दोन घडीचा डाव! भाग -११

कथा एका विस्कटलेल्या डावाची!

दोन घडीचा डाव!

भाग -अकरा.


"प्रेमात पडलो होतो खरं, पण यावेळी मी कुण्या सजीव माणसांच्या नाही तर त्या निर्जीव वास्तूच्या प्रेमात पडलो होतो. तिथल्या खेळीमेळीच्या वातावरणाच्या प्रेमात पडलो होतो. हे असं मी कधी अनुभवलंच नव्हतं. नंतर मला रघुबद्दल कळलं की त्याचे प्रेमप्रकरण सूरू आहे आणि त्याच्या बहिणीच्या लग्नाशिवाय तो पुढे काही करू शकणार नाही. कोणास ठाऊक का पण मित्राच्या त्या अडचणीचा फायदा उचलायचे मी ठरवले."

"कसला फायदा?" श्रीनयच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.


"चित्राचे वडील तिच्यासाठी स्थळ शोधत होते. अजून एकाही मुलाशी जुळले नव्हते. मला हे कळल्यापासून मी मुद्दामच त्यांच्या घरी चकरा मारू लागलो. रघू असताना आणि नसतानाही. तिच्या बाबांचा हळूहळू विश्वास संपादित केला. कारण मला ठाऊक होतं, ती त्यांच्या शब्दाबाहेर जाणारी मुलगी नाहीये. आता त्या घरात मी बऱ्यापैकी रूळलो होतो. रघुला सांगून टाकलं की मला चित्राशी लग्न करायचे आहे आणि लगेच त्याच्या वडिलांना तिचा हातही मागितला."


"पण ती तर तुमच्यापेक्षा मोठी.."


"मोठी होती त्याचाच तर फायदा घ्यायचा होता मला. माझ्यापेक्षा मोठी असूनही मी तिच्या प्रेमात कसा आकंठ बुडालोय हे मला पटवून द्यायचे होते. तिच्या वडिलांकडून हिरवा कंदील मिळाल्यावर प्रेमात वयाचं कसलं बंधन नसतं हे तिच्या गळी उतरवण्यास मी यशस्वी झालो. त्या बयेला खरंच वाटलं की मी तिच्या प्रेमात आहे." तो छद्मीपणे हसला.

"प्रेम! तिला काय माहित की प्रेम कशाशी खातात ते? आणि मुळात तिच्या प्रेमात पडण्यासारखं होतं तरी काय? मी असा गोरापान, ती अशीच काळी सावळी. नुकताच एकविसाव्यात प्रवेशणारा मी आणि ती तर माझ्यापेक्षा मोठी. नाही म्हणायला एक करारीपणा होता तिच्या स्वभावात. मन निर्मळ, शुद्ध होते तिचे. पण मला प्रेम करायला मन नाही तर केवळ शरीर हवे होते." त्याने क्षणभर थांबून पाण्याचा घोट घेतला.


"ही फसवणूक होती हो बिचाऱ्या चित्राची. ती तर तुमच्या अध्यात ना मध्यात होती. का तिचा बळी दिलात? तिला हे कळल्यावर काय झाले असेल?" कधी न पाहिलेल्या चित्राबद्दल त्याच्या मनात वाईट वाटत होते.


"ती माझ्यासाठी केवळ एक प्यादं होती. आणि मी तरी तिला कुठे कळू दिले होते याबद्दल? ती तर भ्रमात होती ना की मी प्रेम करतोय म्हणून? डॉक्टर, तुम्हाला सांगू? तिच्यात आणखी एक गुण होता. ती खूप स्वाभिमानी होती. कदाचित म्हणूनही मी तिच्याशी लग्न केले असेल. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती कायम माझ्या सोबत राहील हा विश्वास होता मला. लग्न होऊन गरिबीचे ठिगळ लावलेल्या माझ्या छोट्याश्या घरात ती आली ना, तेव्हा एकवार तिलाही प्रश्न पडला असेल की अशा भणंग तरुणाशी का तिचे लग्न लावले असावे? पण त्या प्रश्नाने डोक्यात घर करून राहण्यापूर्वीच तिने त्याला बाहेर काढले आणि माझ्या बेरंगी आयुष्यात रंग भरायला सुरुवात केली."


बोलता बोलता मग त्याने त्याची नव्या शहरातील नोकरी, तिथले आयुष्य, अन त्यानंतर झालेली बडतर्फी हेही सांगून टाकले.


"खूप उद्विग्न झालो होतो मी. पार खचलो होतो तेव्हा. तेव्हा मला चित्राचीच एकमेव साथ होती. त्या कठीण परिस्थितीत आई देखील नीट वागत नव्हती. आणि चित्रा? तिने एकहाती घर सांभाळून मला आणि देवीला पुढे शिकायला प्रोत्साहन दिले. दोन वर्ष नवऱ्यापासून दूर, पदरात तीन लहान लेकरं, दुस्वास करणारी सासू आणि आपल्याच गोशात वावरणारी नणंद. पण तरीही न डगमगता ती ठाम राहिली. स्वाभिमाने स्वतः आणि आम्हालाही जगवत राहिली."


"तरीही तुम्ही तिच्याशी प्रतारणा केलीत? शीट आता मलाच माझा राग येऊ लागलाय. तुमच्यात मी माझ्या आजोबांना का शोधतोय तेच कळत नाहीये." श्रीनयच्या चेहऱ्यावर राग झळकू लागला होता.


"प्रतारणा.." श्रीधर हसला जरासा. "तिला कुठे ठाऊक होतं मी प्रतारणा करतोय ते? खूप विश्वास होता तिचा माझ्यावर. आणि तो विश्वास तसाच राहवा म्हणून मीही सतत प्रयत्नशील राहिलो. एखाद्या स्त्रीने माझ्याकडे पहिलं, कुणाचा धक्का लागला तरी त्या गोष्टी मी तिला सांगायचो. आपला नवरा कसा भोळा, देवमाणूस आहे असे तिला वाटायचे. माझ्यावर ती कधी अविश्वास दाखवू शकलीच नाही. उलट जर माझ्याबद्दल कोणी तिला सांगण्याचा प्रयत्न केला तरी माझ्यासाठी ती दुसऱ्यांशी भांडायला तयार होती."


"मग राहू द्यायचे होते ना तिला त्याच भ्रमात. का तो भ्रमाचा भोपळा फोडलात?" श्रीनयच्या डोळ्यात दुःख होते.


"पापाचा घडा फुटतोच की आपोआप. तसेच काहीसे माझ्या बाबतीत झाले. पण त्या आधी खूप काही घडून गेले. मला परत नोकरी लागली. देवीचे लग्न झाले. देवी तर आईलाही मदतीला म्हणून आपल्यासोबत घेऊन गेली. चित्रा असताना साधा चहाचा कप सुद्धा न विसळणारी माझी आई देवीकडे मात्र सर्व काम करायची. मला वाटलं देवी सासरी गेलीय, आईही नाहीये. काही जबाबदाऱ्या अंशता पूर्ण झाल्यात. आता जरा सवड आहे, तर मी पाहिलेली स्वप्न पूरी करू देत."


"कसली स्वप्न?" श्रीनय.


"ठेकदाराचे घराणे होते आमचे. अख्खे गाव आम्हाला सावकार म्हणून ओळखायचे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय बाबाने मोडीत काढला. दारूच्या व्यसनापोटी सगळी इस्टेट घालवून बसले. मला एकच ध्यास होता, जे त्यांनी गमावले ते परत मिळवायचे. चित्राही माझ्या स्वप्नांना आपली स्वप्न मानून माझ्या सोबतीने चालू लागली आणि त्यात सर्वात प्रथम बळी गेला तो तिच्याच भावनांचा." श्रीधरने त्याच्याकडे पाहिले.


"म्हणजे?" त्याच्या डोळ्यात बघत श्रीनय.


"नवी जमीन विकत घ्यायची म्हणून मी तिच्या बाबांनी तिला दिलेली जमीन विकायला काढली. माहेरच्या जमिनीत तिच्या भावना, तिचे मन गुंतले असेल असा विचारही कधी मला शिवला नाही. स्वार्थी झालो होतो मी. तिने केवळ एकदाच विरोध केला आणि मी माझ्या मतावर ठाम असलेला बघून तीही तयार झाली. तिच्या मनावर बसलेला हा कितवा आघात होता कोणास ठाऊक? पण तिने ते दुःख चेहऱ्यावर कधीच दाखवले नाही."


"शी इज सिम्पली ग्रेट." श्रीनय.


"डॉक्टर एक सांगू? इतकेही ग्रेट राहू नये हो. तिने स्वतःसाठी म्हणून कधी स्टॅंड घेतलाच नाही. माझ्यात पूर्णपणे सामावून घेतलं होतं स्वतःला. ती आणि मी वेगळे आहोत असे तिला कधी वाटलेच नाही. हीच तिची भूमिका तिलाच घातक ठरली."


"ती तुमच्यावर प्रेम करायला लागली होती आजोबा, तुम्हाला का कळले नाही?" श्रीनय.


"प्रेम आंधळे असते म्हणतात. तिने खरंच डोळ्याची झापडं बंद करून माझ्यावर प्रेम केलं. मी म्हणेन ते सर्व तिला पटायचे. स्वतःच्या मर्जीने ती कधी जगलीच नाही. तिचे जगणे केवळ माझ्यासाठी, माझ्या स्वप्नांसाठी होते."

"मी माझ्या स्वप्नात पार बुडालो होतो. जे करतोय ते चूक की बरोबर याची पर्वाच नव्हती. हळूहळू जमिनी घेण्याचा सपाटाच सुरू केला मी. वेळप्रसंगी कर्ज काढले, कर्जबाजारी झालो पण बापाने जे गमावले त्याच्या दुप्पट जमीन जेव्हा माझ्या नावावर जमा झाली तेव्हाच तो वेडेपणा मी थांबवला. आता पैसा हातात खेळू लागला होता. भरपूर इस्टेट जमा केली होती. एक मुक्त पाखरू झालो होतो मी. आणि त्यासोबतच एक गुर्मी अंगावर चढू लागली होती." श्रीधरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले होते.


टिंग टिंग टिंग…


जेवणाच्या घंटीचा आवाज झाला तसा श्रीनय तंद्रीतून बाहेर आला. "आजोबा, सात वाजलेत. तुम्ही जेवायला जा. मलाही घरी निघावे लागेल. आई वाट बघत असेल. पुन्हा भेटलो की बोलू पुढे." तो उठत म्हणाला.


कार चालवत असताना त्याला डोके खूप जड आल्यागत वाटत होते. बाहेरच्या ट्रॅफिकच्या आवाजाने पुन्हा ते ठणकायला लागले. खिडकीच्या काचा बंद करून त्याने एसी चालू केला. नेहमीच एफएम वर गाण्याचा आस्वाद घेणारा तो एफ एम सुरू करताच सलमा आगाचा आर्त स्वर कानावर आरुढ होऊ लागला.


   'हर एक पल को ढुंढता 

    हर एक पल चला गया

    हर एक पल फिराक का

    हर एक पल विसाल का 

    हर एक पल गुजर गया 

    बना के दिल पे इक निशां 

    सुना रहा है ये समा, सुनी- सुनी सी दास्ता

    फजा भी है जवा - जवा..'


ज्या तीव्रतेने तो स्वर हृदयात घर करत होता त्याच तीव्रतेने न पाहिलेल्या चित्राबद्दल त्याला दाटून येत होते.


काय झाले असेल तिचे पुढे? हा श्रीधर केवळ तिचा वापर करून घेत आहे हे कळल्यावर किती तुटली असेल? मनात असंख्य विचार येत होते. गालावर गरम, ओलसर काही जाणवले म्हणून त्याने  हात गालाकडे नेला. त्याच्याच डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंचा तो स्पर्श होता. एका अनोळखी व्यक्तीसाठी डोळ्यातून पाणी वाहतेय हे बघून त्यालाच स्वतःचे आश्चर्य वाटत होते.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

******

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all