दोन ध्रुवांवर दोघे आपण ...

दोघांनाही भेटायचे आहे पण अंतर काही मिटत नाही


शीर्षक - दोन ध्रुवांवर दोघे आपण

विषय - दोन ध्रुवांवर दोघे आपण 

फेरी - राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा 



ओळख होती जुनीच आपली , शब्द निघे अलवार ओठी
शोधे नजर चहूकडे तुज , नित्य आता या गाठीभेटी


कैफ त्या तेजाचा हा बघ , पौर्णिमेची शुभ्र चांदणी
वाऱ्या संगे सुवास भिनला , फुलुन आल्या कळ्या अंगणी

शुभ्र फुलांचा गजरा द्यावा , गंध भोवती असा असावा
बहर जरी तो नसे फुलांचा , भास मजला तुझाच व्हावा

सोडून जाती मागे आता , हरवूनी ओल्या हिरव्या वाटा
मनास खोल टोचतो माझ्या , आठवणींचा बोचरा काटा

शब्दांच्या कुंचल्यात कैद ते , क्षण रिकामे हाती येती
दुःख कवटाळूनी उराशी , ओल्या जखमा सुकून जाती

मिटल्या पापण्यांत आता , प्रतिबिंब मजला तुझे दिसावे
शेवटचे आवडते माझे , रोजनिशीचे पानं असावे

चमकूनी दिसे सगळ्यांमध्ये , नभातील तो शुक्रतारा
श्वासांनी आवरते आता , आठवणींचा हा पसारा

प्रेमात तुझ्या मी पार बुडाले , मीच हरवले माझे मी - पण
मिटेल का दोघांतील अंतर , दोन ध्रुवांवर दोघे आपण


सौं तृप्ती कोष्टी

जिल्हा - सांगली , सातारा