दोन घडीचा डाव! भाग -१३

कथा एका विस्कटलेल्या डावाची.



दोन घडीचा डाव!
भाग -तेरा.

"घरी परत जाण्यापूर्वी तुझा अर्ज काउंटरवर जमा करून घे." कामात गढल्याचे आव आणत लॅपटॉपवर बोटं चालवत तो म्हणाला.

"हो सर, थँक यू सर." ती हसतच बाहेर पळाली.

ती गेली आणि श्रीधरने लॅपटॉपमध्ये घुसलेली मान वर केली. त्याच्या ओठावर एक वेगळेच हास्य उमटले होते.

******

"श्रीधर, आज खूप खूष दिसतो आहेस? काही गुड न्यूज आहे का?" घरी परतलेल्या श्रीधरला चित्रा विचारत होती. कारणही तसेच होते. तो घरी आला तोच गुणगुणत. त्याने शीळ वाजवली म्हणजे काहीतरी खास कारण असते हे ठाऊक होते तिला.

"हम्म. तसेच काहीसे." तो सूचक हसला. चित्त थाऱ्यावर नव्हतेच. रात्री स्वप्नातही लिलीने पकडलेले हात आठवत होते.

आठ दिवसांनी लिली ऑफिसमध्ये हजर झाली. तिचे काम बाहेरच्या डेस्क वरती होते त्यामुळे श्रीधरशी संबंध येण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही जाताना ती मुद्दाम पेढ्यांचा बॉक्स घेऊन त्याच्या केबिनमध्ये प्रवेशली.


"सर, आज मी इथे आहे ते केवळ तुमच्यामुळे. त्यासाठी हे स्वीट. सध्या एवढेच. पहिला पगार झाला की मग मात्र तुम्ही म्हणाल तिथे पार्टी देईन." त्याच्या हातावर पेढा ठेवत ती म्हणाली.

"अभिनंदन. इथे स्वागत आहे." त्याने हसून तिला अभिनंदन केले.


आता ती मुद्दामच काम काढून त्याला भेटत होती. कधी काही कळत नाहीये म्हणून, कधी काही शिकायचे म्हणून. तर कधी असेच, डब्यात नवा पदार्थ आणला म्हणून.

महिना कसा गेला, कळलेच नाही. हातात पगाराचे पैसे आले आणि दुसऱ्या दिवशी लिली सुंदरशी शिफॉनची साडी नेसून ऑफिसला आली. चेहऱ्याला रंगरंगोटी केल्यामुळे ती सुंदर दिसत होती. केबिनमध्ये येताना श्रीधरची नजर तिच्यावर पडली.

"लिली, लूकिंग ब्युटीफुल टुडे. एनीथिंग स्पेशल?" त्याच्या प्रश्नावर तिने केवळ स्मित केले. सर्वांसमोर त्याने केलेली स्तुती तिला आवडली होती.

"सर, सांगा, तुम्हाला काय हवंय?" दुपारी केबिनमध्ये येत तिने प्रश्न केला. काही न कळून तो तिच्याकडे पाहत राहिला.

"म्हणजे कालच माझा पहिला पगार झाला. पहिल्या पगारानंतर पार्टी द्यायचे ठरले होते ना म्हणून." ती म्हणाली.

"ओह, मग कसली पार्टी देणार आहेस?" तिच्याकडे बघत तो.

"तुम्ही म्हणाल ते. सर आपण लंचला जाऊया?" ती पुढे म्हणाली.

"अगं नको. ते बरं नाही दिसणार."

"अहो सर, चलाच तुम्ही. आज माझ्याकडून पार्टी. नेक्स्ट टाइम तुमच्याकडून. मला काहीच अडचण नाहीय. आणि बरं दिसणार की नाही हा प्रश्नही मला पडणार नाही." ती त्याच्याकडे बघून अशी गोड हसली की मग तिला नाही म्हणाला त्याची हिंमत झाली नाही.

*****
महिना सरला होता. एका सायंकाळी जास्त काम होते म्हणून श्रीधर ऑफिसमध्येच होता. तसा खूपदा तो आपले काम घेऊन उशीरापर्यंत बसायचा. रात्री आठ वाजता घरी जायचे म्हणून निघाला तर बाहेर लिली तिच्या डेस्कवर दिसली.

"लिली, तू अजूनपर्यंत इथेच?" आश्चर्याने तो तिच्याजवळ थांबला.

"ते सर, काम पूर्ण व्हायचं होत म्हणून.." ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. दिवसभर गुलाबासारखा फुललेला तिचा चेहरा कोमेजला होता. गालावर सुकलेल्या अश्रुंचे ओघळ उमटले होते. डोळेही सुजल्यासारखे भासत होते.

"लिली, तू रडते आहेस? काय झाले?" तो. तिने काही नाही म्हणून मान हलवली.

"तुला खोटे बोलता येत नाही लिली. काय झाले सांग मला." त्याने आग्रह धरला.

"सर, माझा मुलगा. वडिलांविना वाढलेला तो. त्याने आज फोन केला होता. रडत होता हो. वडील हवेत त्याला. कुठून आणून देऊ?" तिच्या डोळ्यांना पुन्हा धार लागली.

तो लहान आहे, पण तू मोठी आहेस ना. स्वतःला समजव. सावर स्वतःला." तिच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला. यावेळी त्याच्या मनात असा काही हेतू नव्हता, पण त्याच्या स्पर्शाने ती मोहरली.

"आता घरी जा. खूप उशीर झालाय." श्रीधर बाहेर पडत म्हणाला.

"हम्म." तिनेही तिची बॅग आवरली.

घरी आल्यावर एका तासानंतर श्रीधरचा मोबाईल वाजायला लागला.

"काय हे? मोबाईलमुळे नीट जेवण सुद्धा होत नाही." चित्रा त्याच्याकडे बघत म्हणाली.

"अगं आता मोबाईल म्हणजे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालाय. तसेही माझे जेवण आटोपलेय." हात धुवून त्याने मोबाईल घेतला. स्क्रिन वर झळकणारे नाव बघून त्याला आश्चर्य वाटले.

"बोल लिली, घरी नीट पोहचलीस ना?" त्याने विचारायचा अवकाश की तिचा हुंदका त्याच्या कानावर आला.

"लिली? ठीक आहे ना सगळं?" त्याच्या स्वरात काळजी.

"सर, काहीच ठीक नाहीये. मला घरी जायला कोणतेच साधन मिळाले नाही. माझे गाव खेड्यावरचे. इतक्या रात्री कोण सोडून देईल?" ती रडत होती.

"तू घरी गेली नाहीस तर मग आहेस तरी कोठे?" तो.

"आपल्या ऑफिसच्या बाहेर असलेल्या ऑटोस्टॅंड शेजारी आहे. सर, आता कुठे जाऊ मला काही कळत नाहीये हो." तिचा आवाज पुन्हा रडवेला झाला होता.

"काळजी करू नको, मी आलोच." गाडीची चावी घेत तो.

"श्रीधर? इतक्या रात्रीचा कुठे निघालास?" किचन आवरून बाहेर आलेल्या चित्राने त्याला विचारले.

"अगं, ऑफिसच्या एका स्टॉफचा प्रॉब्लेम झालाय. येतोच." म्हणून तो निघूनही गेला.

तो पोहचला तेव्हाही लिली रडतच होती. त्याने तिला शांत केले आणि मग एका हॉटेलवर तिची सोय करून तो घरी परत निघाला.


हॉटेलमधील रूमच्या बेडवर लिलीने अंग टाकले आणि एक स्फूट हसू तिच्या ओठावर आले.

"मिस्टर श्रीधर, आज मी इथे एकटीच आहे. लवकरच माझ्यासोबत तुम्हीसुद्धा इथे असाल. मोठ्याने हसून ती त्या मऊशार गादीवर लोळायला लागली.

******

लिलीची केलेली ही मदत त्यांच्या नात्याला नवे आयाम देणारी ठरणार होती. तिने तिच्या मुलाबद्दल त्याला सांगितल्यापासून मनात एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता. आता ऑफिसमध्ये आल्यावर केबिनमध्ये शिरताना तो मुद्दाम एक कटाक्ष तिच्याकडे टाकू लागला आणि तीही रोज स्मित करून त्याला प्रतिसाद देऊ लागली.

हळूहळू हा साद प्रतिसाद हॉटेलच्या रूमपर्यंत केव्हा पोहचला, श्रीधरला कळलेच नाही. दोघांच्यात जे झाले ते त्यांच्या मर्जीने होते. आजपर्यंत कित्येकीच्या गरजा त्याने भागवल्या होत्या. हीसुद्धा त्यातलीच एक असे समजून तो कपडे सावरत उठला.

"लिली, तुला हवे तर आज तू इथे राहू शकतेस. मी रूमचे पैसे पे केले आहेत. मला मात्र निघायला हवं." ती काहीच बोलत नाही हे बघून त्याने तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू होते.

"लिली, तू रडते आहेस? का? जे झाले ते दोघांच्याही मर्जीने ना?"

"सर, तुम्हाला नाही कळायचे." तळव्याने डोळे पुसत ती.
तो प्रश्नार्थक तिच्याकडे पाहत राहिला.

"मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिले आणि तेव्हाच तुमच्या प्रेमात पडले होते. तुमच्या मनात माझ्याबद्दल असलेली काळजी बघून सुखवले होते मी. आज तुम्हाला माझं सर्वस्व दिलेय. खरं सांगू मनातल्या देवाला फुल वाहिल्या सारखं वाटलं. प्रेमात पडलेय हो मी तुमच्या." तिचे बोलणे तो ऐकत होता. ती असे काही बोलेल असे त्याला वाटले नव्हते.

"लिली, आपल्यात जे झाले तो एक व्यवहार म्हणून समज. जमलं तर विसरून जा. हवे तर आपल्या दोघांनाही गरज होती म्हणून त्यातून हे घडले असे समज."

"हा असा विसरून जाण्यासारखा कोरडा व्यवहार नव्हता हो सर. मी या आठवणी जपून ठेवेन माझ्या हृदयात, कायम." ओठ रुंदावून ती म्हणाली.


घरी येताना तिचे बोल त्याच्या कानात गुंजत होते. 'कम ऑन श्रीधर, तुला असे कुठे गुंतायचे नाही आहे. जास्त मनावर घेऊ नकोस.' तो स्वतःला समजावत होता. पण लिली काही डोक्यातून जात नव्हती.

"जेवायला घेऊ?" चित्राच्या प्रश्नाने तो भानावर आला.
"अं? नको गं. मी बाहेरूनच खाऊन आलोय. तू तुझे आटोपून घे." बेडरूममध्ये जात तो म्हणाला.

आता ऑफिसमध्ये तो लिलीशी जास्त जवळीक साधत नव्हता. कामापुरता बोलायचा. तो असे वागेल हे ठाऊक होते तिला आणि त्याला जाळ्यात कसे ओढायचे हेही चांगलेच अवगत होते.


"सर, मला तुमच्याशी बोलायचे आहे. बाहेर भेटायला जमेल का?" दोन महिन्यांनी त्याच्या मोबाईल वर तिचा मेसेज आला.

काय झाले? मुलाचा काही प्रॉब्लेम झालाय का?" नेहमीच्या भेटण्याच्या ठिकाणी दोघे बोलत होते.


"नाही, तो तर होस्टेलवर आहे. त्याचे ठीक चाललेय."

"मग?"

"सर, मला जे सांगायचे आहे ते प्रॉब्लमॅटिक आहे की नाही माहित नाही, पण तुमच्याशिवाय इतर कोणाला सांगूही शकत नाही." ती शब्दांची जुळवाजुळव करत होती.

"बोल ना." श्रीधर.

"सर, मला दिवस गेलेत. तुमच्या भाषेत सांगायचं तर मी प्रेग्नेंट आहे." त्याच्या चेहऱ्यावर नजर रोखत ती म्हणाली.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******

🎭 Series Post

View all