दोन ध्रुवांवर दोघे आपण... कविता

Don Dhruvanvr


इरा जिल्हास्तरीय स्पर्धा
फेरी.... कविता
विषय.. दोन ध्रुवांवर दोघे आपण
कवितेचे नाव... दोन ध्रुवांवर
संघ मुंबई

दोन ध्रुवांवर खेळ मांडला

कार्यालयाचे काम करता करता
येता मनी विचार असा माझीया,
मी इकडे दबलो फाईली पाठी
तू निजे मऊ मऊ उशीवरी


बॉस माझा चिडे निरंतर
तू काढे झोपा अंवातर
कमावे मी चार आणे
खर्च करावे तू आठ आणे

तू मारे गप्पा आई सोबत सतत
मी ऐके शिव्या सांहेबांच्या मन मारत
तू रिचवे कप चहाचे खाऊन खारी बिस्किटे
ऑफिसमध्ये घेऊनी ब्रेक मी मारे सिगरटचे सुट्टे


तुला असे आरामात जगतांना ,
वाटे मजला जन्म तुझा सुखाचा
असावे तूच परी महाराणी सदा
नको जन्म नवरोबाचा सदा ओझी वाहण्याचा

घरकाम वाटे मजला खूप सरळ सोपे
परि तू जाता माहेरी कळे किती कठीण ते
धुऊनी कपडे कंबर मोडले
आवरूनी पसारा डोके भिरभिरले


मी जरी उंदडत असे सतत बाहेरी
तूच बनवी माझे आलय महलापरी
तू नसताना आठवे मजला स्मित तुझे
तुझ्या डोळ्यात दडले कष्टांचे आसवे

मी शीण ताण घेऊनी येई घरी
परी तू न रूसता मजसाठी अमृताचा प्याला करी.
तुझे मधुर शब्द करी गुंजन
मी मात्र करे सदा चिडचिड भजन

आपुलकीने मज विचारते सदा
दिवस कसा गेला तुमचा
परी माझ्या मुखी बोल कधी न येई
सखे तू ही जरा विश्रांती घे कशी

रिचवता कँन्टीनचे बेचव अन्न
आठवुनी नीर येता नयनी
तुझ्या हातचा साधा मऊ भात
तृप्ती तेव्हा न जाणली तुझ्या हातची

आता तू नसताना जवळी
केली उजळणी तुझ्या अवगणुंची
पर माझे मन न देई साथ मजला
काढाया उकळीपाकळी दुर्गुणाची तुजला

साजणी साथ तुझी हिमालयाची
असता जवळी संकटे वाटे मिराएवढी
तू कधी ना तक्रार करे
मी मात्र सुर सदा तक्रारीचा काढे.


आता सोड हा रुसवा सारा
तरी तुझ्याविना मी अधुरा
दोन ध्रुवांनी खेळ मांडीला संसाराचा
चल सखे ये परतुनी आवर हा पसारा

©®अनुराधा आंधळे पालवे