भाग -दोन.
"ती बघ माझी आई, माझ्यासाठी डोळ्यात पाणी घेऊन उभी आहे. आई मला माफ करशील ना? तुझा श्रीधर चुकलाय गं. आता तुझ्याजवळ तुझ्या कुशीत येऊन मला माझ्या चुकांची कबुली द्यायची आहे. आई रडू नकोस ना गं. अशा नालायक मुलासाठी तू नको ना डोळ्यात पाणी आणू." त्याचा आवाज हळूहळू क्षीण होत चालला होता.
"सिस्टर, अशा बघत काय उभ्या आहात? सलाईन फिक्स करा ना." श्रीनय तिथे येत ओरडला. त्यानेच मग हात घट्ट पकडून परत वॅसोफिक्स लावले. त्याला एक इंजेक्शन द्यायला सांगितले आणि तो केबिनमध्ये गेला.
आता श्रीधर गाढ झोपला होता पण झोपेतही त्याची आई त्याला स्पष्ट दिसत होती. स्वप्न होते का ते? छे! स्वप्न कुठले? ती तर खरंच त्याला दिसत होती. गोऱ्यापान मस्तकावर ठसठशीत लाल कुंकू उमटवलेली त्याची आई.. लक्ष्मी. तिचे मुखकमल त्या कुंकवाने कसे उजळून दिसत होते.
"शिरीऽऽ, हा चहाचा कप बाबांना नेऊन दे रे." चुलीवर कढत असलेला चहा कपात ओतत ती त्याला हाक देत होती.
"शिरी नाही गं आई, श्री म्हण ना. कितीदा सांगायचे?" दहा वर्षाचा श्रीधर तिला म्हणाला.
"तू नको शिकवू मला. जा चहा नेऊन दे." ती जराशा फनकाऱ्याने म्हणाली, तसा गुमान त्याने तो कप वडिलांना नेऊन दिला.
"रामराम देवाजी, कसे आहात?" श्रीधरने चहा नेऊन देण्यात आणि दारात त्याच्या वडिलांचे दोन मित्र सुधाकर अन दामू उगवण्यात एकच गाठ पडली.
"देवाच्या कृपेने एकदम ठणठणीत. काय काम काढलंत?" देवाजीने हसून विचारले.
"काम असं काही नाही. दामूच्या पोरीची पत्रिका बघ की जरा. यंदा तरी लग्न जुळतय की नाही ते सांग." तिथेच ठाण मांडत एकाने त्याच्यासमोर पत्रिका धरली.
"हो, हो. बघतो की. श्री, आईला पुन्हा दोन कप चहा टाकायला सांग रे." देवाजीने श्रीधरकडे नजर टाकली.
त्यावर मान डोलावून तो आईकडे गेला. तिने रागानेच चुलीवरच्या भांड्यात पाणी आणि साखर टाकले. सकाळपासून सुरू झालेली तिची भट्टी अजूनपर्यंत विझली नव्हती आणि म्हणूनच तिचा रागराग होत होता.
श्रीधरला आईचा राग फारसा कळत नव्हता पण वडिलांबद्दल मात्र खूप आदर वाटत होता. गोरापान, जरासा मध्यम बांध्याचा, चेहऱ्यावर तेज असलेला असा देवाजी त्याचा आदर्श होता. कोणी त्याच्याकडे काम काढले तर त्याच्या ओठावर कधीच ना नसायचे. त्याच्या घरी आलेली व्यक्ती कधीच उपाशी बाहेर पडत नसे. त्याचा त्रास मात्र लक्ष्मीला व्हायचा. दिवसभर चुलीसमोर बसून बिचारी उकडून जायची पण काही बोलायची सोय नव्हती. नवऱ्याला काही बोलू शकत नव्हती मग सगळा राग कोवळ्या श्रीधरवर निघायचा.
"दामू, अरे यंदा पोरीचे सगळे ग्रह जागेवर आहेत. लग्नाचा योग सोळा आणे आहेच म्हणून समज." दामूच्या हाती पत्रिका ठेवत देवाजी म्हणाला.
"देवाजी भारी गोष्ट सांगितली बघ. आता चहा नको कोंबडीचा झणझणीत रस्साच हवा." सुधाकर अंगणात फिरत असलेल्या कोंबड्याकडे बघत बोलला, तसे देवाजीने स्वयंपाकघरात डोकावत लक्ष्मीला स्वयंपाकाची वर्दी दिली.
दोन तासात त्या तांबड्या रश्श्याचा दरवळ घरभर पसरला. मित्रासोबत जेवायला बसलेल्या देवाजीसमोर दामूने एक छोटी बाटली ठेवली.
"दामू, काय हे?"
"देवा, कोंबडीचे झणझणीत जेवण, अन मदिरा सोबतीला नसेल तर ते जेवण काय जेवण असतं होय रे? आमच्यासोबत तूही घोटभर घेऊन तर बघ मग तुला याची नशा कळेल." त्याच्या ग्लासात बाटलीतील दारू ओतत दामू म्हणाला.
"दामू, अरे मी पीत नाही." देवाजी.
"माहितीये रे आम्हाला. म्हणून तर तुला तो देतोय. पोरीचे लग्न जुळणार म्हणून आनंदी आहे तो. घे पी." दामूने भरलेला ग्लास त्याच्या हातात देत सुधाकर म्हणाला.
"सुधा, अरे.."
"काही बोलू नकोस देवा. तुला आपल्या दोस्तीची कसम." दोघांनी मिळून देवाजीच्या घशात तो ग्लास रिता केला.
"काही म्हण दाम्या, वहिनीच्या हाताला चव लय भारी आहे रे." वाटीतील रश्श्याचा भुरका मारत सुधाकर म्हणाला.
"हो रे सुध्या, दोस्त असावा तर देवासारखा अन वहिनी असावी तर लक्ष्मीवाहिनीसारखी." दामू कोंबडीचे हाड चोखत म्हणाला.
देवाजी फक्त हसत होता. त्यांच्यासोबत आता त्यालाही चांगलीच चढली होती. जेवण करून दोघे निघून गेले आणि तो तेथेच पसरला. उठण्याचे त्राण त्याच्यात उरलेच कुठे होते?
इकडे लक्ष्मीने डोळ्याला पदर लावला. नवऱ्याचे हे रूप ती प्रथमच पाहत होती. आणि श्रीधर? तो लहानगा जीव तर कावराबावरा झाला होता. बाबा म्हणजे त्याचा जीव की प्राण! आई रागात त्याला कधी काही बोलून जायची पण वडिलांच्या तोंडून त्याने कधी अपशब्द ऐकले नव्हते. देवाजी जेव्हा त्याला 'श्री' म्हणून हाक द्यायचा तेव्हा त्याला फार अप्रूप वाटे. शाळेतील गुरुजी खेरीज देवाजी हाच एक असा होता जो त्याच्या नावाचा योग्य उच्चार करायचा. आई तर कायम 'शिरी' म्हणायची. पण इतर दुसऱ्यांनी त्याला 'शिऱ्या' म्हणून हाक मारली तर देवाजी त्यांच्याशी भांडलाच म्हणून समजा.
त्याच्या लाडक्या लेकावर त्याचे खूप प्रेम होते. दोन पोरी लग्न होऊन सासरी गेल्या होत्या आणि आता लाडाचा लाडोबा एकुलता एक श्रीधर उरला होता. त्यामुळेच कदाचित त्याची त्याच्यावर जास्तच प्रेमाची पाखरण होत रहायची. आपला लेक पुढे जाऊन कोणीतरी खूप मोठा बनेल हा त्याला विश्वास होता. आणि असा हा देवाजी आज असा वागला ते त्याच्या लाडक्या श्रीलाही रुचले नव्हते.
देवाजी कोणी प्रघाढपंडित ब्राम्हण नव्हता. ज्योतिषविद्येच्या आवडीपोटी तो ते शास्त्र शिकला होता. गरजू लोकांना पत्रिका बनवून देणे, पंचांग बघणे अशी कामं फुकटात तो करून द्यायचा. खरे तर ठेकेदारीचा पिढीजात व्यवसाय करणारे त्याचे कुटुंब. या व्यवसायातून त्याच्या पूर्वजांनी बरीच माया जमवली होती. पन्नास एकर भाताची शेती, घरात दूधदुभती जनावरे, मोठे कौलारू घर त्याला लाभले होते. तो एकुलता एक, तेव्हा स्वतः दुसरा काही व्यवसाय करावा अशी गरज भासली नव्हती.
घरात लक्ष्मी वास करत होती आणि त्यामुळे रिकामटेकडे मित्र त्याच्या भोवती सतत पिंगा घालत असायची. घरातील चूल कधीच विझत नव्हती. मित्रांत त्याची वाहवा आणि घरात नक्षत्रासारख्या बायकोची वाताहत होत होती आणि त्यामुळेच ती आताशा चिडचिड करायला लागली होती. आजच्या प्रसंगाने तर ती खचून गेली होती. डोळ्यातील पाणी पुसून श्रीधरला दोन घास खाऊ घालून ती उपाशीपोटीच निजली.
"लक्ष्मी, मला माफ कर. यापुढे असे नाही होणार." सकाळी उठल्यावर ओशाळवाणे वाटून देवाजी बायकोची माफी मागत होता. त्यावर मुकपणे लक्ष्मी केवळ टीपं गाळत होती.
"आता माझ्याशी बोलणारच नाहीस का?" तो.
"काय बोलू?" हुंदका देत लक्ष्मी म्हणाली. "दोन्ही पोरी आपल्या घरी गेल्या. हा लहानगा शिरी लहानसा चेहरा करून राहतो आणि तुम्हाला काय सुचतंय? तुमची संगत, तुमचे मित्र.."
"लक्ष्मी माझे मित्र वाईट नाहीत गं. थोडे लहरी आहेत. बाकी काही नाही." तिचे बोलणे मध्येच थांबवत तो म्हणाला.
"कधी डोळे उघडणार तुमचे? घरात पैसा आहे म्हणून तुम्हाला गुळासारखे ते चिकटून बसलेत. संपत्ती गेली की तेही जातील. तुम्हाला कळत कसे नाही?" ती अगतिकतेने बोलत होती.
"लक्ष्मी, काल चूक घडली म्हणून तुझे खूप ऐकून घेतले पण माझ्या मित्रांविषयी असे पुन्हा बोललीस तर मी खपवून घेणार नाही, कळलं? आणि आपल्याला पैश्यांची काय कमतरता आहे? आपल्यातले कोणी चार घास खाल्ले तर तुझे असे काय कमी होणार आहे?" देवाजीचा स्वर वाढला होता. त्याच्या आवाजाने श्रीधर दचकून जागा झाला.
"बाबाऽऽ" डोळे चोळत तो दोघांकडे आलटून पालटून बघत होता.
"श्री, उठलास बाळा? जा तुझे आन्हीक उरकून घे. मग आपण बाराखडी शिकूया."काही वेळापूर्वी वाढलेला त्याचा आवाज क्षणात मृदू झाला. लक्ष्मीही आपल्या कामाला लागून चुलीवर चहाचे आंदण उकळायला ठेवले.
चहाचा घोट घेत असताना ती चटकन जागेवरून उठली आणि मोरीत गेली. अचानक तिला उलट्या येऊ लागल्या होत्या.
"लक्ष्मी, काय झाले? तू ठीक तर आहेस ना?" जागेवरून उठून देवाजी तिच्याजवळ येत म्हणाला.
"हम्म. रात्री जेवले नाही म्हणून कदाचित त्यामुळे असेल." तोंड पुसत ती म्हणाली.
"काय गो लक्षुमी? कसल्या ओकाऱ्या काढतेस? दिवस बिवस गेलेत की काय?" शेजारची द्वारका घरात येत म्हणाली.
"काही काय वहिनी तुमचं? आपली कमल पोटूशी आहे. माझं काय घेऊन बसलात?" लक्ष्मी.
"तुझ्या कमलला अठरावं लागलंय आणि तू आत्ता पस्तीशी ओलांडली आहेस. मग हे अशक्य नाही ना? खरंच दिवस गेलेत बाई तुला. लेकीसोबत तूही बाळंत होणारेस बघ." द्वारकेने आपली अनुभवी नजर लक्ष्मीवरून फिरवली आणि हसून म्हणाली.
"देवा भावोजी, तुमच्या शिऱ्याला खेळायला लवकरच नवा सवंगडी येणार आहे." देवाजीकडे बघून द्वारका सूचक हसली आणि तिच्या घराकडे निघून गेली.
"लक्ष्मी, द्वारका वहिनी खरं बोलतेय?" तिचा उजळलेला चेहरा हातात घेत देवाजी आनंदाने विचारत होता. तिने मान हलवून तिची नजर खाली केली.
न्हाणीघरातून बाहेर आलेला श्रीधर आईबाबाच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भव टिपत होता. त्यांना आनंदी बघून त्याचाही चेहरा उजळला.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
नव्या बाळाच्या आगमनाच्या चाहूलीने देवाजीच्या वागण्यात पडेल का काही बदल? वाचा पुढील भागात.
*******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा