दोन घडीचा डाव! भाग -७

कथा एका विस्कटलेल्या डावाची!

दोन घडीचा डाव!

भाग -सात.


पण श्रीधरचे मात्र पक्के होते, लग्न करेन तर चित्राशीच.

आणि मग ठरलं. बैठकीत श्रीधर -चित्राच्या लग्नाची सुपारी फुटली. चित्राच्या अंगाला श्रीधरच्या नावाची हळद लागली.

*****


"सिस्टर, इथले ते आजोबा कुठे आहेत?" राउंडला आलेला श्रीनय विचारत होता.


"गेला तो म्हातारा पळून." सोबतची नर्स मिश्किल हसली.


"काय?" श्रीनयच्या कपाळावर आठी आली.


"अहो सर, तसाही तो सर्किट आत्मा होता. इथे राहून करणार तरी काय होता? म्हणून गेला असेल." ती हसून म्हणाली.


"सिस्टर, इट्स नॉट अ जोक. हसताय काय? हॉस्पिटलची काही जबाबदारी असते की नाही?" त्याला आता राग यायला लागला होता.


"सर, असे इंग्लिश बोलू नका हो. नाहीतर मला मग पुन्हा तो म्हातारा आठवतो. तुम्ही काल त्याला बोललात ना की आज डिस्चार्ज मिळेल म्हणून, म्हणून मग तो दुपारपासूनच जायला हटून बसला. कोणाचं काही ऐकेना. तेव्हा कंटाळून सायंकाळी राउंडला आलेल्या डॉक्टर कुलकर्णीनी त्याला जायची परवानगी दिली."


"कुलकर्णी सरांनी डिस्चार्ज दिल्यावर आता मी तरी काय बोलणार? पण तुम्हाला हे सगळे कसे कळले?" पुढच्या पेशंटकडे वळत तो बोलला.


"खरं तर सर मी कालपासून डबल ड्युटी करतेय. कालचा अख्खा दिवस मी हॉस्पिटलला होते म्हणून मला माहित." ती.


"हम्म." तो.


"सर, एक विचारू? तुम्ही त्याच्याबद्दल इतके हळवे का आहात? मला तर तो पेशंट अजिबात आवडला नव्हता. कसला त्याला इगो होता कोणास ठाऊक?" केबिनमध्ये गेल्यावर नर्स श्रीनयला विचारत होती.


"ॲक्च्युअली सिस्टर, ते मला माझ्या आजोबांसारखे वाटले हो. आई बाबा गेल्यावर आजी आजोबांनी मला सांभाळले. त्यात आजोबांचा तर माझ्यावर खूप जीव होता. दोन वर्षांपूर्वी ते देवाघरी गेले. हे आजोबा आपल्या वॉर्डात दिसले आणि मला माझ्या आजोबांची फार आठवण झाली म्हणून त्यांच्याबद्दल थोडा सॉफ्ट कॉर्नर मनात निर्माण झाला होता. बाकी काही नाही." श्रीनयने आपल्या डोळ्यातील पाणी अलगद वेचले.


"ओह, सॉरी सर." त्याला तसे हळवे बघून ती म्हणाली.


"अरे, तुम्ही का सॉरी म्हणताय? मी विचार केला होता की आज त्यांना डिस्चार्ज देऊन एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात ठेवावे. जेणेकरून त्यांची काही सोय तरी होईल. पण तेच निघून गेलेत. सिस्टर, तुम्ही म्हणाला होतात ना की पेशंटशी कसले नाते जोडू नये म्हणून? खरंय तुमचं. अशा नात्यांनी आपल्यालाच त्रास होतो." तो खिन्नपणे बोलत होता.


"सर, तुम्ही नका हो टेन्शन घेऊ. त्याचे कोणी ना कोणी नातेवाईक असतील. याच्या अशा तिरसट स्वभावामुळे कंटाळून त्याला सोडून दिले असेल. तो त्यांच्याकडे जाईल परत आणि पुन्हा ते एक होतील. तुम्ही उगाच आपल्या डोक्याला ताप करून घेताय."


"होप सो." श्रीनय स्टेथो घेऊन उठत म्हणाला. आज सी. एस. सरांनी मिटिंग ठेवलीय. ती अटेंड करून येतो." केबिनबाहेर पडत तो म्हणाला.


*****

श्रीधर रात्रीच हॉस्पिटल सोडून निघाला होता. कुठे जायचे? काय करायचे? त्याला काही सुचत नव्हते. चित्राच्या आठवणीत जीव व्याकुळ झाला होता. तिच्याकडे जाऊन तिला भेटावे, तिची मनापासून माफी मागावी हा एकच विचार मनात फिरत होता. त्याचे पाय आपोआप एस टी स्टॅंडकडे वळले. शेवटची बस निघून गेली होती. 


रात्रभर तिथेच थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी तो बसमध्ये बसला आणि चित्रा ज्या शहरात होती तिथे पोहचला. ते शहर म्हटले तर त्याचेही होते. कित्येक आठवणी इथे जुळल्या होत्या. काय दिलं नव्हतं या शहराने त्याला? सारे काही इथेच सामावले होते. तसेही लाथ मारेल तिथून पाणी काढेल अशी धमक असलेला तो. जिथे गेला त्या प्रत्येक शहराने त्याला एक नाव मिळवून दिले होते. मात्र या शहराची गोष्ट निराळी होती. नाव, स्टेटस, पैसा.. याबरोबरच बदनामी आणि आयुष्याची राखरांगोळीही इथेच त्याच्या वाट्याला आली होती.


एक आवंढा गिळून तो घराच्या दिशेने चालू लागला. 'चित्रांगण' त्याच्या स्वप्नातील घर! ते घर आता त्याच्या मालकीचे राहिले नव्हते. चित्राने ते तिच्या नावावर करून घेतले होते आणि लगेच घराचे नाव देखील बदलले होते. 'चित्रांगण' आता 'चित्रमहाल' झाले होते.


आणि आज त्याच चित्रमहालाच्या दारात तो उभा होता. मोठ्या हिमतीने त्याने दारावरची बेल वाजवली तेव्हा एका गोड छकुलीने दरवाजा उघडला.


"कोण तुम्ही? आणि तुम्हाला कोण हवंय?" तिने अनोळखी नजरेने त्याला प्रश्न केला.


"मी श्रीधर. चित्रा? चित्रा आहे?" त्याचा स्वर थरथरत होता.


"ए आज्जी, तुझ्याकडे कोणीतरी श्रीधर आलेत गं." ती आत पळत म्हणाली.


त्याचे नाव ऐकून गाण्याची तयारी करत असलेली चित्रा थबकली. तिची पावले दरवाज्याकडे वळली.

दोघांची नजरानजर झाली आणि त्याचा अवतार बघून तिच्या डोळ्यात अश्रुंचा महापूर उभा राहिला. डोळ्यासमोर आजवरचा संपूर्ण काळ एखाद्या चित्रफितीप्रमाणे झरझर सरकत गेला. तिने मोठ्या शिताफीने डोळ्यातील अश्रुंना डोळ्यातच विरवले.


"कशी आहेस?" श्रीधरचा क्षीण स्वर तिच्या कानावर पडला. 


"मी मजेत. तुझा विचार करणं सोडलं आणि बघ, माझं आजारपण कुठल्या कुठे पळून गेलं. आता अगदी मस्त मजेत आहे मी. काम करायला सावी आहेच. बाजूला लतिका - पार्थही आहेत. नीट चाललंय माझं. पण तुझी कुठे वाट चुकली?" चित्रा त्याला विचारत होती.



"चित्रा, लिलीने पुरतं अडकवलंय गं मला. माझी पेन्शन, माझे कार्ड सर्व तिच्या ताब्यात आहेत. तिथे मला काडीचीही किंमत नाहीये. तिचा मुलगा जो माझा नव्हताच कधी, सारखा पाणउतारा करतो. शीण आलाय गं आता सगळयांचा. मी सारं सोडून तिथून निघून आलोय. त्यांच्यासोबत राहणं अशक्य आहे आता. चित्रा मी येऊ इथे राहायला? माफ करशील मला?"

डोळ्यात पाणी घेऊन तिच्यापुढे हात जोडून तो उभा होता.


क्षणभर काय बोलावे तिला कळेचना. ती तिथेच स्तब्ध उभी होती.


"खरं तर आता माझा तुझ्याशी कसलाच संबंध उरला नाही श्रीधर, त्यामुळे माफ करण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही माफ करायचं म्हणत असशील तर तुला मी माफ करेनही. पण मी तुला इथे राहायची परवानगी देऊ शकत नाही. बहात्तर वर्षाच्या आयुष्यात आत्ता कुठे मी माझ्या इच्छेने जगायला सुरवात केलीय. माझं अस्तित्व शोधलं. ते पुन्हा नाही गमवायचंय. आता मला स्वतःला कोणत्याच नात्यात नाही बांधायचंय. माझं आयुष्य मला माझ्यापरीने जगायचंय. सॉरी!" 


तिचे स्पष्ट, सडेतोड बोलणे ऐकून भरल्या डोळ्याने तो आल्यापावली परत निघाला. तो गेल्यावर तिनेही डोळे पुसले. 'इतकी कठोर कसे मी वागू शकले?' स्वतःला प्रश्न करून तिने दरवाजा बंद केला. हे कठोरपण आधीच दाखवले असते तर कदाचित तिचेही आयुष्य काहीतरी वेगळे असते. 


"ए आज्जीऽऽ, ये ना गं. आपलं गाणं राहीलंय ना." मुलींच्या आवाजाने भानावर येत ती आत गेली. 


"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.." चित्राचा मधुर आवाज बाहेर ऐकू येत होता. श्रीधरच्या कानावरही तो आवाज आला आणि डोळे पुसून त्याने हलकेच स्मित केले.


'चित्रा, खरंच ग्रेट आहेस तू. तुझ्यावर इतका अन्याय करूनही तू शेवटच्या क्षणाला बाजी पलटवलीस. जिंकलीस गं तू. हा दोन घडीचा डाव माझ्यावरच उलटला. या श्रीधरला हरणे कधी ठाऊकच नव्हते. लहानपणापासूनच. आणि मोठा झालो, तुझ्याशी लग्न करून तुला जिंकले. तेव्हापासून तू मला कधी हरूच दिले नाहीस. प्रत्येक प्रसंगी माझी ढाल बनून तू माझ्या पुढ्यात ठाकलीस. मी मात्र तुझ्या पाठीत खंजीर खुपसला. आय एम सॉरी. पण तू आत्ता या क्षणी खूष आहेस हे बघून छान वाटले.' तो मनात चित्राचे प्रसन्न रूप साठवून पुढे निघाला. 


तो परत एस.टी.स्टॅन्डकडे निघाला. पोटात कावळे ओरडायला लागले होते. त्याचे पाय जवळच्याच एका उपहारगृहाकडे वळले. अचानक वातावरण बदलले. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. भज्यांचा सुटलेला घमघमाट आणि पावसाचा लयबध्द आवाज.. त्याचे मन त्याला चित्रासोबतच्या भूतकाळात घेऊन गेले.


 काय दडले होते चित्रा आणि त्याच्या भूतकाळात? वाचा पुढील भागात.

.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

******

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all