भाग -अठरा.
"मी असा दीन, असहायपणे नाही जगू शकत. म्हणून तर मला मृत्यूला जवळ करायचे होते. तर तुमच्या श्रीने मला इथे आणून ठेवले. डॉक्टर मीरा, कुणाची सहानुभूतीची नजर नाही हो मला सहन होत. तो खूप मोठा पराभव आहे माझा. या श्रीधरचा." डोळे पुसत तो म्हणाला.
"मिस्टर श्रीधर, आता तुम्हाला या सगळ्याचा पश्चाताप होतोय ना? झाले तर मग. सगळं विसरून नवे आयुष्य सुरू करा."त्याला समजावत हळुवारपणे मीरा म्हणाली.
"लिलीच्या वागण्याचा खूप त्रास होतो मला." श्रीधर हळवे होत म्हणाला.
"तुमच्या वागण्याचा चित्रा मॅडमना जो त्रास झालाय त्याबद्दल्यात हा त्रास काहीच नसावा. तुम्ही त्यांचा इतक्या वर्षाचा विश्वास मोडलात. लिलीनेही तुमच्याशी तेच केले. टिट फॉर टॅट, सिम्पल." ती.
"हम्म." खिन्न होत तो.
"मिस्टर श्रीधर, विसरा आता ते. श्री तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन आलाय. ही जागा चांगली आहे. तुमच्याकडे ज्ञानाचा भरपूर साठा आहे. त्याचा उपयोग करा. आय होप तुमच्या हातून नक्कीच काहीतरी चांगलं घडेल." स्मित करून मीरा.
"आय होप सो." तिच्याकडे बघून श्रीधर.
"होप फॉर द बेस्ट!" ती हसून म्हणाली. "बरं, मी निघते आता. उशीर होतोय."
"डॉक्टर मीरा.." ती जायला उठली तसे त्याने तिला हाक दिली. ती थबकली जराशी.
"थँक यू." तो भारावल्यासारख्या म्हणाला. "माझ्याशी कसले नाते न जोडताही माझ्या मनाला जाणून घेण्याबद्दल खरंच थँक यू."
"मिस्टर श्रीधर, डोन्ट फॉरगेट की मी एक डॉक्टर आहे. डॉक्टर -पेशंटचे रिलेशन आहेच की आपल्यात." ओठावर स्मित आणून तिने बाहेर निघाली.
******
"मीराऽऽ अगं ब्रेक, ब्रेक लाव." श्रीनय जोरात ओरडला तसे तिने करकचून ब्रेक लावला. समोरची गाडी थोडक्यात बचावली होती. तिच्या हृदयाची धडधड जोरात ऐकू येत होती.
"काय गं, कसल्या विचारात हरवली होतीस? तू खाली उतर, मी ड्राईव्ह करतो." कारच्या बाहेर पडत तो.
"नो श्री. आय एम ओके नॉऊ." तिच्या श्वासांची गती वाढली होती.
"मीरा, यू आर नॉट ओके. मला दिसते आहे ना? तू बैस बाजूला. मी चालवतो. तसेही आपण शहरात पोहचलोय. त्यांचे घर तेवढे शोधायचे आहे." कारचा दरवाजा उघडत तो.
ती नाईलाजाने बाजूला येऊन बसली. कारचे स्टीअरिंग आता श्रीनयच्या हाती होते.
"मीरा, प्रोफेशनल वागूनही शेवटी तूही गुंतलीसच ना त्यांच्यामध्ये." तिच्याकडे एक कटाक्ष टाकून तो म्हणाला.
"मिस्टर श्रीधर होतेच तसे की कोणीही त्यांच्याकडे ओढल्या जाईल. त्यांचं व्यक्तिमत्व वेगळंच होतं रे. स्वतःची बुद्धी चांगल्या कामासाठी वापरली असती तर त्यांचे आयुष्य निराळे असते." मीरा खिन्न हसून म्हणाली.
"श्री, इतक्या कमी सहवासाने सुद्धा आपली ही कंडिशन आहे, मग सत्य ठाऊक झाल्यावर त्या चित्रा मॅडम कशा रिॲक्ट होतील रे? त्यांची काय अवस्था होईल?" त्याच्याकडे बघत मीराने विचारले.
"काय माहिती? त्यांच्याबद्दल आजवर जितकं ऐकलंय त्यावरून तरी त्या कणखर बाण्याच्या आहेत हे समजलंय. त्यामुळे दुःख होऊनही सांभाळतील त्या स्वतःला." श्रीनय समोर बघत बोलत होता.
"त्यांच्या मुलांना कळवायचं?" दोन क्षण थांबून तिने श्रीनयला प्रश्न केला.
"मीरा, त्यांच्याबद्दल जरा जास्तच विचार करते आहेस असे नाही का तुला वाटत? आणि आपल्याला त्यांच्या फॅमिलीबद्दल कुठे फारसे माहिती आहे? त्यांचा निरोप त्यांच्या चित्रापर्यंत पोहचवायचा. बाकी मग मुलांना सांगायचे की नाही ते त्या बघून घेतील." गुगल मॅप चेक करत तो म्हणाला, तशी मीरा शांत बसली.
थोड्यावेळाने ते दोघे चित्राच्या घरासमोर उभे होते. 'चित्रमहाल' नाव वाचून मीराच्या ओठावर स्फूट हसू उमटले. चित्रांगण ते चित्रमहालचा प्रवास श्रीधरकडून तिला कळला होता. चित्राला भेटायला ती तेव्हाच तर आतूर झाली होती. पण ही भेट अशाप्रकारे होईल, हे तिच्या गावीही नव्हते.
'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..' आत चिमण्या मुलींचा सूर लागला होता. काहीशी संभ्रमित होऊन मीराने दारावर थाप दिली.
गाण्याचा आवाज थांबला. एका चिमुरडीने येऊन दार उघडले.
"चित्रमहालात तुमचे स्वागत आहे." त्यांच्याकडे बघून ती चिमणी म्हणाली. त्याही अवस्थेत मीराच्या ओठावर स्मित आले.
"चित्रा मॅडम? त्या आहेत ना?" मीराने तिला विचारले.
"ॲडमिशन करायचीय? पण तुमच्यासोबत तर कोणीच नाहीये? कुणाची ॲडमिशन करायची आहे?" त्या चिमणीचे डोळे भिरभीरत होते.
"आज्जी तुझ्याकडे नवी स्टुडन्ट आलीये गंऽऽ.." दुसऱ्या चिमणीने आत वर्दी दिली.
श्रीनय आणि मीराचा गोंधळ उडाला होता. ह्या मुली काय बोलताहेत त्यांना काही कळत नव्हते.
"आले, आलेऽऽ." तेवढ्यात आतून आवाज आला.
पांढऱ्याशुभ्र केसांना डोक्यावर व्यवस्थित बसवत आतून चित्रा बाहेर आली. काळी सावळीशीच, कसला दिखावा नाही की काही नाही. त्या पांढऱ्या केसांना काळ्या रंगाची झालर लावण्याची सुद्धा तसदी घेतली नव्हती. जे आहे ते स्वच्छ आणि नितळ होते, खोटेपणाचा लवलेश नव्हता. चेहऱ्यावर एक नवे तेज मात्र विसावले होते.
"नमस्कार, मी चित्रा. लहानमुलांचे संस्कारवर्ग चालवते ना, म्हणून या चिमण्या जमल्यात." स्वच्छ हसून ती म्हणाली.
मीराचे ओठ देखील आपसूकच रुंदावले. " मी मीरा आणि हा श्री." तिला नमस्कार करत ती उत्तरली.
"श्री?" चित्राच्या डोळ्यात काहीतरी चकाकले.
"श्रीनय." तिचा गोंधळ श्रीनयने ओळखला.
"आम्ही श्रीधर आजोबांबद्दल बोलायला आली आहोत." शब्दांची जुळवाजुळव करत तो पुढे म्हणाला.
"माफ करा. ते आता इथे राहत नाही. आणि कुठे आहेत ते मला ठाऊक नाही." ती सभ्यपणे उत्तरली.
"चित्रा मॅडम, ॲक्च्युअली.."
"आज्जी, त्याबद्दलच आम्हाला सांगायचे आहे." मीरा पुढे काही बोलले तोच तिचे वाक्य कापत श्रीनय म्हणाला.
"मला कळले नाही. काय सांगायचे आहे?" त्या दोघांकडे बघून चित्रा.
"आज्जी.." श्रीनयने परत साद घातली आणि मग तिला श्रीधरबद्दल थोडक्यात सारे काही सांगितले.
चित्राच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. कदाचित डोळ्यात अश्रू जमा झाले असावेत पण तिने त्यांना बाहेर पडायला परवानगी दिली नाही.
"खरंच मी अग्नी दिल्याने त्याला मुक्ती मिळेल?" श्रीनय कडे वळून तिने प्रश्न केला.
"त्यांची शेवटची इच्छा होती. तुम्ही कराल ना पूर्ण?" त्याने थिजल्या स्वरात विचारले.
"इच्छा सांगण्यापूर्वी त्याने मला कुठे विचारले? नाते असताना नेहमी गृहीतच पकडले मला आणि आता काही नाते उरले नसताना शेवटच्या क्षणाला सुद्धा तेच केले. ठीक आहे. येते मी. करेन त्याची इच्छा पूर्ण." तिचा चेहरा परत निर्विकार झाला होता.
"तुमची मुलं? त्यांना कळवायचं?" मीराने मघापासून मनात खदखदणाऱ्या विचाराला बाहेर काढले.
"हम्म. तसा बाप म्हणून पोरांशीही चुकीचाच वागला तो. पण किमान पोरांना घडवलंही त्यानेच ना? मी करते फोन." चित्रा मोबाईल हातात घेत म्हणाली.
"चिमण्यांनो, दोन दिवस आपल्या संस्कारवर्गाला सुट्टी बरं का? चला आता आपल्या घरी पळा." वर्गातील मुलींना डब्यातील लाडू देत तिने पिटाळले आणि मग मुलाला फोन लावला.
"..मी या डॉक्टरांसोबत निघते. तुम्ही तुम्हाला जमेल तसे या." श्रीधरबद्दल त्याला सांगून तिने फोन कट केला.
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार.
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार.