दोन घडीचा डाव! भाग - ६

कथा एका विस्कटलेल्या डावाची!
दोन घडीचा डाव!
भाग -सहा.

"चित्रा.." नाही म्हणायला श्रीधरच्या कानावर नर्सचा आवाज जाऊन आदळला. आणि चित्राच्या आठवणीत तो व्याकुळ झाला.

"चित्रा, तुझ्यासोबतची सगळी नाती तर तुटलीत गं. माझ्यामुळेच. तरी मन व्याकुळ झाले की तुझ्याचजवळ येऊन का थांबते?" तो परत स्वतःशी बडबडायला लागला. अस्वस्थ मन आणखी अस्वस्थ होऊ लागले.

त्याला आठवला तो दिवाळीचा सण, जेव्हा रघू त्याला त्याच्या घरी यायचा आग्रह करत होता. त्या आग्रहाखातर श्रीधर त्याच्या घरी गेला होता आणि तिथेच त्याला भेटली चित्रा, रघुची मोठी बहीण. दिसायला काळी सावळीच पण चेहऱ्यावर एक तेज होते तिच्या. अभ्यासात हुशार पण पुढे नोकरी करून कुणाची गुलामी करायची नाही असे वडिलांनी ठासून सांगितल्यामुळे दहावीनंतर कॉलेजात न जाणारी आणि व्यायासायिक शिक्षण घेऊन टेलरिंगचा व्यवसाय करणारी चित्रा.

तिला पाहताक्षणीच श्रीधर तिच्याकडे अनामिक ओढीने ओढल्या गेला असं वगैरे काही झाले नव्हते पण डोक्यात मात्र काहीतरी वेगळेच शिजायला लागले होते.

"काय झाले? तू असा नाराज का आहेस?" गावातील ओढ्याकाठी फिरताना श्रीधर रघुला विचारत होता.

"काही नाही रे."

"माझ्याशी तू खोटे बोलू शकत नाहीस. खरं काय ते बिनधास्त सांग ना." त्याचा चेहरा स्वतःकडे वळवत श्रीधर.

"कावेरी, माझी प्रेयसी. लग्न कर म्हणून मागे लागलीय."

"मग? काय प्रॉब्लेम आहे?" श्रीधर.

"चित्राताई. ती माझ्यापेक्षा मोठी आहे ना. तिचे लग्न जुळायचे आहे. तिच्याआधी मी कसे लग्न करू शकतो? कावेरीला हेच कळत नाहीये." पाण्यात दगड फेकून मारत रघू म्हणाला.

"होईल रे सगळं ठीक. आणि तुझे लग्नाचे वय तरी झाले का? का उगाच टेंशन घेतोस."

'कावेरीच्या घरचे तिच्या मागे लागलेत रे. ताईचे लग्न लवकर व्हायलाच हवे." तो उठत म्हणाला.

घरी परतल्यावर श्रीधर आपल्याच तंद्रित होता. त्याच्या डोळ्यासमोर राहूनराहून चित्राचा तो काळासावळा चेहरा येत होता. मन काहीतरी वेगळेच सांगत होते आणि मेंदू मात्र भलत्याच विचारात गुंतले होते.

आताशा श्रीधरच्या रघुच्या गावाकडील फेऱ्या वाढल्या होत्या. कधी त्याच्यासोबत तर कधी सुट्टी असेल तर एकटाच. श्रीधर हा रघुचा एकदम खास दोस्त आहे म्हणून मग त्याच्या अशा वेळी अवेळी येण्याने कोणाला काही वाटण्याचा प्रश्नच नव्हता. तो आता त्यांच्याच घरातील होऊन गेला होता. घरी आला की त्याची शोधक नजर चित्रावर खिळली असायची हे कोणाच्या नाही पण रघुच्या ध्यानात येत होते.

"श्रीधर, ताई बद्दल भलता सलता विचार मनात आणू नकोस." एक दिवस रघुने त्याला ठणकावले.

"भलता विचार नाही, मला तिच्याशी लग्न करायचे आहे." श्रीधर.

"श्रीधर.. "

"श्रीधर काय श्रीधर? तुझ्याच फायद्याचे बोलतोय. तिच्यामुळे तुझे लग्न अडतेय ना? मी करतो चित्राशी लग्न म्हणजे मग तुझाही मार्ग मोकळा." त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू होते.

"हे अशक्य आहे. बा याला हो म्हणणार नाही. ताई आपल्यापेक्षा मोठी आहे." रघू म्हणाला.

"त्यांना होकार द्यायला मी भाग पाडेन. मग तर झाले ना?" श्रीधरच्या बोलण्यावर रघू गप्प बसला. त्याचे मन कुठेतरी स्वार्थी झाले होते.

फायनलच्या परीक्षा आटोपल्या आणि नेहमीप्रमाणे स्वतःच्या गावाला जाण्यापूर्वी श्रीधर रघुच्या गावी आला. आणि एक दिवस त्याने सदाभाऊला अनपेक्षित विचारणा केली.


"मला चित्रासोबत लग्न करायचे आहे. तिचा हात माझ्या हातात देणार का?" श्रीधर सदाभाऊंना विचारत होता. 

सदाभाऊंना काय बोलावे कळत नव्हते. 'एवढासा पोरगा. आपल्या लग्नाची बोलणी आपणच करतोय?' पण त्याचा निर्भीडपणा आवडला त्यांना.

नाही म्हणायला तसे त्याच्यात काही नव्हतेच.

लाघवी. बडबडणारा. सदा हसरा चेहरा. हुशार. कोणतेही काम करण्यास न लाजणारा, मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर! खरंच श्रीधर होताच गुणांची खाण. बघायलाही सुंदर.. गोरापान. कोण त्याला नाही म्हणणार? 

पण एक होते, तो वयाने चित्रापेक्षा लहान होता.

"असं कसं लग्न करणार? नवरदेव कधी नवऱ्या मुलीपेक्षा लहान असतो का?" सदाभाऊनी प्रश्न केला. 

"मला या गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नाहीय. मी घेईन ना सांभाळून." श्रीधरने आश्वासन दिले. सदाभाऊ एकदम जुनाट विचाराचे नव्हते. त्यांनी त्याला एकदा चित्राशी बोलायला सांगितले.

"तुला माझ्याशी का लग्न करायचे आहे?" चित्रा त्याला विचारत होती.

"संसारीक आहेस. माझ्या घराला सांभाळून नेशील याची खात्री आहे मला." तो आत्मविश्वासाने म्हणाला. "आणि मुख्य म्हणजे आवडतेस तू मला."

"अरे.. पण मी मोठी आहे तुझ्यापेक्षा." ती म्हणाली. 

"तर काय झाले? एज डजन्ट मॅटर! तुला माहित आहे? शेक्स्पिअरची बायको पण त्याच्यापेक्षा मोठी होती. त्याला काही फरक नाही पडला, मला काय पडणार?"

त्याचे आपल्या आवडत्या शेक्स्पिअरला मध्ये आणले आणि दिले मग पुन्हा दोन तीन दाखले. तीही थोडी इंप्रेस झाली. 

"तू करशील ना लग्न माझ्याशी?" त्याने पुन्हा विचारले.

काय बोलावं तिला कळेना. "बा च्या शब्दाबाहेर नाहीय मी." ती लाजून आत पळाली. 

******

"पण बा, घरात गरिबी आहे त्याच्या." रघू सांगत होता. मन स्वार्थी झाले होते तरी त्याला बहिणीची काळजी होतीच. किमान वयाचा फरक बघून नाहीतर त्याच्या घरची परिस्थिती जाणून तरी वडील श्रीधरला नाही म्हणतील अशी त्याला आशा होती.

"गरिबीच माणसाला समृद्ध बनवते. परिस्थितीची जाणीव आहे त्याला." सदाभाऊ म्हणाले. 

"शिकतोय तो अजून. नोकरीचा पत्ता नाहीये. कसं द्यायचे आपल्या ताईला त्या घरात?" रघू एक-एक आठवून बोलत होता. 

श्रीधरची कॉलेजातील लफडी सांगायची त्याची हिंमत होत नव्हती. कारण ते त्याच्याही अंगलट आले असते. चित्राचे लग्न झाले तर कावेरी आणि तो एकत्र येतील ही आस होतीच.

"रघू, अरे, मित्र आहे तो तुझा. तरी ओळखलं नाहीस त्याला? हुशार आहे तो. लाथ मारेल तिथून पाणी काढेल, अशी धमक आहे त्याच्यात. आता तो गरीब आहे पण माझं मन मला सांगतोय, तुझ्याआधी तो नोकरीला लागेल, तेही चांगल्या पगाराच्या."
सदाभाऊच्या बोलण्यात एक वेगळाच विश्वास होता. 

काय बोलणार रघू आता? तो द्विधा मनस्थितीत अडकला होता. पण तरीही त्याला कुठेतरी वाटायचे चित्राने तरी लग्नाला नकार द्यावा. 

चित्राच्या नकाराचा प्रश्नच नव्हता. आजपर्यंत तिने बाच्या एकाही गोष्टीला कधी विरोध केला नव्हता. बा म्हणेल तीच पूर्व दिशा. तो कोणाला ओळखण्यात कधी चुकणार नाही याची खात्री होती तिला. 


चित्रा आता पंचविशीत प्रवेशली होती. खूप सौंदर्यवती अशी नव्हतीच ती. पण तिच्या काळ्या -सावळया चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. सदाभाऊंना वाटले हीच योग्य वेळ आहे लग्नाची. आणि.. हाच तो योग्य वर! 

श्रीधरची घरची परिस्थिती अगदीच बेताची होती.
कधीकाळी गर्भश्रीमंत असणारे त्यांचे घराणे आता गरिबीच्या खाईत लोटले होते. वडिलांचा केव्हाच मृत्यू झाला होता. बहिणीचे लग्न झाले होते. आई, तो, आणि एक लहान बहीण.. एवढंच त्याचे कुटुंब होते. 

सदाभाऊला वाटले, गरिबी काय आज आहे, तर उद्या नाही. पण माणूस महत्वाचा. माणूस म्हणून श्रीधर त्यांना खूप चांगला वाटला. त्यांनी ठरवले, आता चित्राचे लग्न होईल तर श्रीधरशीच. 


"आई मी लग्न करतोय." श्रीधरने लक्ष्मीला सांगताच ती सुन्न डोळ्याने केवळ बघत राहिली.

"श्रीधर, आपले घर, जमीन, तुझे पुढील शिक्षण, बहीण.. या सर्वांची जबाबदारी सोडून लग्नाचे काय घेऊन बसलास?" ती विचारत होती.

"आई, अगं मी काहीच विसरलो नाही. लग्नाचा निर्णय देखील विचारपूर्वक घेतोय."

"श्रीधर, ती मुलगी तुझ्यापेक्षा मोठी आहे." मनातील घालमेल कशी बोलून दाखवावी हे लक्ष्मीला कळत नव्हते.

"आई, म्हणूनच तर ती मला हवी आहे. मोठी आहे, सेल्फ डिपेंडन्ट आहे. होईल तर तिची आपल्याला मदतच होईल. तू नको काळजी करू." तो लक्ष्मीला समजावत होता.

श्रीधरच्या आईला मात्र चित्रा सून म्हणून पसंत नव्हती. आधीच काळी-सावळी. त्यातही वयाने मोठी.

तिला वाटायचे,'पोराला वेड बीड लावलंय की काय या बयेनं? नाहीतर एवढा माझा हुशार लेक. का अशा मुलीशी लग्न करेल?' 

लग्नाआधीच तिच्या मनात होणाऱ्या सुनेबद्दल एक अढी निर्माण झाली. लग्नाला ठाम विरोधच होता तिचा.

पण श्रीधरचे मात्र पक्के होते, लग्न करेन तर चित्राशीच. 

आणि मग ठरलं. बैठकीत श्रीधर -चित्राच्या लग्नाची सुपारी फुटली. लवकरच चित्राच्या अंगाला श्रीधरच्या नावाची हळद लागली.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all