दोन घडीचा डाव! भाग -८

कथा एका विस्कटलेल्या डावाची!

दोन घडीचा डाव!

भाग - आठ.


तो परत एस.टी. स्टॅन्डकडे निघाला. पोटात कावळे ओरडायला लागले होते. त्याचे पाय जवळच्याच एका उपहारगृहाकडे वळले. अचानक वातावरण बदलले. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. भज्यांचा सुटलेला घमघमाट आणि पावसाचा लयबध्द आवाज.. त्याचे मन त्याला चित्रासोबतच्या भूतकाळात घेऊन गेले.


त्यांचे लग्नही असेच मुसळधार पावसात झाले होते. तो क्षण त्याला आठवला. तू आवडतेस असे म्हणून त्याने तिच्याशी लग्न केले होते. त्याच्या भूलथापांना तीही भुलली होती. खरे तर त्याच्या मनात अजूनही सुमन होती. तिने श्रीमंत मुलाशी संसार थाटण्याचे ठरवले अन सुडाच्या भावनेने त्यानेही घरची परिस्थिती बरी असलेल्या चित्रासोबत लग्नाचा घाट घातला.


त्याच्या घरी लक्ष्मीला हेच वाटत होते की चित्राने काहीतरी जादू केली म्हणून हा असा वागतोय. ती घरी येण्याआधीच तिच्याबद्दल मनात एक अढी निर्माण झाली होती. आणि त्यामुळे सासू सुनेचे नाते म्हणावे तसे कधी बहरलेच नाही. श्रीधरचे लग्न झाले तेव्हा देविका दहा वर्षांची होती. त्या चिमुकलीची चित्रा दुसरी आईच झाली. फाटक्या संसाराचा गाडा हाकताना लक्ष्मीला लेकीचे लाड करायला जमले नाही ती कसर चित्रा पूरी करत होती.


सदाभाऊने म्हटल्याप्रमाणे पुढच्या काही महिन्यात श्रीधरला रघूपूर्वी चांगल्या कंपनीत नोकरी लागली आणि त्याने त्याचे बिऱ्हाड दुसऱ्या शहरात हलवले. शहरात जायला मिळणार म्हणून चित्रा खूष होती. तिथे गेल्यावर मात्र तिच्या आनंदावर विरजण पडले. दहा बाय दहाच्या खोलीत फाटका असलेल्या संसाराला नेटकेपणाचे ठिगळ लाऊन ती दिवस रेटत होती. पण कधी तोंडातून ब्र ही काढला नाही.


दोन वर्षांनी त्यांच्या घरात दीपकचे आगमन झाले आणि इकडे श्रीधरच्या पगाराचा आकडा वाढला. हातात पैसा खुळखुळू लागला. श्रीधर, चित्रा, देविका आणि दीपक लहानशा खोलीत सुखाने राहत होते



दोन वर्षांनी लतिकाचा जन्म झाला आणि काही दिवसातच श्रीधरच्या नशिबाने वेगळीच कलाटणी घेतली. त्याचे होऊ घातलेले प्रमोशन बाजूला राहून उलट त्याच्यावर मोठा घोटाळा केल्याचा आळ आला होता आणि त्याची बाजू मांडण्याची संधी न देताच त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले. इतक्या लवकर मोठी पोस्ट मिळणार म्हणून त्याच्यावर डुख धरून बसलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला पार अडकवले होते.


आत्ता कुठे आयुष्यात सुख यायला सुरुवात झाली होती. प्रमोशन झाले की पैसा जमा करून नवी शेती घ्यायचा विचार मनात सुरू झाला होता. कष्टात दिवस काढणाऱ्या लक्ष्मीला आरामात ठेवण्याचे तो स्वप्न बघत होता आणि कंपनीच्या अशा अचानक घेतलेल्या निर्णयाने त्याच्यावर जणू वज्रघातच झाला होता.

त्याच्या डोळ्यसमोर अंधार दाटला. स्वतःची बाजू मांडण्याची संधीही त्याला मिळाली नाही. सुखी संसाराचे स्वप्न एवढयातच विरले. आत्ता कुठे आयुष्याची शून्यातून पुढे सुरुवात झाली होती, आता आयुष्य पुन्हा शून्यावर येऊन ठेपले.


आपली कच्ची बच्ची, चित्रा, देविका सर्वांना घेऊन त्याने पुन्हा गावची वाट धरली. दुःखी मनस्थितीत सर्वांना घेऊन श्रीधर त्याच्या गावी परतला. नोकरी गेलेली, हातात एक दीड एकराचा जमिनीचा तुकडा, पैसा मिळण्याचे दुसरे कुठले संसाधन नाही. या अवस्थेत तो हळूहळू डिप्रेशन मध्ये जाऊ लागला होता. लक्ष्मीसाठी, त्याच्या लाडक्या देविकासाठी आणि ह्या घरासाठी पाहिलेले स्वप्न कुठेतरी खोल तळाशी बुडतेय असे त्याला वाटू लागले


गावात मन रमत नव्हते आता. खिशात जोवर पैसे होते तोवर ठीक चालले होते. पैसे संपले तशी घरात चणचण भासू लागली. गावातील शेतीची कामे संपली होती. त्यामुळे गावातही कुठे काम मिळेना. एक -दोन ठिकाणी मुलाखतीला जाऊन आला. पण तिथेही नकारच मिळाला.


आता आईही जरा तूसडेपणाने वागू लागली होती. देविका मोठी होत होती. ती आपल्याच कोशात वावरायची.


आई - बहीण, बायको, दोन लहान लहान लेकरं. सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती. काय करावे त्याला कळेना. हळूहळू नैराश्याच्या गर्तेत तो जाऊ लागला.


चित्राला त्याची अवस्था बघावत नव्हती. ती त्याला धीर देई. ह्या वेळेस आता तीच त्याचा आधार होती. सगळी सोंग आणता येतात. पण पैशाचे सोंग मात्र नाही आणता येत हे चित्राला जाणवले होते.


त्याच्या डोळ्यावरची झोप जणू गायबच झाली होती आणि अशा वेळी त्याला साथ मिळाली त्याच्या बायकोची, चित्राची. घरातील स्थिती बघता तिने सगळी सूत्रे आपल्या हातामध्ये घेतली. काही दिवस श्रीधरला माहेरी घेऊन राहिल्यानंतर तिने सदाभाऊने कधीकाळी घेऊन दिलेली शिलाईचे मशीन घेऊन सासरी परतली. तिने घेतलेले व्यावसयिक शिक्षण आता कामी पडणार होते.


संसाराचा डोलारा एका हाती पेलवत चित्राने श्रीधरला उच्च शिक्षण घ्यायला बाहेर पाठवले देविकाचा नुकताच दहावीचा निकाल आला होता. तेव्हा तिलाही तिने डीएड करायला तालुक्याच्या ठिकाणी ॲडमिशन करून दिली.


घरात पैश्यांची ओढताण होत होती, पण यातून काहीतरी चांगला मार्ग निघेल अशी आशा चित्राच्या मनात कायम होती.


"चित्रा, तुझ्याशी लग्न करून मी योग्य निर्णय घेतला होता, हे पटतेय गं मला. एखादी मुलगी असती तर हे असे अठराविश्व दारिद्र्य असलेले घर केव्हाच सोडून गेली असती. तू वेगळी आहेस. फार फार वेगळी आहेस." सुट्टीमध्ये घरी आलेला श्रीधर तिला मिठीत घेऊन बोलत होता. त्याच्या त्या प्रेमळ मिठीत ती अलगद विरघळली.


पुढची दोन वर्ष अशीच सरली. आता श्रीधरला दुसऱ्या कंपनीत नोकरी लागली होती. या काळात त्याने देवीकाचे तिला आवडणाऱ्या मुलासोबत लग्न लाऊन दिले. त्याची लाडकी बहीण सुखी राहावी म्हणून त्याने लग्नात कसलीही कसर सोडली नाही. पुढे काही महिन्यातच देविका शिक्षिका म्हणून नोकरीला लागली आणि सोबत म्हणून लक्ष्मीला आपल्याकडे घेऊन गेली.


******


'चित्रा,तेव्हा तुझी साथ होती, म्हणून मी पुढे जाऊ शकलो. नाहीतर खरंच डिप्रेशन मध्ये जाऊन मी वेडा झालो असतो गं.' डोळ्यातील पाणी पुसत तो स्वतःशीच म्हणाला. बाहेरचा पाऊस सरून आकाश मोकळे झाले होते. त्याच्या डोळ्यातील आभाळ मात्र अजूनही भरूनच होते.


प्लेटभर भजी पोटात ढकलून तो तिथून उठला. त्याचे पाय त्याला एसटी स्टॅंड कडे ओढून नेत होते. कुठे जायचे? काय करायचे? त्याला काहीच कळत नव्हते. जी बस लागून होती त्या बसमध्ये तो जाऊन बसला. शेवटच्या स्टॉपची तिकीट त्याने घेतली होती. बस सुरू झाली तशी खिडकीला डोके टेकवून त्याने डोळे मिटले.


'मुसाफिर हूँ यारो

न घर है ना ठिकाना 

मुझे चलते जाना है 

बस चलते जाना..'


त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात गाणे वाजत होते. मिटल्या डोळ्यातून एक थेंब हळूच त्याच्या गालावर येऊन थांबला.

******


"मला जमीन घ्यायची आहे." चित्रासोबतचे बोलणे त्याला आठवत होते.


"अहो, पण आपल्याकडे पैसा कुठे आहे? देवीच्या लग्नात होती नव्हती सारी जमापुंजी संपलीय ना." ती त्याला समजावत होती.


"ते काही नाही माहित गं मला. पण माझं स्वप्न होतं, बाबांनी जे जे गमावलेय ते सगळे मिळवायचे. आईला सुखाचे दिवस दाखवायचे. आई आता देवीकडे आहे. तशी सुखीच आहे पण ती पूर्वी जशी होती तशी मला बघायची आहे. बाबांनी गमावलेल्या जमिनीपेक्षा जास्त मी कमवेन ना तेव्हा तिच्या चेहऱ्यावर तो आनंद मला दिसेल." तो तिला सांगत होता.


"हो, खरं आहे तुमचं. हे सगळं मिळवल्यावर मलाही आनंद होईलच की. पण सध्या आपल्याकडे नड आहे ना? मग कसं शक्य आहे हे?" ती हळुवारपणे त्याला म्हणाली.


"माझ्याकडे एक आयडिया आहे." तिच्याकडे बघून तो.


"कसली?" तिचा भाबडा प्रश्न.


"आपण कर्ज घ्यायचे?" तो विचारता झाला.


"कर्ज? नको बाबा. एकवेळ चटणी भाकर खाऊन मी राहीन पण कर्ज घेऊन आनंदात नाही जगू शकणार." तिने त्याचा प्रस्ताव लगेच नाकारला.


"पण मला जमीन घ्यायचीय चित्रा. आणि इतक्यात आपल्याकडे पैश्यांची दुसरी कुठलीच सोय नाहीये. ती जमीन पण मला सोडायची नाहीये. मग कर्जाशिवाय दुसरा पर्याय नाहीये गं." तो हताश होऊन म्हणाला. 

ती काही न बोलता गप्प होती. त्या मुकपणातून तिचा नकार स्पष्ट दिसत होता.


"एक करता येईल." अचानक त्याचे डोळे चकाकले.


"काय?" ती.


"तुझ्या वडिलांनी तुला जे शेत दिले होते ते विकूयात. तशीही ती जमीन दूरच्या गावी असल्यामुळे आपल्या फार कामाची नाहीये. ती विकून आलेल्या पैशातून ही नवी जमीन घेता येईल." त्याने अलगद तिला फाशात अडकवले.


खरंच अडकेल का चित्रा या जाळात की देईल त्याला नकार? वाचा पुढील भागात.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

******

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all