Feb 29, 2024
पुरुषवादी

दोन घडीचा डाव! भाग -१४.

Read Later
दोन घडीचा डाव! भाग -१४.


दोन घडीचा डाव!
भाग -चौदा.

"सर, मला जे सांगायचे आहे ते प्रॉब्लमॅटिक आहे की नाही माहित नाही, पण तुमच्याशिवाय इतर कोणाला सांगूही शकत नाही." ती शब्दांची जुळवाजुळव करत होती.

"बोल ना." श्रीधर.

"सर, मला दिवस गेलेत. तुमच्या भाषेत सांगायचं तर मी प्रेग्नेंट आहे." त्याच्या चेहऱ्यावर नजर रोखत ती म्हणाली.

"काय?" त्याला जरासा धक्का बसला पण तिचा चेहरा मात्र निर्विकार होता.

"ओके, ठीक आहे. तू ते अबार्शन करून घे." त्याचा सल्ला.

"सर, असे कसे करू? आपल्या प्रेमाची निशाणी आहे ही." ती.

"मग काय जन्म देणार आहेस?" तो त्रागाने म्हणाला.

"जर तुम्ही स्वीकारायला तयार असाल तर एक काय दहा मुलांना जन्म देईन." ती हसून म्हणाली

"लिली, तुला माहिती आहे हे शक्य नाही. उगाचच काही बरळू नकोस. तुला काय हवे? किती पैसे लागतील ते सांग आणि तुझ्यासोबत माझीही सुटका करून घे."

"मला तुम्ही हवे आहात सर. व्हाल माझे?" तिने त्याला कोंडीत पकडले.

"लिली, माझे लग्न झाले आहे." तो उद्विग्नपणे म्हणाला.

"हे तुम्हाला आधीच कळायला हवे होते. बाय द वे, दुसरा पर्याय आहे माझ्याकडे."

"काय? पैसे हवेत का तुला? किती हवेत बोल." तो.

"सर, न जन्माला आलेल्या बाळाची बोली लावायला निघालात?" ती कुटील हसत म्हणाली. "मला पैसा नकोच. केवळ नाव हवेय." तिने क्षणभर पॉज घेतला. "तुमचे नाव." तिने वाक्य पुरे केले.

"व्हॉट डू यू मिन?" तो.

"इतकं इंग्लिश नका बोलू हो. कानावरून जातं माझ्या. साध्या सरळ भाषेत सांगायचे तर माझ्या आणि माझ्या मोठ्या मुलाच्या मागे तुमचे नाव हवे." ती.

"लिली, काय बोलतेस तू?"

"योग्यच बोलतेय. बघा गरज तुम्हालाही आहे आणि मला देखील. माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचे सत्य जगासमोर आले तर तुमची किती नाचक्की होईल? त्यापेक्षा माझ्या मुलाला नाव दिलंत तर नाव होईल तुमचे." ती पुन्हा हसली.

"लिली, तू काय समजतेस मला?"

"मित्र समजते, सखा समजते, एक प्रियकर आणि माझा होणारा नवरा समजते." त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली.

"लिली यू आर इम्पॉसिबल!" तचे बोलणे ऐकून तो म्हणाला.

"सर, पुन्हा इंग्लिश?" ती फिसकन हसली.

"आता तुला मी तुझ्या आयुष्यात हवा आहे तर माझ्यासारखे इंग्लिश शिकायला हवे बरं." त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आयुष्यात पहिल्यांदा त्याला टक्कर देणारी भेटली होती.

******

बाहेरचा वारा कानाला झोंबायला लागला तसे श्रीधरने खिडकी बंद केली. आतापर्यंत सुंदर भासणारी चंद्रकोर वाकुल्या दाखवत आहे असे त्याला वाटत होते. स्वतःला सावरत त्याने बेडवर स्वतःला झोकून दिले.

'लिली, पहिल्या डावाची खेळी तुझ्या बाजूने होती. दुसरा डाव मी माझ्या खिशात टाकणार होतो. पण सगळे फासे उलटे पडले, अन हा दोन घडीचा डाव माझ्यावरच उलटला. तू चिट केलंस लिली मला. यू आर अ चिटर.' बेडवर पहुडल्या पहुडल्या तो तिच्या नावाने खडे फोडत होता. तिची जितकी आठवण येत होती तितकाच तिच्याबद्दल वाटणारा तिरस्कार वाढत होता. रागामुळे त्याचा श्वास वाढला होता.

******

"श्री? व्हाट्स रॉंग विथ यू? कालपासून तुला कॉल करतेय, काहीच नीट बोलत नाहीयेस. काही प्रॉब्लेम आहे का?" मीरा आत येत म्हणाली.


"मीरा? तू यावेळी इथे काय करते आहेस? तुझी ओपीडी नाहीये का?" हॉस्पिटलच्या केबिनमध्ये अचानक आलेली मीरा बघून श्रीनय गोंधळला.

"नाही, मी क्लीनिक बंद करून आलेय." त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसत ती.

"अगं पण का? तुला बरं नाहीये का?" तो.

"हे तू मला विचारण्याऐवजी स्वतःला विचार श्री. बरा आहेस ना तू?" मीराच्या स्वरात काळजी होती.
तिच्या बोलण्यावर तो शांतच होता.

"श्री, आय थिंक देअर इज निड टू टॉक विथ इच अदर. कॅन वी गो फॉर कॉफी?"

"मीरा प्लीज, इंग्लिश नको. डोक्यात जायला लागलं यार ते." श्रीनय डोक्याला हात लाऊन बसला.

"व्हॉट? डोन्ट टेल मी की तू तुझ्या त्या श्रीधर आजोबामुळे टेन्स आहेस?" मीरा हसून म्हणाली.

"कसली गुणाची बायको आहेस यार तू?" ओठावर फिके हसू घेऊन तो म्हणाला.

"होणारी बायको." ती.

"काही का असेना, पण मनाचे दुखणे लगेच ओळखलेस ना."

"हम्म. डॉक्टर नवऱ्याची डॉक्टर बायको आहे म्हटलं मी, होणारी." मिश्किल हसत ती म्हणाली. "आतातरी कॉफी घ्यायला येशील का?" त्याचे गाल ओढत ती.

"तू सोबत असलीस तर कुठेही यायला तयार आहे मी." तिच्या डोळ्यात हरवत तो म्हणाला.

"हो? तेवढा वेळ आहे का तुमच्याकडे? तूर्तास निघूया?" त्याच्या डोळ्यापुढे चुटकी वाजवत मीरा.

"चल." मंद स्मित करत श्रीनय तिच्यासोबत निघाला. तसेही त्याची ओपीडी आटोपली होती.


कॉफी पिताना त्याने आपले मन मीरासमोर रिते केले. श्रीधरने त्याला जे सांगितले ते ऐकून तीही स्तब्ध झाली.

"बापरे! श्री कसले पोचले आहेत रे तुझे आजोबा? माझा तर विश्वासच बसत नाहीये की इतकी नीच माणसं असतात." कॉफीचा घोट घेत मीरा.

"मीरा, माझे खरे आजोबा नाहीत ते." तो डोळ्यातील ओल लपवत म्हणाला.

"ए, मी मस्करी केली रे. काय एवढं लाऊन घेतोस?" त्याच्या हातावर हात ठेवत ती.

त्याने तिच्या हातावर स्वतःचा हात ठेवून पकड घट्ट केली. "मीरा, तू मला सोडून कधी जाणार नाहीस ना गं?"

"कधीच नाही, पण जर का तू त्या श्रीधरसारखा वागलास तर त्याच्या चित्रासारखी इतका वेळ सहन नाही करणार. लगेच एक घाव दोन तुकडे." ती हसून म्हणाली.

"ए, मी तसा नाहीये गं."

"माहितीये रे मला. एका परक्या माणसासाठी रडणारा तू, तुझ्या सख्ख्या बायकोच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देशील का?" ती हसून.

"इतका विश्वास आहे?"

"हम्म, आहेच मुळी. आणि तू कधीच विश्वासघात करणार नाहीस हे सुद्धा माहित आहे." त्याच्या हातावर ओठ टेकवत मीरा म्हणाली. "पण काय रे श्री? आणखी त्या आजोबांनी असे काय केले असेल की उतारवयात त्यांच्या बायकोने हे धाडस दाखवले असावे?"

"मला माहिती नाही. आणि जाणून घ्यायचेही नाही."

"पण मला जाणून घ्यायचे आहे." ती.

"मीरा? तुला आत्ताच त्यांच्याबद्दल चीड वाटत होती ना? आता लगेच सहानुभूती वाटायला लागलीय?" विस्मयतेने तो.

"तसे नव्हे रे श्री. हे बघ, ते आत्ता त्यांच्या बायकोबद्दल बोलत आहेत म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी अपराधीपणाची सल असेल ना? एखादी पश्चातापाची झालर तरी? आणि जर त्यांच्या मनात त्यांच्या चुकीबद्दल गिल्ट असेल तर त्यांची बाजू ऐकून घ्यावी असे मला वाटतेय."

"तुला खरंच असं वाटतं मीरा की त्या माणसाला गिल्ट आहे?" तिच्यावर डोळे रोखून श्रीनयने विचारले.

"कदाचित. उगाचच त्या दिवशी मृत्यूला जवळ करण्याचा प्रयत्न त्याने केला नसता. यू नो श्री, एखाद्याला जर चुकीची जाणीव होत असेल तर त्याला योग्य मार्ग दाखवणे आपले काम आहे ना?"

"सिरियसली? या वयात त्यांना आपण मार्ग दाखवायचा?" तो.

"काय हरकत आहे? त्यांची इच्छा असेल तर दाखवू या ना. यात वयाचा काय संबंध? आणि खरंच संबंध असेल तर त्यांच्या बायकोने याच वयात फारकत घेतली हे का विसरतोस तू?"

"हम्म. यू आर राईट."

"आय एक आल्वेज राईट." त्याला इंग्रजीमध्ये बोलताना ऐकून मीरा मिश्किल हसली.

"पण त्यांना कनव्हिंस करणं मला नाही गं जमणार. खूप हट्टी आहेत ते. आणि आता मला त्यांना भेटायची पण इच्छा नाहीये."

"हॅलो डॉक्टर, असं टाळून कसं चालेल ना? ऑफ्टरऑल सावली वृद्धाश्रमाचा व्हिजिटिंग डॉक्टर आहेस तू."

तरीही मीरा, या वेळी मी नाही जाणार. त्या ऐवजी तू जाशील? प्लीज?"

"मी?"

"प्लीज ना. माझी होणारी बायको आहेस ना? मग होणाऱ्या नवऱ्याचे ऐकणार नाहीस का?" इवलासा चेहरा करून तो म्हणाला.
त्याला तसे बघून तिला खूप हसू आले. एखाद्या निरागस बाळाप्रमाणे तो दिसत होता.

"ओके. जाईन मी." त्याच्या केसातून हात टाकून ते विस्कटत ती म्हणाली. "पण श्री. उगाचच त्यांना टाळू नकोस. त्यांच्या मनात आणखी खूप काही साचलं आहे अरे. त्यांना मोकळे होऊ दे.

" टाळत नाहीये माते." कोपरापासून हात जोडत श्रीनय म्हणाला. "फक्त या वेळी भेटायचे नाहीये. नेक्स्ट टाइम जाईनच ना. आणि मोकळं व्हायचं असेल तर तुझ्यासमोर सुद्धा होतीलच. यावेळी तू ऐकून घे."

तिने होकार दिला आणि मग काही वेळाने दोघे परतीला निघाले. कालपासून निराश असलेला श्रीनय मीराच्या भेटीने खुलला होता.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//