतो तर तुम्ही तर जीवाशी हात धुवून बसला असता, हे येतेय ना ध्यानात?" त्याच्या डोळ्यात बघत श्रीनय बोलत होता. त्याचे बोलणे ऐकून श्रीधरने मान खाली घातली.


"कसला त्रास छळतोय आजोबा तुम्हाला? एकदा बोलून मोकळे व्हा ना. कदाचित तुम्हालाच बरे वाटेल. तुम्ही वेडे नाही आहात हे माहितीये मला. मग हे असे वेड्यासारखे आपल्याच जीवाशी का खेळताय?" तो हळूवारपण त्याच्या मनात हात घालण्याचा प्रयत्न करत होता.


"का वाचवलंत डॉक्टर तुम्ही मला?" तो आणखी पुढे काही बोलण्याआधी श्रीधरने प्रश्न केला. 


"कारण मी एक डॉक्टर आहे. वाचवणे हा माझा धर्म आहे. आणि कदाचित काही नातंही असेल तुमच्या सोबत.. कदाचित माणुसकीचे नाते?" त्याच्या चेहऱ्यावर नजर गाढत तो म्हणाला.

"पण आजोबा, मला सांगा का तुम्ही असे वागताय? तुमच्या मनात कसला गिल्ट आहे? काय बोचतेय मनात? या वयात मुलांनी वगैरे घराबाहेर काढले का?" त्याने डायरेक्ट त्याच्या वर्मावर बोट ठेवले.


"मुलं कशाला घराबाहेर काढतील? मीच सर्वांशी नाते तोडलेय. तुम्हाला माझ्याविषयी ऐकायची खूप हौस आहे ना? मग ऐकाच माझी कहाणी. ऐकल्यावर तुम्हालाही लाज वाटेल माझ्याशी नाते जोडायची. मग ते नातं माणुसकीचे असू दे नाहीतर आणखी कुठले." त्याच्या नजरेला नजर देत श्रीधर बोलत होता.

क्रमश:

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

******

फोटो गुगल साभार.

श्रीनयला सांगेल का श्रीधर त्याच्या संसाराची झालेली वाताहत? वाचा पुढील भागात. लवकरच.


🎭 Series Post

View all