Login

दोन घडीचा डाव! भाग -४

कथा.. एका विस्कटलेल्या डावाची!

दोन घडीचा डाव!

भाग -चार.


"लेकरा, तुझ्यामुळे आपल्या पूर्वजांच्या कमाईचा तुकडा आपल्याजवळ राहिला. इतक्या लहान वयात कुठून शिकलास रे हे शहाणपण?" मांडीवर त्याचे डोके ठेवून ती त्याला थोपटत होती. लहानगी देविका त्यांच्या जवळ येऊन बसली. आळीपाळीने ती दोघांना बघत होती.


"आई, तू खूष आहेस ना?" तिच्याकडे चेहरा वळवून तो विचारत होता. तशी तिच्या डोळ्यातील दोन थेंब त्याच्या गालावर येऊन विसावली.


त्याच्या प्रश्नावर काय बोलणार ती माऊली? व्यसनासाठी नवरा होते नव्हते सगळे विकायला निघाला अन पोराने त्याच्याकडून घराण्याची शेवटची निशाणी परत मिळवली. हसावे की रडावे तिलाच कळत नव्हते.


"शिरी, तुला एवढंच सांगते की कसल्या व्यसनाच्या पाठी कधी लागू नकोस. पैसा जवळ असला की लोकं भुलतात अन आपल्याला भुलवतात. तू तुझ्या बाबासारखा झालेला मला बघवणार नाही रे. शिकून मोठा हो. असं सगळं गमावू नकोस." त्याच्या केसातून हात फिरवत ती बोलत होती.


******


'शिकलो मी. खूप शिकलो. एवढा शिकलो की अख्ख्या पंचक्रोशीत अजूनही माझ्याइतका शिकलेला कोणी सापडणार नाही.'

हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे तो एकटक पाहत होता. बालपणीची ती आठवण अजूनही ठसठसत होती.


देवाजीने घराबाहेर पाऊल टाकले तेव्हा ते त्याचे शेवटचे दर्शन असेल असे स्वप्नातही कोणाला वाटले नव्हते. आताशा असा दोन तीन दिवस बाहेर भटकून तो घरी यायचा तसाच या वेळीही गेला असेल असे समजून त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अचानक सुधाकर दारात उभा राहिला.


"लक्ष्मी वहिनी.." त्याने दिलेल्या हाकेसरशी डोळ्यात पाणी उभे राहिले होते.


"सुधाकर भावोजी? तुम्ही?" जराशा नाखुशीनेच लक्ष्मीने प्रश्न केला.


"वहिनी आपला देवा गेला हो." डोळे पुसत तो म्हणाला. त्याच्या बोलण्याने ती मटकन खाली बसली. तेवढ्यात श्रीधर बाहेरून आला.


"काय बोलताय काका?" त्याच्या आवाजात जरब होती.


"खरं तेच बोलतोय. तालुक्याला गेलो तेव्हा माहिती पडले. तो इथून बाहेर पडला आणि रांजणगावी भरणाऱ्या देवाच्या यात्रेला गेला. देवाचा भक्त म्हणून त्या गावात त्याला मान होता. तीन दिवस तो तिथेच मंदिरात राहिला आणि चौथ्या दिवशी अचानक त्याने देह सोडला. त्याचे अंतिमसंस्कार देखील तिथल्या लोकांनीच केले." सुधा त्यांना सांगत होता.


"नाही, हे खोटं आहे." लक्ष्मी ऊर बदडवून रडत होती.


दुसऱ्या दिवशी रांजणगावी जाऊन श्रीधरने चौकशी केली तर सुधाने सांगितलेली गोष्ट खरी असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. देवाजी बाकी कसाही असला तरी देवाचा निस्सीम भक्त आणि देवळात झालेला मृत्यू म्हणून मग त्याचे उत्तरकार्य तिथेच केले होते. खरे तर तो मूळचा कुठला हेदेखील तिथे कोणाला माहिती नव्हते आणि म्हणून त्याच्या घरी बातमी पोहचवायची तसदी कोणी घेतली नव्हती.


देवाजी असा अचानक कायमचा निघून गेल्यामुळे लक्ष्मीचा संसार उघड्यावर पडला. श्रीधर थोडा मोठा होता पण देविका तर अजून शाळेतही जायला लागली नव्हती. संसार उघडा पडला तरी लक्ष्मीने पोरांना उघड्यावर टाकले नाही. आपल्या मायेचा पदर तिने त्यांच्या डोक्यावर ठेवला. मोठ्या दोन्ही पोरी त्यांच्या सासरी तशा सुखी होत्या. इथे लक्ष्मीकडे मात्र सगळी चणचण होती.


"द्वारका वहिनी, कुठे काही काम मिळेल का हो?" एक दिवस अगतिकतेने तिने द्वारकेला विचारले.


द्वारका तिला आपल्या ओळखीने मजुरीच्या कामाला घेऊन गेली. आजवर असे कधी कोणाच्या दारात पदर पसरायची वेळ लक्ष्मीवर आली नव्हती. देवाजी गेला आणि घराचे वासे पूर्णपणे उलटे फिरायला लागले.


"शिरी, आयुष्यात पैशांपेक्षा काहीच महत्त्वाचे नसते रे. तुझे बाबा गेले, जमीनजुमला गेला आता कोणी विचारणारे सुद्धा उरले नाहीत." डोळे पुसत ती त्याला सांगत होती.


"आई, हेही दिवस जातील. तू म्हणतेस तसे मी खूप शिकेन, खूप सारा पैसा कमवेन. आपले गेलेले वैभव परत मिळवेन. तुझ्या श्रीचे तुला वचन आहे हे." तिच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला.


"दादा, मलाही शाळेत जायचे आहे. मी सुद्धा खूप शिकेन." देविका त्याला येऊन बिलगली तसे त्याने तिला उराशी कवटाळले. वडिलांची माया तिला कधी लाभली नव्हती. आता श्रीधरच तिचा पिता झाला होता.


******

'आई, शिकायचं तेवढं सांगितलेस. पण कधी हे का नाही सांगितलेस गं, की कसल्या गोष्टीचा कधी गर्व करू नकोस म्हणून? गर्वाचे घर खाली म्हणतात. माझ्यासारख्या गर्विष्ठ अन घमेंडखोर माणसाला तर स्वतःचे घर ही उरले नाही. आयुष्यात जे मिळवलं ते सर्व गमावलं. आता जगून तरी काय उपयोग? मला येऊ दे ना तुझ्याजवळ. तुझ्या कुशीत पुन्हा शिरायचे आहे. तुझी माफी मागायची आहे. सारं विसरून एक लहान मूल बनून तुझ्या मांडीवर विसावयाचे आहे.' त्याच्या डोळ्यातील कडा पाणावल्या होत्या.


"कसे आहात आजोबा? बरे ना?" ओळखीच्या आवाजाने श्रीधरने समोर पाहिले. समोर डॉक्टर श्रीनय होता.


"हो बरा आहे मी. आय एम परफेक्टली फाईन." त्याच्यातील इंग्रजीचा किडा पुन्हा वळवळायला लागला.


"द्याट्स नाईस! असेच जर राहिले तर लवकरच तुम्हाला डिस्चार्ज मिळेल." त्याच्या छातीवर स्टेथोस्कोप लाऊन चेक करत श्रीनय म्हणाला.


"ॲक्च्युली डॉक्टर, मला इथे नाहीच रहायचे आहे. असे बंधनयुक्त आयुष्य नाही हो मला जगायचे. बाहेरचे मोकळे आकाश मला साद घालतेय. त्या सादेच्या तालावर मला विहारायचे आहे." श्रीधर बोलत होता.


"अरे वाह! एकदम साहित्यिक भाषा बोलताय हो. आणखी दोन दिवस थांबा. चांगले चालूफिरू लागलात की तुम्हाला सुट्टी." हसून बोलत श्रीधर पुढच्या पेशंटकडे वळला.


'साहित्यिक?' श्रीधरच्या ओठावर एक गूढ हसू आले.

'साहित्यिक होतो म्हणून कॉलेजात असताना कित्येक पोरींच्या नजरेत घर करून होतो. एखादीवर दोन ओळी लिहिल्या तरी ती पार खलास होऊन जायची. मी मात्र दुसऱ्याच कुणासाठी तरी माझा कलिजा राखून ठेवला होता. सुमन! काय सुंदर होती ती! माझी ड्रीमगर्ल.. स्वप्नसुंदरी होती ती.'

अचानक त्याच्या मनात त्याचे पहिले प्रेम आठवायला लागले.


देवाजीचा मृत्यू झाला तेव्हा नुकताच श्रीधरने दहावीची परीक्षा दिली होती. निकाल येईपर्यंत आईसोबत तोही मजुरीला जात होता. जात्याच हुशार असा तो मॅट्रिकला पंच्याहत्तर टक्के घेतले आणि मग पुढच्या शिक्षणासाठी त्याने मोठया शहरात पाऊल टाकले. मुलगा जिद्दीने शिकतोय म्हणजे लवकरच चांगले दिवस येणार या आशेने लक्ष्मी प्रत्येक दिवस कंठत होती.


ज्या शहरात तो गेला ते शहर म्हणजे आजूबाजूच्या शंभर -दोनशे किलोमीटरच्या परिसरातील विद्येचे माहेरघर होते. दुरून दुरून तिथे मुलं शिकायला यायची. श्रीधरला मिळालेल्या चांगल्या गुणांच्या जोरावर त्याला तिथे फुकटात प्रवेश मिळाला. तो खूष होता. पोरगा चांगल्या शहरात शिकणार म्हणून लक्ष्मीही आनंदी होती.


ज्युनिअर कॉलेज झाले आणि त्याने त्याचे वसतिगृह सोडले. कारण होस्टेलचे जेवण आणि जीवन दोन्ही त्याला मानवले नव्हते. सारखा तो आजारी पडू लागला म्हणून दोन वर्ष कशीबशी काढल्यावर त्याने वसतिगृहाला कायमचा रामराम ठोकला.


पुढे सिनिअर कॉलेजमध्ये प्रवेश तर मिळाला पण राहायचे कुठे हा प्रश्न होता आणि अशातच त्याला भेटला एक जीवभावाचा दोस्त, ज्याचे नाव होते रघू. 


एकच कॉलेज, एकच बेंच आणि मग त्यांची रूमही एक झाली. रघू, मंगल, श्रीधर अशी मित्रांची एक नवी टोळी निर्माण झाली. मंगलच्या घरची परिस्थिती जेमतेमच. श्रीधरच्या घरची गरिबी तर पाचवीला पूजलेली. त्या मानाने रघू जरा बऱ्या घरचा. खाऊन पिऊन सुखी. त्याने घरून आणलेल्या वाणसामनावर हे दोघं आरामात राहत होती. दोस्ती म्हणजे काय हे कदाचित इथेच तो शिकला होता.


अशातच एक दिवस एक नवीन ॲडमिशन आली. गोरीपान देखणी अशी सुमन. तिला बघून श्रीधर एकदम गारच झाला. गोऱ्या वर्णाची ती, नुकत्याच उमललेल्या टवटवीत गुलाबासारखी भासायची. हसली की तिची शुभ्र दंतपक्ती विखूरलेल्या मोगऱ्याच्या कळ्यांप्रमाणे उठून दिसायची. वर्गातील कित्येक मुलांच्या मनात तिने राज्य केले होते, पण मीच तिला माझी राणी करणार हा श्रीधरचा विश्वास होता.


रात्री तर ती स्वप्नात यायचीच. दिवसाढवळ्यादेखील उघड्या डोळ्यांनी तो तिच्याच स्वप्नात गुंतलेला असायचा. तिला कशाप्रकारे आपली करता येईल याच विचारात तो होता.

:

क्रमश :

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

सुमन आणि श्रीधरचे सूत जुळेल का? वाचा पुढील भागात.

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

******

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all