दोन घडीचा डाव! भाग -१९(अंतिम भाग)

कथा एका विस्कटलेल्या डावाची!
दोन घडीचा डाव!
भाग -एकोणवीस. (अंतिम भाग.)

"चिमण्यांनो, दोन दिवस आपल्या संस्कारवर्गाला सुट्टी बरं का? चला आता आपल्या घरी पळा." वर्गातील मुलींना डब्यातील लाडू देत तिने पिटाळले आणि मग मुलाला फोन लावला.

"मी या डॉक्टरांसोबत निघते. तुम्ही तुम्हाला जमेल तसे या." श्रीधरबद्दल त्याला सांगून तिने फोन कट केला.


श्रीधरच्या अंतिमसंस्काराच्या ठिकाणी चित्रा उभी होती. वडिलांचे अंतिमदर्शन घेताना मुलांना अश्रू अनावर होत होते. त्यांना मनातून बाप म्हणून तो हवा होता.. अखेरपर्यंत. पण त्यानेच सर्वांशी नाते तोडून लिलीसोबत जाणे स्वीकारले होते. आज तिथे ना लिली होती ना तिचा मुलगा. होती ती चित्रा अन त्याचा अंश असलेली त्याची स्वतःच्या रक्ताची मुले.

आगीच्या ज्वाळा उठू लागल्या तसे त्याच्या चितेला नमस्कार करून चित्रा मागे सरली. डोळ्यात पाणी का आले तिलाही कळले नाही. मागे सरताना तिच्याही नकळत डोळ्यातील दोन थेंब चितेवर पडले. श्रीधरच्या निष्प्राण देहाला कदाचित याचीच तर वाट होती. आता तो मुक्त होणार होता.. कायमचा!

"मिस्टर श्रीधरच्या आठवणी अजूनही छळतात ना तुम्हाला?" तिच्या डोळ्यातील पाणी हेरून मीराने हळूच विचारले.

"कसलेही नाते न उरलेल्या माणसाच्या कसल्या आठवणी मला छळतील?" चित्रानेच तिला प्रतिप्रश्न केला.

"मग तुमच्या डोळ्यात पाणी का?" मीरा तरी कुठे तिचा पिच्छा सोडणार होती?

"माणूसकीचे." डोळे पुसत चित्रा उत्तरली. "एखादी परकी व्यक्ती गेली तरी माणुसकीच्या नात्याने डोळे येतातच की भरून. तसेच काहीसे."

"खरंच, मिस्टर श्रीधर म्हणायचे तसे तुम्ही मुव्ह ऑन झालात. रिअली यू आर ग्रेट." मीराच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा आदर दाटून आला.

"गरजेचं होतं ते. त्या यातनात अडकून पडले असते तर गुदमरून केव्हाच माझा श्वास बंद पडला असता. लिलीने श्रीधरला दगा दिला आणि तो मात्र तिथेच अडकून राहिला. त्यातून बाहेर निघणं नाही जमलं त्याला. एखाद्याने त्याला फसवणे हा पराभव होता त्याचा. हा पराभव त्याच्या जिव्हारी लागला आणि त्यातून हे सगळं घडलं. स्वछंदी जीवन जगणारा तो पण त्याला कळलेच नाही की आपण सुद्धा आपल्या आयुष्यावर प्रेम करायला शिकलो पाहिजे. ते म्हणतात ना लव्ह यू जिंदगी.. त्यासारखं."

"फार सुंदर बोलता हो तुम्ही. परखड आणि अगदी स्पष्ट. आवडलं मला." मीरा.

"हे सगळं मी करू शकले. सुरुवातीचे पाऊल मीच स्वतः उचलले. पण मला बळ दिलं ते श्रीने. तो मला भेटला नसता तर कदाचित मी हे करू शकले नसते." चित्रा सांगत होती.

"श्री?" मीराच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.

"हम्म. श्री. श्रीरंग नाव त्याचं. पण नंतर मी त्याला श्री च बोलू लागले. त्यानेच माझे वकीलपत्र घेतले होते. किती योगायोग बघ ना, माझ्या आयुष्यात श्रीनच यावं आणि माझं वकीलपत्र घ्यावं अन श्रीधरच्या आयुष्यातही दुसऱ्या श्रीनेच येऊन त्याला आधार द्यावा."

"हो. पण तुमच्या श्री सारखं मला आजोबांना त्यांच्या गर्तेतून बाहेर नाही काढता आलं. शेवटी मी हरलोच." श्रीनय तिथे येत म्हणाला.

"नाही रे बाळा तू कुठे हरलास? तू त्याला भेटलास म्हणून तर नेत्रदानासारखे महान कार्य करण्याचे त्याला सुचले. श्रीरंगाने माझे वकीलपत्र घेतले आणि तू श्रीधरचे दखलपत्र घेतलेस. माझ्या श्रीने मला बाहेर पडायला मदत केली हे खरे असले तरी मुळात पहिले पाऊल मीच तर पुढे टाकले होते. श्रीधरला यातून बाहेर पडायचंच नव्हतं म्हणून तो तुझे ऐकू शकला नाही. दुसऱ्याचं ऐकणारा नव्हता रे तो. त्याला त्याचेच ऐकायचे होते." ती खिन्नपणे म्हणाली.

"आता हेच पहा ना, शेवटच्या क्षणी मी त्याच्यासाठी अश्रू ढाळावेत हेच त्याच्या मनी होते. माझ्या डोळ्यात पाणी आलेसुद्धा. जाता जाता इथेही तोच जिंकला की. त्याच्या आयुष्याचा दोन घडीचा डाव सपशेल हरला तो. पण शेवटच्या क्षणीही त्याला हवे तसाच तो वागला." बोलून झाल्यावर ती जायला निघाली.

"आज्जी, आजच्या दिवस थांबा ना. उद्या मी तुम्हाला सोडून देतो." नकळत श्रीनयच्या तोंडून बाहेर पडले.

"नाही रे बाबा, नको. आता पुन्हा दुसऱ्या नात्यात गुंतणे नको.माझी मी जाईन निघून." तिने हलके स्मित करून त्यांचा निरोप घेतला.

चित्रा निघून गेली. 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..' चित्रमहालातील चिमुरड्यांच्या आवाज उगाचच कानात घुमतोय असे श्रीनयला वाटत होते.

******

"डॉक्टर श्रीनय, पेपरमधली ही बातमी पूर्ण वाचून झाली का हो?" नर्सच्या प्रश्नाने श्रीनय भानावर आला. तिने हॉस्पिटलमध्ये आल्याआल्याच त्याच्या हातात पेपर ठेवला होता. अन ती बातमी वाचताना कालपर्यंत घडलेला घटनाक्रम जशाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला होता.

त्याने हातातील पेपरवर पुन्हा नजर फिरवली. '..वयाच्या पंच्याहत्तरी नंतरही नेत्रदान करणाऱ्या या तरुण वृद्धाला भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या या दानामुळे दोन नेत्रहीन जीवांना हे जग बघता येऊ शकणार आहे.' त्याने बातमीची शेवटची ओळ वाचली आणि समाधानाने त्याचे ओठ रुंदावले.

"सिस्टर, चला राउंडला जाऊया." हातातील स्टेथो गळ्यात अडकवत तो निघाला. आज त्यालाही श्रीधरच्या निर्णयाचे कौतुक वाटत होते.

*****समाप्त.*****
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*


कथेबद्दल थोडेसे..

'शोध.. तिच्या अस्तित्वाचा!' ही कथामालिका वर्षभरापूर्वी मी लिहिली होती. अर्थात ती कथा चित्राची होती. तिच्यावरच्या अन्यायाची, तिच्या संघर्षाची होती.
'दोन घडीचा डाव!' ही कथा म्हणजे त्या कथेचा पुढचा भाग समजू शकतो.

चित्राने घेतलेल्या घटस्फोटानंतर तिचे आयुष्य बदलले होते.पण पुढे श्रीधरचे काय झाले असावे हा प्रश्न मला छळत होता आणि म्हणूनच त्याची बाजू दाखवणारी ही कथा मी लिहायला घेतली. अर्थातच तो कथेचा नायक दाखवला असला तरी त्याच्या वागण्याचे समर्थन कुठेच केले नाहीये. तो चुकीचेच वागला होता आणि म्हणूनच शेवटी पश्चतापाच्या आगीत होरपळून त्याने मृत्यूला कवटाळले. पण जाता जाता मात्र त्याने केलेली एक चांगली कृती त्याच्या वाईटावर मात करून गेली.

त्याच्या या कृत्याने पापाने भरलेला त्याचा घडा रिता झाला नसला तरी त्याच्या ओंजळीतील पुण्याचे दान मात्र वाढले होते. त्याला हवी असलेली मुक्ती कदाचित त्याला मिळाली असावी. आता श्रीधरची ही कहाणी इथेच संपते आहे.

धन्यवाद!

🎭 Series Post

View all