दोन घडीचा डाव! भाग -१६

कथा एका विस्कटलेल्या डावाची!


दोन घडीचा डाव!
भाग -सोळा.

"धातांत खोटं बोलत होती ती. प्रत्येक क्षणाला. तिचे बोलणे ऐकून मी गडबडलो होतो. पण त्या पोराच्या डोळ्यात पाहिले आणि गहिवरून गेलो. लहानपणीच त्याच्या बापाने त्याला टाकले होते. बाप म्हणजे काय त्याला ठाऊकच नव्हते. त्याने मला मारलेली मिठी, 'बाबा' म्हणून मारलेली हाक! पार विरघळलो मी त्या शब्दात. माझंच बालपण माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. बाबाच्या प्रेमासाठी मीही लहानपणापासून आसूसलेला होतो. पण व्यसनात बुडालेल्या बाबाला मी कधी कळलोच नव्हतो." बोलताना त्याच्या डोळ्याच्या काठावर पाणी उभे राहिले.

"का? तुम्हाला तुमची मुलं नव्हती?" तिने खोचकपणे विचारले.

"माझी मुलं? चार चार मुलं आहेत मला." तो हसून उत्तरला.
"चांगली शिकलेली, उच्च पदावर कार्य करणारी. पण त्यांनी जे बनावं असे मला त्यांच्याकडून वाटत होते ते झालंच नाही. त्यांनी आपले जोडीदार देखील त्यांच्या आवडीचे निवडले होते. पण या मुलात काहीतरी वेगळं जाणवलं. तो माझा शब्द डावलणार नाही हे मनात कुठेतरी भिनले. माझा मुलगा बनवून माझ्या तत्वावर चालणारा, मी म्हणेल ते ऐकणारा असे त्याला करायचे होते. त्यावेळी मी विसरलो होतो की मी केवळ नाव दिले तरी त्याच्या शरीरात माझे नाही तर दुसऱ्या कुणाचे तरी जीन्स आहेत. तो का ऐकणार माझं?"
श्रीधरने दिलेले उत्तर मीराच्या डोक्यात अजूनही फिरत होते तोच श्रीनयने कारचा ब्रेक लावला.

"मीरा पोहचलोय आपण." त्याच्या वाक्यासरशी ती विचारातून बाहेर आली.

"या डॉक्टर." कोणीतरी श्रीनयला म्हणाले. पोलीस त्याच्याआधीच येऊन पोहचले होते.

"काय झालेय? आणि ते आजोबा कुठे आहेत?" श्रीनयच्या चेहऱ्यावर प्रश्न होते. काहीतरी वाईट घडलंय असे राहून राहून त्याला वाटत होते.

"कूल डाउन डॉक्टर श्रीनय. मिस्टर श्रीधर आता या जगात राहिले नाहीत." त्याच्याकडे थंड कटाक्ष टाकत इन्स्पेक्टर बोलले.

"व्हॉट? बट हाऊ? म्हणजे मागच्या आठवड्यात तर मी आलो होतो. तेव्हा तर एकदम ठणठणीत होते. मग अचानक? आणि त्यांना बरं नव्हतं तर मला आधी इन्फॉर्म का केलं नाही?" श्रीनय पॅनिक झाला होता.

"श्री, ते काय बोलताहेत आधी ऐकून तर घे." मीराने त्याचा हात घट्ट पकडला.

"ॲक्च्युअली सर, त्यांनी सुसाईड केलीय. तसे नोट देखील लिहून ठेवलेय. पोलिसांसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. आत्ताच त्यांची बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली आहे."

"मीरा, काय असंबंध बोलताहेत हे? ते असे का करतील?" तो गोंधळला होता. गोंधळ तर मीराचाही उडाला होता. कारण तो असे काही करेल असे तिलाही वाटत नव्हते.

"सकाळीच त्यांनी खोलीतील सर्वजण नाश्त्याला गेले असताना संधी साधून हाताची नस कापली. अर्ध्या पाऊण तासात त्यांचे रूमपार्टनर्स परत आले पण तोपर्यंत सगळा खेळ खलास झाला होता. हे चारपानी नोट त्यांनी तुमच्यासाठी ठेवलेय." त्याच्या हातात ठेवत इन्स्पेक्टर.

त्याने थरथरत्या हाताने ते पेजेस पकडले. स्वतःवर नियंत्रण ठेवत कसेबसे वाचायला सुरुवात केली. वाचताना त्याच्या पायाला कंपण सुटले होते.

"श्री, आर यू ऑलराईट? काय लिहिलंय त्यांनी?" मीराने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. डोळे पुसत त्याने ते पेज मीराच्या हातात दिले.

'डिअर डॉक्टर. फर्स्ट ऑफ ऑल आय एम रिअली सॉरी..' श्रीधरने पत्राची सुरुवात नेहमीप्रमाणे इंग्रजीच्या तडक्याने केली होती.

'डिअर लिहितोय कारण खरंच तुम्ही मला प्रिय आहात. माझ्यावर प्रेम करणारी चित्रा, (लिली नव्हे बरं) आणि माझी खरी मुलं ह्यानंतर माझ्यावर खरंखूर जीव लावणारे कुणीतरी भेटले ते म्हणजे तुम्ही आहात. आपल्यात ना कसली ओळख आणि ना कसले नाते. तरी तुम्ही माझ्यात गुंतत गेलात. माझ्यावर मनापासून प्रेम करणारी माझी माणसं जी माझ्यात गुंतली होती त्यांना माझ्यामुळे त्रासच झाला. त्याचप्रकारे तुम्हालाही माझ्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागलाय, त्यासाठी सॉरी.

एखाद्यात गुंतणं खूप वाईट हो डॉक्टर. जे माझ्यात गुंतले त्यांना त्रास झाला आणि मी ज्यांच्यात गुंतलो त्यांच्यामुळे मलाही त्रासच भोगावा लागला. निसर्गाचा हा नियमच असतो का हो असा?'
मीराने एकवार श्रीनयकडे बघून पान पलटवले.


'एनिवेज, मी तुम्हाला आणखी त्रास देणार नाही. तसे तर नदीच्या कठडयावरून तुम्ही मला वाचवलं नसतं तर दोन महिन्यापूर्वीच माझा देह विसर्जित झाला असता. पण तुम्ही मला इथे घेऊन आलात आणि पुन्हा जगायला भाग पाडलंत. खरं तर नव्हतं हो मला जगायचं. पण तुमची मीरा, तिने मला इतके दिवस जगण्याची आस दाखवली. तिनेच सांगितलं, मृत्यू म्हणजे कसले प्रायश्चित नव्हे. उरलेले आयुष्य काहीतरी चांगले करण्यात घालवा. तुमची मीरा खूप चांगली आहे हो डॉक्टर. शी वूड बी युअर परफेक्ट पार्टनर. तिने सांगितले पण खूप प्रयत्न करूनही माझा भूतकाळ पाठ सोडत नव्हता. काहीतरी करायचे म्हणून आश्रमातल्या लोकांना शेक्स्पिअर शिकवायला घेतला मी. पण त्याच्या हॅम्लेटचे भूत माझ्या मानगुटीवर असे पक्के पकड करून बसले की त्यापासून मी स्वतःला सोडवू शकलो नाही. त्या भुतानेच शेवटी मार्ग दाखवला मला. आणि मग मी त्याच्याबरोबर निघून जाण्याचे ठरवले.

थोडं वेड्यासारखे वाटेल हे. पण वेडाच तर आहे मी. ह्या वेड्याची जागा सभ्य लोकात नाहीये हो डॉक्टर. म्हणून मी हे जग सोडण्याचा निर्णय घेतला. खूप विचार करून. स्वमर्जीने. तुमच्या मीराने सांगितल्याप्रमाणे मला लोकांसाठी काहीतरी करायला हवे होते पण जमले नाही. मृत्यूपश्च्यात मात्र काहीतरी करावे वाटतेय. हे माझे घारे डोळे, तारुण्यात कित्येक ललना ह्यावर भाळल्या होत्या, ते मला दान करायचे आहेत. नेत्रदान करायचे आहे मला.

खरं तर मला माझी बॉडी तुमच्या मेडिकल कॉलेजला दान करायची होती, पण मला मुक्ती हवी आहे. त्या बॉडीवर नवशिख्या डॉक्टरांच्या चालणाऱ्या स्काल्पेलमुळे मी नाही हो मुक्त होणार. उलट भूत बनून इकडे तिकडे फिरत राहीन. डॉक्टर, मला नकोय ते. मला मुक्ती हवीय आणि ती केवळ तुम्हीच देऊ शकता.'

"श्री, खरंच मिस्टर श्रीधर वेडे होते का रे? तू कशी त्यांना मुक्ती मिळवून देऊ शकतोस?" त्याच्याकडे बघत मीरा.

"पुढे वाच. मग कळेल तुला." श्रीनय हळवे होत म्हणाला.

"हम्म." म्हणत मीराने पुढचे पान हाती घेतले.

'डॉक्टर, तुम्हाला प्रश्न पडलाय ना की तुम्ही मला कशी मुक्ती मिळवून देणार ते? तुम्हाला नाही तर तुमच्या मीराला तरी नक्कीच पडला असेल. तेवढं ओळखायला शिकलोय मी.' तिने चमकून श्रीनयकडे पाहिले आणि पुन्हा पुढचे वाचू लागली.

'चित्रा.. चित्राला घेऊन याल इथे? माझ्या मृतदेहावर तिच्या हाताने अंतिम संस्कार कराल का? खरं तर विचित्रच मागणी आहे माझी. हवं तर हट्ट समजा हा. मुलांना सोडून एक्स बायकोच्या हाताने भडाग्नी द्यायची म्हणतोय. पण डॉक्टर पुरवाल का हा माझा हट्ट? तिच्यावर केलेल्या अन्यायाचे हे प्रायश्चित नसेल कदाचित, पण तेव्हाच मला मुक्ती मिळेल असं माझं मन सांगतेय. चित्राने माझ्याशी कसलेच नाते ठेवले नाहीये, तरी सुद्धा मुटकुळं बांधलेल्या माझ्या देहावर जेव्हा तिच्या डोळ्यातील दोन थेंब गळतील तेव्हाच हा श्रीधर समाधानाने इहलोकी प्रस्थान होईल. हां, ते अश्रू बघायला माझे डोळे नसतील पण त्याचा स्पर्श निर्जीव असलेल्या माझ्या शरीराला नक्की जाणवेल. खात्री आहे मला. डॉक्टर, ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करणार ना हो? त्याशिवाय मुक्ती नाही हो मला. प्लीज, माझ्यासाठी? ' श्रीधर.

"श्री, हे काय विचित्र मागणे? आपण कुठे त्या चित्राला ओळखतो? आणि त्या का इथे येतील?" पान मिटत मीरा त्याला म्हणाली.

"माझे डोके काम करेनासे झालेय मीरा. त्या आजोबात कसा गुरफटलो कळलेच नाही गं." तिच्या कमरेला विळखा घालून तो रडत होता.

"हेय श्री, मी आहे ना? आपण करूयात काहीतरी. तू उगाच रडू नकोस ना." त्याला समाजावता समजावता तिच्याही डोळ्यातून पाणी वाहायला लागले.

"हा पत्ता. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मला दिला होता. मी विचारले की कशाला म्हणून. तर ते म्हणाले दोन दिवसांनी डॉक्टरसाहेबांना द्याल. मदत होईल." आश्रमातील व्यवस्थापकांनी डायरीमध्ये लिहिलेला पत्ता श्रीनयला देत सांगितले..

"मीरा दोन तासांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. आपण त्यांच्या चित्राला घेऊन येऊया. तोवर पोस्टमार्टम आणि डोळे काढण्याची प्रोसेस पार पडली असेल." मीराचा हात हातात घेत तो म्हणाला.

"श्री, आर यू शुअर? या पत्त्यावर जायचं पक्के आहे ना?" त्याच्या हातावर हात ठेवून तिने विचारले.

हम्म. त्यांची शेवटची इच्छा, नव्हे त्यांचा हट्ट मला पुरवावाच लागेल. त्याशिवाय त्यांना मुक्ती मिळणार नाही." डोळे पुसत तो बोलला.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all