दोन घडीचा डाव! भाग -१७

कथा विस्कटलेल्या डावाची!
दोन घडीचा डाव!

भाग -सतरा.

"मीरा दोन तासांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. आपण त्यांच्या चित्राला घेऊन येऊया. तोवर पोस्टमार्टम आणि डोळे काढण्याची प्रोसेस पार पडली असेल." मीराचा हात हातात घेत तो म्हणाला.

"श्री, आर यू शुअर? या पत्त्यावर जायचं पक्के आहे ना?" त्याच्या हातावर हात ठेवून तिने विचारले.

हम्म. त्यांची शेवटची इच्छा, नव्हे त्यांचा हट्ट मला पुरवावाच लागेल. त्याशिवाय त्यांना मुक्ती मिळणार नाही." डोळे पुसत तो बोलला.

"मुक्ती वगैरे? तू मानतोस हे सगळं?" तिने पुढे विचारले.

"आय डोन्ट नो. पण त्यांची ही इच्छा पूर्ण करावीशी वाटतेय यार. तू आहेस ना माझ्यासोबत?" त्याच्या प्रश्नात अस्वस्थता होती.

"हम्म. आय एम आल्वेज विथ यू." त्याच्याकडे बघून छोटूसे स्मित करत ती म्हणाली. चल निघूया? उशीर नको व्हायला." ती.

"श्री, कार मला ड्राईव्ह करू दे." त्याच्या हातातील चावी घेत मीरा.

"मीरा?" त्याने प्रश्नार्थक तिच्याकडे पाहिले.

"श्री, मी बोललेय ना की मी आहे तुझ्यासोबत. यू डोन्ट वरी. आधीच तुझ्या डोक्यात प्रश्नांचे किती काहूर माजले आहे, अशा अवस्थेत मी तुला ड्राईव्ह कसे करू देऊ? तू शांतपणे डोळे मिटून बस. मी चालवते." त्याला स्पष्टीकरण देत ती.

श्रीनय डोळे मिटून बसला होता. मीरा कार चालवत होती. डोळे उघडे होते. चित्त मात्र थाऱ्यावर नव्हते. श्रीधरच्या कृत्याने ती सुद्धा विचलित झाली होती. ती त्याला भेटली तेव्हा त्याने तिला त्याचा भूतकाळ सांगितला होता. कितीही चुकीचे वागला असला तरी पश्चातापाच्या आगीने तो होरपळत होता. त्यामुळे तिच्या मनात त्याच्यासाठी एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता.

"शेवटी त्यानेही तुमच्या लिलीसारखा दगाच दिला ना?" लिलीच्या मुलाबद्दल श्रीधर मीराला सांगत होता तेव्हा तिने उपरोधाने विचारले होते.

"हो. शेवटी लिलीचेच रक्त त्याच्या नसात भिनले होते. तो माझा मुलगा होताच कुठे?" तो खिन्नपणे उत्तरला होता.

"तुम्हाला हे केव्हा जाणवले?" तिच्या प्रश्नातील उपरोध कायम होता.

"जाणवले, बऱ्याच उशीरा जाणवले. तोवर मात्र पाठखालून खूप पाणी वाहून गेले होते." श्रीधर.

"म्हणजे?" मीरा.

"लिली. ती घरी आली होती माझ्या."

"काय?" मीरा आश्चर्याने.

"हो. मी घर बांधले तेव्हा तिने ते बघण्याचा हट्टच धरला होता. मग मी घराच्या वास्तूपूजनाच्या वेळी तिला बोलावले होते. घरावरचे नाव बघून ती खळखळून हसली होती." तो सांगत होता तशी मीराची प्रश्नार्थक नजर त्याला दिसली.

"अगं, 'चित्रांगण' घरावरचं नाव. त्या नावावर ती हसली. तुम्हाला कळतंय का सर? तुमच्या चित्रासाठी केवळ अंगण आहे, तेच चित्रांगण. घर तिचे नाहीच आहे. या घरात तर मी मिरवणार. बरोबर ना सर?" लिलीची नक्कल करून श्रीधर म्हणाला.

"तिच्या बोलण्यावर मीही हसलो होतो. कारण तिच्याकडे एका वेगळ्याच ओढीने मी ओढल्या जात होतो. चित्राला मात्र त्यातलं काहीच ठाऊक नव्हते. ती बिचारी पाहुण्यांचे करण्यात गुंतली होती."

"मग चित्राला कसे कळले? तुम्हीच सांगितले का?" मीराच्या डोक्यात केव्हाचा घर करून असलेला प्रश्न तिने विचारला.

मांजर डोळे मिटून दूध पीत असली तरी इतरांना ते माहिती असतं. तिलाच तेवढं वाटत असतं की दुसऱ्यांना ती दिसत नाहीये." श्रीधर निर्विकारपणे म्हणाला. त्याचे उत्तर ऐकून मीराचे ओठ नकळत रुंदावले.

"नीतू, माझी लहान लेक डिलिव्हरीसाठी घरी आली होती. तिला प्रेग्नन्सीचा जुलमाचा त्रास होता. चित्रा तिची काळजी घेण्यात पूर्णपणे गुंतली होती. आणि मी? मी लिलीच्या प्रकरणात. तिच्यात खूप गुंतलो होतो मी. एका मंदिरात जाऊन तिच्या गळ्यात माझ्या नावाचे मंगळसूत्र बांधले होते. आम्ही फिरायला बाहेर गेलो होतो. मुंबईला. खूप फिरलो, मजा केली. जीवाची मुंबई करणे म्हणजे काय हे लिलीने पहिल्यांदा अनुभवले असेल. चौपाटी, तिथले फिरणे, फोटो.. सगळं सगळं तिला हवं तसं मी करत होतो."

"शीट, स्वतःची मुलगी त्रासात असताना असे कोण वागू शकतो?" मीराच्या डोळ्यात त्याच्याबद्दल तिरस्कार होता.

"घरी परतल्यावर काही दिवसांनी आमचे फोटो चित्राच्या हाती लागले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. शेवटी आमचे नाते तिच्यासमोर आले होते."

मीराने डोक्यावर हात ठेवला. न पाहिलेल्या चित्राच्या मनावर कसला आघात झाला असेल याची कल्पनाही तिला करवत नव्हती.

"चित्राने मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण आमचं नातं खूप पुढे गेले होते. त्यातून माघार घेणं शक्य नव्हते. या सर्व गोष्टीमुळे चित्रावर मोठा मानसिक आघात झाला. मी असे वागू शकतो असा तिने कधी विचारच केला नव्हता. मनाचा आजार शरीरावर घात करत होता. तिचे शरीर तिला साथ देणे बंद करू लागले. ती पार कोलमडून गेली होती." त्याने एक लांब श्वास घेतला.

"तुमचं मन इतकं असंवेदनशील?" मीराचा आवाज कापरा झाला होता.

"तिच्या बाबतीतील माझ्या साऱ्या संवेदना गोठल्या होत्या. मी तर वाट बघत होतो, तिच्या मृत्यूची! एकदा का ती या जगातून गेली की ऑफिशीअली मी लिलीला बायको म्हणून घरी आणू शकणार होतो. चित्रा लवकरच जाणार यावर माझा प्रचंड विश्वास होता आणि म्हणूनच तर मला डिवोर्स वगैरे घ्यायचा नव्हता."

"तुमची मुलं? ती काहीच बोलली नाही का तुम्हाला?" मीरा.

"कुणाचे काही ऐकून घ्यायच्या स्थितीत मी होतो तरी कुठे? कोण माझे आणि कोण परके हे मला कळतच नव्हते. माझ्या मुलाने मला समजावलं. सगळी धनदौलत लिलीला द्या पण तुम्ही आम्हाला हवे आहात असे डोळ्यात पाणी आणून माझ्या दीपकने मला गळ घातली. मला मात्र लिली हवी होती. मग मी असे कसे करणार ना? शेवटी दीपकच चित्राला म्हणाला की मोठ्या मनाने तिने मला माफ करावे आणि जी परिस्थिती आहे तिचा स्वीकार करावा."

"तुमचाच मुलगा. तो काय उपाय सुचवणार? शेवटी सगळे पुरुष सारखेच." मीराला राग आला होता.

"माझा पुरुषार्थ पुन्हा इंचभर वाढला. कसे का होईना मुलाने ते नाते मान्य केले असे मला वाटत होते. त्यामुळे चित्राही आपसूकच मला माफ करून लिलीला स्वीकारेल हे मी गृहीत धरले होते." श्रीधर बोलत होता. मीराची धारदार नजर त्याच्यावर रोखली होती.

"चित्रा मात्र स्वाभिमानी होती. इतकी वर्ष ती माझ्या बाजूने उभी होती. आता तिच्या स्वाभिमानाला ठेच लागली होती. तिने दीपकला एकच प्रश्न केला की माझ्याऐवजी चुकून तिचा पाय घसरला असता तर तिला त्याने माफ केले असते का? तिचा हा प्रश्न म्हणजे चपराक होती माझ्यासारख्या पुचकट पुरुषार्थाला. तिचा निर्णय पक्का झाला होता. तिने कोर्टात केस टाकली. आणि अगदी सहजरीत्या माझ्याकडून घटस्फोट मिळवून घेतला."

"तुमच्यासारख्या चलाख पुरुषाकडून इतक्या सहजपणे डिवोर्स मिळाला? कमाल आहे." उपरोधिक हसत मीरा.

"हम्म. अचानक तिच्यात कुठून बळ आले माहित नाही. पण जिंकली ती. तिने काही पुरावे गोळा केले ज्यांनी मला घटस्फोटाच्या कागदावर सही करायला मजबूर केले होते." तो.

"वॉव! ग्रेटच. तुमच्या या चित्राला भेटायला हवे एकदा. इंटरेस्टिंग आहेत त्या." मीराचा चेहरा चमकत होता.


"ग्रेटच आहे ती. मलाच कळायला उशीर झाला. डॉक्टर मीरा, तुम्हाला माहितीये डिवोर्स झाल्यावर चित्राने पहिले काम कुठले केले असेल?" श्रीधर.

"कुठले?"

"चित्रांगणचे नाव बदलून तिने चित्रमहाल केले. ते घर आता केवळ तिचे झाले होते. तिच्या स्वप्नांचा महाल होता तो. पण तिथे मला जागा नव्हती."

"तुमची जागा तर लिलीच्या हृदयात होती ना?" मीरा खोचकपणे म्हणाली.

"हम्म. त्याच तर माजात होतो मी. पण ते किती खरे आहे याची प्रचिती मला लवकरच आली. लिलीने पुरते लुबाडले मला. चित्रांगण तिला मिळाले नाही. मग नवे घर नवा थाट तिने माझ्याकडून करून घेतला. माझी सर्व कार्ड्स स्वतःच्या ताब्यात घेतली. आता मी तिला नको होतो. माझी सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली तिने. ज्या शून्यातून मी विश्व निर्माण केले होते, पुन्हा त्याच शून्यात परत गेलो. चित्रा आयुष्यातून गेली आणि ही कायमची वणवण माझ्या पाठी लागली." त्याच्या डोळ्यात पाणी आले होते.

"मी असा दीन, असहायपणे नाही जगू शकत. म्हणून तर मला मृत्यूला जवळ करायचे होते. तर तुमच्या श्रीने मला इथे आणून ठेवले. डॉक्टर मीरा, कुणाची सहानुभूतीची नजर नाही हो मला सहन होत. तो खूप मोठा पराभव आहे माझा. या श्रीधरचा." डोळे पुसत तो म्हणाला.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all