दोन घडीचा डाव! भाग -१२

कथा एका विस्कटलेल्या डावाची!

दोन घडीचा डाव!

भाग -बारा.


ज्या तीव्रतेने तो स्वर हृदयात घर करत होता त्याच तीव्रतेने न पाहिलेल्या चित्राबद्दल त्याला दाटून येत होते.


काय झाले असेल तीचे पुढे? हा श्रीधर केवळ तिचा वापर करून घेत आहे हे कळल्यावर किती तुटली असेल? मनात असंख्य विचार येत होते. गालावर गरम, ओलसर काही जाणवले म्हणून त्याने एक हात गालाकडे नेला. त्याच्याच डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंचा तो स्पर्श होता. एका अनोळखी व्यक्तीसाठी डोळ्यातून पाणी वाहतेय हे बघून त्यालाच स्वतःचे आश्चर्य वाटत होते.

******

रात्री श्रीधरने पलंगावर अंग टेकवले. खोलीत असलेले इतर सहकारी कधीच निद्रेच्या अधीन झाले होते. याची झोप मात्र उडाली होती. हळूच उठून तो खिडकीजवळ गेला. बाहेर सुटलेला मंद वारा, खिडकीत डोकावणारी इवलीशी चंद्रकोर, मध्येच लुकलूकणारे तारे. तो एकटक आकाश डोळ्यात सामावून घेत होता.


'या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे..' चित्राला शेवटचे भेटायला गेल्यावर तिथून परत निघताना त्याच्या कानावर पडलेले सूर त्याच्या कानात गुंजत होते.


'चित्रा, तू शिकलीस या जगण्यावर प्रेम करायला. मला नाही ग जमत आहे ते. हरलोय मी. हा श्रीधर हरलाय त्याच्या आयुष्यात. कदाचित पहिल्यांदा. तू माझ्यापासून वेगळे व्हायचा निर्णय घेशील असे कधी वाटलेच नव्हते मला. पण घेतलीस तू फारकत. आणि जिंकलीस तू. पहिल्यांदा? की नेहमीच? माझ्याशी लग्न करून तुझे सधन घर सोडलेस आणि माझ्या अंधाऱ्या झोपडीत दिव्याची वात पहिल्यांदा तू तेवलीस, खरं तर तेव्हाच तुझी जिंकण्याची सुरुवात झाली होती. माझी नोकरी गेली तेव्हा स्वकष्टाने मला शिकायला पाठवून नवी नोकरी मिळायला मदत केलीस. आईचे दुखणेखुपणे केलेस. देवींची नोकरी, लग्न अन त्यानंतर माझ्या स्वप्नांची पूर्तता. तू प्रत्येकवेळी स्वतःला सिद्ध करत आलीस.


मला वाटत होतं की मी जिंकतोय. आयुष्यात सारे काही माझ्या मनासारखे घडतेय. मी आनंदी होतो. पण हे सर्व तुझ्यामुळे घडतेय हे सोयीस्करपणे विसरून जात होतो. माझ्या यशाचे प्रत्येक पाऊल हा डाव तू जिंकते आहेस याची साक्ष आहे, हे कळत नव्हते गं मला. आता कळतेय,आयुष्यभर जिंकतं आलीस ती तू. अन हरलो होतो तो केवळ मी. तू स्वाभिमानी करारी स्त्री आहेस हे विसरूनच गेलो होतो मी. लिली आयुष्यात आली आणि तुझ्या त्या करारी बाण्यानेच आपण विभक्त झालो.'


'आपण विभक्त झालो? नाही तू झालीस विभक्त. मी तर तुझा कधी होऊच शकलो नाही. तुच माझ्या प्रेमाच्या खोट्या जाळात अडकली होतीस आणि वेळ आल्यावर त्यातून बाहेर पडून वेगळी झालीस. कसे जमले हे तुला?' त्याच्या डोळ्यातील थेंब गालावर उतरू लागले होते.


अश्रू पुसून त्याने अलवार डोळे मिटले. पहिल्यांदा भेटलेली चित्रा त्याच्या डोळ्यासमोर आली. काळी सावळीशीच पण चेहऱ्यावर तेज असलेली. ' म्हणावी तेवढीही कुरूप नव्हतीस तू. कोणीतरी नक्कीच तुझ्या प्रेमात पडले असते अशी खचितच होतीस तू.' त्याचे ओठ उगाचच रुंदावले. आयुष्यपट पुन्हा एकदा झरझर डोळ्यसमोरून सरकू लागला.


चित्राचे सगळे आयुष्य श्रीधरच्या स्वप्नांच्या पूर्ततेत गेले. आता किमान उत्तरार्धात तरी एकत्र सुखाने राहू ही एकच तिची इच्छा होती. आपले एक घर असावे. स्वतःच्या मर्जीप्रमाणे ते सजवावे. तरुणपणात जमले नाही, किमान उतारवयात तरी एकमेकांच्या सोबतीने मस्त जगावे. रात्री हातात हात घेऊन आकाशातल्या चांदण्या मोजाव्यात. किती खुळचट आणि साध्या कल्पना होत्या तिच्या. शरीराने कुरकुर करणे सुरू केले होते. वयच ते. तिचे शरीर उतरवयात पदार्पण करतोय याची साक्ष द्यायला लागले होते.


श्रीधरचे मात्र तसे नव्हते. रिटायर्डमेंट झाले आणि त्याने दुसऱ्या नोकरीत स्वतःला झोकून दिले. एका नोकरीतून तो केवळ रिटायर्ड झाला होता. त्याचे मन, त्याचे शरीर नव्याने तारुण्यात पदार्पण करत होते. मुलं मोठी झाली होती, आपापल्या संसारात रमू लागली होती. आणि इकडे श्रीधरच्या सुप्त इच्छा डोके वर करायला लागल्या होत्या.


नवे शहर, नवे ऑफिस, नवे काम, नवा स्टॉफ! त्याला मुळात नवनव्या गोष्टी करायला, शिकायला फार आवड. या कामातही त्याने स्वतःला अगदी झोकून दिले. आयुष्याची नवी इनिंग सुरू झाली होती. तितक्याच दमदार आणि तडफदार वृत्तीने. आजवर असलेल्या नोकरीच्या प्रत्येक ठिकाणी त्याने आपले कर्तव्याचा ठसा उमटवला होता. नव्याने रुजू झालेल्या या ठिकाणी सुद्धा त्याच्या कामाच्या पद्धतीवर भाळणारे खूप जण होते. नवतरुणाला लाजवले असा त्याचा जोश होता. कपंनी त्याच्यावर खूष होती. कामाच्या चढत्या आलेखाबरोबरच त्याची पोस्ट देखील उच्च पदाला पोहचली होती. जळणारेही बरेच होते इथे पण त्यांना भीक घालणारा श्रीधर नव्हता. त्याचा एक वेगळाच वचक होता. इतक्या अनुभवी आणि हुशार असलेल्या त्याला गमावणे कंपनीला परवडण्यासारखे नव्हते.


आणि अशातच तिथे त्याला लिली भेटली. लिली.. नुकतीच पस्तीशी उलटलेली एक तरुणी. तरुणी कसली? पंधरा वर्षांच्या मुलाची आई. ती तिथेच एका ट्रेनिंग कोर्स साठी आलेली आणि येताक्षणीच श्रीधरच्या हृदयात एक दस्तक देणारी. तिच्यात आकर्षण वाटावे असे खूप काही नव्हतेच, पण तरीही तिने आपल्या अदेने श्रीधरला स्वतःकडे वळविण्यास भाग पाडले. श्रीधर तर त्याच वृत्तीचा होता, पण आजवर तिच्यासारखी कोणी भेटली नव्हती. आजवर त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया त्याने विचारल्यावरच त्याच्याशी नाते जोडायला तयार झाल्या पण ही जरा वेगळी होती. ही स्वतःहून नातं जोडायला बघू पाहत होती.


"सर, मी फार कठीण परिस्थितीत आहे हो. नवऱ्याने टाकले. आई बाबांनी हात वर केले. पदरात एक मुलगा.." बोलता बोलता तिने डोळ्याला पदर लावला.


"तर? मी तुझी काय मदत करू शकतो?" तोही श्रीधर होता. त्याच्या अवतीभोवती भिरभिरणाऱ्या या पाखरावर त्याची नजर तर गेली होती, पण आता स्वतःहून हात पुढे करायची काहीच गरज नव्हती.


"उद्या इथला ट्रेनिंगचा माझा शेवटचा दिवस. पण गावी परत गेल्यावर काय करू सुचत नाहीये. सर तुमच्या ओळखीने मला इथेच कुठे चिपकवले तर बरं होईल." तिच्या डोळ्यात अर्जव होते.


"मी?"

"सर प्लीज. तुमचा इथे किती मान आहे. एकदा माझ्याबद्दल बोलून बघा ना, प्लीज? प्लीज सर, मला छोटीशीही नोकरी मिळाली ना तरी पुरेसे आहे. तेवढेच पैसे मुलाच्या शिक्षणासाठी कामी येतील. तुमचे उपकार देखील मी आयुष्यभर विसरणार नाही. एकटी तरुण स्त्री, नोकरीच्या शोधात कुठे वणवण करू?" तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू उभे राहिले.


"हं, ठीक आहे. मी प्रयत्न करून बघतो. तू रडू नकोस. रडताना छान दिसत नाहीस." मिश्किल हसत तो तिथून निघून गेला.


तो निघून गेला तसे गालावर आलेले अश्रू तिने पुसून काढले. ओठावर छद्मी हसू पसरले होते. 'रडताना मी सुंदर दिसत, हे मला ठाऊक आहे. पण या अश्रुंच्या साथीने तुम्हाला कसे जाळ्यात अडकवणार, बघाच तुम्ही. लिली आहे मी. अशा पैशेवाल्यांना गाठणे हेच तर माझे काम आहे.' आपली भुवई उडवत ती मनात हसत होती.


*****

"सर, मी आत येऊ?" दुसऱ्या दिवशी श्रीधरच्या केबिनच्या दारात लिली अदबीने उभी होती. त्याने इशाऱ्यानेच तिला आत बोलावले.


"सर, काल मी कामाबद्दल बोलले होते, त्या विषयी बोलायचे होते." ती.


"हम्म. मी मोठया साहेबांच्या कानावर शब्द टाकलाय. बहुतेक पुढच्या आठवड्यापासून तू रुजू होऊ शकतेस." तो काम करता करता बोलत होता.


"ओह माय गॉड पुढच्याच आठवड्यात? कुठे?" तिच्या आवाजात आनंद मावत नव्हता.


"इथेच, याच ऑफिसमध्ये." तिच्याकडे स्मित करत तो म्हणाला.


"काय? तुमच्या हाताखाली? ही तर खूपच मोठी गोष्ट आहे. आय एम सो लकी सर. थँक यू, थँक यू सो मच." तिने त्याचा हात हातात घेतला.


तिच्या त्या अनपेक्षित स्पर्शाने श्रीधरच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. त्याने चमकून तिच्याकडे पाहिले.


"सॉरी सर, ते भावनेच्या भरात चुकून झाले. सॉरी आणि थँक यू." ती गोंधळून जायला निघाली.


"लिली." दाराजवळ पोहचत नाही तोच त्याच्या आवाजाने ती थबकली.


"घरी परत जाण्यापूर्वी तुझा अर्ज काउंटरवर जमा करून घे." कामात गढल्याचे आव आणत लॅपटॉपवर बोटं चालवत तो म्हणाला.


"हो सर, थँक यू सर." ती हसतच बाहेर पळाली.


ती गेली आणि श्रीधरने लॅपटॉपमध्ये घुसलेली मान वर केली. त्याच्या ओठावर एक वेगळेच हास्य उमटले होते.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

******

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all