दोन घडीचा डाव! भाग -१५

कथा एका विस्कटलेल्या डावाची!


दोन घडीचा डाव!
भाग - पंधरा.

"ओके. जाईन मी." त्याच्या केसातून हात टाकून ते विस्कटत ती म्हणाली. "पण श्री, उगाचच त्यांना टाळू नकोस. त्यांच्या मनात आणखी खूप काही साचलं आहे अरे. त्यांना मोकळे होऊ दे."

"टाळत नाहीये माते." कोपरापासून हात जोडत श्रीनय म्हणाला. "फक्त या वेळी भेटायचे नाहीये. नेक्स्ट टाइम जाईनच ना. आणि मोकळं व्हायचं असेल तर तुझ्यासमोर सुद्धा होतीलच की. यावेळी तू ऐकून घे."

तिने होकार दिला आणि मग काही वेळाने दोघे परतीला निघाले. कालपासून निराश असलेला श्रीनय मीराच्या भेटीने खुलला होता.

********

महिना सरत आला होता. श्रीधर आश्रमात बऱ्यापैकी रूळल्या सारखा वाटत होता. आणि अचानक एक दिवस राउंडवर असताना डॉक्टर श्रीनयचा मोबाईल वाजला.

"हॅलो डॉक्टर.." वृद्धाश्रमातील व्यवस्थापकांचा तो फोन होता.

"हॅलो, बोला ना काका. काय म्हणताय?" पेशंटची फाईल चाळत श्रीनयने विचारले.

"डॉक्टर, ते मागच्या महिण्यात आपल्याकडे आलेले नवे पाहुणे.."

"कोण? ते श्रीधर आजोबा? थोर शेक्स्पिअरचे शिष्य? काय केलं त्यांनी आता?" श्रीधरचे नाव ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते.

"खूप मोठा घोळ झालाय डॉक्टर. आम्ही पोलिसात फोन केलाय. तुम्ही लगेच या ना." त्यांच्या स्वरात घाबरल्याचे भाव होते.

"पोलीस? काय केलंय त्यांनी असं? कोणावर हात बित उगारला का? कठीण आहे हा म्हातारा." श्रीनय थोडा चिडला होता.

"डॉक्टर, तुम्ही या लगेच." व्यवस्थापकांनी फोन ठेवला.

"हॅलो मीरा, अगं जरा हॉस्पिटलला ये ना. त्या आजोबांनी काहीतरी गोंधळ घातलाय. आपल्याला वृद्धाश्रमात जावे लागेल." त्याने लागलीच मीराला कॉल केला.

"काय रे श्री? काय केलं त्यांनी? बरंय माझ्याकडे इमरजन्सी केस नव्हती ते. म्हणून लगेच येता तरी आलं." दहा मिनिटात त्याच्या हॉस्पिटलला मीरा पोहचली होती आणि ते दोघे वृद्धाश्रमाच्या दिशेने निघाले होते.

"काय माहिती?" त्याच्या चेहऱ्यावर त्रागा होता.

"मला काय वाटते श्री, आपल्या लग्नात ना आश्रमवाले आपल्याला आहेर म्हणून या आजोबांनाच देतील की काय. असा अँटिक माणूस ते जास्त दिवस नाही सहन करणार." मीरा हसून म्हणाली.

"तुला भंकस सुचतेय?" कार ड्राइव्ह करत तो.

"नाही रे श्री, तुला बरं वाटावं म्हणून बोलतेय." ती पुन्हा हसली. "पण तुला आवडत नसेल तर गप्प बसते." ओठावर बोट ठेवत ती.

तिचा कार्टूनपणा बघून त्याला हसू आले होते पण तसे न दाखवता तो समोर बघून कार चालवत होता. श्रीधरने काय केले असावे हा प्रश्न त्याला छळत होता.

तीही गप्पपणे डोळे मिटून बसली. खरं तर त्याला छळणारा प्रश्न तिलाही त्रास देत होताच की. पंधरा दिवसांपूर्वीच तर ती श्रीधरला भेटली होती. तेही श्रीनयने तिला आग्रह केला होता म्हणून. तिला त्याची ती भेट आठवत होती.

"सो, मिस्टर श्रीधर, कसे आहात तुम्ही? इथे आश्रमात काही प्रॉब्लेम नाहीये ना?" रुटीन चेकअप झाल्यावर तिने त्याला विचारलेला प्रश्न. ओठावर ठेवणीतले हसू.

"डॉक्टर मीरा, आय एक ॲब्स्यूल्यूटली फाईन. अँड वन मोअर थिंग, आय लाईक युअर ॲटीट्युड." आपले ओठ रुंदावत तो म्हणाला.

व्हॉट? " ती.

"म्हणजे बघा ना,तुम्ही मला माझ्या नावाने हाक मारलीत. डॉक्टर श्रीनयसारखे आजोबा नाही म्हणालात."

"श्री भोळा आहे. तो चटकन कुणाशीही नातं जोडायला बघतो. आय एम नॉट लाईक द्याट. मी केवळ माझ्या प्रोफेशनमध्ये प्रोफेशनलच असते." मीरा उत्तरली.

"खरं आहे तुमचं डॉक्टर. डॉक्टर श्रीनय खरेच भोळे आहेत. माझ्या चित्रासारखे. तीही अशीच चटकन कोणावर विश्वास ठेवणारी.."

"आणि तरीही तुम्ही तिच्या पाठीत खंजीर खुपसलाच ना? भोळेपणाचा चांगला फायदा घेतलात." त्याच्यावर डोळे गाडून ती म्हणाली.

"श्रीने मला सांगितलंय सगळं." तो एकटक तिच्याकडे पाहत असल्याचे बघून ती म्हणाली. "कसंय ना आमचं नातं पारदर्शी आहे, तुमच्या चित्रासारखं. त्यात कसली लपवीछपवी नाहीय, तुमच्यासारखी. असं काय केलं होतं हो तुम्ही? की तुमची भोळी चित्रा तुमच्यापासून वेगळी झाली?" तिने डायरेक्ट प्रश्न केला.

"एक्स्ट्रामरायटल अफेअर." तो बळेच ओठ रुंदावून म्हणाला. "एक अफेअर नाही, अफेअर्स. पण लिली प्रकरण एवढं अंगावर आलं की चित्रा माझ्यापासून पार दुरावली."

"वाईट वाटतेय तुम्हाला त्याचे?"

"तेव्हा तर काहीच वाटत नव्हते. पण जेव्हा लिलीने दगा दिला तेव्हा ते फील झाले." शून्यात बघत तो.

"तुम्हाला कोणीतरी दगा दिला? स्ट्रेन्ज." मीरा तुच्छतेने म्हणाली.

"यू ॲब्स्यूल्यूटली राईट डॉक्टर. मला कोणी दगा देऊ शकतो हे खरंच माझ्यासाठीसुद्धा स्ट्रेन्जच होते. लिली आयुष्यात येण्याआधी माझ्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या. पण लिली वेगळी होती. शेरास सव्वाशेर म्हणतात ना, तशीच." श्रीधर सांगत होता.

"ओह, रिअली? नेमकं काय केलं तिने?" मीराच्या डोळ्यात जाणून घ्यायची उत्सुकता होती आणि त्यापेक्षा जास्त चित्रावर अन्याय करणाऱ्या श्रीधरसारख्या माणसाला तोडीस कोणीतरी तोड मिळालीय याचा आंनदही.

"ती प्रेग्नन्ट होती. नेमकी माझ्यामुळेच का? हा प्रश्न मला आत्ता पडतोय. पण जेव्हा तिने ती न्यूज मला सांगितली तेव्हा त्याला कारण मीच असावे असे मला वाटले होते. मला जशा दहा मैत्रिणी तसे तिला सुद्धा दहा मित्र आहेत हे तेव्हा मला ठाऊक नव्हते."

"मग?" मीरा.

"मग काय? तिने त्या प्रेग्नन्सीचे भांडवल करून मला लुटण्याचा प्लॅन आखला. बळी पडणारा नव्हतोच मी. मी तिला अबार्शन करण्याचा सल्ला दिला. तीही लगेच तयार झाली पण त्या बदल्यात मात्र तिच्या मोठ्या मुलाला माझे नाव देण्याचा करार केला." तो.

"आणि तुम्ही ते मान्य केले?" अचंब्याने मीराने विचारले.

"त्याशिवाय तेव्हा दुसरा मार्ग नव्हता. जर बाळाला जन्म देण्याचा हट्ट तिने केला असता तर माझी नाचक्की झाली असती म्हणून मी होकार दिला. केवळ होकार. तसे मी काही करणारच नव्हतो. एकदा का तिचे अबार्शन झाले की मी मोकळा होणार होतो. तिच्याशी नाते तोडून दुसऱ्या एखाद्या पाखराकडे वळलो असतो." त्याच्या चेहऱ्यावर उद्विग्नता पसरली होती.

"पण ती तुमच्यापेक्षा स्मार्ट निघाली. ग्रेट." तिला त्याची दया यायला लागली.

"ओव्हरस्मार्ट. बारा घाटाचे पाणी प्यायलेली होती लिली. एका छोट्याश्या खेड्यातून आलेली ती माझ्यापेक्षा इतकी जास्त पोचलेली असेल असे वाटले नव्हते."

"असं नेमकं काय केलं तिने?"

"अबार्शन झाले आणि दोन महिन्यांनी तिने हिस्ट्रेक्टोमी करायचा निर्णय घेतला. गर्भाशयच पोटातून काढून टाकायचे म्हणून ती माझ्या मागे लागली. ना रहेगा बॉंस नि ना रहेगी बासुरी. असे तिचे म्हणणे होते."

"आणि तुम्ही त्याला मान्यता दिलीत?" मीराचा प्रश्न.

"मी तिच्यापासून जितका दूर जाण्याचा प्रयत्न करत होतो तितकेच तिच्या चातुर्याच्या जाळ्यात अडकून तिच्याकडे खेचल्या जात होतो. त्या वेळी का ते ठाऊक नाही पण तिचा निर्णय मलाही पटला. म्हणजे पुढे आमच्यात काही झाले तरी मला काही धोका नव्हता. आणि तिला कदाचित दुसऱ्या पुरुषांकडून पण कसला धोका नव्हता."

"शी! कसल्या विकृत मानसिकतेचे पुरस्कर्ते होतात तुम्ही दोघेही." मीराला ते ऐकूनच किळसवाणे वाटले.

"येस, यू यूज्ड प्रॉपर वर्ड. विकृत मानसिकता! खरंच आपल्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या लाईफ पार्टनरला सोडून दुसऱ्याच्या नादी लागणे ही विकृत मानसिकताच आहे डॉक्टर मीरा. पण हे मला तेव्हा कळले नाही. लिली कदाचित पैश्यांसाठी हे करत असावी. पण मी? मी केवळ एक एंजॉयमेंट म्हणून हे करत होतो की तारुण्यात माझ्या खऱ्याखुऱ्या प्रेमाचा अपमान झाला त्याचा बदला म्हणून असा वागत होतो मला कधी कळलेच नाही. मी लिली मध्ये पार गुरफटून गेलो होतो."

"प्रतारणा केलीत हो तुम्ही चित्राशी." मीराच्या डोळ्यात पाणी का आले तिलाही कळले नाही.

"प्रतारणाच केली मी चित्राशी. लिलीपूर्वी आयुष्यात आलेल्या स्त्रियांपैकी एकीसाठीही चित्राला सोडावं असं कधी मनात आलं नव्हतं. चित्राची फसवणूक तर सुरुवातीपासूनच मी करत आलो होतो. पण तरीही ती मला हवी होती. कारण ती माझा बॅकबोन होती. माझा आधार, माझ्या चुका सांभाळून घेणारा मायेचा पदर होती ती.

"खूप दुखावलंत तुम्ही चित्राला." डोळे पुसत ती.

"लिलीच्या वागण्यात काय जादू होती मला नाही माहित. जेव्हा लिली की चित्रा असा प्रश्न तिने केला तेव्हा मला चित्रा हवीय असे म्हणताच आले नाही."

"अशी काय वागली ती?"

"गर्भाशयाच्या ऑपरेशननंतर तिने मला तिच्या मुलाला भेटवले. त्याला सांगितले की मी त्याचा बाबा आहे. इतकी वर्ष भांडणामुळे मी चिडून निघून गेलो होतो पण आता मला तो हवा आहे."

"इतका खोटेपणा?"

"धातांत खोटं बोलत होती ती. प्रत्येक क्षणाला. तिचे बोलणे ऐकून मी गडबडलो होतो. पण त्या पोराच्या डोळ्यात पाहिले आणि गहिवरून गेलो. लहानपणीच त्याच्या बापाने त्याला टाकले होते. बाप म्हणजे काय त्याला ठाऊकच नव्हते. त्याने मला मारलेली मिठी, 'बाबा' म्हणून मारलेली हाक! पार विरघळलो मी त्या शब्दात. माझंच बालपण माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. बाबाच्या प्रेमासाठी मीही लहानपणापासून आसूसलेला होतो. पण व्यसनात बुडालेल्या बाबाला मी कधी कळलोच नव्हतो." बोलताना त्याच्या डोळ्याच्या काठावर पाणी उभे राहिले.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार.

प्रिय वाचकहो, प्रकृती अस्वास्थामुळे भाग टाकायला उशीर होतोय, त्याबद्दल क्षमस्व! तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा आहे.

🎭 Series Post

View all