दोन घडीचा डाव!
भाग- तीन.
"देवा भावोजी, तुमच्या शिऱ्याला खेळायला लवकरच नवा सवंगडी येणार आहे." देवाजीकडे बघून द्वारका सूचक हसली आणि तिच्या घराकडे निघून गेली.
"लक्ष्मी, द्वारका वहिनी खरं बोलतेय?" तिचा उजळलेला चेहरा हातात घेत देवाजी आनंदाने विचारत होता. आज पहिल्यांदा त्याच्या श्रीला कोणी 'शिऱ्या' बोलल्याचा त्याला राग आला नव्हता. तिने मान हलवून तिची नजर खाली केली.
न्हाणीघरातून बाहेर आलेला श्रीधर आईबाबाच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भव टिपत होता. त्यांना आनंदी बघून त्याचाही चेहरा उजळला.
******
लक्ष्मीचा उजळलेला चेहरा धूसर होत गेला आणि श्रीधरने ने त्याचे किलकिले डोळे हळूवार उघडले.
समोरचे त्याला स्पष्ट दिसत नव्हते. सकाळची त्याला न आवडणारी नर्स गेली होती. पांढऱ्या पोषाखातील एक दुसरीच नर्स त्याच्याकडे येत होती. त्याने डोळे उघडझाप करून पुन्हा तिच्याकडे पाहिले. तिची तुकतुकीत गोरीपान कांती त्याला आईची आठवण करून गेली.
"सुंदर आहेस गं." ती जवळ आली तशी त्याने मनापासून तिचे कौतुक केले. सकाळच्या शिफ्टमधल्या नर्सकडून हा पेशंट वेडा आहे हे तिला ठाऊक झाले होते.
"काय आजोबा, माझ्याशी लगट करता होय?" त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकून ती म्हणाली आणि त्याचे दुसरे सलाईन लाऊन ती निघून गेली.
'लगट..' ती बोललेली शब्द त्याच्या हृदयात काट्यासारखा रुतला. लगट करणे म्हणजे काय? त्याला चांगलेच तर ठाऊक होते. यावेळी मात्र त्याने मनापासून तिची स्तुती केली होती. कारण तिच्या गोऱ्या रंगात त्याला त्याची आई दिसली होती.
घरात पुन्हा नव्या जीवाची चाहूल लागली तसा सगळीकडे आनंदीआनंद पसरला होता. देवाजी लक्ष्मीची नीट काळजी घ्यायला लागला. पण हे सगळे नव्याचे नऊ दिवसच होते. मित्रांच्या संगतीने पुन्हा तो मुळपदावर आला होता. वडिलांच्या वाईट मित्रांची संगत आणि आता सुरु झालेली मदिरेची लत, श्रीधरच्या आयुष्यात वेगळेच वादळ येऊन उभे राहणार होते.
"मी काय ऐकते आहे? तुम्ही जमिनीचा तुकडा विकलात?" डोळ्यात पाणी घेऊन लक्ष्मी देवाजीला विचारत होती.
"लक्ष्मी, खूप मोठा गुन्हा केल्यासारखे माझ्याकडे बघू नकोस. इतकी जमीन आहेच की आपल्याकडे. विकली पाच एकर, तर असा किती फरक पडतोय?" तिच्या जवळ येत देवाजी म्हणाला.
तोंडातून येणाऱ्या दारूच्या उग्र दर्पामुळे लक्ष्मीने तोंड फिरवले.
"लक्ष्मी, तू अशी वागतेस म्हणून मग मला दारूला जवळ करावी लागते. तुला माझे मित्र आवडत नाही. त्यांचा तुला राग येतो म्हणून हल्ली त्यांचे इथे येणे मी बंद केले. आता बाहेर जातो म्हणायला, तर जवळ पैसा नको का? म्हणून जमीन विकली तरी तू तोंड वेंगाळतेस? मग मी काय करू ते तरी सांग?" तो बोलत होता, ती मात्र डोळ्याला पदर लाऊन त्याच्यापासून दूर होत आत गेली.
"श्री, इकडे ये." त्याच्या हाकेला ओ देत श्रीधर त्याच्यासमोर उभा राहिला. बाबाची आजची अवस्था बघून त्याचे शरीर थरथर कापत होते.
"काय रे, माणसासारखा माणूस आणि असा घाबरतोस? आईच्या मागे राहून राहून अगदी शेळी झालाहेस. जा अभ्यास कर." त्याला दटावून तो तेथेच आडवा झाला.
हल्ली देवाजीचे व्यसन चांगलेच वाढले होते. घरात एका इवल्या परीने जन्म घेतला होता. 'देविका' नाव तर त्यानेच सुचवले होते. ती गोंडस कळी दिसायला अगदी त्याच्यासारखी होती म्हणून स्वतःच्या नावावरून त्याने तिचे हे नाव ठेवले. प्रत्यक्षात त्याचा तिच्याशी संबंध केवळ नाव ठेवण्यापुरताच. बापाचे प्रेम काय असते हे तिला कधी कळलेच नाही. देविका चंद्राच्या कलेने वाढत होती आणि देवाजीचे व्यसन त्याच्या दुपटीने.
कधीकाळी ज्याच्याकडे आपला आदर्श म्हणून बघणारा श्रीधर तिरस्कार कधी करायला लागला त्याचे त्यालाच कळले नाही.
देवाजीच्या व्यसनाने घरात पाय रोवले आणि वडिलोपार्जित जमवलेल्या लक्ष्मीने हळूहळू घरातून काढता पाय घेतला. घरातील श्रीमंती केवळ नावापूरती उरली होती. देवाजीच्या नावाभोवती असलेले ठेकेदाराचे वलंय संपत आले होते. कधी पाच एकर, कधी दोन एकर असे करता करता चार वर्षात पन्नास एकर जमिनीपैकी केवळ दीड एकराचा तुकडा उरला. ऐसपैस असलेला त्याच्या चौसोपी वाड्यापैकी तीन लहान खोल्यांचे छप्पर तेवढे अंगावर राहिले.
त्या वाड्याने केवळ पैश्यांची बळकत पाहिली होती. मोठमोठ्या लोखंडी संदूकात रुपयांच्या राशी पाहिल्या होत्या आता त्याच वाड्यावर एक अवकळा पसरली होती.
श्रीधर आता मॅट्रिकला होता. आपल्या पूर्वजांच्या श्रीमंतीच्या कहाण्या आणि वडिलांच्या करतुदीमुळे आलेले अठराविश्वे दारिद्र्य या दोहोंची सांगड घालणे त्या नवतरुणाला कठीण जात होते.
"शिरी, ज्या ठिकाणी पैश्यांच्या राशीत लोळले, त्याच ठिकाणी एकेक आण्याकरिता आता तरसायला लागते आहे. तू काहीही कर पण खूप शिक. बापाने जे हाल केले ते तू करू नकोस." लहानग्या देवीकाला पोटाशी कवटाळून लक्ष्मी त्याला सांगत होती.
पैसा कसा महत्त्वाचा हे त्यालाही पटू लागले होते. शाळा सुरू होण्यापूर्वी दोन तास चहाच्या टपरीवर काम करून तो पैसा गाठीशी बांधू लागला. देवाजीकडे दुर्लक्ष करून तो आईसाठी झटू लागला.
"लक्ष्मी, तू मध्ये पडू नकोस. हा उरलेला जमिनीचा तुकडा मला विकू दे." एकदा असाच दारूच्या नशेत झोकांड्या देत आलेला देवाजी लक्ष्मीवर आगपाखड करत होता.
"मी नाही हे होऊ देणार. अहो, स्वतःच्या लेकरासाठी तरी काही उरवून ठेवा. जनाची नाही तर मनाची तरी काही लाज बाळगा."
"ए, बायकोने नवऱ्याला शहाणपणा शिकवायचा नसतो. एवढं साधं कळत नाही का तुला?" त्याने जवळ जवळ तिला ढकलून दिले. बाहेरून आत येणाऱ्या श्रीधरने तिला पकडले म्हणून पडायची वाचली ती. बापाचा रुद्रावतार बघून देवीका रडायला लागली.
"एय, श्री. काय रे? आहे ना तुझ्यात दम? शाळेत जातोस ना? मग कॉलेजात जाशील. मोठा ऑफिसर होशील? तुला रे कसली कमी असेल? सांग तुझ्या आईला, मी तिच्या लेकाची नाही तर माझ्या वडीलकीची जमीन विकतोय ते." तो आता त्याच्यावर घसरला होता.
"वडिलोपार्जित तेवढाच एक तुकडा उरलाय. शिरी, समजाव ना रे तुझ्या बापाला." लक्ष्मीच्या डोळ्यातून गंगायमुना वाहत होत्या. अंगणात एव्हाना आजूबाजूचे चार लोकं जमा झाले होते.
श्रीधरने एकवार आईकडे पाहिले आणि मग तो देवाजीजवळ येऊन उभा राहिला. "जमीन विकायची आहे तुम्हाला?" त्याच्या डोळ्यात आरपार नजर टाकत त्याने विचारले.
"हो." देवाजीच्या आवाजात जरब होती.
"मग करा सौदा." श्रीधरची नजर अजूनही त्याच्या डोळ्याला भिडलेली.
"शिरी.." लक्ष्मीचा अगतिक स्वर त्याच्या कानावर पडला.
त्याने तिच्याकडे बघून हात दाखवला. "तुम्हाला जमीन विकायची आहे ना? मला घ्यायचीय ती जमीन. तुम्ही माझ्याशी सौदा करा." लेक बापाला म्हणत होता. लक्ष्मी जागीच थिजल्यासारखी त्याच्याकडे बघत होती.
"तू घेतोस ती जमीन? लईच मोठा झालास. चल हजार रुपयाचे पाकीट टाक. पैसा माझा, जमीन तुझी." त्याच्याकडे छद्मीपणे हसून देवाजी म्हणाला.
"असे नाही. मला माझ्या नावाचे विक्रीपत्र नाहीतर बक्षीसपत्र करून द्या. जमीन माझी, पैसा तुमचा." खिशातून शंभर रुपयांच्या दहा नोटा बाहेर काढत तो म्हणाला.
दोन दिवसात देवाजीने उरलेला शेतीचा तुकडा श्रीधरच्या नावे बक्षीसपत्र म्हणून लिहून दिला आणि त्याच्याजवळील पैसे स्वतःच्या खिशात टाकले.
"लक्ष्मी, पोरगा बरोबरीचा झालाय. तुला आता माझी गरज लागणार नाही. तुम्ही तिघे सुखी राहा." देविका, श्रीधर आणि लक्ष्मीकडे एक नजर टाकून देवाजीने घराचा उंबरा ओलांडला.
"शिरी, एवढे रुपये कुठून जमा केलेस तू?" लक्ष्मी त्याला विचारत होती.
"आई, असा एक दिवस उजाडेल या भीतीने मी बाहेर काम करून पैसे जमवीत होतो. परवाच शेटजीने वर्षभराची कमाई म्हणून हातावर हजार रुपयाचे पाकीट ठेवले आणि ते.." त्याला पुढे बोलवेना. एक मोठा हुंदका गळ्याशी दाटून आला होता. लक्ष्मीने त्याला कवेत घेत प्रेमाने गोंजारले.
"लेकरा, तुझ्यामुळे आपल्या पूर्वजांच्या कमाईचा तुकडा आपल्याजवळ राहिला. इतक्या लहान वयात कुठून शिकलास रे हे शहाणपण?" मांडीवर त्याचे डोके ठेवून ती त्याला थोपटत होती. लहानगी देविका त्यांच्या जवळ येऊन बसली. आळीपाळीने ती दोघांना बघत होती.
:
क्रमश: