दोन ध्रुवांचे आपण दोघं

वेगळेपण
दोन ध्रुवांचे आपण दोघं

गडगडणारा मेघ सख्या तू
झरझरणारी सर ती मी
उग्र असा तू सागर असता 
संथ वाहती सरिता मी

नभांगणीचा वासरमणि तू
कुमुदिनीच मी वसुधेची
आकाशाचा पूर्ण चंद्र तू
मंद ज्योत मी धरतीची

तू कवितेतुन दु:ख मांडतो
व्यथा सांगतो दुनियेच्या
माझी कविता हसे बागडे
झुल्यात झुलते सृष्टीच्या

तू रागातिल वादी स्वर नी
मी वर्जित स्वर रागाचा
राग मालिका बेसुर होते
जरा स्पर्श होता त्याचा

मंगल ग्रहचा तू रहिवासी
शुक्र ग्रहाची मी बाला
दोन ध्रुवांचे अंतर मिटवा
हे जमले ह्या काळाला

आपण होतो दूर दूर रे
तरी भेटलो इथे कसे?
प्रेमरसाचा प्याला पीता
अंतर मिटले पूर्ण असे


© राधा गर्दे
  कोल्हापूर